
चांगलं गाणं म्हणजे काय याची उत्तरं वेगवेगळी असू शकतात. माझ्या मते दिवस-रात्रीच्या कुठल्याही प्रहरी आनंदानं ऐकावंसं वाटणारं जे गाणं ते चांगलं गाणं.
वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे
मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे
अजय-अतुलच्या अप्रतिम इंट्रो-पीसवर पाय ठेका धरू लागलेले असताना, मान डोलू लागलेली असताना आणि मन झुलू लागलेलं असताना हे शब्द तुमच्या कानावर पडतात आणि तुम्ही चांगल्या अर्थानं माणसामधून उठता! शहरातल्या गर्दीत हरवलेले असाल किंवा मनातल्या गर्दीत...हे गाणं अलगद बोट धरून तुम्हाला गावाच्या वाटेवर नेऊन सोडतं. आपल्या सद्य मन:स्थितीच्या तुरुंगातून पाऊल बाहेर पडतं आणि भरभरून एक दीर्घ श्वास घेताना जाणवतं, की कितीही महागडी अत्तरं वापरा; पण मातीच्या सुगंधाला पर्याय नाही. त्यातून कवी-गीतकार दासू वैद्य - दासूदादा - थेट ‘आपल्या प्रत्येकाच्या’ गावच्या मातीचा गंध शब्दांच्या कुपीतून पेश करतो. ‘गंध’, ‘दरवळ’ असे सुबक, सुगंधी शब्द फक्त एकाशेजारी एक मांडल्यानं ही अनुभूती येत नसते. त्या अनुभूतीला कारण असतो तिच्यामागचा भावनेचा ‘परिमळ’. ‘मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे’ यातल्या ‘माझे’ या शब्दामुळे ते गाणं सुरुवातीच्या दोन ओळींतच आपल्या सर्वांचं होऊन जातं. वास्तविक, ‘नाते मनाचे’च्या खालची ओळ यमक साधण्यासाठी ‘चे’ नंच संपवण्याचा मोह कुठल्याही ‘गीतकारा’ला झाला असता; पण म्हणूनच इथं दासूदादामधला ‘कवी’ आणि ‘माणूस’ मोठा होतो.
स्वप्नातले गाव माझ्यापुढे
दिवसाचा पक्षी अलगद उडे
फांदीच्या अंगावरती
चिमणी ती चिवचिवणारी
झाडात लपले सगे-सोयरे
हा गाव माझा जुना आठवांचा
नादात हसऱ्या या वाहत्या नदीचा
ढगात उरले पाउसगाणे कसे साठवावे!
ज्या गावी परत येण्यासाठी जीव तळमळत होता, ते प्रत्यक्ष समोर आल्यानंतरची अधीरता अधोरेखित करताना दासूदादा ‘दिवसाचा पक्षी अलगद उडे’सारखी चित्रदर्शी ओळ लिहितो. ‘दिवसाचा पक्षी’, ‘झाडातले सगे-सोयरे’, ‘नादात हसणारी नदी’, ‘ढगातले पाऊसगाणे’ या सगळ्या नितांत काव्यमय ओळींमधून एक जिवंत पेंटिंग उभं होत राहतं. आपण अनिमिष नजरेनं कवितेतलं चित्र पाहत राहतो, चित्रातली कविता ऐकत राहतो.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
हातातले हात, मन बावरे
खडकाची माया कशी पाझरे
भेटीच्या ओढीसाठी श्वासांचे झुंबर हलते
शब्दांना कळले हे गाणे नवे
ही वेळ आहे मला गोंदणारी
ही धुंद नाती गंधावणारी
पुन्हा एकदा उरी भेटता कसे आवरावे?
गीतकारानं गाण्यातून सिनेमाची गोष्ट तर पुढं न्यायची असतेच; पण त्याहीपेक्षा आधी त्या गाण्यातली गोष्ट पूर्ण करायची असते. या दुसऱ्या कडव्यात दासूदादा आपल्याला गावाच्या वेशीतून घरात नेतो. थोरा-मोठ्यांची, मित्र-मैत्रिणींची ओळख करून देतो. प्रत्येकाला साजेशी ओळ लिहितो व गावाशी आणि गावाकडच्या माणसांशी असलेल्या हृद्य नात्याची लीलया सांगड घालतो.
पाच मिनिटांच्या, दहा-बारा ओळींच्या गाण्यात हे सगळं साध्य करणं अशक्यप्राय तसं असतं. दुसऱ्या कडव्यातदेखील ‘खडकाची पाझरणारी माया’, ‘श्वासांचे हलते झुंबर’, ‘गोंदणारी वेळ’ अशा अप्रतिम ओळी त्याच्या लेखणीतून उतरल्या आहेत. ‘उतरल्या आहेत’ असं म्हणतो, कारण, ते लिहिताना त्यालाही नक्की कल्पना नसणार, की त्यानं एकाच ‘कमर्शिअल’ गाण्यात किती किती कविता लिहिल्या आहेत! या गाण्याचे शब्द समोर ठेवून तासन् तास बघत बसावेत इतके ते देखणे आहेत.
औरंगाबादच्या वास्तव्यात दिग्दर्शक राजीव पाटील यांनी ‘सावरखेड : एक गाव’चं स्क्रिप्ट वाचलं तेव्हा दासूदादानं शब्द दिला होता. तो शब्द साधासुधा नव्हता, एका ‘कवीचा’ शब्द होता. अजय-अतुलचं ‘मूड बनवणारं’ संगीत, कुणाल गांजावाला यांचा, ओलाव्याची साद घालत गावाकडे निघायचं निमंत्रण देणारा, आवाज आणि गावाच्या वाटेवरच्या लहानसहान जागा आणि त्यामागच्या गोष्टी सांगणारे शब्द...
आपल्या सर्वांनाच अनेकदा प्रबळ इच्छा होत असते, की आत्ताच्या आत्ता गाडीला स्टार्टर मारावा आणि गावाकडे निघावं. ते दरवेळी जमतंच असं नाही; पण अशा सर्व हळव्या क्षणी आपण प्ले लिस्टमधल्या या गाण्याचं स्टार्ट बटण नक्की दाबू शकतो.
जल्लोष आहे आता उधाणलेला
स्वर धुंद झाला मनी छेडलेला
शहारलेल्या, उधाणलेल्या कसे सावरावे!
गावच्या वारीसाठी आसुसलेल्या मनाला हे गाणं, आपल्या घराच्या पायरीपासून हात धरून, आठवणींचा सोपान करत, कळसाच्या दिशेनं घेऊन जातं. शेवटी, पांडुरंगाचा कळस दिसल्यानंतर धावत सुटणारे वारकरी काय आणि गावची वेस लांबून दिसल्यानंतर धावत सुटणारे अधीर मन काय, भेटीच्या ओढीसाठी श्वासांचं झुंबर हलणं हेच महत्त्वाचं!
दासूदादा, काय लिहिलंय यार!
(सदराचे लेखक हे कवी आणि सिनेगीतकार आहेत.)
वाचकहो, तुमचे अभिप्राय जरूर कळवा आणि सन २००० नंतरच्या अमुक एका गाण्याबद्दल लिहिलं जावं असं तुम्हाला वाटत असेल तर मेलवर, सोशल मीडियाच्या माझ्या अकाउंटवर हक्कानं सांगा...
Vaibhav.joshee@gmail.com
Fb:- @vaibhavjoshiofficial
Insta:- @vaibhavjosheeofficial
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.