समृद्ध शतकाचा अस्त... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babasaheb Purandare
समृद्ध शतकाचा अस्त...

समृद्ध शतकाचा अस्त...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-: वसंत वसंत लिमये

आम्ही दोघांनी ‘वाडा’ शैलीत जेव्हा घर बांधले तेव्हा ते बाबासाहेबांनी पहावे, आमच्या धडपडीचं खरं कौतुक त्यांच्याकडून व्हावं ही सुप्त इच्छा होती. बाबासाहेबांना मी सर्वप्रथम अनुभवलं शाळकरी वयात. त्यांच्या शिवचरित्र व्याख्यानमालेनं मी भारावून गेलेलो. माझ्यासाठी महत्त्वाच्या संस्काराचा तो अनमोल ठेवा होता. त्यानंतर आमच्या अनेक गाठीभेटी झाल्या. ‘राजमाची ग्रामसुधार’ शिबिरांच्या दरम्यान. बाबासाहेबांना घरी आणण्यासाठी मी जमेल तसे प्रयत्न करीत होतो; परंतु यश येत नव्हतं. परंतु उमेश धालपे या मित्रामुळे ते शक्य झालं. एखाद्या स्वप्नासारखा तो दिवस होता. बाबासाहेबांचं पथ्यपाणी आणि जेवणात काय चालतं, याची आधीच चौकशी केली होती.

मनसोक्त गप्पा, खरवसासह चवी परीनं शांतपणे त्यांचं जेवण झालं. ‘सारंच अप्रतिम!’ असं म्हणून स्वतःच्याच घरी असल्याप्रमाणे बाबासाहेब म्हणाले, ‘मी आता थोडा आराम करतो.’ शेजारच्याच बेडरूममध्ये एखाद्या लहान बाळाप्रमाणे बाबासाहेब निवांतपणे निजले. त्यानंतर बाबासाहेब मोठ्या आस्थेनं माझ्या ९१ वर्षीय आईला भेटले. तिनं हट्टानं केलेल्या पिठल्याची त्यांनी विशेष वाखाणणी केली.

एक अफाट मनस्वी, व्रतस्थ, कर्तृत्वसंपन्न आयुष्य ते जगले. अशा तपोवृद्धाला भेटणं ही पर्वणी होती. आयुष्यभर शिवचरित्राचा ध्यास, शिवचरित्राच्या प्रसारासाठी केलेली वणवण, हालअपेष्टांची तमा न बाळगता व्यासंग केलेला हा तपस्वी माणूस.

प्रसंगी निंदा सहन करावी लागली तरी वागण्यात कुठेही कटुतेचा लवलेशही नव्हता. त्यांच्या मिष्किल स्वभावात एक अलवारपणा जाणवला. त्यांच्या निधनाची बातमी वि‍जेप्रमाणे येऊन कोसळली. ‘शिवसृष्टी’सारखी त्यांची अनेक अपूर्ण

स्वप्नं, अनेकांना मिळणारं प्रेमळ मार्गदर्शन सारं काही एका क्षणात संपून गेलंय! मी बाबासाहेबांच्या पार्थिवाला नमस्कार केला. नकळत डोळे डबडबले, राहून राहून घरी लहान बाळाप्रमाणे झोपलेले बाबासाहेब आठवत होते. भगवान, आपने यह अच्छा नही किया!

loading image
go to top