

Artificial Intelligence Global Race
esakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर - saptrang@esakal.com
चीन आणि अमेरिकेची तुलना करताना अमेरिका अजूनही संशोधन, मूलभूत नवकल्पना आणि अत्याधुनिक ‘एआय’ मॉडेल्समध्ये आघाडीवर आहे. साध्या भाषेत सांगायचं, तर अमेरिका अनेकदा नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावते, तर चीन ते तंत्रज्ञान प्रचंड वेगानं आणि प्रचंड प्रमाणावर वापरून स्वस्त करून दाखवतो. पण आता चीन संशोधनात सुद्धा प्रचंड वेगानं प्रगती करतोय. अनेक लोक अजूनही अमेरिकेला तंत्रज्ञानात एकमेव सुपरपॉवर समजतात पण परिस्थिती वेगळी आहे.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेल्या १०-१५ वर्षांत जगात सर्वांत मोठी स्पर्धा जर कोणामध्ये सुरू असेल, तर ती अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये आहे. एकेकाळी अमेरिका ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबॉटिक्स, सेमिकंडक्टर्स, इंटरनेट आणि सॉफ्टवेअर या सगळ्या क्षेत्रांची निर्विवाद नेता मानली जायची. पण आता चीन इतक्या वेगानं पुढे येतो आहे, की अनेक क्षेत्रांत तो अमेरिकेला थेट टक्कर देतो आहे, तर काही क्षेत्रांमध्ये त्यानं आघाडीही घेतली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अमेरिकेकडे अजूनही खूप मोठी ताकद आहे. कारण जगातल्या अनेक मोठ्या ‘एआय’ कंपन्या अमेरिकेत आहेत. उदाहरणार्थ ओपन ए आय, गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि अँथ्रो्पिक या कंपन्यांनी जनरेटिव्ह एआय मध्ये मोठी झेप घेतली आहे. चॅटजीपीटी, जेमिनी, क्लॉड यांसारखी मॉडेल्स अमेरिकेत विकसित झाली. पण चीनही मागे नाही. चीनमध्ये बायडू, अलीबाबा, टेनसेन्ट आणि डीपसीक यांच्यासारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर ‘एआय’ विकसित करताहेत. विशेषतः डीपसीक या कंपनीनं कमी खर्चात शक्तिशाली ‘एआय’ मॉडेल तयार करून जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.