उजेडाच्या गळ्याला काजळी (उत्तम कांबळे)

uttam kamble
uttam kamble

एकीकडं भंगारवाला, किरकोळ फळविक्रेता आणि गांजलेला शेतकरी, तर दुसरीकडं लठ्ठ पगार घेणारा सुशिक्षित वर्ग...असं विसंगत चित्र समाजात काही नवं नाही...पण यातली पहिल्या वर्गातली ‘म्हणजे हातावर पोट असणाऱ्या वर्गातली’ माणसं जेव्हा एकाच दिवशी एकामागोमाग एक भेटतात आणि आपलं दुःख सांगू लागतात, तेव्हा त्यातली प्रखरता एरवीपेक्षा जास्त जाणवू लागते आणि साहजिकच हा वर्ग तसंच लठ्ठ पगार घेणारा वर्ग व त्याचा एकसारखा वाढतच जाणारा पगार... यांची मनात तुलना होऊ लागते. त्यातही पुन्हा तथाकथित मंदीची झळ बसते, ती पहिल्या वर्गातल्या माणसांनाच. दिवाळीच्या उजेडात तर ही काजळी जास्तच काळी दिसायला लागते.

महाराष्ट्रात दीड महिना चाललेला हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आणि उदार होऊन राजानं भोपळा दान करावा, त्याप्रमाणं त्यांच्या पदरात काहीतरी टाकलं. नेमकं काय पडलं आणि त्यातून खरंच भोपळा उगवणार की कारलं, हे पाहण्यासाठी पुढच्या वर्षाच्या भोपळ्याची वाट पाहावी लागणार आहे. काहीही असो. कुणीतरी काहीतरी देतंय आणि कुणीतरी काहीतरी घेतंय, असं निदान एक चित्र तरी निर्माण झालं. जसं ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही निर्माण झालंय. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बातमी वाचतच मी बाहेर पडणार होतो. दुचाकी स्टॅंडवर लावलीही. त्यातच एक एसएमएस आला. तो कुणाचा होता कळत नाहीय. अलीकडं असंच होतं. ‘वरिष्ठ गुरुजींची म्हणजे महाविद्यालयात मासिक लाख-दीड लाख पगार घेणाऱ्या प्राध्यापकांची दिवाळी यंदा अंधारात जाणार आहे. पगार झालेला नाही, काहीतरी करा,’ असं एसएमएसमध्ये लिहिलेलं होतं. कुणीतरी काहीतरी करावं आणि जे काही होईल ते संबंधितांना व्हॉट्‌सॲपवर पाठवावं, अशी अपेक्षाही अलीकडं वाढते आहे. एकतर मोठ्या गुरुजींची संघटना जबरदस्त आहे. मनात आणलं तर ते परीक्षा बंद पाडू शकतात, वर्ग बंद पाडू शकतात. मोर्चा काढू शकतात. दोन-तीन तास हातात गाइड घेऊन जे काही शिकवायचं असतं (अर्थात याला दुर्मिळ का होईना अपवाद आहेत) तेही बंद पाडू शकतात. मग हा एसएमएस का आला? अंगणवाडीताईंचा संप सुरू होता तेव्हा छोटे गुरुजी, मध्यम गुरुजी, थोडे उच्च गुरुजी, अत्युच्च गुरुजी त्यांना पाठिंबा देतील, असं वाटलं होतं. कारण, त्या अंगणवाड्यांमध्ये जे मुलं जमा करून त्यांना शाळेची सवय लावतात, त्यामुळंच वरच्या सर्व विविधतेत नटलेल्या गुरुजींचा फायदा होत असतो; पण अलीकडं तसंही होत नाहीय. नव्या व्यवस्थेनं दोन घटकांतलं नातं तोडलंय आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या रंगाची कॉलरही दिलीय. आपलीच कॉलर भारी कशी आहे, यासाठीचे इव्हेंटही होतात. असो. जगरहाटी म्हणतात ती हीच आणि नगरपालिकेचा चुना पळवून ‘कलयुग आ रहा है’ असं जे कुणी लिहितात, त्यांनाही हेच तर सांगायचं असतं.

सुरवातीला वाटलं की आपण या एसएमएसला उत्तर पाठवू नये. त्याला त्याचा प्रश्‍न खूपच गंभीर वाटत असंल तर तो फोन करेल किंवा अल्प काळाचं महान दुःख सोशल मीडियावर स्पर्धेत पळवेल. पुन्हा विचार केला की द्यावं एका ओळीचं उत्तर आणि दिलंही. ‘छान. आता अत्युच्च गुरुजींनाही अंधार समजायला मदत होईल. अंधाराच्या कविता वगैरे मस्त शिकवतील ते आता.’

एसएमएस शूट केला. मला वाटलं होतं, हा वर्ग कधी चर्चेत हरत नसतो, म्हणून उत्तर येईल; पण तसं काही आलं नाही. शिक्षणाची गुणवत्ता घसरायला शिक्षकही जबाबदार असतात, असं लिहिलं तेव्हा अनेक छोट्या गुरुजींनी निषेधाचा एसएमएस पाठवला होता; पण दोन वर्षांपूर्वी ‘यांचे पगार वाढवा’, असं लिहिलं तेव्हा मोजता येणार नाहीत एवढे अभिनंदनाचे एसएमएस. गाडी चालवत गोदाघाटावर पेरू घेण्यासाठी थांबलो. साईबाबांच्या शिर्डीतून छानपैकी पेरू आणणारी आणि ती इथं विकणारी एक ताई आहे. दर आठवड्याला एकदा तिच्याकडं पेरू घ्यायचे आणि ती देईल तेवढे पेरू विकत घ्यायचे, हे ठरलेलं आहे. आता देईल तेवढे याचा अर्थ एक किलो. सरड्याची धाव जशी कुंपणापर्यंत, तशी मध्यमवर्गीयांची ग्रॅमपर्यंत, हे एव्हाना आम्हा दोघांनाही कळलंय. ‘ताई, खूप छान पेरू आहेत’ या वाक्‍यावर ती म्हणाली ः ‘‘पेरू तर छानच आहेत, पण गिऱ्हाईक कुठं आहे? वरीस झालं. गिऱ्हाईक आकडतच चाललंय. पाटी खपायला चार दिवस लागतात. नाहीतर माल खराब होतो. दिवाळी कशी जाणार कळत नाही. लोक फराळाच्या नादाला लागतात आणि पेरवाकडं पाठ फिरवतात. पूर्वी असं नसायचं. साऱ्यांचीच दिवाळी रंगायची.’’

पेरूचे पैसे देत असतानाच शेजारीच सफरचंदांची पाटी घेऊन बसलेली ताई म्हणाली ः ‘‘भाऊ, माझ्याकडं बोहनी तर कर. दिस डोक्‍यावर आला तरी बोहनी नाही बघ.’’
मला सफरचंद घ्यायची नव्हतं; पण तिचा आग्रह मात्र वाढतच राहिला. आग्रह करतच तीही पेरूवालीसारखी अवघड बोलायला लागली ः ‘नोटा बंद झाल्यापासून असं घडतंय. पैसा कुठं गेला आणि लपून बसला, काय कळत नाही!’

बोलता बोलता बाई ऑनलाइन करन्सीचं अर्थशास्त्र मांडेल असं वाटलं नव्हतं. सफरचंदविक्रीचा आणि ऑनलाइन करन्सीचा काही संबंध असेल का, याचा मी विचार करत असतानाच ती पुन्हा म्हणाली ः ‘‘जे ते म्हणतंय मंदी हाय, मंदी हाय...मग गरिबानं जगायचं कसं आन्‌ तोंडावर आलेला डोंगराएवढा सण कसा करायचा?’’
सफरचंद न घेताच मी पुढं निघालो. ती बाई नाराज झालेली दिसली. मी स्वतःलाही प्रश्‍न विचारू लागलो, की खरंच मंदी आहे का? नसेल तर आपण मासिक किराणामध्ये दहा-पाच टक्‍क्‍यांची कपात का केली...?

प्रश्‍न तर अवघड होता. आज अगदीच सकाळी एका भंगारवाल्यानं आपली इज्जत काढली होती. तसं तर मध्यमवर्गीयांची कुणीही इज्जत काढू शकतो. ...तर मी लेटरबॉक्‍समध्ये पडलेलं वर्तमानपत्र घ्यायला गेलो. म्हणजे पावणेसात-सात या वेळेला. इतक्‍यात एक भंगारवाला आला आणि माझ्या गेटसमोरच गाडा लावला. म्हणाला ः ‘‘साहेब, भंगार आहे का? द्या काही असलं तर...’’
मी नम्रपणे म्हणालो ः ‘‘नाही भाऊ. भंगार नाहीय.’’
तो ः ‘‘गेल्या वर्षी काढलं होतं की साहेब!’’
मी ः ‘‘हो...पण या वर्षी नाहीय.’’
तो ः ‘‘दिवाळीत काही नवं घेतलं नाही का?’’
त्याचा हा प्रश्‍न मात्र प्रतिष्ठेवर घाला पडावा असा होता. उत्तर द्यावं तर पुन्हा प्रतिष्ठाच जाणार होती. नसलेल्या प्रतिष्ठेला किंवा स्वतःच स्वतःसाठी जन्माला घातलेल्या प्रतिष्ठेला माणूस किती घाबरतो नाही? माणूस कशाला; मीच घाबरलो होतो. चकवा देणारं उत्तर त्याच्या गाडीत ठेवलं. म्हणालो ः ‘‘अजून तरी काही घेतलेलं नाही.’’

तो वस्तादच असावा. त्यानं परत विचारलंच ः ‘‘कधी आहे खरेदी? दिवाळी तर आलीय आणि खरं सांगू का साहेब, सगळीकडं असंच बोलत्यात लोक. ‘यंदा मंदी हाय, काय खरं नाही...’ म्हणून. आता तुम्हाला मंदी असंल तर आमचं काय होईल...?’
हे सगळं आठवत आठवतच बाजारात फिरलो. काम नसतानाही दहीपुलावर जाऊन बसणं, बाजारात फिरणं याची मला सवयच झाली आहे. खरंतर असं फिरताना मस्तच वाटतं.

दुपारी श्रीरामपूरमध्ये पोचलो. शासकीय निवासस्थानात असेच एक व्यापारी भेटले. त्यांच्यासोबत एक शेतकरीही होते.  व्यापारी भाजीपाला आणि फळं श्रीरामपूरमध्ये घाऊक विकत घेतो आणि देशभर पाठवतो. त्याच्या मते मागणीत ४० टक्‍क्‍यांनी घट झालीय. मालाचं उत्पादन वाढूनही विक्रीत घट झालीय. असं अलीकडंच घडतंय. पूर्वी १९८५ नंतर एकदा मंदीच्या काळात घडलं होतं. आता मंदी नसेलही; पण घडतंय मात्र ती असल्यासारखंच.

व्यापाऱ्याचं झाल्यानंतर शेतकरी बोलायला लागला ः ‘‘पूर्वी ना घरातल्या बाया म्हाताऱ्याकोताऱ्या माणसांनी (पुरुषांनी) दिलेल्या घरखर्चासाठीच्या पैशातला काही भाग वाचवायच्या. गाडग्या-मडक्‍यात ठेवायच्या. सणावाराला, येळंकाळंला त्याचा उपयोग व्हायचा; पण जुन्या नोटा जमा करायची वेळ आली तेव्हा माणसांनी त्यांची गाडगी-मडकी उलटी केली. शिलकी पैसा बॅंकेत ठेवून नवा केला. तो काय बायकांना परत मिळालाच नाही. वर्षभर हातात नोटा खेळायला वेळ लागला. बऱ्याच गोष्टी ऑनलाइन आल्या. त्यांच्या हातात जाणारा पैसा कमी झाला. शिलकीतला पैसा टिकल की नाही, याची काळजी त्यांना वाटतेय. मडक्‍यात पैसे लपवायचा प्रयत्न आता कुणी करत नाही. गरिबांच्या खात्यावर लाख लाख जमा होणार होते; पण डोरल्यातली लाखपण जमा झाली नाहीय. कर्जमाफीचे पैसे हातात नाहीत. फटाके उडवायचे की नाही, यावर तुमची चर्चा. आणि आमची चिंता? पणती पेटवायला तेल मिळंल की नाही याची. काजळीनं उजेड पकडल्यासारखं वाटतंय. दुसरं काय?’’
एकेका दिवशी एकाच विषयाचे प्रसंग उभे राहायला लागतात. त्यांचीच एक मालिका होते आणि कुठं कुठं ती ओढून न्यायला लागते. अगदी मंदीपर्यंत आणि उजेडाच्या गळ्यावर साचत जाणाऱ्या काजळीपर्यंत.
००००
ता. क. ः हा मजकूर लिहून झाला आणि टीव्हीवर बातम्या येऊ लागल्या. अत्युच्च गुरुजींना सातवा वेतन आयोग लागू झाला. या मंडळींना आधी उजेड मिळतच होता...पण त्यांच्यावर आता उजेडाचा पाऊस पडणार आहे. वेठबिगारीवर शिकवणाऱ्यांना मात्र यापुढंही अंधाराच्या पावसातच भिजावं लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com