
घुबडांचं शहर (उत्तम कांबळे)
त्या नवतरुणीला घुबड आणि गिधाड यातला फरक कळत नसावा, असं मला वाटलं...पण असं जरी असलं तरी तिनं व्यक्त केलेली त्यासंदर्भातली वेदना अस्सल असावी. वास्तव असावी. सगळं शहर ‘घुबडां’नी भरलंय आणि त्यांच्या नजरा आपण जिथं जाऊ तिथं आपला पाठलाग करत आहेत, आपल्या सर्वांगाचा वेध घेत आहेत असं तिला वाटणं हे नक्कीच दु:खद आहे. तारुण्यात पाऊल ठेवलेल्या मुलीला असा अनुभव येणं हे सभ्य समाजाचं लक्षण नक्कीच नाहीय.
कें द्र सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेला एक कर्मचारी अलीकडं फिरायला माझ्याबरोबर असतो. निवृत्त कर्मचाऱ्यांचं एक बरं असतं, की निवृत्तीनंतर खूप गतीनं ते आपलं सामाजिकीकरण करण्यात गुंतलेले असतात. याउलट सेवेतल्यांचं असतं. माणूस दिसला की यांना त्रास होतो. निवृत्तीनंतर हे कर्मचारी मोठ्या हिरीरीनं समाजात मिसळतात. आपल्या भागात कोणत्याही कार्यक्रमास सगळ्यात अगोदर जातात. शोकसभा असली, की सगळ्यात अगोदर आणि जास्त बोलत राहतात. धार्मिक कार्यक्रमात हेच आघाडीवर. मुला-बाळांची लग्नं असतात. वेळ भरपूर असतो. स्वाभाविकच ही सगळी मंडळी निवृत्तीनंतर अधिक वक्तशीर बनतात. शिलकीतली ऊर्जा वापरून चपळही बनतात. ...तर आम्ही दोघं छत्री घेऊन पावसातच चालत होतो. अर्धाएक तास चालत राहिल्यानंतर याला कुणीतरी समोर ओळखीचं दिसलं. हा त्याच्याशी काहीतरी बोलणार तेवढ्यात समोरचाच एकजण मागं वळून याला म्हणाला : ‘‘अहो, कुणीतरी त्या नगरसेवकाला सांगत का नाही?’’
हा : ‘‘काय सांगायचं रावसाहेब?’’
तो : ‘‘काय म्हणजे? चार दिवसांपासून माझ्या दारात पाणी साचलंय. घरात जाता येत नाही. वाहन लावता येत नाही. नातवांना शाळेसाठी बाहेर काढताना किती त्रास होतो. त्यातच एखादं वाहन जोरात गेलं की पाणी थेट आमच्या घरात उडून येतं. बाप रे बाप...नसती कटकट! स्मार्ट सिटी बनवणाऱ्यांना दिसत नाही का हे?’’
माझ्याबरोबरचा हा थोडा शांतच होता. बोलणारा माणूस खूप मोठ्या पदावरचा म्हणजे सुपर क्लासवन अधिकारी होता. विशेष म्हणजे, बांधकामाच्या एका कोणत्या तरी शाखेत होता. माझ्या बरोबरच्याला सगळी कल्पना होती. या दोघांची बऱ्याच वर्षांपासून जानपहचान होती; पण हा कनिष्ठ आणि तो सुपर क्लासवन. प्रोटोकॉल पाळण्याचा प्रयत्न करतच हा म्हणाला : ‘‘रावसाहेब, तुम्हीच करा एक फोन किंवा घरी जाऊन भेटा नगरसेवकाला.’’
त्यावर तो म्हणाला : ‘‘मी का सांगू?...तर मी काय म्हणतोय, कुणीतरी सांगत का नाही त्याला?’’
हा थोडा धाडस करून पुन्हा म्हणाला : ‘‘रावसाहेब, तुमचंच वजन आहे. तुम्हीच सांगा.’’
तो : ‘‘अरे, अशा फडतूस माणसाच्या दारात मी नाही उभा राहणार.’’
हा : ‘‘असं कसं रावसाहेब! आपल्याच भागातला नगरसेवक आहे तो.’’
तो : ‘‘असेल...पण आम्ही निवडून नाही दिलेला. तुम्ही झक मारलीय. तुम्हीच त्याला पालखीत बसवून मिरवत होता. मी नाही. कुणीतरी दुसऱ्यानं सांगायला पाहिजे.’’
या दोघांचं बोलणं तोडून रावसाहेबांच्या बरोबरीनं चालणारा म्हणाला : ‘‘रावसाहेब, बरोबर आहे यांचं. तुम्हीच बोला म्हणजे झक मारत तो काम करेल.’’
रावसाहेब चिडून होते. समोरचे खड्डे आणि त्यातलं पाणी चुकवत ते म्हणाले : ‘‘आपल्या लेव्हलचा नाहीय तो. मी अजून सुपरवन आहे म्हटलं. म्हणूनच म्हणतोय, की कुणीतरी सांगायला पाहिजे.’’
चर्चा खूप झाली. बोलता बोलता सगळ्यांनीच एक-दीड किलोमीटर अंतर कापलं. तोडगा काही निघालाच नाही. कुणीतरी सांगायचं म्हणजे नेमकं कुणी? आणि रावसाहेबांच्या स्वत:च्या दारात डबकं तयार होऊनही ते स्वत: काही सांगायला तयार नव्हते. तसं घडलं तर त्यांची प्रतिष्ठा कमी होणार होती. निवृत्त व्हायला अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. तेवढा काळ त्यांना रावसाहेबाची, प्रतिष्ठेची आणि प्रोटोकॉलची झूल पांघरायची आहे. प्रश्न एवढाच होता, की आपल्या जवळ रावसाहेब राहतात, हे डबक्याला कसं कळणार?
आमची चालण्याची गती त्यांच्यापेक्षा अधिक होती. काही झालं तरी अर्ध्या तासात पाच किलोमीटर अंतर कापायचं असतं. कधी कधी दोन-चार मिनिटं होतात इकडं-तिकडं, तेही कुणी प्रोटोकॉलवाला रावसाहेब भेटला तर...पाच-दहा मिनिटं असंच चाललो, तर पुढं आणखी एकजण ओळखीचा दिसला. नेहमी तो एकटाच असतो. इकडं-तिकडं न बघता तो नेहमी खाली मान घालून चालतो. कुणी बरोबर असलं, तरीही हा खाली मान घालूनच बोलतो. जर चालण्याचा काही विधायक परिणाम घ्यायचा असेल, तर काही पथ्यं पाळावी लागतात, असं त्याचं म्हणणं आहे. एक मोठी एनजीओ चालवत प्रसिद्ध पावलेल्या कुणाचं तरी त्यानं भाषण ऐकलेलं असतं. आज त्याच्याबरोबर त्याची नात होती. व्यायामप्रेमी आजोबा घरातल्या कुणाकुणाला तरी कधीतरी चालण्यासाठी असं बाहेर काढतो. आज बिचारी नात सापडलेली. तिला मी स्वत: दहावीपासून पाहत आलोय. नुकतीच ती बारावी झाली. मेडिकलला नंबर लागला नाही. कोकणात फार्मसीला प्रवेश घेतलाय. एक वर्ष कसंतरी ती फार्मसी करणार आहे. पुढच्या वर्षी मोठ्या तयारीनं पुन्हा एंट्रन्स देणार आहे. ‘बीएचएमएस’सुद्धा तिला चालणार आहे. तिनं टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. मी तिच्या आजोबाला ‘गुड ईव्हनिंग’ म्हटलं, तसं तिनंही मागं वळून पाहिलं. ‘गुड ईव्हनिंग अंकल’ असं म्हणत ती पुन्हा चालू लागली. मोठ्या आकारात लिहिलेली तिच्या टी-शर्टवरची अक्षरं माझं लक्ष वेधून घेऊ लागली : ‘घुबडांचं शहर!’ टी-शर्टवर घुबडाचं चित्र वगैरे काही नव्हतं. सफेद शर्टवर काळ्या रंगातली ही अक्षरं मला चक्रावून गेली.
मी हळूच तिला विचारलं : ‘‘बेटा, हे असं काय लिहिलंय? याचा अर्थ काय?’’
ती : ‘‘क्लीअर आहे. घुबडांचं शहर म्हणजे घुबडांची वृत्ती असलेल्या माणसांचं शहर.’’
मी : ‘‘ते कसं काय?’’
ती : ‘‘माझ्या वयाची मुलगी असता ना तुम्ही, तर कळलं असतं!’’
मी : ‘‘अजूनही कळत नाहीय तुला काय म्हणायचंय ते...’’
ती : ‘‘शहरात कुठंही जा, चहूबाजूंनी वासनेनं भरलेल्या नजरा डंख मारतात. चोची मारतात सर्वांगावर. बस, रिक्षा कुठंही बसा, स्कूटीवरून जा... नजरा काही आपल्याला सोडत नाहीत. किती नॉन्सेन्स आहे नाही हे सगळं, अंकल? आम्ही मुलींनी कसं फिरायचं? घुबडांच्या नजरा कशा झेलायच्या? काही कळत नाहीय.’’
मी : ‘‘पण टी-शर्टवर लिहून काय उपयोग?’’
ती : ‘‘जे घुबडाच्या नजरेनं बघतात त्यांना लाज वाटेल, आय मीन शरम वाटेल त्यांना.’’
मी : ‘‘याच शहरात आपणही राहतोय. शहरात सगळेच लोक घुबडं-गिधाडं कशी असतील?’’
ती : ‘‘ॲक्च्युअली, मला सगळ्यांना तसं म्हणायचं नाहीय; पण घुबडांची पॉप्युलेशन जास्त आहे. आय हेट इट! खरंतर त्यांना गिधाडं म्हटलं तरी माझं ऑब्जेक्शन नाहीय. जंगलातली घुबडं फक्त रात्रीच पाहू शकतात; पण ही माणसातली घुबडं २४ तास पाहतात. पाहतात कसली? नजरेतून विष फेकतात.’’
मी : ‘‘तुला माहीत आहे काय, ‘आउल सिटी’ नावाचा एक प्रोजेक्ट आहे. एक म्युझिकल ग्रुप आहे आणि बेटा, घुबड सगळ्याच ठिकाणी अशुभ मानत नाहीत, विकृत मानत नाहीत. तुझी भावना बरोबर आहे; पण पक्षी चुकला काय ते बघ...’’
ती : ‘‘सो व्हॉट? मला नाही माहीत. माझ्या टी-शर्टवरचं वाक्य मी स्वत: प्रिंट करून घेतलंय.’’
मी : ‘‘तुला गिधाडं तर म्हणायचं नाहीय?’’
ती : ‘‘व्हॉट इज द डिफरन्स? गिधाडं काय आणि घुबडं काय? वृत्तीनं दोन्ही सारखीच.’’
थोडा वेळ चालल्यानंतर ती आजोबांबरोबर खूप पुढं निघून गेली. घुबड आणि गिधाड यातला फरक तिला कळत नसावा, असं मला वाटायला लागलं. ते काहीही असो; पण हे शहर घुबडांनी भरलंय, असं तिला वाटणं हे खूप दु:खद आहे. माणसाच्या जगात, माणसाच्या रूपात घुबडं दिसणं हे काही सभ्य समाजाचं लक्षण नक्कीच नाहीय. ते तिच्या टी-शर्टवर अवतरणं तर बिलकूल बरोबर नाहीय...