देवा तुझ्या गाभाऱ्याला...

देव हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. ज्यांच्यासाठी तो नाही त्यांना फारसे प्रश्न सतावत नाहीत; पण ज्यांच्यासाठी तो आहे त्यांना सतत मानसिक आंदोलनांना सामोरं जावं लागतं.
Mandar Cholkar
Mandar CholkarSakal

देव हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. ज्यांच्यासाठी तो नाही त्यांना फारसे प्रश्न सतावत नाहीत; पण ज्यांच्यासाठी तो आहे त्यांना सतत मानसिक आंदोलनांना सामोरं जावं लागतं. खरं तर एकदा का स्वत:ला समर्पित केलं की किती निर्धास्त वाटायला हवं; पण अनेकांच्या बाबतीत तसं होत नाही. शरण जातानाही त्या समर्पणाची सातत्यानं दखल घेतली जावी हा हव्यास उरतोच. डोळ्यांना न दिसणाऱ्या पायांवर माथा ठेवणं भल्याभल्यांना जमत नाही. आपल्याला त्यासाठी माध्यम म्हणून एखादी मूर्ती तरी लागते किंवा व्यक्ती तरी. तथाकथित निर्गुणाच्या दिशेनं प्रवास सुरू आहे अशा समजुतीत वावरताना देवत्वाचा पुरावा मात्र वारंवार सगुण रूपात, लहानसहान अनुभवांत शोधणं सुरू राहतं आणि तो नाही मिळाला की मुखवटा सरकतो. सालस लीनतेला इतर मानवी भाव-भावनांचे धुमारे फुटतात. भ्रमनिरास झाल्याची घुसमट कल्लोळ होत जाते आणि दोषारोपाचं बोट स्वत:कडे वळण्याऐवजी समोरच्याकडे वळतं, ज्यानं कधीही स्वत:च्या असण्याचा दावा केलेला नसतो.

देवा, तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही

सांग कुठं ठेवू माथा, कळंनाच काही

देवा, कुठं शोधू तुला, मला सांग ना

प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा

देवा, काळजाची हाक ऐक एकदा तरी

माझ्या ह्या जिवाची आग लागू दे तुझ्या उरी

आरपार काळजात का दिलास घाव तू?

दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

चित्रपटासाठी गाणी लिहिताना बहुतांशी एक किंवा फार फारतर दोन पात्रांसाठी लिहावं लागतं. दोनहून अधिक पात्रांसाठी गाणं लिहिणं महाकठीण. विशेषत: त्यांच्या भावना परस्परविरोधी, तरीही एकमेकांत मिसळत पुढं जाणार असतील तर. म्हणूनच ‘दुनियादारी’ या चित्रपटासाठी मंदार चोळकरनं पेललेल्या या आव्हानाचं कौतुक वाटतं. ‘का कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरले’ या एकाच ओळीत सईची मानसिक अवस्था मांडून, तेच अंत्ययमक धरून, संपूर्ण विरुद्ध अवस्थेच्या ओळी मंदारनं ऊर्मिलासाठी लिहिल्या आहेत.

स्वप्न माझे आज नव्याने खुलले

अर्थ सारे स्पर्शाने उलगडले

गैरमुसलसल गझलप्रकारात एकाच गझलेत अनेक विषयांवरचे शेर असतात; तरीही त्या सर्व शेरांना जोडणारी एखादी भावना असेल तर वाचकांना, श्रोत्यांना ती समजणं सुलभ होतं. या गाण्यातल्या पराकोटीच्या भिन्न दिसणाऱ्या ओळी संगीतकार अमितराजनं कौशल्यानं बांधल्या आहेत. अर्थात्, काही गाण्यांचा पूर्ण अर्थ अधोरेखित करण्यासाठी दृश्य माध्यमाची गरज पडतेच पडते, त्यानुसार इथं संजय जाधव यांनी केलेला मोन्ताजेसचा वापर कामी येतो. आकाशाकडे न बघता कधी डोळ्यांत, कधी आरशात, तर कधी शून्यात बघणारे स्वप्नील, अंकुश, ऊर्मिला, सई आणि सुशांत एकमेकांत देवत्व शोधताना दिसतात.

का रे तडफड ही ह्या काळजामधी?

घुसमट तुझी रे होते का कधी?

माणसाचा तू जल्म घे, डाव जो मांडला मोडू दे

पुढच्या ओळींमधे सईच्या आणि ऊर्मिलाच्या व्यक्तिरेखांमधलं अंतर मिटवताना मंदारनं कमाल केली आहे.

का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे

उत्तरांना प्रश्न कसे हे पडले

अंतरांचे अंतर कधी न कळले

दोन ध्रुवांवरच्या दोघींचं म्हणणं जास्तीत जास्त जवळ आणताना मंदारनं एकीला शून्य अंशावर ठेवलं आहे आणि दुसरीला तीनशे एकोणसाठ अंशावर. अती जास्त जवळिकीमुळेच सूक्ष्म फरक दिसेनासे व्हावेत हा परिणाम साधणं अत्यंत अवघड. विशेष करून ऊर्मिलाच्या तोंडी असलेल्या ओळींतून आश्वासक जाणिवेला त्यानं जी संभ्रमाची झालर लावली आहे त्याला तोड नाही. संहितेशी पूर्णत: प्रामाणिक राहणाऱ्या गीतकाराचं हे लक्षण आहे.

या गाण्यात संभ्रम आहे, आर्जव आहे, घुसमट आहे, कल्लोळ आहे, स्वप्नं आहेत आणि स्वप्नभंगही आहेत. मात्र, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या गाण्यात अनेक प्रश्न आहेत. देवात माणूस आणि माणसांत देव शोधणाऱ्या सगळ्यांचे प्रश्न. ‘त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?’ असो वा ‘दयाघना, का तुटले चिमणे घरटे?’ असो, हे प्रश्न विचारले जातच आहेत. ज्यांचं उत्तरच मौनात आहे, नेणिवेत आहे, ओंकारात आहे आणि चराचराच्या हुंकारात आहे अशा उत्तरांना पडणारे हे प्रश्न.

बदलत्या काळानुसार म्हणा किंवा चित्रपटाच्या कथानकानुसार म्हणा, ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’मधली प्रश्नांची भाषा बदलली आहे, अधिक टोकदार झाली आहे. म्हणूनच आनंदी जोशी आणि कीर्ती किल्लेदार यांच्या मृदू आवाजातल्या प्रश्नांना उत्तर म्हणून ऐकू येत राहतो आदर्श शिंदेच्या आवाजातला प्रतिप्रश्नरूपी टाहो. मातीचे पाय आणि दगडाचं काळीज हा विरोधाभास सहन न होणाऱ्या सगळ्यांना समेवर आणत राहतो आदर्श शिंदेचा कातर, काळीज चिरत जाणारा टाहो.

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी

माझ्या ह्या जिवाची आग लागू दे तुझ्या उरी

आरपार काळजात का दिलास घाव तू?

दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू?

‘देव आहे’ असं मानणाऱ्या सगळ्यांनाच कधी ना कधी तो जाणवू दे आणि त्याहीपेक्षा तो जाणवलेलं समजू दे हीच प्रार्थना.

कविवर्य सूर्यकांत खांडेकर एका गीतातून विचारतात :

जीवनी संजीवनी तू, माउलीचे दूध का?

कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?

मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का?

या इथे अन् त्या तिथे रे सांग तू आहेस का?

तू आहेस ना?

(सदराचे लेखक हे कवी आणि सिनेगीतकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com