विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? 

Zenda
Zenda

हिंदीतले नामवंत कवी दुष्यंतकुमार यांचा एक शेर आहे.
मैं जिसे ओढ़ता-बिछाता हूँ, वो ग़ज़ल आप को सुनाता हूँ
कलाकृतीच्या माध्यमातून जीवनाचे विविध कंगोरे वाचक-श्रोते-प्रेक्षक यांना दाखवताना ‘मला खूप काही कळलंय’ ही वृत्ती बाजूला ठेवावी लागते. मला सापडलेल्या एका पायवाटेवर कदाचित मी दोन पावलं पुढं आलो आहे म्हणून मागून येणाऱ्यांना या मार्गातले खाचखळगे माझ्या पद्धतीनं समजावून सांगतो आहे, हा एकच भाव शेवटी महत्त्वाचा ठरतो. अर्थातच सगळ्या सुविचारांप्रमाणे हाही बोलायला सोपा आणि आचरणात आणायला अवघड! खूप कमी कलाकारांना अभिनिवेश विसरून सातत्यानं ‘जगणं’ लिहायला जमतं. त्यातलंच एक ठळक नाव म्हणजे अरविंद जगताप. अरविंदचं कुठलंही लेखन थेट काळजाला भिडतं, आपलं वाटतं, याचं माझ्या मते एकमेव कारण म्हणजे, तो जे जगतो तेच लिहितो आणि जे लिहितो ते जगत राहतो. त्याची गाणी आपल्याला ‘लाईक-लव्ह-हिट्स’च्या पल्याड घेऊन जातात, त्यापैकी हे एक गाणं.

जगन्याच्या वारीत मिळेना वाट 
साचले मोहाचे धुके घनदाट
आपली माणसं, आपलीच नाती 
तरी कळपाची मेंढरास भीती 
विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती 

कुठल्याही गाण्याची सुरुवात कशी होते यावरही बरेचदा त्याचं यशापयश अवलंबून असावं. ‘जगन्याच्या वारीत मिळेना वाट’ ही ओळ सरळसरळ प्रत्येक मराठी मनाचा ताबा घेते. भारंभार प्रतीकांच्या ओझ्यानं वाकलेली अनेक सालंकृत गाणी आपण ऐकतो-वाचतो. वरकरणी देखण्या दिसणाऱ्या या गाण्यांमधला आत्मा हरवलेला दिसतो. अरविंद हा प्रतीकांच्या मोहात कधीच ‘म्हणणं’ हरवू देत नाही हे विशेष. 

आयुष्याच्या वारीतला विठ्ठल म्हणजे ध्येय, स्वप्न, उद्दिष्ट, ध्यास, आदर्श. त्याची अशी कितीतरी मनोहारी रूपं आपण डोळ्यांत साठवून चालत असतो. अशा वेळी जेव्हा आपल्याबरोबर चालणारा एक वारकरी ‘वाट मिळेना’ म्हणतो तेव्हा अठरापगड जातीच्या कोट्यवधी हळव्या जनांचा ठोका चुकतो. ही वाट का मिळत नाहीये हे सांगताना अरविंद, ‘ ‘साचले’ मोहाचे धुके घनदाट’ असं लिहितो तेव्हा स्तिमित व्हायला होतं. धुकं म्हणा किंवा अगदी मोहाचं धुकंही म्हणा, हे तसं मराठी गीतलेखनात नवीन नाही; पण धुकं ‘साचणे’ ही कमाल आहे. जवळपास सगळ्यांनी धुके ‘दाटले’ लिहिलं असतं; पण ‘साचले’ लिहून अरविंदनं त्याची छटा इतकी गडद केली आहे की मुलायम धुक्याची दलदल झाल्यासारखी वाटते! गाणं भिडण्याची ही बारीकसारीक कारणं आपल्याला लवकर लक्षात येत नाहीत. हे गाणं, हे ‘गाऱ्हाणं’ अगदी आतून आलेलं आहे त्याचा हा आणखी एक पुरावा. 

आपला जिवलग असो, डॉक्टर असो किंवा देव...गाऱ्हाणं मांडताना, आधी काय दुखतंय हे सांगावं लागतं आणि तेही थोडक्यात! ‘आपली माणसं, आपलीच नाती..तरी कळपाची मेंढरास भीती’ या एका ओळीत जन्माचा सल मांडून अरविंद कळीचा सवाल टाकतो. आता सांग, ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?’

आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता
पुरे झाली आता उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता
उजळावा दिवा म्हणुनिया किती, मुक्या बिचाऱ्या वाती जळती 
वैरी कोण आहे इथे, कोण साथी विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती 

डोळ्यांदेखत आदर्श ढासळण्यासारखं दु:ख नाही. आपण ज्याची तत्त्वं स्वीकारतो, काळजावर गोंदून घेतो त्याची तत्त्‍वं काही वेगळीच; नव्हे भलतीच होती, हे जेव्हा कळतं तेव्हा अवघं अस्तित्व सोलून काढावंसं वाटतं. 
वल्कलांनीही सुटेना प्रश्न आता
सावली फेडून व्हावे नग्न आता

जगणं व्यर्थ आहे, नश्वर आहे हे आपण अनेकदा वाचलेलं असतं; पण अनेकांसारखं लिहील ती अरविंदची लेखणी कसली! 

बुजगावण्यागत व्यर्थ हे जगनं
उभ्या उभ्या संपून जाई 
खळं रितं रितं माझं 
बघुनी उमगलं 
कुंपन हिथं शेत खाई 

राजकीय पार्श्वभूमीचा सिनेमा, पिढ्यान् पिढ्या कार्यकर्त्यांचा होत असलेला वापर एका ‘बुजगावणं’ या शब्दानं ठळक होतो. त्याच वेळी ते बारा बलुतेदारांपासून नोकरदारांपर्यंत सगळ्यांनाही लागू होतं. प्राणांतिक टाहोला वेदनेची जोड नसली की तो आक्रस्ताळेपणा होतो. दु:ख आहे, शब्दसंपदा आहे म्हणून ऊठ-सुट थयथयाट करून चालत नाही. अरविंदचं लेखन पसरट नाही म्हणूनच त्याच्या तोंडी टोकदार सवाल शोभतात. अशाच काही लेखण्यांना प्रत्यक्ष विठ्ठलासमोर त्याच्याच विश्वातली विसंगती मांडून जाब मागायचा अधिकार प्राप्त होतो. 

भक्ताच्या कपाळी सारखीच माती 
तरी झेंडे येगळे, येगळ्या जाती
सत्तेचीच भक्ती, सत्तेचीच प्रीती
विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती??

‘झेंडा’ हा दिग्दर्शक म्हणून अवधूत गुप्तेचा पहिला सिनेमा. अवधूत संगीतकार-गायक तर आहेच; पण त्यानं अनेक उत्तम गाणीही लिहिलेली आहेत. तसं असूनही कुठलं गाणं कधी कुणाला लिहायला द्यायचं हे त्याला अचूक कळतं हे मी माझ्या अनुभवावरून खात्रीनं सांगू शकतो. स्वत: लिहायच्या किंवा गायच्या मोहक धुक्यात न अडकता अवधूतनं हे गाणं अरविंदला लिहायला सांगितलं आणि ज्ञानेश्वर मेश्राम या नवीन गायकाकडून गाऊन घेतलं. कलेवर निस्सीम प्रेम करणारी अशी माणसं एकत्र येतात तेव्हाच अशा कालातीत कलाकृती तयार होत असाव्यात.

‘मला ते मीटर वगैरे येत नाही रे, वैभव. आणि ते अमुक एक वेळेत, अमक्या चालीवर शब्द लिहिणंही जमत नाही,’ अरविंद काल हसत फोनवर म्हणाला. 
‘न का येईना रे, तू तुझा कल्लोळ मांडत राहा, बाकीचं संगीतकार बघून घेतील आणि तुझ्या ओळींचे सुविचार होत राहतील. शेवटी ‘डेड’लाईनची गाणी लिहिणं वेगळं आणि ‘हेड’लाईनची गाणी लिहिणं वेगळं, मित्रा!’ 
कविवर्य सुरेश भट म्हणाले होते तसं :

जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती?
सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती!
‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?’ काय लिहिलंयस यार!

(सदराचे लेखक हे कवी आणि सिनेगीतकार आहेत.)

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com