हुरहूर असते तीच उरी...

Songs
Songs
Updated on

कॉलेजच्या दिवसांत माझ्या मनानं अशी एक भ्रामक समजूत करून घेतली होती, की आपला दिवस चांगला गेला तर संध्याकाळ किंवा रात्र वाईट जाते आणि आजची संध्याकाळ चांगली गेली तर उद्याचा दिवस वाईट जातो. अनेक वर्षं मी अस्वस्थतेशी लढा दिला. आयुष्यात काहीतरी चांगलं घडलं की पाठोपाठ जमा-खर्चाचा समतोल राखण्यासाठी वाईटही घडतं अशा नकारात्मक मन:स्थितीतून हे तण उगवलेलं असणार. आजार हा मानसिकही असू शकतो वगैरे कल्पनाही नसण्याचा तो काळ, त्यामुळे हे असलं विचित्र काहीतरी घरच्यांना सांगणं तर सोडाच; पण मित्रांकडेही कधी बोलता आलं नाही. आयुष्यातले अनेक सोनेरी दिवस मी अर्धे उनाडक्या करत आणि अर्धे या भीतीत काढले. ही असली जगावेगळी हुरहूर आता कायमच आपल्याबरोबर, हिच्यातून सुटका नाही असं वाटायचं,  ‘तो’ आणि ‘त्याच्या कविता’ आयुष्यात येईपर्यंत!

हुरहूर असते तीच उरी
दिवस बरा की रात्र बरी?

हा मुखडा ऐकला आणि लख्ख प्रतिबिंब दिसलं. त्याची अनेक गाणी मी आधी ऐकली होती; पण हे गाणं ऐकलं आणि सिनेमा सुटल्या सुटल्या धावत जाऊन त्याचा ‘...आणि तरीही मी’ हा काव्यसंग्रह विकत घेतला. झपाटल्यासारखा वाचून काढला किंवा असं म्हणू या की वाचल्यावर झपाटला गेलो. गंमत म्हणजे, फक्त वर उल्लेखिलेल्या गाण्यातच नाही तर, त्याच्या अनेक कवितांमध्ये मी मला दिसत गेलो. अजिबात ओळख नसताना, त्याच्या कुठल्याही कविता वाचलेल्या नसताना, माझ्या काही कवितांमध्ये तसेच विषय, तशाच प्रतिमा आधीच उतरलेल्या होत्या. चोरी सोडा; अगदी प्रेरणा म्हणूनही माझ्या हातून असं काही उतरलेलं नसूनही कानकोंडा झालो. आता जगाला त्या काही कविता कधीच दाखवता येणार नाहीत म्हणून हिरमुसलो आणि त्याहीपेक्षा ‘त्याच्या’ कानावर गेलं तर काय वाटेल ही भावना मनाला खात राहिली. ‘आपणच सरळ जाऊन भेटावं का? की फाडून टाकाव्यात या काही कविता?’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुठला रस्ता सांग खरा?
वळणाचा की सरळ बरा?

‘डाय हार्ड फॅन’सारखं वाट्टेल ते करून त्याचा नंबर मिळवला. मात्र, एकदाही फोन करायचं धाडस झालं नाही; पण विधिलिखित असल्याप्रमाणे त्याच्या कानावर माझ्या कविता गेल्या. संगीतकार आशिष मुजुमदार यानं त्याला मुंबईत जेव्हा माझ्या काही रचना ऐकवल्या तेव्हा त्याचं पहिलं वाक्य होतं, ‘अरे मुजम्या, हा तर माझा सहोदर! फोन लाव त्याला’ आणि माझ्या फोनवर आवाज आला, ‘हॅलो, मी सौमित्र!’
त्यानंतर आत्ता या क्षणापर्यंत त्याची अस्वस्थता, त्याची हुरहूर, त्याचं दाटून येणं, बरसणं सगळं सगळं मला माझं वाटत आलेलं आहे. तो तसाच आहे.

जगणे मरणे काय बरे
सुख खरे की दु:ख खरे?
शरीर जाते जळुन तरी
धूर खरा की राख खरी?

असे प्रश्न स्वहस्ते भाळी कोरून घेतलेला अश्वत्थामा! त्याला वरवरचं जगता येत नाही आणि तो जगणंच लिहीत असल्यानं ते येतं तेव्हा खोल आतून येतं.

चेहरामोहरा, स्वभाव वेगवेगळे असले तरीही त्याच्या आरशात सगळी माणसं, सगळी मनं एकसारखीच दिसतात. तुम्ही फार तर ‘मला माझं प्रतिबिंब आवडलं नाही’ असं म्हणू शकता;’ पण ‘आरशावर चरा आहे’ असा दोष कधीच नाही देऊ शकत. कारण, त्यात त्याची आणि तुमची चिरंतन घुसमट एकरूप झालेली दिसते.

सौमित्र तुम्हाला भेटतो तेव्हा तुमचं जगणं टिपकागदासारखं शोषून घेतो. 
‘एक उनाड दिवस’सारखा अप्रतिम चित्रपट, अशोकमामा, फैय्याज़बाईंचा हृद्य सीन, सुरुवातीला फैय्याज़बाईंचं गुणगुणणं, त्यानंतर शुभाताई जोशींचं कसदार गायन, सलील कुलकर्णीची जीवघेणी हळवी चाल... आणि शब्द? शब्द नाही, प्रश्न! एका मनस्वी, संवेदनशील, अस्वस्थ, हुरहुरत्या लेखणीतून उतरलेले प्रश्न! गीतकाराला पडलेले; पण जगण्यासाठी धडपडणाऱ्या सगळ्यांचे! त्यात आपलं-तुपलं असं काही उरतच नाही.

तुमचा-माझा पाऊस असा वेगळा करता येईल?
मनामधला गारवा कधी हातात धरता येईल?
तुमचं-माझं जगणं जरा 
एक करून पाहू
तुम्ही माझ्या, मी तुमच्या
छत्रीखाली भिजत राहू...

आजच्या गाण्यावर लिहिताना मी सौमित्रकडून आणखी काही कडवी मागितली, खास आपल्या सगळ्यांसाठी आणि अर्थातच खास आपली!

जाण्याआधी सांज पुन्हा
कुठुनी येतो सुन्नपणा?
जगण्याचे हे आर्त ठसे
कविता सुचणे रोज जसे
वळण्याआधी थांब इथे
या रस्त्याला अंत कुठे
तुझियासोबत तूच रहा
मिटुनी डोळे आत पहा
हुरहूर असते तीच उरी
दिवस बरा की रात्र बरी?

कधी कधी निवांतपणे गावातून फिरत असताना पूर्वीची संकेतस्थळं नव्यानं भेटतात. काही काही गाण्यांच्या ओळींतून सावकाश फेरफटका मारतानाही तोच अनुभव येतो. अशी गाणी आपल्याच जुन्या गोष्टीचं नवं तात्पर्य सांगतात. काळाच्या वेगात हात सुटलेल्या जगण्याला पुन्हा भेटायचं असेल तर दर्जेदार कलाकृतीसारखं दुसरं वळण नाही.
आता मला माझी ‘हुरहूर’ एकाकी नाही वाटत. कारण, सोबत तो असतो...सौमित्र!
काय लिहिलंय यार!
(सदराचे लेखक हे कवी आणि गीतकार आहेत.)  

वाचकहो, तुमचे अभिप्राय जरूर कळवा आणि सन २००० नंतरच्या अमुक एका गाण्याबद्दल लिहिलं जावं असं तुम्हाला वाटत असेल तर मेलवर, सोशल मीडियाच्या माझ्या अकाउंटवर हक्कानं सांगावं...
@vaibhavjoshiofficial

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com