esakal | वाचनानं जगणं समृद्ध झालं
sakal

बोलून बातमी शोधा

Reading

ग्रंथप्रभाव
पुस्तकांनी आयुष्य बदलतं. अशा विविध पुस्तकांमुळे वाचकाला नवनवे मार्ग सापडतात. आयुष्य घडवणाऱ्या अशाच पुस्तकांविषयीचं हे साप्ताहिक सदर

वाचनानं जगणं समृद्ध झालं

sakal_logo
By
ऊर्मिला मातोंडकर saptrang@esakal.com

माझं शालेय शिक्षण मराठीतून झालं. त्यामुळं लहानपणी मराठी पुस्तकं अधिक वाचली. तेव्हा आमच्या घरी कॉमिक्‍स किंवा अन्य गोष्टींची पुस्तकं नव्हती. त्यामुळं तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं पुस्तकं ज्याला म्हणतात तीच वाचली. मराठीतले माझे आवडते लेखक अर्थातच सगळ्यांचे लाडके पु. ल. देशपांडे. त्यांच्यासह जयवंत दळवी, रणजीत देसाई यांच्या कादंबऱ्यांनी मला जगण्याची दृष्टी दिली. रत्नाकर मतकरी, जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांमध्ये रमले. या सगळ्यांमध्ये कठीण लेखक म्हणजे जीए. सुरुवातीला ‘जीए’ ची पुस्तकं माझ्या डोक्‍यावरूनच जायची. त्यामुळं त्यांची पुस्तकं खूप उशिरा वाचली. ‘ जंगल'' चित्रपट करीत असताना ‘हिरवे रावे’ हे पुस्तक मकरंद देशपांडे वाचत होता. ते माझ्या हातात आलं, वाचून काढलं. जीएंची पुस्तके आपण जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा तेव्हा त्यातील विविध अर्थ वेगवेगळ्या वेळी उलगडत जातात.

सप्तरंगमधील आणखी दर्जेदार लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मला अजूनही आठवतं, माझी दहावीची परीक्षा संपली आणि त्या आनंदात मी रात्री बसून ‘श्रीमान योगी'' ही मोठी कादंबरी सकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत पूर्ण वाचून संपवली. हे सगळे वाचन करीत असतानाच मला आपले आयुष्य किती मोठं आणि विशाल आहे याचं दर्शन झाले. महाविद्यालयात जाऊ लागले आणि साहजिकच इंग्रजी साहित्याकडे वळले. तिथं सुरुवात रशियन साहित्याने केली. तेव्हा रशियाकडून भारताला अनुदान मिळायचं. त्यामुळं रशियन पुस्तकं मराठी आणि इंग्रजीत अनुवादित व्हायची. ती अत्यंत कमी किमतीत मिळायची. त्यामुळे थोर रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय, मॅक्‍सिम गोर्की, आंतोन चेखाव, फ्योदोर दोस्तोयेव्हस्की यांनी रशियन क्रांतीच्या काळात लिहिलेली अनेक पुस्तके मी वाचली. माझ्या अभ्यासाचा विषय इंग्रजी साहित्य हा होता. त्यामुळं डी. एच. लॉरेन्स यांसारखे काही इंग्रजी लेखक आम्हाला अभ्यासाला होते. त्यामुळं त्यांची पुस्तकं मी वाचायचेच. अभ्यासाव्यतिरिक्त माझे वाचन अधिक होते. प्रत्येक पुस्तक आपल्याला काही तरी देत असते. आपल्या आयुष्यात एक पायरी पुढं टाकण्यास या पुस्तकांची मदत होते. त्यामुळे वाचनाचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी चित्रपटसृष्टीत काम करू लागले त्या वेळी इंग्रजी बेस्ट सेलर नॉव्हेल्स वाचायला सुरुवात केली. स्टीफन हॉकिंग यांसारख्या बेस्ट सेलर अमेरिकन लेखकांची पुस्तकं वाचली; मात्र त्याकाळात गंभीर वाचन थोडं कमी होऊ लागले. कारण चित्रीकरणाच्या अधेमधे वाचन करावे लागायचे. आतापर्यंत अनेक कथा-कादंबऱ्या, प्रवास वर्णने, व्यक्तिचित्रणं असं विविधांगी वाचन केले. प्रत्येक पुस्तकातून काही तरी शिकले आहे. आपलं आयुष्य जसं वेगवेगळ्या ढंगाचं असतं तसं वाचनही वेगवेगळ्या प्रकारचं असलं की खूप मजा येते.

आता लॉकडाऊनच्या काळात मी नॉनफिक्‍शन पुस्तकं खूप वाचली. अमर्त्य सेन यांचं "द आर्ग्युमेन्टेटिव्ह इंडियन'' वाचले. आपण कसे बदलत गेलो... समाज कसा बदलत गेला... हे सगळे या पुस्तकात आहे. आता पूर्वी वाचलेले प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘माझी जीवनगाथा'' पुन्हा वाचायचं आहे. फार पूर्वी याचं वाचन केलं आहे. वाचनामुळे आपण प्रगल्भ होतोच, शिवाय आपले आयुष्य समृद्ध होतं. मला आताच्या पिढीला विशेष करून पालकांना एकच विनंती आहे, की आपल्या पाल्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करा. त्यांना व्हिडिओ गेम्स वगैरेंपासून दूर ठेवण्याचा अधिकाधिक प्रयत्न करा.

अलीकडे मी एका डेन्टिस्टकडे गेले होते. बाहेर आले तर दोन छोट्या मुली बसलेल्या होत्या आणि त्यांच्या हातात पुस्तके होती. त्या दोघीही त्या पुस्तकात खूप हरवल्या होत्या. मला खूप आनंद झाला. ट्विंकल खन्नाने मध्यंतरी एक ट्विट केले होते आणि त्यात तिने म्हटले होते, की तिच्या मुलीला वाचनाची खूप आवड आहे. आजच्या मुलांना वाचनाची आवड आहे हे पाहून मला खूप बरे वाटले. मुलांना काही ना काही वाचायला दिलं पाहिजे. त्यांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे. वाचनातून मिळालेले विचार आयुष्यात खूप पुढे घेऊन जाणारे असतात. हा वाचनाचा पाया बालपणातच रचायला हवा. तो मजबूत असला की माणूस उत्तुंग भरारी घेऊ शकतो. जगणं समृद्ध आणि प्रगल्भ होते.
(शब्दांकन : संतोष भिंगार्डे)

Edited By - Prashant Patil

loading image