

Video Art and Ranbir Kaleka
esakal
हर्ष भटकळ - saptrang@esakal.com
‘व्हिडिओ आर्ट’ म्हणजे चित्रपट किंवा ध्वनिचित्रमुद्रण नव्हे. हलते दृश्य हीच मुळी कलाकृती बनते. काळ, हालचाली, पुनरावृत्ती, प्रकाश आणि ध्वनी हे सारे कलाकाराची भाषा होतात.
पाच वर्षांचे होईपर्यंत रणबीर कालेका जुन्या हवेलीत राहात असत. ‘तिथे वेळ कसा तो जातच नसे,’ हे त्याच्या स्मरणात आहे. बाहेरच्या जगात फारसे काही होत नसे. पटियालाजवळ बहमाना नावाचे एक खेडे होते. ज्या आर्ट गॅलरीज् आणि म्युझियम्समध्ये रणबीर यांच्या कलाकृती नंतर प्रदर्शित होणार होत्या त्यापासून ते कोसो दूर होते. बहुतेक वेळा आतल्या शांत जागेत, प्रकाशाच्या तिरिपीत नाचणाऱ्या धुलीकणांचा खेळ ते पाहात. चारकोलने चित्रे काढत. जणू ते कोपऱ्यात, रिकाम्या जागेत दडलेल्या रहस्यांचाच शोध घेत होते. बालमनात कलेचे स्फुल्लिंग फुलत होते.
गोष्टींत गुरफटलेले बालपणरणबीरचे कुटुंब गोष्टीवेल्हाळ होते. त्यांची आजी आणि काका त्यांना गोष्टी सांगायचे. खेड्यात कथाकारही होतेच. त्या कथा जादूच्या, गूढरम्य असायच्या. त्यातली एक गोष्ट- ‘आरशांचा पर्वत’ (‘अ माउंटन ऑफ मिरर्स’) त्यांच्या कायम लक्षात राहिली. अनेक वर्षानंतर ही कथा अनपेक्षितपणे त्यांच्या एका व्हिडिओत अवतरली. त्यांना जोडणारा धागा बरेच काही सांगून जातो. या कथांचे स्वरूप नेहमीच सरळसोट असते असे नाही. काही तरी उलटसुलट असते; पुनरावृत्ती आणि बदलसुद्धा. आठवण्याची प्रक्रिया तशीच असते मुळी! गतगोष्टींतील एखादी आठवण अचानक जागृत होते आणि त्यात नंतर घडलेल्या घटनेचाही समावेश होऊ शकतो.
रणबीर सांगतात, की खेड्यातल्या हवेलीत काढलेली पाच वर्षे ही निर्णायक ठरली. वास्तूंचे परस्पर प्रमाण आणि आकार, सूक्ष्म वस्तूंचे तपशील, दुरून दिसणारे प्रकाशाचे अंधूक स्वरूप, धुरकटलेल्या काचेच्या खिडक्यांतून दिसणारी दृश्ये, यांतून कल्पकता वाढत गेली. चारकोलने काढलेल्या त्यांच्या सुरूवातीच्या चित्रांत विविध प्राणी, माणसे- त्यात नर्तक यांची चित्रे होती. एकदा त्यांच्या काकाने त्यांना मायकल अँजेलो आणि सिस्टिन चॅपेलची हकिकत सांगितली. तेव्हा कुमारवयातील रणबीर यांच्या डोक्यात विचार आला की ही चित्रे काढायला किती वेळ लागला असेल... पेंटिंग वेळखाऊ असते, हे त्यांच्या लक्षात आले.