खरी कहाणी ‘केरळ स्टोरी’ मागची...

मुस्लिम तरुण केरळमधील तरुण हिंदू मुलींना भुलवून लग्नाच्या जाळ्यात ओढतात, असा या चित्रपटाचा दावा आहे.
The Kerala Story Movie
The Kerala Story MovieSakal

- वेल्ली थेवर, vellythevar@gmail.com

सत्य घटनांवर बेतलेल्या कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात, सर्जनसुलभ कलात्मक स्वातंत्र्य संपतं कुठं आणि निव्वळ कपोलकल्पित कहाणी सुरू होते कुठं, हे सांगणं खरंच कठीण असतं. तथापि, विपुल शहानिर्मित ‘द केरळ स्टोरी’ तर, प्रत्यक्ष जीवनातील घटनांवर आधारित म्हणवला जाणारा एखादा चित्रपट वास्तवात किती कल्पनाबंबाळ बनवला जाऊ शकतो, याचं अतिशय भयावह उदाहरण आहे.

मुस्लिम तरुण केरळमधील तरुण हिंदू मुलींना भुलवून लग्नाच्या जाळ्यात ओढतात, असा या चित्रपटाचा दावा आहे. या हिंदू मुलींच्या मनावर कट्टर इस्लामी शिकवणूक बिंबवली जाते आणि मग आयसिस (द इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया) मध्ये सामील होण्यासाठी जहाजातून त्यांना बळजबरीने सीरिया किंवा येमेनला पाठवलं जातं, असं या चित्रपटात दाखवलं आहे. प्रथम सांगितलेला अगडबंब आकडा संबंधितांनी नंतर मागे घेतला असला तरी, हजारो मुलींच्या बाबतीत असं घडलं, हाच या चित्रपटाच्या पटकथेचा मूलाधार आहे.

आयसिसमध्ये सामील झाल्यानंतर मारल्या जाऊन अरबस्तानातील वाळवंटात पुरल्या गेलेल्या मुलींचा ३२ हजार हा डोळे विस्फारायला लावणारा अजब आकडा या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्त सेन यांनी कुठून आणि कसा मिळवला हे माझ्या तरी मुळीच लक्षात येत नाही. प्रत्यक्षात अशा प्रकारे आयसिसमध्ये दाखल झालेल्या एकमेव हिंदू मुलीची आई आजही जिवंत आहे. आपल्या मुलीचा थांगपत्ता लागावा म्हणून ती तिच्या जिवाचा आटापिटा करत आहे. कोर्टात तिच्यासाठी दाव्यांमागून दावे दाखल करत आहे, तर मग बाकीच्या ३१ हजार ९९९ मुलींचे आई-वडील अगदी चिडीचूप कसे काय बसलेत?

निमिषा कुमार ही ती एकमेव हिंदू मुलगी. ती आयसिसमध्ये सामील झाली होती. बिंदू संपत ही तिची आई आपल्या मुलीच्या प्रकरणात सर्वांगीण आणि सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी कोर्टात अनेकविध अर्ज दाखल करत आहे.

निमिषा दंतवैद्यकी शिकत होती, ती शास्त्रीय नृत्यही करत असे. आपल्या प्रशिक्षण संस्थेतच परिचय झालेल्या मित्राशी लग्न करता यावं म्हणून २०१३ मध्ये तिने इस्लाम धर्म स्वीकारला; परंतु या मित्राने तिला सोडून दिलं आणि दुसऱ्याच शहरातल्या एका वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. या वेळी निमिषा गरोदर होती. प्रेमभंगाने खचून जाऊन तिने गर्भपात करवून घेतला आणि ती एका स्वयंसेवी संस्थेत काम करू लागली. ही संस्था एंडोसल्फान या विवादास्पद कीटकनाशकामुळे बाधित मुलांची काळजी घेत असे.

इथं काम करत असतानाच कट्टर मूलतत्त्ववादी धर्मोपदेशक झाकिर नाईक यांच्या शिकवणुकीने निमिषा प्रभावित झाली. विवाहपूर्व लैंगिक संबंध आणि अन्य मुक्त भावनाविष्कार यांचे दुष्परिणाम ते विशद करत. यातून अखेरीस अब्दुल रशीद आणि त्याची बायको सोनिया सेबॅस्टियन या दोन कट्टर मूलतत्त्ववाद्यांचं आकर्षण निमिषाला वाटू लागलं. या दोघांनी सत्यसरणी नावाची एक संस्था सुरू केली होती. शेवटी आपल्याप्रमाणेच धर्मांतर केलेल्या बेक्सिन व्हिन्सेंट याच्याशी निमिषाने विवाह केला.

आयसिसबाबत अधिक माहिती नसलेल्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी सांगायला हवी. अबू बकर बगदादी हा माथेफिरू इराकमधील एक स्थानिक दंगलखोर गुंड होता. सुरुवातीला तो अल कायदा या संघटनेत होता. त्यातून फुटून निघून त्याने इराकमध्ये आयसिस या संघटनेची स्थापना केली. २०१३ ते २०१५ या कालावधीत त्याने यझिदी, शिया मुस्लिम आणि इतर वांशिक अल्पसंख्याकांची, तसंच आपल्या राजकीय विरोधकांची अमानुष कत्तल करून इराकमधील काही प्रदेशाचा कब्जा घेतला होता.

माणसं मारून तो त्यांचे देह सार्वजनिक जागी लटकावत असे. या प्रसंगाची आम्ही पाहिलेली छायाचित्रं निव्वळ भीषण होती. सार्वजनिक चौकात माणसं जनावरांप्रमाणे ओळीने लटकावलेली दिसत. एकविसाव्या शतकातील एक अतिभयाण वंशविच्छेद म्हणूनच हे चित्र मानवजातीच्या लक्षात राहील.

एक वेळ अशी आली की, इराकची राजधानी बगदादच्या दिशेने या बगदादीची आगेकूच सुरू झाली होती. आता इराक आयसिसच्या ताब्यात गेलाच असं वाटू लागलं होतं. बगदादी आणि आयसिसच्या या यशात इंटरनेटचा सिंहाचा वाटा होता असं म्हणता येईल. कारण उच्चशिक्षित तरुण मुस्लिम मुलांना आपल्या प्रचारासाठी आकर्षित करणं आयसिसला त्यामुळेच शक्य झालं होतं. आपापल्या घरात लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर घेऊन आरामात बसलेल्या या तरुण छुप्या रुस्तुमांना इस्लामी खिलाफतची कल्पना प्रत्यक्षात आणणं अगदी सहजशक्य वाटत होतं. आपण नुसती समोरच्या की-बोर्डवरची नेमकी बटणं दाबली की झालं ! इस्लामच्या सुरुवातीच्या काळातील खलिफांच्या शासनावर सुन्नी मुस्लिमांची अतोनात श्रद्धा होती.

आयसिसच्या या इंटरनेट प्रचारकांनी घातलेली भुरळ फळास आली आणि या संघटनेचा परमोत्कर्ष झाला. संपूर्ण जगभरातून सुमारे ४० हजार स्त्री-पुरुष आयसिसमध्ये सामील होण्यासाठी इराकमध्ये दाखल झाले. परंतु, बगदादीच्या शोधमोहिमेदरम्यान अमेरिकन सैन्यदलांनी कोणतीच दयामाया दाखवली नाही. या चाळीस हजारांतील अनेकांना त्यांनी यमसदनास पाठवलं.

मोसुल आणि सीरिया या प्रदेशात खिलाफतीची सत्ता आणण्याचं अबू बकरचं स्वप्न साकार होणं अशक्य असल्याचं चित्र २०१५ च्या सुमारास स्पष्ट होऊ लागलं. त्या वेळी अफगाणिस्तानमधील इतर काही मंडळींनी आयसिसची कल्पना उचलून धरली. इच्छुक तरुणांना अफगाणिस्तानमध्ये जाणं अधिक सोपं होतं. इराक आणि सीरियाला जाणं दिवसेंदिवस कठीण होऊ लागलं तेव्हा आयसिसच्या प्रचार यंत्रणेने मुस्लिम तरुणांना अफगाणिस्तानकडे आकर्षित करावयास सुरुवात केली.

आयसिसच्या लढाऊ तरुणांची कुमक मिळाली की अफगाणिस्तानमधील युद्ध अधिक जोमाने लढून अमेरिकन सैनिकांना चांगलाच धडा शिकवता येईल, असं अफगाणिस्तानमधील धर्मयोद्ध्यांना वाटू लागलं.

तहरीक-ए-तालिबानमधील फुटीर गटाने २०१५ मध्येच अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक राज्याच्या विलायत खुरासानची स्थापना केली होती. थोडक्यात, हे खुरासानमधील इस्लामिक राज्य म्हणून ओळखलं जाई. २०१६ मध्ये सुमारे २१ लोक केरळमधून इराणला गेले आणि तिथून चालत चालत त्यांनी अफगाणिस्तान गाठलं. २१ केरळी नागरिक बेपत्ता झाल्याच्या घटनेने आपली राष्ट्रीय तपास संस्था (NIA) बुचकळ्यात पडली.

तीन वर्षं तपास करून देशाच्या अन्य भागांतून आयसिसच्या अनेक सहानुभूतिदारांना त्यांनी अटक केली. हे २१ बेपत्ता केरळी नागरिक अफगाणिस्तानमधील आय.एस.ची सत्ता असलेल्या प्रदेशात कसे गेले, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. या २१ पैकी केवळ सहा स्त्रिया होत्या. त्यातही एकच मूळची हिंदू, दोन धर्मांतरित कॅथॉलिक आणि तीन जन्माने मुस्लिम स्त्रिया होत्या.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने २०१७ मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार सोनिया सॅबिस्टन हिने आपला पती अब्दुल रशीद अब्दुल्ला याच्यासह ३१ मे २०१६ रोजी मुंबई विमानतळावरून उड्डाण केलं होतं. कोट्टायम शहराचा रहिवासी असलेला अब्दुल रशीद एका खासगी क्षेत्रातील कंपनीत इंजिनिअर होता. आपल्या प्रथम अपत्याच्या अकाली मृत्यूनंतर आपली ही नोकरी सोडून तो धर्मप्रचारक प्रवचनकार बनला होता, तो धर्मांतरंही घडवून आणत असे. इस्लामिक राज्याच्या विचारसरणीवर आधारित अशी कुराणची शिकवण द्यायला त्याने सुरुवात केली होती.

सत्यसरणी या नावाची धर्मांतराला प्रोत्साहन देणारी एक संस्थाही त्याने सुरू केली होती. रशीद हा एक सलाफी (कट्टर मूलतत्त्ववादी) मुस्लिम होता. अन्य धर्मांतील लोकांना इस्लामच्या छत्राखाली आणण्याच्या कलेत त्याने विशेष प्रावीण्य संपादन केलं होतं. ‘रमझान महिन्याच्या शेवटी शेवटी, २०१५ च्या जुलैमध्ये केव्हातरी, इस्लामिक स्टेट आणि त्यांच्या कल्पनेतील जिहाद यांना पाठिंबा देण्यासाठी पदन्ना आणि कासारगोड येथे या जोडप्याने गुप्त वर्ग चालू केले होते.’ असं NIA ने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

परंतु खुरासान प्रांतात गेलेल्या एकूण २१ पैकी बहुतेक सर्व केरळी स्त्री-पुरुषांनी एकट्या अब्दुल रशीदकडूनच प्रेरणा घेतली होती, ही गोष्ट मात्र त्या वेळी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या लक्षात आली नव्हती. प्रेषित महंमद यांच्या हयातीत, मध्ययुगीनकाळी होतं त्या धर्तीचं प्रशासन असलेल्या चिरकालीन स्वर्भूमीचं आमिष दाखवून रशीदनेच त्या साऱ्यांना भुरळ पाडली होती.

तीन वर्षांनी, म्हणजे सन २०१८ हे वर्ष संपता संपता एन.आय.ए. आणि इतरही भारतीय यंत्रणांना अफगाणिस्तानमधील काबूल शहरातल्या बदाम बाग तुरुंगाला भेट द्यायला पाचारण करण्यात आलं तेव्हा कुठं अब्दुल रशीदची दु:साहसं सर्वांच्या निदर्शनाला आली. त्याच्या प्रभावाखाली येऊन इस्लामिक राज्यासाठी बळी पडलेल्यांच्या विधवा त्या वेळी अफगाण सरकारच्या ताब्यात होत्या. त्यापैकी सहा केरळच्या होत्या आणि इतर जम्मू-काश्मीर व अन्य राज्यांतील होत्या. त्या विधवांनी भारतीय यंत्रणांना सांगितलं की, त्यांचे पती अफगाणिस्तानच्या पूर्व भागात असलेल्या नांगरहार प्रांतातील पर्वतराजीत झालेल्या लढाईत मारले गेले होते.

आय.एस.आय.च्या ताब्यात असलेल्या नांगरहार प्रांतात प्रवेश केल्याकेल्याच अब्दुल रशीदच्या गटातील तरुणांचे बळी जायला सुरुवात झाली होती.

अमेरिकनांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यात बरेच केरळी लोक ठार झाले. अशफाक माजीद नावाचा एक जण त्या गटात होता. केरळी तरुणांपैकी कोणाचाही बळी पडताच दरवेळी तो मृताच्या कुटुंबाला संदेश पाठवत असे. मूळ हिंदू असलेल्या निमिषाने इस्लाम धर्म स्वीकारताना फातिमा हे नाव धारण केलं होतं. २०१६ मध्ये गालिचांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ती श्रीलंकेला गेली. तिथून ती अफगाणिस्तानला कशी पोहोचली, हे तिची आई बिंदू संपत हिच्या दृष्टीने एक कोडंच आहे.

अफगाणिस्तानात असताना बेक्सिन विन्सेंटपासून तिला एक मूलही झालं. हा बेक्सिनसुद्धा स्वतःचा ख्रिश्चन धर्म सोडून मुसलमान झाला होता. ख्रिश्चन लोकांनासुद्धा इस्लाम स्वीकारायला लावणाऱ्या अब्दुल रशीद या त्यांच्या गुरूचं कसब यावरून दिसून येतं. रशीदची बायको सोनिया सेबॅस्टियन ही मूळची कॅथोलिक. ख्रिश्चन धर्मविषयक आपल्या ज्ञानाचा उपयोग बेक्सिनच्या मतपरिवर्तनासाठी तिने नक्कीच केला असणार, कारण त्यानंतर बेक्सिनचा भाऊ आणि भावजय यांनीही धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारला होता. हे सारेच मग इराणमार्गे अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांतात गेले होते.

अफगाणिस्तानात निमिषाचा पती बेक्सिन आणि त्याचा भाऊही मारला गेला. त्यानंतर या भावाची बायको मेरीन हिने आपला गटनायक अब्दुल रशीद याच्याशी निकाह लावला. त्यापूर्वीही रशीदची अनेक लग्नं झालेली होती. अब्दुल रशीदची पहिली बायको बिहारी होती. अफगाणिस्तानमध्ये असलेल्या आपल्या नवऱ्याला साथ देण्यासाठी काबूलला जाणाऱ्या विमानात चढण्याच्या प्रयत्नात असताना २०१७ मध्ये तिला दिल्लीतच ताब्यात घेण्यात आलं होतं.

अशा चित्रविचित्र सहप्रवाशांच्या गटाचा गुरू आणि म्होरक्या असलेला अब्दुल रशीदही अखेरीस मारला गेला. सोनिया, मेरिन आणि यास्मिन अहमद अशा त्याच्या तीन विधवा त्याच्या मागे राहिल्या. अब्दुल रशीद अफगाणिस्तानात मारला जाताच, मुळातच कधी न घडलेल्या ‘ द केरळ स्टोरी’चा प्रवास ठप्प झाला. आयसिसच्या सहाही विधवा आता भारतात परत येऊ इच्छित आहेत; परंतु त्यांना न स्वीकारण्याची योग्य अशीच भूमिका भारत सरकारने घेतलेली आहे.

आपला मुख्य विषय असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाबद्दल सांगायचं तर मूळ गाभा कायम ठेवून एखाद्या कथेचं नाट्यपूर्ण चित्रण करण्यात काहीच वावगं नसतं; पण या प्रकरणात प्रत्यक्षात एकुलती एक हिंदू स्त्री आयसिसला सामील झालेली असताना ३२ हजार स्त्रियांची ही कथा असल्याचं चित्रपटात भासवणं ही कलात्मक नाट्यमयतेची भलतीच ओढाताण होय. यापेक्षा कितीतरी किरकोळ गोष्टींपायी देशातील सार्वजनिक सलोखा धोक्यात आला आहे. ही तर अवाढव्य बागुलबुवाचीच चंदेरी आवृत्ती आहे.

हा चित्रपट दुष्ट आणि धोकादायकच म्हणावा लागेल, कारण खुद्द ‘एन.आय.ए’ च्या नोंदीनुसार संपूर्ण भारतात आयसिससंबंधी आरोप केवळ दोनशे व्यक्तींवर ठेवण्यात आले आहेत. या दोनशेमध्येच भारताबाहेर पाऊल न ठेवता इथंच राहून इंटरनेटवर आयसिसचा प्रचार व प्रसार करणाऱ्या अनेकांचाही समावेश आहे. धर्मांतर करून फातिमा बनलेली निमिषा कुमार ही आयसिसमध्ये सामील झालेली केरळमधील एकमेव हिंदू मुलगी आहे. इतर पाच स्त्रियांपैकी दोन ख्रिश्चन, तर बाकीच्या जन्मानेच मुस्लिम होत्या, हे आपण पाहिलंच आहे.

हिंदू-मुस्लिम तरुणांमध्ये असलेल्या विलक्षण बंधुभावाचं मनोज्ञ दर्शन केरळमध्ये पावलोपावली घडतं. पण ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बनवणाऱ्या मंडळींना याची जाणीव दिसत नाही. बुरखा घातलेल्या मुस्लिम विद्यार्थिनीला आपल्या मागे बसवून, कुंकू लावलेली हिंदू विद्यार्थिनी दुचाकी चालवत आहे, हे दृश्य केरळमध्ये नेहमीच पहावयास मिळतं. या देशात केवळ केरळमध्येच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असे सर्व समाजघटक सारखेच शिक्षित असल्याचं दिसतं. केरळच्या मातीत मुरलेलं हे जातीय सौहार्द बिघडवायचं सामर्थ्य ‘द केरळ स्टोरी’सारख्या तथ्यहीन चित्रपटात मुळीच असू शकत नाही.

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार असून मुंबईतल्या गुन्हेगारीबद्दल आणि मुंबई शहराबद्दल लेखन करतात.)

(भाषांतर : अनंत घोटगाळकर)

anant.ghotgalkar@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com