बॉलिवूडवर ‘मस्तान’ ची माया! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Haji Mastan

बॉलिवूडवर ‘मस्तान’ ची माया!

- वेल्ली थेवर saptrang@esakal.com

हाजी मस्तान संदर्भातील खऱ्या-खोट्या घटनांची प्रचंड चर्चा होण्याच्या काळात त्याच्याविषयी अनेक कपोलकल्पित कहाण्या सांगितल्या जायच्या. तो खूपच उदात्त असल्याचे (हे पूर्णत: खोटे आहे) बोलले जायचे. प्रत्यक्षात, मस्तानला शानशौकीचे जीवन जगणेच पसंत होते. तो मलबार हिल सारख्या उच्चभ्रू वस्तीत स्वतंत्र बंगलेवजा घरात राहायचा. पांढरे बूट, पांढराशुभ्र शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पँट असा त्याचा पेहराव असायचा. अतिशय महागड्या सिगरेट ओढायचा आणि पांढऱ्या शुभ्र रंगाची मर्सिडिझही चालवायचा. त्याच्या डोळ्यासमोर सतत असणारी स्वत:ची मधुबाला (अभिनेत्री सोना ऊर्फ वीणा शर्मा) होती. तिला बॉलिवूडमध्ये एंट्री देण्याचा त्याने प्रयत्न केला होता. त्या काळात हाजी मस्तानची मुंबईतल्या अनेक बड्या लोकांशी नियमित भेटीगाठी व्हायच्या. त्यावेळी अशाही वावड्या उठल्या होत्या की, त्याच्या बंगल्यात जमिनीपासून छतापर्यंत सगळीकडे सोन्याची बिस्किटे लपविली आहेत.

ही एक केवळ काल्पनिक कथा नाही तर सत्य घटना आहे. १९७० च्या दशकांत ‘डाकू और वो’ या चित्रपटाचे महाराष्ट्रातील एका खेड्यात चित्रीकरण सुरू होते. अभिनेत्री साधनाचे पती आर. के. नय्यर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते तर निर्माते एन. पी. अली होते. या चित्रपटात दिग्गज मंडळी होती. संजीव कुमार, रणधीर कपूर आणि रंजिता असे मातब्बर कलाकार असूनही चित्रीकरणाच्या ठिकाणी त्यांच्याऐवजी, बॉलिवूडमध्ये नसलेल्या एका व्यक्तीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होत होती. त्या व्यक्तीला लोक पहात होते, स्पर्श करत होते. त्याच्या ‘परिस स्पर्शा’ने आपलेही नशीब उजळून निघेल, असे त्यांना वाटत होते. ज्याच्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली, ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी नसून हाजी मस्तान मिर्झा होती. त्या काळातील सोने तस्कर ! तो चित्रीकरणाच्या मुहूर्तांच्या कार्यक्रमासाठीचा प्रमुख पाहुणा म्हणून हजर होता.

हाजी मस्तानभोवती जमलेली गर्दी पाहून अभिनेते रणधीर कपूर म्हणाले होते, की ‘कोण म्हणतो, आम्ही स्टार आहोत. त्याची (हाजी मस्तान) क्रेझ पाहता आपण सर्व एखाद्या ज्युनिअर कलाकारांसारखे वाटत आहोत.’’ हाजी मस्तानची गरिबीपासून ते श्रीमंत होण्यापर्यंतची वाटचाल ही अनेक दंतकथांनी भरलेली आहे.

डॉकवरचा शांत चेहऱ्याचा हमाल ते प्रसिद्ध सोने तस्कर असा हाजी मस्तानचा प्रवास झाला. याच हाजी मस्तानमुळे पडद्यावरच्या ‘माफिया’चे व्यक्तिमत्त्व साकारले गेले आणि ते प्रचंड लोकप्रिय झाले. ‘दिवार’ चित्रपटातील ‘विजय’ हे पात्र हाजी मस्तानच्या व्यक्तिमत्त्वावर बेतलेले होते. हाजी मस्तानच्या जीवनपटातून एक शहराचा स्वभाव, त्या शहरातील लोकांच्या इच्छा, आकांक्षा, त्याची काळ बाजू आणि संपूर्ण भारतातून या महानगरात दाखल होणाऱ्या स्थलांतरितांचा आधार बनण्याची क्षमता समजण्यास मदत झाली.

हाजी मस्तानमुळेच मुंबईची ‘सोन्याचे अंडी देणारी कोंबडी’ अशी व्याख्या केली जाऊ लागली. मायानगरी मुंबईत आपले भाग्य बदलू शकते, असे बॉलिवूड चित्रपटांद्वारे लोकांच्या मनावर ठसले जाऊ लागले. योग्य वेळी चाली रचल्या तर, किंवा व्यवस्थेला हातातील खेळणे कसे करायचे, हे तुम्हाला समजले, तर या शहरात आपण आपले नशीब काढू शकतो, असा मुंबईबाबत समज निर्माण झाला.

याबाबतीत मस्तान हा जुन्या काळातील बिग बुल ‘हर्षद मेहता’च होता. त्याने व्यवस्थेतील उणिवा शोधल्या आणि त्यावर काम केले. त्याच्या मृत्यूच्या वीस वर्षांनंतरही भारतातील या सर्वाधिक प्रसिद्ध झालेल्या सोने तस्कराची व्यक्तिरेखा दूरचित्रवाणीवर येणाऱ्या एक मालिकेत समाविष्ट करण्यात आली आहे आणि तसेच, या वर्षी एक माहितीपटही येत आहे.

त्याच्या बंगल्याला अनेक दरवाजे असून तो प्रत्येकवेळी वेगळ्या दरवाजातून वेगळ्या इंम्पोर्टेटेड मोटारीतून बाहेर पडतो. त्याने गरिबांना सोन्याची बिस्किटे वाटल्याचेही बोलले जायचे. पण यातील काहीच खरे नव्हते. कदाचित, सोने हे साठवून ठेवण्याची, संपत्ती म्हणून जतन करण्याची वस्तू असल्याने आणि ते श्रीमंतीचे प्रतीक मानले गेल्याने सोन्याच्या बिस्किटाच्या प्रतिमेचे लोकांमध्ये विशेष आकर्षण होते. त्यामुळेच, मस्तानबाबत तशी प्रतिमा निर्माण झाली असावी. फाळणीनंतरच्या भारतात, विभाजित भारतात आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठीचे आणि आकांक्षा पूर्ण करण्याचे उदाहरण म्हणून मुस्लिमांनी हाजी मस्तानकडे पाहिले. मस्तानला मिळालेले यश पाहता आपला भारतात राहण्याचा निर्णय योग्यच होता, असे त्यांना मनोमन वाटले. एक गरीब सायकल मॅकेनिक आणि एक हमाल ‘गोल्ड किंग’ बनू शकतो, उच्चभ्रू लोकांत ऊठबस करू शकतो, तर कोणत्याही मुस्लिम युवकाला काहीही अशक्य नव्हते. हाजी मस्तानमुळे त्यांच्या अपेक्षा प्रचंड उंचावल्या गेल्या आणि तुमच्यात हिंमत असेल आणि त्या जोरावर तुम्ही यंत्रणेलाही लोळण घ्यायला लावू शकत असाल, तर जग तुमच्या मुठीतच आहे.

अन्‌ बॉलिवूडशी नाळ जुळली

हाजी मस्तान मिर्झा हा डॉन असला तरी लोकांना ठार मारण्याच्या फंदात तो स्वत: कधी पडला नाही. मुंबईतील मोक्यावरची मालमत्ता विकण्यासाठी एखाद्याने विरोध केला तर त्यांना बाहेर काढण्यासाठी तो करीम लाला आणि दाऊद इब्राहिम या आपल्या पंटर लोकांचा वापर करायचा. हीच पद्धत नंतर इतर माफिया डॉन आणि राजकीय पक्षांनीही वापरली. सार्वजनिकरित्या मात्र हाजी मस्तानने आपली प्रतिमा जपली होती आणि अन्य गुंडांच्या भांडणांत तो मध्यस्थाची भूमिका बजावत असे. दिलीपकुमार आणि सायरा बानो हे बॉलिवूडमधील दिग्गज हाजी मस्तानला आपल्या घरी पार्टीसाठी नेहमीच बोलवत असत. यामुळे हाजी मस्तानचे व्यक्तिमत्त्व आणखीच उजळून निघायचे. असे म्हणतात की, एकदा करीम लाला आणि हाजी मस्तान हे दिलीपकुमार यांना खूश करण्यासाठी त्यांच्या पायाजवळ बसले आणि त्यांच्या चित्रपटातील संवाद म्हणू लागले.

कदाचित याच काळात बॉलिवूड आणि माफिया यांचे गुळपीठ जमले असावे. मस्तानने ज्यावेळी चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने माफिया-बॉलिवूड या अभद्र युतीचा पाया रचला. अर्थात, माफियांकडून घेतली जाणारी थोडीफार मदत, ही कालांतराने हिंदी चित्रपटावरची आर्थिक पकड मजबूत करेल, असे त्यावेळी कोणालाही स्वप्नातही वाटले नसेल. १९६०-७० च्या दशकात हाजी मस्तानने बॉलिवूडमध्ये आपले बस्तान बसविले नसते, तर कदाचित माफिया हे बॉलिवूडपासून एका विशिष्ट अंतरावरच राहिले असते. त्या काळात तस्करीबाबत भारतीयांमध्ये असलेला नैतिक संभ्रम हीच खरी समस्या होती. त्यामुळे तस्करीचा मार्ग चुकीचा आहे, असे अनेकांना वाटत नव्हते. स्वातंत्र्योत्तर भारताचे नैतिक अधिष्ठान अद्याप बसले नव्हते. भारतीयांचा सतत अपमान करणाऱ्या ब्रिटिशांनी सार्वजनिक नीतीमत्तेला रसातळाला नेले होते. इंग्रजांनी आयात शुल्काची आकारणी केली आणि ती लागू गेली. मात्र भारतीय इंग्रजांचा तिरस्कार करत असल्याने त्यांनी या कराचा नेहमीच विरोध केला. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही लोकांचा या कराला असलेला नैसर्गिक विरोध कायम राहिला.

आणीबाणी ठरली कर्दनकाळ

तस्करी हा कायद्यानुसार गुन्हा असला तरी तो विनातिकीट प्रवास करणाऱ्यासारखा होता. तिकीट न काढता जोपर्यंत पकडले जात नाही, तोपर्यंत प्रवास करायला काय हरकत आहे, असा भारतीय जनमानसात विचार होता. शेवटी आणीबाणी ही सरकारसाठी आश्‍चर्यकारक गेमचेंजर ठरली. नैतिकेचे आवरण घालून तस्करी करणाऱ्यांचा बुरखा आणीबाणीने फाडला. एका झटक्यात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सर्व स्तरातील गुंडांना आणि गुन्हेगारांना लक्ष्य केले. तस्कर, आर्थिक गुन्हेगार, गुंड, काळाबाजार करणारे, किरकोळ गुन्हेगार, साठेबाजी करणारे या सर्वांना एकजात दुष्ट म्हणून पकडून तुरुंगात डांबले गेले. कायद्याशी लपंडाव करणाऱ्या हाजी मस्तान, वरदराजन मुदलियार, करीम लाला, दाऊद इब्राहिम, रमा नाईक, युसूफ पटेल यांच्या मुसक्या आवळल्या आणि ‘मिसा’ आणि ‘कोफेपोसा’ कायद्यांनुसार गुन्हे दाखल केले गेले. या कारवाईमुळे दिवास्वप्नात असलेली भारतीय जनता खडबडून जागी झाली. या कारवाईतून एकच संदेश स्पष्टपणे दिला गेला : तस्करी हा वाईट गुन्हा आहे. तुम्ही तस्कर असाल तर तुम्ही वाईट आहात. देशहितासाठी आणि विकास कामासाठी वापरण्यात येणारा कर बुडवून तुम्ही देशाला फसवत आहात. तुम्ही कायदा पाळणारे नाहीत. तुमच्या नावावर थकबाकी असेल, तुम्ही गुंड, तस्कर असाल, तर तुरुंगाची हवा खावीच लागेल.

शरणागती आणि आर्थिक उदारीकरण

हाजी मस्तान आणि अन्य गुंडासाठी हा वास्तव स्वीकारण्याचा काळ होता. तुरुंगातील दिवस त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले. त्यांनी लाखो रुपये कमावले होते, पण तस्करीच्या गुन्ह्यात अडकवून स्वत:चे अस्तित्व धोक्यात घालण्याची त्यांची इच्छा नव्हती. आता त्यांना आपले नशीब पणाला लावायचे नव्हते. ते एकत्र झाले आणि त्यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला आव्हान देणाऱ्या समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांना शरण जाण्याचे ठरविले. शेवटी आणीबाणी मागे घेतल्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी काही अटींवर त्यांची सुटका केली. हाजी मस्तानसह सर्व तस्करांनी दिल्लीत एका सार्वजनिक कार्यक्रमात जयप्रकाश नारायण यांच्यासमोर शरणागती पत्करली. हाजी मस्तान याच्याबद्दल त्याच्या मृत्यूपर्यंत सर्वांनाच आकर्षण होते. अर्थात शतकाच्या अखेरीस हे आकर्षण कमी झाले. कारण जुन्या पिढीला मागे टाकून नवी पिढी पुढे आली. या नव्या काळात, म्हणजे १९९२-९३ च्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानंतर मौल्यवान सोन्याऐवजी उपभोगवादाला अधिक महत्त्व मिळाले.

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार असून, मुंबईतील आणि एकूण गुन्हेगारीविषयक पत्रकारिता त्या करतात.)

(अनुवाद : अरविंद रेणापूरकर)