
तरणीताठी पोरं भररस्त्यात हातातील कोयते परजवत पुण्यात दहशत माजवत फिरल्याचं पाहून मला दुसऱ्याच एका तरुणाची एक जुनी गोष्ट आठवली.
हत्याराचा शेवट हत्यारानेच...
- वेल्ली थेवर
तरणीताठी पोरं भररस्त्यात हातातील कोयते परजवत पुण्यात दहशत माजवत फिरल्याचं पाहून मला दुसऱ्याच एका तरुणाची एक जुनी गोष्ट आठवली. शंकऱ्या नावाचा हा मूळ राजस्थानी तरुण एक सामूहिक खुनी होता.
सत्तरच्या दशकात त्याने राजस्थान, पंजाब आणि हरियानात एकंदर सत्तरहून अधिक हत्या केल्या होत्या. गुन्हा करण्याची त्याची पद्धत ठरलेली असे. आडबाजूला असलेल्या एखाद्या निर्जन ठिकाणी तो लपून बसे.
कुणी एकटा-दुकटा त्या रस्त्यावरून जाऊ लागला की, सावज नजरेच्या टप्प्यात येताच हातात एक मोठा हातोडा घेऊन तो झपकन त्याच्याजवळ जाई आणि त्याच्या मानेवर बरोब्बर कानाखाली एक जोराचा तडाखा देई.
थोड्याच काळात ‘कानफटी मार’ म्हणूनच तो ओळखला जाऊ लागला. कंठकर्णनलिकेवर (eustachian tube) जोराचा आघात झाला की शरीराचा संपूर्ण तोल जातो आणि बहुधा क्षणार्धात माणसाचा प्राणही जातो. १९७९ च्या आसपास हा कानफटी मार पकडला गेला आणि यथावकाश त्याला फाशीही झाली.
मुंबईत एक कुप्रसिद्ध ‘स्क्रू ड्रायव्हर लुटारू’ होता. तो थेट समोरच्याच्या डोळ्यातच स्क्रू ड्रायव्हर खुपसे आणि तो काढतच नसे. आपल्या हातांचे ठसे पोलिसांना मिळू नयेत म्हणून तो हातमोजे घाली. रोहित वर्मा नावाचा छोटा राजनचा एक साथीदार होता. बँकॉकमध्ये दाऊद गँगकडून गोळ्या घालून मारला गेला तो. हा रोहित वर्मासुद्धा हातोड्यानेच खून करायचा.
मार्व्हल सीरिजमधल्या त्या ‘पनिशर’प्रमाणेच तो चक्क पंधरा किलो वजनाचा एक जाडजूड हातोडा जवळ बाळगायचा. नव्वदच्या दशकात ईस्ट वेस्ट एअरलाइन्सचे प्रमुख तकीउद्दीन वाहिद यांच्या गाडीच्या पुढच्या काचेवरच त्याने आपला हातोडा जोराने हाणला. काच फुटताक्षणी वर्माच्या साथीदारांनी वाहिद यांच्यावर बेछूट गोळीबार केला आणि त्यांना जागीच ठार केले.
कापड गिरण्या बंद झाल्यानंतर मुंबईतल्या टोळीयुद्धातली नृशंस हिंसा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसू लागली. दक्षिण-मध्य मुंबईतील कामगार वस्त्यांनीच आजवर शहराचं राजकारण घडवलं होतं. त्या वस्त्या आता अचानक विस्कटू लागल्या होत्या. अरुण गवळी हा गुंड मुळात एक गिरणी कामगार होता.
त्याच्याप्रमाणेच अखेरीस गुंडगिरीकडे वळलेल्या इतर अनेक तरुणांचे आई-बापही गिरण्यांतच काम करत होते. एखाद्या जीवनपद्धतीचं उद्ध्वस्त होत जाणं हे एक युगांतर असतं. मुंबईत कापड गिरण्या बंद झाल्या, तसे पुण्यातही झपाट्याने बदल घडले.
आपलं निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखाने कंठणाऱ्यांचं वानप्रस्थाश्रमी शहर हे पुण्याचं रूप पालटून ते मुंबईचं एक थोडं दूरचं उपनगरच बनलं, मुंबईचा एक उपग्रहच जणू. या रूपांतराचे काही सामाजिक, मानसिक स्वरूपाचे विपरीत परिणाम पुण्यावर झालेच असणार. काही भेगा पडल्याच असणार. केवळ स्वयंचलित वाहन उद्योगाचं शहर असलेलं पुणे अवघ्या वीस वर्षांत शिक्षण आणि सॉफ्टवेअर उद्योगाच्या जाळ्याचं केंद्र बनलं.
झटक्यासरशी ओलांडलेला हा टप्पा थोडाथोडका नव्हता, त्याचे परिणामही थोडेथोडके असू शकत नव्हते. मुंबईच्या कापड गिरण्या बंद झाल्यानंतर मुंबई विस्कटली, त्याचप्रमाणे पुण्यातही फार मोठ्या लोकसमूहाची सामाजिक वीण कुठेतरी विस्कटून गेली असणार... आतून काहीतरी फाटून तुटून गेलं असणार.
अर्थातच, समाजातील या तुटलेपणाकडे बोट दाखवून या माथेफिरू बनलेल्या तरुणांच्या बेपर्वा कृत्यांचं समर्थन मुळीच करता येणार नाही. या कोयता हल्ल्याचे व्हिडिओ यू-ट्यूबवर पाहताना अक्षरशः थरकाप उडतो. शेतकऱ्यांच्या घराघरांत आढळणारं साधंसुधं अवजार असलेला कोयता आता एक दहशतबाज हत्यार बनला आहे.
परिणामतः बंदूक ज्याप्रमाणे परवान्याशिवाय मिळत नाही, त्याप्रमाणे कोयता विकत घेणंही पुण्याच्या शेतकऱ्याला पोलिसांनी दुरापास्त करून सोडलं आहे. कोयता घेण्यापूर्वी शेतकऱ्याला आधार कार्ड दाखवायला सांगून ते त्याची नोंद करून घेत आहेत. निव्वळ मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एक महत्त्वाची गोष्ट नोंदवायलाच हवी.
कोयता दाखवला की लोक आपल्याला नमतात, आपले अंकित होतात आणि आपला हेतू साध्य होतो, ही गोष्ट एकदा हल्लेखोरांच्या लक्षात आली की, ते लोक पुनःपुन्हा तो वापरतच राहणार. लोकांच्या मनातील भीती हेच त्या शस्त्राचं आणि ते वापरणाऱ्याचं प्रचंड बळ बनतं.
नव्वदच्या दशकात सुभाष माकडवाला नावाच्या गुंडाच्या हाती एके ४७ आली तेव्हा तो तिचा बेछूट वापर करू लागला. त्या काळात मुंबईत कोणत्याही प्रकारची बंदूक मिळवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती; पण माकडवाल्याला असली सर्वश्रेष्ठ बंदूक तस्करीद्वारा पैदा करता आल्यामुळे तो स्वतःला अजिंक्य समजू लागला.
माकडाच्या हाती जणू कोलीतच मिळालं. ती बंदूकच त्याची भाषा बनली. मित्रांच्या बरोबर हॉटेलात जेवायला गेला तरी तिथं बेधडक तो आपल्या या शस्त्राचं प्रदर्शन करे. सगळ्यांच्या नजरेत यावी म्हणून तो ही बंदूक जाणीवपूर्वक टेबलावरच ठेवी.
हा माकडवाला आपल्या एके ४७ चा वापर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध करायचा, तसंच तो हे शस्त्र ऐट म्हणूनही मिरवायचा. या अत्याधुनिक शस्त्रामुळे पोलिसांना तो एक मोठं आव्हानच होऊन बसला होता. शेवटी एकदाचं इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा यांनी त्याला ठार केलं.
आपल्या लाडक्या शस्त्राच्या जोरावर बेफाम झालेला राजेश इगवे नावाचा दुसरा एक गुंड होता. इगवे सुरुवातीला मुंबई पोलिसात एक साधा कॉन्स्टेबल होता, नंतर त्याने आपला मार्ग बदलला आणि तो अबू सालेमच्या टोळीत सामील झाला.
नव्वदीच्या दशकात तो अबू सालेमच्या टोळीतील नेमबाज बनला. पूर्वाश्रमीचा पोलिस या नात्याने जुळलेल्या संबंधातून त्याला वजनाने हलक्या स्वयंचलित बंदुका मिळत. माथेफिरूप्रमाणे तो ही बंदूक कुणावरही चालवू लागला. त्याच्याकडे अशा खूप स्वयंचलित बंदुका होत्या. एकाच वेळी त्यातून अनेक गोळ्या सुटत.
या बंदुकांच्या जोरावर तो शक्तिशाली बनला. मूळचा पोलिस असून पक्का गुंड झालेला इगवे इतका उपद्रवी आणि धोकादायक बनला की, शेवटी एका पोलिस एन्काउंटरमध्ये त्याला कायमचं झोपवावं लागलं. पुण्याच्या कोयता गॅंगने यातून योग्य तो धडा घ्यावा. जो तलवारीच्या जिवावर जगतो, तो शेवटी तलवारीनेच मरतो.
विळा-हातोड्यासारख्या, इतकंच काय एखाद्या स्क्रू ड्रायव्हरसारख्या रोजच्या वापरातल्या साध्यासुध्या घरगुती वस्तूही दहशत माजवणारी हत्यारं म्हणून वापरायची परंपरा आजतागायत सुरूच आहे.
दक्षिण भारतात ‘अरुवल’ नावाचा कोयत्याचाच एक प्रकार शेतकरी आजही अवजार म्हणून वापरतात. गेली अनेक शतकं हे अरुवल तेथील दरोडेखोरांचं आवडतं हत्यार होतं. सर्वसामान्य लोकांनाही वैऱ्याचा बंदोबस्त करायला किंवा ‘बदले की आग’ विझवायला हे अरुवलच उपयोगी पडे.