

V Shantaram Biography
esakal
डॉ. बी. एम. हिर्डेकर - saptarang@esakal.com
भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचण्यात अग्रणी असलेले व्ही. शांताराम यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणारे पुस्तक म्हणजे शशिकांत चौधरी लिखित ‘चित्रपती व्ही. शांताराम’ होय! चित्रपट-निर्मितीसाठी कार्य केलेल्या सर्व ज्ञात-अज्ञातांना हे पुस्तक चौधरी यांनी कृतज्ञतापूर्वक अर्पण केले आहे. त्यांच्या पुस्तकांची ही अर्पणपत्रिकाच मनाचा ठाव घेते. दादासाहेब फाळके, पद्मविभूषण यांसारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवलेल्या व्ही. शांताराम यांच्याबद्दल लिहिलेले हे पुस्तक एक समृद्ध ठेवा आहे असे म्हणायला हरकत नाही.
चौधरी यांनी हा चरित्रग्रंथ अनेक संदर्भ शोधून, तपासून, अभ्यासांती सिद्ध केला आहे. त्यांचे कष्ट पुस्तक वाचताना ठायी ठायी जाणवतात. पुस्तकांच्या पहिल्या प्रकरणात राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील चित्रपट, संगीत, शास्त्रीय संगीत, पूर्वापार चालत आलेल्या लोककला, नाटकमंडळींचे सादरीकरण अशा अनेक घटकांचा रंजक इतिहास मांडला आहे. गोविंदराव टेंबे, शंकरराव सरनाईक, बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले अशा दिग्गज कलावंताबद्दलची माहिती दिलेली आहे. या प्रकरणात लेखकाने शाहू महाराज, त्यांचे कला व कलावतांवरचे प्रेम, त्यांना दिलेले मानधन, प्रोत्साहन, त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते हे सर्व अधोरेखित केले आहे.
शांताराम बापूंच्या जडणघडणीबाबत, विवाहासंदर्भात त्यांनी उचललेल्या धाडसी पाऊलाबाबत, त्यांच्या खडतर जीवनाबाबत सविस्तर तपशील चौधरी यांनी दिला आहे. ते वाचताना शांताराम यांच्या जिद्दीचे कौतुक वाटते. नाटकांच्या दौऱ्याच्या निमित्ताने शांताराम यांची नाटककार राम गणेश गडकरी यांच्याशी ओळख झाली. पुढे त्यांच्याशी नाते कसे जडले, हे विस्ताराने पुस्तकातूनच वाचण्यासारखे आहे. ज्या काळात शांताराम जोमाने काम करत होते, तो काळ आजसारखा नव्हता. वाहतुकीच्या सहज-सोप्या सोयी नव्हत्या, तंत्रज्ञान, वीज... अशा कित्येक सुविधांची अडचण होतीच. याबाबतचा तपशील वाचकांना त्या काळात घेऊन जातो. खडतर, कठीण असलेला तो काळही रम्य वाटतो.