क्षण ‘युरेका’चा (डॉ. वीरेंद्र ताटके)

डॉ. वीरेंद्र ताटके, पुणे
रविवार, 2 जुलै 2017

भिंतीवरचं ‘घड्याळ’

भिंतीवरचं ‘घड्याळ’

ही  गोष्ट साधारणतः पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची आहे. त्या वेळी शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मनगटावर घड्याळ नसायचं, किंवा मोबाईल फोन नसायचे.  त्यामुळं वर्गातला तास सुरू झाला, की तो संपण्यासाठी शिपाईकाकांच्या घंटेची वाट पाहायला लागायची. एखादा तास एवढा कंटाळवाणा व्हायचा, की तो कधी संपतो याची सर्व विद्यार्थी वाट पाहायचे. मग उगाचच वर्गातल्या भिंतीकडं बघ, फळ्याकडं बघ, खिडकीतून बाहेर डोकावून बघ असे उद्योग सुरू व्हायचे. यातून दिलासा देणारा क्षण आम्हा मुलांना अचानक सापडला. एके दिवशी पहिला तास संपल्यासंपल्या वर्गाच्या छतावरच्या पत्र्याच्या फटीतून भिंतीवर पडलेल्या सूर्यकिरणावर एका मुलानं रंगपेटीतल्या खडूनं खूण केली. दुसऱ्या दिवशी पहिला तास संपायच्या वेळी बरोबर सूर्यकिरण पत्र्याच्या फटीतून त्या खुणेवर आले आणि तास संपायची घंटा झाली. शिक्षक वर्गाबाहेर पडल्यानंतर सर्व विद्यार्थांनी एकच गलका केला. आम्हा सर्वांसाठी तो ‘युरेका’ क्षणच होता.

त्यानंतर वर्गातली उत्साही मंडळी कामाला लागली. त्या दिवशी प्रत्येक तास संपल्यानंतर भिंतीवर सूर्यकिरण जिथं पडले, तिथं खुणा केल्या गेल्या आणि आमचं भिंतीवरचं ‘घड्याळ’ तयार झालं. त्यानंतर एकही तास मुलांना कंटाळवाणा झाला नाही. याचं कारण म्हणजे एखादा तास कंटाळवाणा झाला, की बहुतेक सर्वजण भिंतीवरच्या त्या घड्याळाकडं डोळे लावून बसायचे. त्यातही गंमत अशी होती, की वर्गातला फळा याच घड्याळ्याच्या भिंतीवर होता. त्यामुळं वर्गातली वात्रट मंडळी फळ्याकडं बघत आहेत, की भिंतीकडं टक लावून बसली आहेत, याचा पत्ता शेवटपर्यंत कोणत्याही शिक्षकांना लागला नाही. निसर्गनियमानुसार ऋतू बदलला, की सूर्यकिरणं पडण्याची जागा उजवी-डावीकडे व्हायची, त्यामुळं मुलांनीसुद्धा वर्गातल्या त्या भिंतीवर बदललेल्या  ठिकाणी खुणा केल्या होत्या. ‘संकटकाळी’ हे निसर्गाचं घड्याळ आम्हा सर्वांना फारच मदत करायचं. विशेषतः गणित आणि विज्ञान या विषयांचे शिक्षक एखाद्या तासात एक अवघड धडा संपवून तास संपतासंपता पुढचा धडा सुरू करू पाहायचे, तेव्हा वर्गातला एखादा भिडू भिंतीवरच्या घड्याळाचा अंदाज घेत एखादी शंका विचारून दहा-पंधरा मिनिटं ‘बॅटिंग’ करायचा आणि नवीन धडा काही सुरू नाही व्हायचा! त्या भिडूला जेवणाच्या सुटीत संपूर्ण वर्गाच्या डब्यातून पार्टी असायची, हे वेगळं सांगणं नको. एखादे दिवशी मात्र आभाळ असेल, तेव्हा हे आमचं भिंतीवरचं घड्याळ गायब व्हायचं आणि सगळा वर्ग खट्टू व्हायचा. आजही एखाद्या जुन्या खोलीच्या पत्र्यातून भिंतीवर पडलेले किरण पाहिले, की त्या भिंतीवरच्या घड्याळाची आठवण येते.

Web Title: ureka article in saptarang