

Veerangana Self Defence
esakal
व्ही. राधा, माधव गोखले- saptrang@esakal.com
नको असताना कुणीतरी हात धरत असेल तर अवघ्या दोन सेकंदांत ती पकड सोडवण्यासाठी प्रशिक्षित झालेले मनगट कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतं. ‘प्रत्येक मुलीकडे पूर्णपणे तिची स्वतःची अशी एक क्षमता हवी, हा विचार ‘वीरांगना’ कार्यक्रमाचा पाया...
मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी भरून टाकलेल्या आसमंतात आता संध्याकाळ उतरत होती. सावल्या लांबत चालल्या होत्या. या सुंदर चित्रात प्रकाशाच्या इथेतिथे सांडलेल्या पुंजक्यांची भर घालणारे रस्त्यावरच्या दिव्यांचे ठिपकेही आणखी थोड्या वेळाने दिसायला लागले असते... पण एरवी मोहक दिसणाऱ्या या चित्राकडे आज सरिताचे लक्षच नव्हतं.
तो दिवसच तिच्यासाठी वेगळा होता. आज ती एकटीच घरी परतत होती, नेहमी तिच्यासोबत असणारा तिचा धाकटा भाऊ आज तिच्याबरोबर नव्हता. सकाळीच तो मामाकडे गेला होता. बाहेर जाता येताना सोबत म्हणून बरोबर कोणीतरी असायला हवं, असे ती नेहमीच ऐकत आली होती. लहानपणापासून मनावर बिंबवलेल्या सूचना; सल्ले, आजी-आई-बाबांच्या बोलण्यातून कानावर पडलेले तुकडे, मैत्रिणींच्या कानगोष्टी, सिनेमांतले प्रसंग, कोपऱ्यावर थांबून काहीबाही बोलणारी मुलं या सगळ्यातून सरिताच्या मनात असंख्य विषयांनी फेर धरला होता. त्यामुळे तिची पावलं आणखी वेगानं घराकडे पडत होती.