esakal | कोरोनाचे प्रलय संकट 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचे प्रलय संकट 

काही दिवसांपूर्वी द्वेषमूलक प्रचार करून सत्तारूढ पक्षाने धार्मिक तणावाचं देशभर निर्माण केलेलं वातावरण एकाएकी कोषात गेलं. हे करोनांच वरदान म्हणायच का? की करोनानं निरनिराळ्या देशांच्या सरकार, जनता यात एकाएकी एकप्रकारची "भययुक्त शिस्त" निर्माण केली, असं म्हणायचं? 

कोरोनाचे प्रलय संकट 

sakal_logo
By
विजय नाईक

जगबुडी होणार, असं भाकित आपण गेली अनेक वर्ष ऐकतोय. ही नॉस्ट्रेॅडॅमसची भविष्यवाणी नाही, तथापि, नॉस्ट्रॅडॅमस याची अनेक भाकितं खरी ठरली, असे सप्रमाण सिद्ध करणारेही अनेक. गेलं शतकात औद्योगिकरण, प्रगतीकडे प्रवास करताना प्रगत देशांनी पर्यावरण व हवामानबदलाकडे केलेल्या दुर्लक्षाचे गंभीर परिणाम आपण अनुभवित आहोत. अमेरिकेत कॅलिफोर्नियात लागणारे वणवे लाखो घरे बेचिराख करीत लोकांना बेघर करीत आहेत, जंगलातील अग्निकांड नुकतेच ऑस्ट्रेलियाने अनुभविले. उत्तर व दक्षिण धृवातील बर्फाचे कवच अस्तेअस्ते कमी होत, असून त्यामुळे वाढणारी सागरीपातळी काही देशांना जलसमाधि देणार आहे. समुद्राकाठचे देश त्यामुळे चिंतेत पडलेत. युरोपातील अनेक देशात गेल्या एक-दोन वर्षात अचानक आलेल्या पुरांनी मनुष्यहानिबरोबरच अब्जावधी डॉलर्सच्या संपत्तीचे नुकसान केले. त्सुनामीने केलेला कहर वेगळा. स्कॅडिनेव्हियन देशात (नॉर्वे,स्वीडन,डेनमार्क व फिनलॅंड) उष्णतेची लाट आल्याने असंख्य लोक मृत्युमुखी पडले. कारण काय, तर लोकांच्या घरात ना पंखे ना एअरकंडिशनर्स. त्यांना मुळी सवयच नव्हती. त्यामुळे, कुटुंबे होरपळून ठार झाली. 

प्रदूषणाने भारत व चीनसह जगातील अनेक देशात माणसाला श्‍वास घेणं मुश्‍किल करून ठेवलय. दुसरीकडे, ऍमेझानचं जंगल झपाट्यानं कापलं जात असून, त्याचे दक्षिण अमेरिकेच्या हवामानबदलावर काय गंभीर परिणाम होतील, याची आज आपल्याला कल्पना करता येणार नाही. युरोपातील पाळीव दुधधुभत्या जनावरांच्या "फूट-अँड माऊथ" रोगाने, नंतर "स्वाईन फ्लू," "सार्स," "मर्स," "इबोला," "निफा"आदी साथींनी भर घातली. त्यामुळे, जगाची आधीच ताणली गेलेली आरोग्यव्यवस्था जवळजवळ कोलमडून पडल्यासारखे चित्र निर्माण झाले. नेमक्‍या त्याच वेळी करोनाने जगावर आघात केला व तो 194 पैकी तब्बल 150 ते 160 देशात पसरला आहे. माणसाने निसर्ग व प्राणीमात्रांवर केलेल्या अत्याचाराचा हा परिणाम आहे काय? मानवजातीची व त्याने केलेल्या शास्त्रीय व विज्ञानाच्या प्रगतीची परिक्षा निसर्ग पाहतोय काय?करोनाग्रस्त रुग्णाला बरे करण्यासाठी आज कोणतीही लस उपल्ब्ध नाही. ती तयार होण्यास किमान दीड वर्ष लागेल. त्यानंतरही ती सहजासहजी बाजारात उपलब्ध होण्याची शक्‍यता नाही. दरम्यानच्या काळात लाखो लोक करोनाचे बळी ठरण्याची शक्‍यता आहे. हे चित्र अत्यंत भयावह असल्यामुळे अमेरिका, युरोप, भारत, चीन, आखाती देश यांना देशाचे दरवाजे अचानक बंद करावे लागले. जगाचे दैनंदिन व्यवहार, तसंच अर्धअधिक जग ठप्प झाल्याचं दिसतय. भारतात किमान दोन आठवडे "लॉकडाऊन" झाल्यावरही आपण करोनाच्या भयावह तिसऱ्या टप्प्यात जाऊ शकणार नाही, याची खात्री कुणी देऊ शकत नाही. काही दिवसांपूर्वी द्वेषमूलक प्रचार करून सत्तारूढ पक्षाने धार्मिक तणावाचं देशभर निर्माण केलेलं वातावरण एकाएकी कोषात गेलं. हे करोनांच वरदान म्हणायच का? की करोनानं निरनिराळ्या देशांच्या सरकार, जनता यात एकाएकी एकप्रकारची "भययुक्त शिस्त" निर्माण केली, असं म्हणायचं? 

प्रस्तुत ब्लॉग लिहिताना समोर कोरोनाची माहिती देणाऱ्या "वर्ल्डोमीटर"चं 24 मार्चपर्यंत अपडेट केलेलं पान आहे. त्यानुसार, जगात कोरोनाची लागण 3 लाख,82 हजार 572 जणांना झाली असून 16,578 जणांचे मृत्यू झाले. उपचारामुळे 102,522 लोक वाचाले. ज्यांना संसर्ग झालाय, त्या सक्रीय रुग्णांची संख्या 2 लाख 63 हजार 472, त्यातील 2 लाख 51, 393 जणांना कमी संसर्ग (माईल्ड कंडिशन) आहे व 12 हजार 79 जणांची स्थिती अतिशय गंभीर आहे. चीनच्या हुबेई प्रांतातील वूहान शहरातून सुरूवात होऊन कोरोनानं जगावर आक्रमण केलं. त्याचा परिणाम इतका काही विलक्षण झाला, की जगातील अनेक देशात हैदोस घालणाऱ्या आयसीस, अलकैदा सारख्या दहशतवादी संघटनांनी त्यांच्या अतिरेक्‍यांना प्रवास न करण्याचे आदेश दिले. कारण, हल्ले करण्यापूर्वीच ते कोरोनाचे शिकार होण्याची दाट शक्‍यता होती. 

"द इकॉनॉमिस्ट' मधील लेखानुसार, 18 मार्च रोजी चीनबाहेर कोरोनाची बाधा झालेल्यांची 155 देशातील लोकांची संख्या 1 लाख 34000 झाली होती. त्यापुढील केवळ सात दिवसात 43 देशात तिची संख्या 90 हजारांनी वाढली. जानेवारी व फेब्रुवारीमध्ये आधीच्या अंदाजानुसार, चीनच्या उत्पादनात तीन टक्के होणारी घट 13.5 टक्‍क्‍यांवर जाऊन पोहोचली. किरकोळ विक्रीचे प्रमाण 4 टक्‍क्‍यांऐवजी 20.5 टक्के घसरले, पायाभूत रचना, यंत्रसामुग्री उत्पादनात 24 टक्‍क्‍यांनी घट झाली. लंडनमधील इम्पेरियल कॉलेजच्या अभ्यास गटाने केलेल्या अध्ययनानुसार, ""करोनाची साथ अशीच पसरत राहिली, तर येत्या उन्हाळ्यापर्यंत अमेरिकेत 2.2 दशलक्ष (22 लाख) व ब्रिटनमध्ये 5 लाख जण दगावतील. कोरोनाच्या लागणीकडे पाहता असे दिसते, की पहिल्या दहा देशात सारे प्रगत देश आहेत. त्यात चीन, इटली, अमेरिका, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, दक्षिण कोरिया, स्वीत्झरलॅंड, ब्रिटन, नेदरलॅंड्‌स यांचा तसेच, आशियातील इराणचा समावेश आहे. यातील इराण वगळता अन्य देश हे स्वच्छता, नीटनेटकेपणा, अत्याधुनिकता, पर्यटन, प्रदूषण रहित हवामान, यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यातील इटली, स्पेन, अमेरिका, या देशांना करोनाचा सर्वाधिक फटका बसला. त्यामानाने, विकसनशील भारत, आफ्रिका, उपखंडातील देशात त्याची वाढ तितक्‍या प्रमाणात अद्याप झालेली नाही. याचा अर्थ, प्रगत देशातील लोकांची प्रतिकारशक्ती कमी व विकसनशील देशातील लोकांची अधिक, असे समजायचे का, याचीही शास्त्रज्ञ पाहाणी करतील. 

दरम्यान, या प्रकारच्या साथीच्या रोगाचे काय परिणाम होतात, याची कल्पना येण्यासाठी प्रत्येकाने 2011 मध्ये आलेला "कॉन्टॅजियन" हा चित्रपट हमखास पाहिला पाहिजे. तब्बल नऊ वर्षांपूर्वी दिग्दर्शक स्टीव्हन सोडरबर्ग यांनी दिग्‌र्दशित केलेल्या चित्रपटातील कथानकाचे आजच्या परिस्थितीशी किती साम्य आहे, हे ध्यानात येईल. त्यातील विषाणू हॉंगकॉंगच्या कोवलूनमधील रेस्टॉरन्टमधून खाण्यातून अमेरिकन अभिनेत्रीच्या शरीरात प्रवेश करतो व नंतर अमेरिकेत पसरतो. रोग्याची लक्षणे आज दिसतात, नेमकी तशीच आहेत. हा विषाणू वटवाघूळातून डुकरांमध्ये प्रवेश करतो व त्याचे मांस खाल्लयाने माणसात पसरतो. कोरोनाचा विषाणू हा ही चीनमधील वूहान शहरातील खाद्यपदार्थातून माणसात व नंतर चीन व अन्य देशात पसरला. तो अत्यंत वेगवान आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, विषाणूची लागण झाली, त्यानंतर 67 दिवसात तो 1 लाख लोकांमध्ये पसरला, दुसऱ्या 1 लाख लोकात पसरण्यास त्याला पुढील केवळ 11 दिवस लागले व तिसऱ्या 1 लाख लोकांत पसरण्यास केवळ चार दिवस लागले. याचा अर्थ त्याची वाढ गुणाकार पद्धतीने होते. 

तथापि, "आजच्या परिस्थिताला भारत मार्ग दाखवू शकतो," असे जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक डॉ मायकेल जे रायन यांनी आज सकाळी सांगितले. ते म्हणाले, "कोरोना (कोविद-19) चा सामना करण्यासाठी भारत कळीची भूमिका बजावू शकतो. कारण चीन प्रमाणे भारतही सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. सर्वाधिक जन-घनता असलेल्या देशात करोना कसा प्रवास करतो, हे पाहावे लागेल. भारताने या पूर्वी पोलिओ व देवीच्या (स्मॉल पॉक्‍स) रोगांपासून देशाला मुक्त केले. त्यामुळे भारतापासून बऱ्याच अपेक्षा आहेत. भारताने टाकलेली आक्रमक पावले योग्य आहेत. कोविद -19 विरूद्ध लढण्याची भारतात क्षमता आहे."" 

दुसरीकडे, प्रसिद्ध भारतीय हृदयरोगतज्ञ व नारायण हेल्थ संस्थेचे संस्थापक डॉ. देवी शेट्टी व दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील डॉ. अरविंद कुमार यांनी भारताला अधिक सावधान केले आहे. डॉ. कुमार यांच्यामते, भारत कोरोनाबाबत " टिकिंग बॉंम्ब" च्या टोकावर बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी देशात सर्वत्र "जनता संचारबंदी" जाहीर केल्याचे स्वागत केले जात आहे. कोरोनाबाबतही भारतीय संस्कृती पाश्‍चात्य संस्कृतीपेक्षा सरस ठरली आहे. दुसऱ्या व्यक्तीला भेटताना हस्तांदोलन करण्याऐवजी हात जोडून "नमस्कार" करणे, तसे करताना काही अंतर दूर राहाणे, घरात आल्यावर हात, पाय धुणे. त्यानंतरच घरातील वस्तूंना अथवा खाद्यपदार्थांना हात लावणे, हे सारे संस्कृतीतून परंपरागत आले आहे. पाश्‍चात्य संस्कृतीचा प्रसार आपल्या देशातही गेल्या अर्धशकात मोठ्या प्रमाणवर झाला. तथापि, भारतीय संस्कृतीतील अभिवादनाची प्रथा आता जगाला शिकण्याची वेळ आली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी रोजच्या जीवनात कोणती काळजी घ्यावयाची आहे, हे क्षणाक्षणाला वृत्तपत्रे, टीव्ही यातून सांगितले जात आहे. पुढील दोन आठवडे अत्यंत धोक्‍याचे आहेत. त्यामुळे भारत नव्हे, जगासाठी प्रत्येक दिवस व रात्र "अदृश्‍य" वैऱ्याशी लढण्याची आहे.