चीनमधील खाद्य संस्कृतीचा कहर 

चीनमधील खाद्य संस्कृतीचा कहर 

2 एप्रिल रोजी वॉश्‍गिंटनहून बातमी आली, की चीनच्या दक्षिणेतील गुयलीन व डॉंगगुआन शहरात वटवाघळे, कुत्रे, मांजरे यांच्या खाद्यपदार्थांचा बाजार खुला केला आहे. हे वाचून कुणालाही शिसारी येईल. वस्तुतः त्यांच्या खाण्यातून करोनाची लागण चीनच्या हुबेई प्रांतातील वूहानपासून सुरू झाली. त्यातील वटवाघळ हा विषाणूचा मूळ स्त्रोत आहे. "वॉश्‍गिंटन एक्‍झामिनर" ने दिलेल्या बातमीत म्हटले आहे, की विषाणूची लागण होऊ नये, म्हणून प्रारंभी चीनने या व अन्य जंगली प्राण्याच्या मांसाच्या बाजारांवर बंदी घातली होती. विषाणू जगात सर्वत्र पसरल्याने आजवर 12 लाख 2 हजार 584 लोकांना लागण झाली असून, मृतांचा आकडा 67732 वर पोहोचला आहे. अत्यवस्थ असलेल्या 42376 जणापेकी पैकी किती वाचतील, याची खात्री नाही. 

चीनमधील खाद्यसंस्कृती हा जगात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. चीनी लोक जलचर तसेच, सरपटणारे, वळवळणारे, उडणारे प्राणी खातात. ते खरे आहे, हे पाहायचे असेल, तर बीजिंगमधील "वांगफूजिंग" खाऊ गल्लीला भेट द्यावी. आपल्याला कल्पना करता येणार नाही, असे प्राण्यांचे खाद्यपदार्थ तेथे ठेवलेले असतात. बीजिंग, शांघाय व शियान या शहरांच्या भेटीत मला विलक्षण चित्र पाहावयास मिळालं. वांगफूजिंगमधील दुकानात मांडून ठेवलेल्या ट्रे मध्ये छोटे साप, सुरवंट, नाकतोडे, झुरळासारखे दिसणारे किडे, काळे मोठे कोळी, काड्यांना लटकलेले वळवळणारे काळे व पिवळे जिवंत विंचू,स्क्विड मासे हे चिनी लोक मोठ्या आवडीने फस्त करीत होते. आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. या संदर्भात वारंवार सांगितला जाणारा विनोद म्हणजे, बिजिंगमध्ये परग्रहावरील मानव उतरला तर त्याची प्रयोगशाळेत वैद्यकीय तपासणी होईल, परंतु तो चेंगडूमध्ये उतरला, तर तेथील लोक त्याची भाजी कशी करता येईल, याचा प्रथम विचार करतील. 

असे सांगितले जाते, की चीनी लोकांना काहीही खाण्याची सवय लागली, ती माओत्से तुंग ने ऑक्‍टोबर 1934 ते ऑक्‍टोबर 1935 दरम्यान जियांगशी ते शांग्शी दरम्यान केलेल्या लॉंगमार्चमुळे. त्यावेळी लाखो लोकांनी 370 दिवसात तब्बल 9 हजार कि.मी अंतर पायी कापले. ते ही अत्यंत कठीण अशा दऱ्याखोऱ्या, निबिड जंगलातून. जिवंत राहायचे असेल, तर मिळेल ते खावे लागले. त्याची चव कशी आहे, याचा विचार करण्यास देखील वेळ नसे. आज चीनच्या निरनिराळ्या शहरातील या खाऊ गल्ल्या, "स्ट्रीट फुड" साठी प्रसिद्ध आहेत. तिथं दिवसभर लोकांची झुंबड लागलेली असते. कोणत्या प्राण्यातून कोणता विषाणू आपल्या शरिरात प्रवेश करील, याचे भानही नसते. करोनाचा विषाणू प्रथम वटवाघळातून डुकरामध्ये गेला व डुकरांचे मांस खाल्याने तो माणसाच्या शरिरात शिरला. तरीही ते खाणे चीनी माणसाने सोडलेले नाही. इंडोनेशियातील सुलावेसी प्रांतातही वटवाघळे खाण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांची असून, त्यामुळे ""आपल्याला काहीही झालेले नाही,"" असे सांगणारे असंख्य लोक आहेत. भारतात नागालॅडमध्ये कुत्र्याचं मांस खाण्याची परंपरा अनेक वर्षांची आहे. 

माणसाच्या रक्तावर जगणाऱ्यात आपण सर्वसाधारणतः डास व जळवा यांचा समावेश करतो. पण प्राण्यांच्या रक्तावर जगणाऱ्यात वटवाघळांचा समावेश होतो. त्यातून ते ज्या प्राण्यांचे रक्त प्राशन करतात, त्याचे मांस खाल्ले तर विषाणू शरिरात शिरण्याची शक्‍यता टाळता येत नाही. चीनमधील चोंचिंग या शहरातील एका दुकानात गेलो असता, तेथे वाळवलेले सरडे, पाली, साप, सापाची पिले, स्क्‌विड, ऑक्‍टोपस व अन्य जलचर ठेवलेले होते. एका ठिकाणी काळी वळकटी केलेला पदार्थ दिसला. ""तो काय आहे,"" हे विचारता, ती ""सापाची वाळवलेली पिले आहेत,"" असे सांगण्यात आले. ""त्याचा काय लाभ आहे,"" असे विचारता दुकानदार म्हणाला, की वयस्क माणसांच्या ठिसुळ (ऑस्टेओपेरॉसिस) झालेल्या हाडांसाठी हा चांगला इलाज आहे. ""ती खाल्ली की हाडे दुखण्याचे थांबते."" तैवानची राजधानी तैपेई येथील रात्रीच्या बाजारात सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे ऑक्‍टोपस. त्यासाठी रांगा लागल्याचे मी पाहिले आहे. जपानमध्ये व्हेल माशांचं मांस खास मेजवानी समजली जातात. काही वर्षांपूर्वी जपानने व्हेल माशांची इतकी शिकार केली,की ती प्रजाती नष्ट होण्याची वेळ आल्यावर व्हेल माशांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आली. गोव्यात "सरपोतेल" म्हणजे डुकराच्या मांसाची करी अथवा खाद्यपदार्थांनी भरलेले डुक्कर असते. तसेच, निरनिराळ्या भाजांनी भरलेली मेंढी किंवा बकरी मंगोलियातील खास मेजवानी. 

रशियात "क्‍लबासा" म्हणजे बैलाचे मांस खातात. दुसरी आवडती वस्तू म्हणजे माशांची सोनेरी वा काळी अंडी (कॅव्हियर). कॅव्हियर तसे महागडे. ब्रेडवर लोणी पसरून त्यावर या अंड्यांचा थर पसरतात व त्याचे सॅंडविच खातात. बैलांच्या मासांची भली मोठी दुकाने रशियात आहेत. तेथे बैलाच्या शरिरातील खूर व जिभेसह प्रत्येक भाग विकण्यास ठेवलेले असतात. तसे, पाश्‍चात्य देशात डुकरांच्या मासांची दुकाने असतात. चीनमध्ये "बीजिंग डक" (बदक) देताना त्याच्या शरीराच्या प्रत्येक भागाचे वर्णन शेफ करतो. शंभरापेक्षा अधिक तुकडे करणारा शेफ तज्ञ समजला जातो. भारत बांग्लादेश सीमेवरील तीनबिघा येथे आठवडी बाजार भरतो. तो पाहाण्यास गेलो असता, दोन माणसे कावड घेऊन बसली होती. दोन्ही बाजूला मडकी होती. काही जण खरेदी करण्यास बसले होते. त्यांचा व्यवहार सुरू झाला. तेव्हा एकाने मडक्‍यातून गोगलगाई काढल्या व तराजूत टाकल्या, तर दुसऱ्याने दुसऱ्या मडक्‍यातून जिवंत काळे विंचू काढले. ते पावशेर, अर्धाशेर मोजून खरेदी करणाऱ्याच्या पिशवीत टाकले. तेव्हा इथंही माणसं सरपटणारे प्राणी खातात, याची जाणीव झाली. खेकडे, लॉब्स्टर्स आणि ऍलगे हे पंचतारांकित हॉटेल्समधील विशेष खाद्य म्हणून जगभर डिशमध्ये दिले जातात. 

2011 मध्ये आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना मी डीआर कॉंगोला भेट दिली होती. राजधानी किन्शाशामध्ये दुपारच्या भोजनाला हॉटेलमध्ये गेलो असता समोर मांसाचा पदार्थ पाहून शेफला विचारले, तेव्हा त्याने संबंधित डिश ""पॉक्‍युपॉईन (काटेरी साळुंद्रीच्या)च्या मांसाची आहे,"" असे सांगितले. त्याला हात लावण्याचा प्रश्‍नच नव्हता. लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील यांना दोनवेळा असाच अनुभव आला. इथिओपियाचे राजे हेले सेलासी यांच्या अंत्यविधीसाठी भारतातर्फे त्यांना आदिस अबाबा येथे पाठविण्यात आले होते. अंत्यविधीनंतर जंगलामध्ये एका मचाणवर विविध देशातून आलेल्या नेत्यांसाठी खाना आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या समोर म्हशीचा रॉ (कच्चा) पाय ठेवलेला होता. ते पाहून त्यांनी भोजन नाकारले. आफ्रिकेमध्ये कच्चे मांस खाण्याची अनेक देशात परंपरा आहे. असेच एकदा ते व्हिएतनामला गेले असता त्यांना सकाळी पायथन सूप (अजगराचे सूप) देण्यात आले. अर्थात त्यांनी ते नाकारले. चीनच्या दौऱ्यावर असताना खुद्ध माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पुढ्यात "खास डिश" म्हणून "उकडलेली मांजर" ठेवण्यात आली होती. 

गेल्या आठवड्यात "द टाईम्स ऑफ इंडिया"मध्ये लिहिलेल्या "फेअर इनफ" या संपादकीयात प्रसिद्ध विनोदी लेखक जग सूरैया यांनी विलक्षण खाद्यपदार्थांवर आणखी प्रकाश टाकलाय. ते म्हणतात, "" फ्रेन्च लोकांना गोगलगाय, बेडकाचे पाय व घोड्याचे मांस आवडते. ब्रिटनमधील उच्चभ्रूंना "स्टिल्टन" नावाची चीज आवडते. ही चीज इतकी दिवस कुजवतात,की त्यात काळे किडे पडतात, ते वळवळ करू लागतात (इट्‌स क्रॉलिंग विथ मॅगट्‌स). त्यामुळे या चीजला "वॉकिंग चीज" असे नाव पडले आहे. लंडनच्या फॉर्टनम अँड मॅसन या प्रसिद्ध दुकानात मुंग्यांच्या अंड्याचा थर लावलेली चॉकलेट्‌स मिळतात! ऑस्ट्रेलियातील काही भागात लाकडावर ताव मारणारी "लठ्ठ पांढरी आळी" हा खास पदार्थ आहे, तर जपानमध्ये "फुगू" नावाचा मासा खातात. त्याच्या शरीरात विषाची पिशवी असते. ती काढूनच मासा खाता येतो. चुकीन ती तशीच राहून गेली, तर खाणाऱ्याचा मृत्यू ठरलेला असतो. अमेरिकेतील न्यू ऑर्लिऑन्स मध्ये "गेटर ऑन ए स्टिक" असा पदार्थ असून, ते मगरीच्या मांसाचे सॉसेज असते. "प्राणीमात्रांवर दया करावी," हा सुविचार मानवानं कधीच बासनात गुंडाळलाय. 

या विलक्षण खाद्य संस्कृतीकडे पाहाता, असे दिसते, की जगात भारत असा एकमेव देश आहे, की त्यातील बव्हंश लोक शाकाहारी आहेत. कोट्यावधी शाकाहारीही अधुमधून मांसाहार करतात. परंतु,शाकाहाराला भारतात प्राधान्य आहे. पाश्‍चात्य देशातही व्हेगन (शाकाहारी) लोक आहेत. बस्तर, दंडकारण्य, सुंदरबन्स,मेळघाट, अंदमान व निकोबारच्या जंगलातून राहणाऱ्या आदिवासींच्या खाद्यसंस्कृतीचा आपल्याला नेमका अंदाज आलेला नाही. उंदिर, कबूतर, चिमण्या, पारवे आदी पक्ष्यांची शिकार होते. पाश्‍चात्य देशात व भारतातही काही ठिकाणी सश्‍याचं मांस रुचकर मानलं जातं. गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या 2017 व 18 मधील आकडेवारीनुसार, भारतातील मांस उत्पादन व खाण्यात सर्वाधिक कोंबडी (49.6 टक्के)., जनावरे (4.6 टक्के)., डुक्कर (5.2 टक्के )., मेंढी (7.9 टक्के)., बकरी-बोकड (13.7 टक्के) व म्हशी-रेडे (18.9 टक्के) यांचा समावेश आहे. पश्‍चिम बंगाल, आसाम, कोकणपट्टी यात मासा हे प्रमुख अन्न. जम्मू काश्‍मीरमध्ये मांसाहाराबरोबरच "ट्राऊट" मासा प्रसिद्ध. तरीही भारतात शाकाहाराचे असंख्य चविष्ट प्रकार असल्याने प्रामुख्याने लोकांचा हा आहार आहे. मांसाहारापेक्षा त्याचे असंख्य लाभ आपल्याला मिळतात, असे शास्त्रीयदृषट्या सिद्ध करण्यात आले आहे. तथापि,वटवाघळासारखे प्राणी खाल्याने काय संकट ओढवू शकते, हे चीनने जगापुढे आणले आहे. करोनाच्या भीषण संकटानंतर जगातील खाण्याचे प्रकार बदलणार काय? किंबहुना माणसाने काय खावे व न खावे, याचे भान करोनाच्या विषाणूने आणून दिेले, तरी बरेच काही साध्य होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com