बहुआयामी समीकरणाची उकल

लंडनमध्ये येऊन शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या मनावर इथल्या समाजाचा, शैक्षणिक व आर्थिक वातावरणाचा काय परिणाम झाला असेल, यावर ‘आंबेडकर इन लंडन’ या पुस्तकामधून प्रकाश टाकला आहे.
Ambedkar in London Book
Ambedkar in London Booksakal
Summary

लंडनमध्ये येऊन शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या मनावर इथल्या समाजाचा, शैक्षणिक व आर्थिक वातावरणाचा काय परिणाम झाला असेल, यावर ‘आंबेडकर इन लंडन’ या पुस्तकामधून प्रकाश टाकला आहे.

- वैभव वाळुंज vaiwalunj@gmail.com

लंडनमध्ये येऊन शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या मनावर इथल्या समाजाचा, शैक्षणिक व आर्थिक वातावरणाचा काय परिणाम झाला असेल, यावर ‘आंबेडकर इन लंडन’ या पुस्तकामधून प्रकाश टाकला आहे. संतोष दास, विल्यम गुल्ड आणि ख्रिस्तोफ जाफरलो यांचे हे पुस्तक एक महत्त्वाचा दस्तावेज ठरेल...

संविधान सभेमध्ये भाषण करताना ४ नोव्हेंबर १९४८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘खेडं म्हणजे चालीरीतींचं एक डबकं आहे; अज्ञान, कोतेपणा आणि जातीवादाचं कोठार आहे.’’ हे उद्गार भारतीय कृतीच्या विषम समाजरचनेमधल्या खेड्यांच्या योगदानाला अधोरेखित करतात. खेड्यांच्या या धारणेला त्यांचे वैयक्तिक वाईट अनुभव जितके कारणीभूत होते, तितकेच त्यांच्या लंडन आणि न्यूयॉर्क अशा शहरांमधील चांगले अनुभवदेखील होते. विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर अशाच एका खेड्यातून लंडनमध्ये येऊन शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या मनावर इथल्या समाजाचा, शैक्षणिक व आर्थिक वातावरणाचा काय परिणाम झाला असेल, त्याचं चिंतन बाबासाहेबांच्या आजपर्यंतच्या अनेक आत्मचरित्रांमध्ये क्वचित पाहायला मिळतं. त्यांच्या आयुष्यातील तुलनेने अतिशय कमी प्रमाणात लिहिल्या गेलेल्या कालखंडावर संतोष दास, विल्यम गुल्ड आणि ख्रिस्तोफ जाफरलो यांनी आपल्या लिखाणातून ‘आंबेडकर इन लंडन’ या पुस्तकामधून प्रकाश टाकला आहे.

जाफरलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘आंतरराष्ट्रीय राजकारण व समाज यांचा तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर लिहिलेल्या पुस्तकांच्या मालिकेतील हे सर्वांत अलीकडील पुस्तक आहे. त्यांच्या मागील पुस्तकात १९८०-९० च्या कालखंडात मंडल आयोगानंतर भारतातील उपेक्षित जातींनी आपलं राजकारण कसं फुलवत नेलं याची सुंदर गोष्ट होती. या पुस्तकात ब्रिटनच्या प्रशासनामधील बहुचर्चित दलित नेत्या संतोष दास आणि विविध लेखकांनी जाफरलो यांच्यासोबत आधी विद्यार्थी आणि त्यानंतर राजकारणी म्हणून लंडनमध्ये बहरत गेलेल्या आंबेडकर या बहुआयामी समीकरणाची उकल केली आहे.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थी म्हणून ते आले असताना त्यांच्यासोबत अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे शिकायला होते, ज्यांनी पुढे जाऊन आपापल्या देशांमध्ये मोठी कामगिरी केली. लंडन तेव्हा आर्थिक घडामोडींचं केंद्र होतं. जोसेफ केनडी, क्वामे नक्रूमा, व्ही. के. कृष्ण मेनन अशा विद्यार्थ्यांसोबत शिकताना जगभरातील विविध प्रवाहांसोबत परिचय होत होता. ‘रुपयासमोरील आंतरराष्ट्रीय पेच’ अशा विषयावर संशोधन करतानाच त्यांनी आपला पहिला लेख ‘भारतातील जाती’ प्रकाशित केला होता. त्या काळी युरोप आफ्रिका व आशियामध्ये सर्वदूर पसरलेल्या जात या विषयाचा अभ्यास जागतिक पातळीवर चिकित्सेसाठी खुला केला.

या काळात त्यांनी वाचलेली पुस्तके लंडनमधील त्यांचे वैचारिक व राजकीय मित्र मंडळ, त्यांनी केलेले अभ्यास दौरे व त्यातून एक अर्थतज्ज्ञ, संशोधक व चिंतक म्हणून विकसित होणारा पिंड पुस्तकातून उलगडत जातो. ग्रे इन मध्ये बॅरिस्टर म्हणून काम करताना एक वकील म्हणून त्यांचा झालेला प्रवास दिसतो. ‘ऑक्सफर्ड’च्या तत्कालीन समाजवादी वातावरणापासून कटाक्षाने दूर राहणं, गांधींच्या वाढत्या काँग्रेस प्रभावाबद्दलचे विचार व त्यांच्यापासूनची फारकत अशा दूरगामी परिणाम करणाऱ्या आंबेडकरी विचारांविषयी नवी माहिती या पुस्तकातून मिळते. विद्यार्थी म्हणून त्यांना आलेल्या लहान-मोठ्या अडचणी, प्राध्यापकांसोबत झालेली देवाण-घेवाण व वैचारिक घुसळण यांचा वस्तुनिष्ठ अभ्यास लेखांमध्ये आढळतो.

काळाराम मंदिर आणि महाड अशा सत्याग्रहांनंतर त्यांच्या शासन व धर्म यासंबंधीच्या कल्पना बदलायला सुरुवात झाली होती. अशा पार्श्वभूमीवर १९३० मध्ये गोलमेज परिषदेसाठी त्यांना पुन्हा लंडनला यावं लागलं. या दशकात बाबासाहेब नेमके किती बदलले या अवघड प्रश्नाची उकल जाफरलो यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणी व अभ्यासातून केली आहे. त्यांच्या मनावर झालेला अमेरिकेतील ब्लॅक चळवळीचा परिणाम केविन ब्राऊन यांनी घेतला आहे. अशाच धर्तीवर ‘अमेरिकेतील बाबासाहेब’ अशी रूपरेषा तयार होताना दिसते.

सिटी ऑफ लंडन हे आजही मध्ययुगीन सामंतशाही आणि भांडवलशाही यांच्या मिश्रणातून चालणारं शहर आहे. इथे आलेल्या सर्व स्तरांवरील नागरिकांमध्ये व पर्यायाने भारतीयांमध्ये अगदी तीच जातीय उतरंड सापडते. त्याविरुद्ध लढण्यासाठी विविध कार्यकर्त्यांनी व संघटनांनी केलेले प्रयत्न यांचाही मागोवा या पुस्तकात घेतला आहे. सवर्ण भारतीयांमध्ये बाबासाहेबांनी पहिल्यांदा जातीविषयी बोलणं आणि आज असंख्य दलित विद्यार्थ्यांनी इथल्या जातीय धोरणांना विरोध करणं हा पुस्तकाचा गाभा आहे. महाराष्ट्र सरकारच्या मदतीने तयार झालेल्या आंबेडकर हाऊस या स्मारकाचं वस्तुसंग्रहालय बनवण्यात कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानाची नोंद या पुस्तकात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या नेत्याचं व पर्यायाने इथल्या जनतेचं प्रतिनिधित्व करण्याची एक संधी असतानादेखील महाराष्ट्र सरकारने सातत्याने या स्मारकाकडे केलेला कानाडोळा व म्हणून सध्या संघशासनाच्या हाती गेलेलं नियोजन ही स्वतंत्र अभ्यासाची बाब असू शकेल.

हे सर्व करत असताना लेखकांना अनेक दस्तावेजांमधून जावं लागलं होतं, अनेक लेखांची, बाबासाहेबांनी लिहिलेल्या पत्रांची पडताळणी करायला लागली होती. या कामी दास यांनी काटेकोरपणाने वैज्ञानिक पातळीवर त्यांचं एकत्रीकरण करून लेख लिहिले. यात त्यांना आलेल्या अडचणी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यांच्या या अभ्यासातून पुस्तकाची विश्वासार्हता वाढली आहे.

‘आंबेडकरी आंतरराष्ट्रीयवाद’ या संकल्पनेची पायाभरणी व्हायला सुरुवात झाली आहे. एकीकडे भारतीयांच्या जागतिकीकरणाबरोबर जातीचंही आंतरराष्ट्रीयीकरण झालं आहे. अशा कालखंडात तेनमोळी सुंदरराजनसारख्या लेखिका तसेच पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिणारे सूरज एंगडे जातीच्या बदलत्या संकल्पनेचं विस्तृत विश्लेषण करत आहेत. गावाच्या वेशीपासून आता हाऊस ऑफ लॉर्डपर्यंत जाऊन पोहोचलेल्या जातीची जागतिक चिकित्सा होण्याच्या दृष्टीने हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. ‘आंबेडकर इन लंडन’ हे पुस्तक येत्या २३ जानेवारीला प्रकाशित होणार आहे. संतोष दास, विल्यम गुल्ड आणि ख्रिस्तोफ जाफरलो यांनी या पुस्तकासाठी केलेले संशोधन, त्यातले तपशील खुप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हा एक महत्त्वाचा दस्तावेज ठरणार आहे.

(लेखक सध्या इंग्लंडमध्ये सरकारी नीती व धोरण या विषयावर संशोधन करत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com