esakal | परछाइयाँ रह जाएँगी

बोलून बातमी शोधा

sahir-ludhianvi}

जन्मशताब्दी-विशेष
विख्यात कवी-गीतकार साहिर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दीची सांगता उद्या (ता. ८ मार्च) होत आहे, त्यानिमित्त जागवलेल्या त्यांच्या आठवणी...

परछाइयाँ रह जाएँगी
sakal_logo
By
वंदना कुलकर्णी kulkarnivandana2@gmail.com

विख्यात कवी-गीतकार साहिर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दीची सांगता उद्या (ता. ८ मार्च) होत आहे, त्यानिमित्त जागवलेल्या त्यांच्या आठवणी...

हम ग़मज़दा हैं लाएँ कहाँ से ख़ुशी के गीत 
देंगे वही जो पाएँगे इस ज़िंदगी से हम 
साहिर लुधियानवी...भारतीय सिनेसृष्टीतलं गीतलेखनामधलं एक झळझळीत आणि कमालीचं लोकप्रिय नाव. त्यांच्याविषयीच्या प्रेमकथा, त्यांचा कथित अहंकारी स्वभाव, त्यांचा इतरांपेक्षा एक रुपया जास्त मानधना मिळण्यासाठीचा आग्रह....अशा अनेक कथा-दंतकथा या नावाभोवती आजही घोटाळत असतात. 
ता. आठ मार्च १९२१ रोजी पंजाबातील लुधियाना इथं जन्मलेल्या अब्दुल हई ऊर्फ ‘साहिर’ यांचं बालपण अत्यंत असुरक्षित होते. बेमुर्वतखोर, ऐय्याशीत रमलेले जमीनदार वडील आणि त्यांच्या सावलीपासूनसुद्धा मुलाला सतत जपणारी आई, कोर्टातील कबुलीजबाबांची मालिका...यांमध्ये साहिर यांचं बाल्य हरवून-कोळपून गेलं होतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांनी ‘साहिर’ (जादूगार) हे टोपणनाव (तख़ल्लुस) घेऊन उर्दू काव्यरचना करायला सुरुवात केली. वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांचा तल्खियॉँ (कटुता) हा  उर्दू काव्यसंग्रह प्रकाशित झाला. १९४३ मध्ये तो प्रकाशित झाला. मात्र, या काव्यसंग्रहात कटुतेला छेद देऊन प्रेम, निसर्ग, एकलेपण, समाजातील विषमता या भावनांचा प्रभावी आविष्कार फुलून आलेला दिसतो... 
‘हिरास’ (भय) आणि ‘मता-ए-गैर’ या  दोन कविता पुढं चित्रपटात सुंदर रूप घेऊन आलेल्या दिसतात. प्यार पर बस तो नही है मेरा लेकिन फिर भी (सोने की चिडिया) 
युद्धाच्या परिणामांवर आधारित त्यांची ‘परछाईयाँ’ ही कविता खूप वाखाणली गेली. ती ताजमहाल चित्रपटात ‘खुदा-ए-बरतर तेरी जमीं पर’ असं म्हणत प्रेक्षकांसमोर आली. ‘तल्खियाँ’ नंतर डाव्या विचारसरणीच्या पुरोगामी लेखक चळवळीत साहिर यांचा समावेश अपरिहार्य होता.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

१९५० च्या ‘आझादी की राहपर’पासून पुढं १९७८ पर्यंत १२२ चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं. ‘ये दुनिया अगर मिल भी जाएँ तो क्या है’ आणि ‘जिन्हें नाझ है हिंद पर वो कहाँ है’ असे प्रश्न करणाऱ्या ‘प्यासा’चा, म्हणजेच समाजाकडून नाकारल्या गेलेल्या कवीचा, हा जीवनपट होता.  
प्रेम आणि सामाजिक जाणिवा या दोन्हींची गुंफण असलेलं साहिर यांचं प्रभावशाली काव्य हा त्या चित्रपटाचा शिखरबिंदू होता.  

साहिर यांच्या प्रेमगीतांचा स्तर इतरांच्या गाण्यापेक्षा अगदी वेगळा होता. स्त्रीला उपभोग्य वस्तू न मानता तिचे भोग, तिची दुःखं, (औरत ने जनम दिया मर्दों को... चित्रपट : साधना) तिच्या प्रेमाची नाजूक गुंतागुंत याचा शोध त्यांच्या लेखणीनं घेतला. 
म्हणूनच अमृता प्रीतम यांच्यासारख्या बुद्धिमान प्रतिभाशाली स्त्रीचं साहिर यांच्या प्रेमात पडणं हे नैसर्गिक वाटतं. साहिर यांची कविता मुग्ध प्रणयाची अगदी वेगळीच परिभाषा घेऊन आली होती.
सिनेसंगीत आणि काव्यगुण हे दोन्ही एकमेकांना पूरक असू शकतात असं सिद्ध करत त्यांनी सिनेगीतांना एक नवीन परिमाण बहाल केलं. उदाहरणार्थ : अभी ना जाओ छोड कर...(हम दोनो), हम जब सिमट के आप की...(वक्त), पाँव छू लेने दो...(ताजमहल), तपते दिल पर यूँ गिरती है...(मुझे जीने दो), चलो इक बार फिर से अजनबी ...(गुमराह), या त्यांच्या गाण्यांनी सिनेसंगीत एका वेगळ्या, समंजस पातळीवर नेऊन ठेवलं. 
निसर्ग आणि प्रेम यांचा सुरेख भावबंधही त्यांच्या अनेक गाण्यांतून दिसून येतो.. ये रात, ये चाँदनी फिर कहाँ...(जाल), चुप है धरती, चुप है चाँद-सितारे...(हाऊस नंबर ४४), चाँद मद्धम है, आसमाँ चुप है...( रेल्वे प्लॅटफॉर्म), कश्ती का खामोश सफर है... (गर्लफ्रेंड) 

साहिर हिंदी काव्यात अस्स्खलित उर्दूचा वापर सहज करत असत. उदाहरणार्थ : रानाइयाँ -सौंदर्य. तुम चली जाओगी : शगुन/ तआर्रुफ-ओळख. चलो एक बार फिर से : गुमराह/ परस्तीश-पूजा. किसी पत्थर की मूरत से : हमराज. तरीही ‘चित्रलेखा’सारख्या चित्रपटात संस्कृतप्रचुर हिंदीचा वापरसुद्धा त्यांनी सहजपणे केला.  उदाहरणार्थ :  मधुर मिलन की दुर्लभ बेला...(ए री जाने ना दूँगी), तू निर्मोही मोह ना जाने...( मन रे तू काहे ना)
त्यांचे शब्द योग्य पद्धतीनं अधोरेखित करणारं पूरक संगीत देणाऱ्याया संगीतकारांशीच त्यांचे सूर जुळले होते. त्यांच्या गाण्यांनी गाजलेले काही चित्रपट असे : संगीताकार रोशन  : ताजमहाल,  बरसात की रात, बहूबेगम, चित्रलेखा, दिल ही तो है, जयदेव  : जोरू का भाई, हम दोनो, मुझे जीने दो, रवी : वक्त, गुमराह, हमराज, काजल, आज और कल, एन. दत्ता  : साधना, चंद्रकांता, धर्मपुत्र, धूल का फूल, खय्याम : फिर सुबह होगी, शगुन, कभी कभी, सचिनदेव बर्मन : नौजवान, बाज़ी, जाल, नौ-दो-ग्यारह, मुनीमजी, टॅक्सी ड्रायव्हर, हाऊस नंबर ४४, देवदास, प्यासा, ओ .पी. नय्यर  : नया दौर , सोने की चिडियाँ, मदनमोहन : रेल्वे प्लॅटफॉर्म, ग़ज़ल साहिर पूर्णपणे निरीश्वरवादी होते तरीही ‘अल्ला तेरो नाम’ (हम दोनो), ‘तोरा मन दर्पन कहलाए...’ (काजल), ‘आना है तो आ’ (नया दौर) अशी अनुपम गाणी त्यांनी लिहिली.

असामान्य काव्यप्रतिभेचं लेणं आणि प्रखर सामाजिक जाणिवा घेऊन ते सिनेसृष्टीत आले; पण चित्रपटमाध्यमात गीतलेखन करण्याचे नियम त्यांना बांधून ठेवू शकले नाहीत. स्वतःच्या मर्जीप्रमाणे ते लिहीत गेले आणि त्याची गाणी झाली. त्यामुळेच त्यांच्या बहुतेक सर्व गाण्यांना एक साहित्यिक स्तर आहे. 

सिनेसृष्टीत स्वतःच्या लेखणीच्या जोरावर यशस्वी झालेले साहिर टोकाचे स्वाभिमानी होते. आपल्या अतुलनीय अशा काव्यप्रतिभेचा त्यांना रास्त अभिमान होता. आत्मसन्मानाला त्यांच्या लेखी पैशांपेक्षा जास्त महत्त्व होतं. तो जपण्याच्या नादात अनेक जणांना त्यांनी दुखावलं, तर अनेकांना मदत करून पुढंही आणलं. त्यांच्या प्रयत्नांनी ‘ऑल इंडिया रेडिओ’ वर गीतकाराचं नाव सांगायची  सुरुवात झाली.

साहिर यांची आईवर अलोट श्रद्धा होती. अविवाहित असलेल्या साहिर यांनी आईच्या मृत्यूनंतर चार वर्षांतच, म्हणजे २५ ऑक्टोबर १९८० रोजी, या जगाचा निरोप घेतला.

Edited By - Prashant Patil