

- वैभव वाळुंज
लिव्हरीमध्ये राहणाऱ्या रेड या सद्गृहस्थाने मला आसपासच्या ठिकाणांची सैर घडवून आणली. नजर मावणार नाही इथपर्यंत पसरलेल्या त्या विस्तीर्ण शेताकडे विस्मयाने पाहत असतानाच रेडने मला आसपास चरणाऱ्या गायींविषयी सांगितलं तेव्हा भारताच्या व महाराष्ट्राच्या इतिहासाची एक अनोळखी बाजू आणि ससेक्स व दक्षिण इंग्लंडशी असणारं सुप्त नातं माझ्यासमोर उलगडलं.
युके सरकारकडून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर लंडनच्या, तसेच मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती भागातील अनेक विद्यापीठांच्या ऑफर्स माझ्यासाठी खुल्या होत्या, पण त्यातून मी फाल्मर या लहानशा गावात असलेल्या ससेक्स विद्यापीठातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज’ या संस्थेची निवड केली. ही संस्था भारत आणि विकसनशील देशांचा अभ्यास करण्यासाठी क्यूएस रँकिंगनुसार जगात प्रथम क्रमांकावर आहे, हे कारण होतंच.
येथे शिकायला आल्यानंतर येथील ग्रामीण भागाचा मस्त फेरफटका मारता आला व अनेक नव्या गोष्टी समजून घेता आल्या. इंग्लंड म्हणजे फक्त लंडन नाही तर त्याच्या सोबतच आजूबाजूची खेडी, ग्राम्य संस्कृती आणि गावांची वैविध्यपूर्ण ऐतिहासिक व सामाजिक घडण समजून घेता आली. यातून मला या देशाचा एक नवा पैलू उलगडता आला.
इंग्लंड हा एक छोटासा देश आहे अशी माझीही समजूत होती, पण जसजसा मी येथील गोष्टी समजून घेत गेलो, त्या अनुभवांतून उलगडलं की, या लहानशा बेटावर वसलेला हा देश भारताइतका नसेल, पण मोठ्या प्रमाणात वैविध्यपूर्ण आहे. विशेषतः ससेक्स या दक्षिणेकडील काऊंटीमध्ये येथील मिश्र संस्कृतीच्या अनेक गोष्टी अनुभवता येतात.
युरोपभरातील टोळ्यांनी ब्रिटिश बेटांवर आक्रमण करताना या काऊंटीमध्ये आपली राज्ये उभी केली. त्याच्या फारच तुरळक अवशेषांमधील एक म्हणजे ब्राम्बर किल्ला. सध्या इंग्लिश हेरिटेज या येथील पुरातत्त्व खात्यांनी जपलेला हा किल्ला एकेकाळी, तसेच ससेक्सच्या वैभवाची साक्ष देत उभा आहे. नॉर्मंडी या फ्रान्समधील एका प्रांतातून आलेल्या मध्ययुगीन नागरिकांनी अकराव्या शतकात या भागात आपलं साम्राज्य उभं केलं.
किल्ल्याच्या दिशेने पायी जात असताना वाटेत धोंडे व गारगोटे फोडून त्याच्या चकाकत्या बाजूने प्लास्टर केलेल्या भिंती, सजवलेली घरे दिसतात. इंग्लंडच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी गावातीलच मिळेल त्या स्थानिक साधनांमधून स्थापत्यशास्त्राच्या नवनवीन पद्धती शोधून काढल्या. याचा परिणाम असा झाला की, इंग्लंडच्या हरेक प्रांतात वेगवेगळ्या स्थापत्य परंपरा आणि त्यांची वैविध्यपूर्ण शैली तयार झाली.
याच वाटेवर जात असताना मला एका घरावर ‘बालमर लिव्हरी’ असा मोठा बोर्ड दिसला. जवळच ‘जपून जा, ही घोड्यांच्या जाण्यायेण्याची वाट आहे’ असा मजकूर. काही शतकांपूर्वी इथं ग्रामीण भागांमध्ये शेतमजुरांना जबरदस्तीने काम करायला लागे, त्यांना गावाच्या ठिकाणी राहू दिले जात नसे. अशावेळी शेतातच राहण्यासाठी बनवलेले फुटकळ घर म्हणजे लिव्हरी. माझी उत्सुकताच चाळवली गेली.
‘साहेबांनी अजूनही गुलामगिरी शाबूत ठेवली आहे काय?’ असा विचार करत मी चौकशी केली असता त्या शेतात राहणाऱ्या व्यक्तींकडून मला नवी माहिती मिळाली. लिव्हरीमध्ये राहणाऱ्या रेड या सद्गृहस्थाने मला आसपासच्या ठिकाणांची सैर घडवून आणली.
सध्या तसेच विद्यापीठ असलेल्या फालमर गावाची एक लहानशी वाडी म्हणून ‘बालमर’ वस्ती ओळखली जाई. तेव्हा या ठिकाणाला ‘बोरमर’ असेही म्हटले जाई. येथील टेकडीच्या दोन्ही बाजूस जुन्या गावांचे अवशेष सापडले आहेत. नॉर्मल घराण्यांनी इसवी सनाच्या दहाव्या शतकात शेती करायला सुरुवात केली, तेव्हापासून आजतागायत येथील शेतजमिनीची मालकी त्या कुटुंबाकडे आहे असं म्हटलं जातं.
लिव्हरीच्या पाठीमागील बाजूस एक मोठा वाडा होता, तेथे सध्याची बालमर पिढी राहते. या प्राचीन वाड्यामध्येच आता त्यांचे आर्किटेक्ट वंशज आपला स्वतःचा स्टुडिओ चालवतात. घोडेस्वारी आणि स्थानिक जत्रेत आपली जुनी गाडी घेऊन जाणं त्यांचा शौक असल्याचं समजलं. एकेकाळी गुलाम व शेतमजुरांना राहण्यासाठी असणारी लिव्हरी आता डागडुजी करून एका आलिशान कॉटेजमध्ये बदलण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात अनेक पर्यटक ही जागा भाड्याने घेऊन कुटुंबासह येथे राहत असतात.
आजूबाजूला बालमर कुटुंबाची प्रचंड मोठी शेती पसरली होती. जवळपास दहा एकराचे एकच मोठे शेत व त्यामध्ये नजर जाईल तिथपर्यंत डोलणाऱ्या गव्हाच्या ओंब्या. बालमर कुटुंबातील अनेक लोक अजूनही आपल्या घराण्याचा फार अभिमान बाळगतात. म्हणूनच या शेतीतून नाममात्र नफा मिळूनही केवळ हौस व परंपरेखातर ही शेती केली जाते.
‘इथे फक्त वर्षातून एकदा शेती केली जाते ती उन्हाळ्याच्या काळात. शेतात काही पिकण्याची शक्यता फक्त तेव्हाच असते,’’ तो सांगत होता. एका टेकडीवर बनवलेल्या शेतात बीटसदृश्य पिकाची दाट झाडे होती; परंतु त्यात गायी व मेंढ्या चरत होत्या. ‘एवढ्या भरल्या शेतात जनावरे घुसल्यानंतर त्यांना बाहेर कसं काढणार’ असा भाबडा प्रश्न मला पडला.
यावर हसत रेड म्हणाला, ‘‘तू जर आपली जनावरे येथे घेऊन आलास किंवा इथल्या पिकांची नासधूस केलीस तर त्याचा मालक खूशच होईल. एकदा पीक घेऊन झाल्यानंतर बाकी काळ जमीन पडीक राहू नये म्हणून काहीतरी पेरण्यासाठी इथं बीट किंवा तत्सम पिकांचं बियाणं टाकलं जातं. आता ही पिके उगवतात खरी, पण ती काढून धुणं, त्यांच्यावर प्रक्रिया करणं किंवा त्यांचं विपणन करणं हे प्रचंड खर्चिक काम आहे.
त्यातील सगळा माल विकला तरी तोटाच होईल म्हणून पीक घ्यायचे असेल तेव्हा हे शेत येथील पिकांसह नांगरले जाते. येणाऱ्या पिकांना त्यामुळे जैविक खत व त्यासोबतच जमिनीला नवीन रासायनिक गुणधर्मही मिळतात. त्यामुळे कधीही बीट खायचं असेल तरी शेतात येऊन उपटून न्यायला भिऊ नकोस.’
नजर मावणार नाही इथपर्यंत पसरलेल्या त्या विस्तीर्ण शेताकडे विस्मयाने पाहत असतानाच रेडने मला आसपास चरणाऱ्या गायींविषयी सांगितलं तेव्हा भारताच्या व महाराष्ट्राच्या इतिहासाची एक अनोळखी बाजू आणि ससेक्स व दक्षिण इंग्लंडशी असणारं सुप्त नातं माझ्यासमोर उलगडलं.
vaiwalunj@gmail.com
(लेखक इंग्लंडमध्ये युके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत नीती व धोरण या विषयावर संशोधन करत आहेत.)
(पुढील भागात : ससेक्स आणि महाराष्ट्राची सहकार चळवळ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.