Donald Trump
Donald Trump

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीचे फलित

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 व 25 फेब्रुवारी रोजी आपल्या कुटुंबासह भारताचा 34 तासांचा दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानुसार हा दौरा ''भूतो न भविष्यती'' असा होता. गेल्या सत्तर वर्षात कोणत्याही अमेरिकन अध्यक्षाला इतक्‍या मोठ्या प्रमाणावर जगातील सर्वात मोठ्या एक लाख दहा हजार क्षमता असलेल्या क्रिकेट संकुलात (मोटेरा) सव्वा लाख लोकांनी केलेले स्वागत पाहवयास मिळालेले नाही. म्हणून हे स्वागत खुद्द ट्रम्प, त्यांचे कुटुंब व अमेरिकन अधिकाऱ्यांचे डोळे दिपवणारे ठरले. या दौऱ्यात त्यांनी आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहाल ला दिलेली भेट व दिल्लीत झालेल्या वाटाघाटी, या गेल्या 20 वर्षातील अमेरिकन अध्यक्षांच्या झालेल्या दौऱ्यांपैकी सर्वाधिक कळसाच्या होत्या, असे वर्णन केले, तर त्यात वावगे ठरणार नाही. 

ज्या दिवशी वाटाघाटी होत होत्या, ट्रम्प यांची पत्रकार परिषद व राष्ट्रपती भवनातील शाही भोज होत होता, त्या दिवशी दिल्लीतील उत्तरपूर्व भागतील उपनगरात झालेल्या प्रक्षोभक व हिंसक दंगलीत 42 लोक ठार झाले होते. दंगल झाली ती सुधारित नागरिकत्वाला व लोकसंख्येची नागरीक नोंदणीवही तयार करणाऱ्यांच्या समर्थकात व विरोधकात. भाजपचे कपिल मिश्रा यांनी पोलिसांच्या देखत केलेल्या विधानाचे पडसाद उमटले आणि त्यातून हिंसेचा डोंब उसळला.

भाजपच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसात कशी द्वेषपूर्ण विधाने केली त्याच्या चित्रफिती पोलीसांना दाखविण्याची वेळ दिल्ली उच्चन्यायालयावर आली. ''या नेत्यांविरूद्ध तत्काळ एफआयआर लादून गुन्हे नोंदवा,'' असे न्यायालयाने फटकारले. तरीही पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या त्या नेत्यांना एकदाही जाहीर समज दिला ऩाही, की त्यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई केली नाही. पोलीस संघटना केंद्राच्या हाती असल्याने तिने कोणतीही कारवाई केली नाही. ''ट्रम्प त्याबाबत जाहीररित्या व खाजगीतही बोलतील,'' असे त्यांनी दिल्लीला भेट देण्याआधी वॉशिंग्टनमध्ये उच्चाधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले होते. परंतु, ट्रम्प यांनी त्याचा जाहीर उल्लेख केला नाही. उलट, ''भारतात धार्मिक स्वातंत्र्य आहे, असे मोदी यांनी आपल्याला सांगितले,'' असे मोघम विधान पत्रकार परिषदेदरम्यान केले.'' दिल्लीत उसळलेला हिंसाचार देशाच्या अंगर्तत बाब आहे,'' असे सांगून तो ही विषय टाळला. मोटेरा संकुलातील भाषणात मोदी यांच्यावर त्यांनी आपल्या भाषणातून इतकी स्तुतिसुमने उधळली, की ते हरखून गेले असावे. 

यापूर्वी, ड्व्विट डी आयसेनहॉवर (1959), रिचर्ड निक्‍सन (1969), जिमी कार्टर (1978), बिल क्‍लिंटन (2000), जॉर्ज डब्ल्यू बुश ( 2006), बराक ओबामा (2010 व 2015) यांनी भारताला औपचारिक भेटी दिल्या होत्या. गेल्या 61 वर्षात भारताला भेट देणारे ट्रम्प हे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष होत. 

1959 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे अध्यक्ष ड्व्विट डी आयसेनहॉवर यांनाच फक्त दिल्लीतील रस्त्यांवर दुतर्फा उभे असलेल्या लाखो लोकांनी रांगा लावून त्यांचे जल्लोषात त्यांचे स्वागत केले होते. अहमदाबादेतही विमानतळ ते मोटेरा संकुलपर्यंत लाखो लोकांनी ट्रम्प यांचे दुतर्फा उभे राहून स्वागत केले. 

भारत व अमेरिकचे संबंध सुधारण्यास खऱ्या अर्थाने सुरूवात झाली, की बिल क्‍लिंटन यांनी 2000 साली दिलेल्या भेटीनंतर. तथापि, त्यावेळी भारत, नागरी अणउर्जा निर्मितीच्या संदर्भात अमेरिकेसह अन्य देशांनी वाळीत टाकलेला देश होता. तथापि, 2005 मध्ये भारताचे त्यावेळचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग व अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यात झालेल्या नागरी अणुउर्जा निर्मितीच्या संदर्भातील करारानंतर खऱ्या अर्थाने संबंध सुधारण्यास वेग आला. ओबामा यांच्या कारकीर्दीत तो चालू राहिला व ट्रम्प यांच्या काळात शिगेला जाऊन पोहोचला. येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुका होत असून त्यादृष्टीने ट्रम्प हे 'लेमडक' राष्ट्राध्यक्ष होत. शिवाय, त्यांना नुकतीच महाभियोगातून मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा भारतदौरा छाती फुगविणारा होता, हे निश्‍चित. 'ेन्यूजवीक' मध्ये आलेल्या वृत्तात म्हटले आहे की, 'प्यू रिसर्च' सेन्टरच्या पाहणीनुसार 'ट्रम्प यांना भारतील लोकांची 56 टक्के मान्यता आहे, जगात 29 टक्के तर अमेरिकेत 43 टक्के लोकांची मान्यता आहे.

ट्रम्प यांना या दौऱ्यात सर्वाधिक लाभ झाला असेल, तर अमेरिकेतील 40 लाख भारतीयांना भुरळ घालण्याचा. तथापि, न्यूयॉर्क विद्यापिठातील प्राध्यापक व प्रसिद्ध लेखक सुकेतू मेहता यांच्यामते अमेरिकेतील भारतीय नागरिकांपैकी 75 टक्के नागरीक डेमॉक्रॅटिक पक्षाला मते देतात. त्यामुळे भारतातील एका दौऱ्यामुळे ते त्यांचे मत रिपब्लिकन पक्षाकडे सहजासहजी वळवू शकणार नाही. असे असले, तरी आज तरी ट्रम्प यांचे पारडे जड आहे. त्यामुळे, ते पुन्हा निवडून येण्याची शक्‍यता अधिक. दुसरीकडे, डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन मागे पडले असून ट्रम्प यांचा खरा प्रतिस्पर्धी डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते बर्नी सॅंडर्स असण्याची शक्‍यता अधिक. 
ट्रम्प यांच्या दौऱ्यात एक गोष्ट मात्र खास नमूद करावी लागेल. ती म्हणजे, मोटेरा संकुलात केलेल्या भाषणाची जय्यत तयारी ट्रम्प यांनी केली होती. अन्यथा, त्यांनी विवेकानंदांपासून ते थेट सचिन तेंडुलकर, विराट कोहली, शोले चित्रपट यांचा उल्लेख केला नसता. मोदी यांनी गेल्या काही वर्षात काय केले याचा पाढाच त्यांनी वाचला. तोंड भरून त्यांची प्रशंसा केली. तर मोदी यांनी ट्रम्प यांच्यासह पत्नी मेलानिया, कन्या इव्हांका व जावई जेरार्ड कुचनर यांचा खास उल्लेख करून त्यांची प्रशंसा केली. 

या भेटीचा भारताला काय लाभ झाला? भारत अमेरिका संबंधाच्या संदर्भात सध्या दुतर्फा वेगवेगळ्या विषयांवर 40 समित्या काम करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून 'टू प्लस टू' ही व्यवस्था कायम करण्यात आली असून, त्याअन्वये दर वर्षी दोन्ही बाजूंचे अर्थ व संरक्षण मंत्री एकमेकांना भेटणार आहेत.भारत व अमेरिका दरम्यान दहशतवाद विषयक संयुक्त गट कार्यरत असून, त्याविषयी गोपनीय वाटाघाटीतून माहितीची देवाण घेवाण केली जाते. भारत अमेरिका दरम्यान दुतर्फा व्यापाराचे प्रमाण 142 अब्ज डॉलर्स पर्यंत गेले असून, ट्रेड बॅलंस भारताच्या बाजूने आहे. ट्रम्प यांच्यानुसार 21 व्या शतकातील भारत व अमेरिका यांची सर्वात महत्वाची भागीदारी असेल. 3 अब्ज डॉलर्सच्या संरक्षण कराराने भारत अमेरिकन लष्करी उपकरणांव्यतिरिक्त अपाचे व एम एच- 60 रोमिओ हेलिकॉप्टर्स खरेदी करणार आहे. या व्यतिरिक्त अमेरिकेची अत्यंत प्रहारक व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे देण्याचे आश्‍वासन ट्रम्प यांनी दिले. अमेरिकेकडून भारताला होणाऱ्या निर्यातीचे प्रमाण 60 टक्‍क्‍यांनी वाढले, तर अतिशय दर्जेदार उर्जा उपकरणांची अमेरिकेकडून होणाऱ्या निर्यातीचे प्रमाण तब्बल 500 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. दोन्ही देशात दहशतावाचा, नशील्या पदार्थांचा व्यापार यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्य करण्याचे ठरले. 2005 मध्ये झालेल्या नागरी अणुऊर्जा निर्मितीच्या संदर्भात झालेल्या कराराची आजवर न झालेली अंमलबजावणी होण्याची शक्‍यता वाढली आहे. आणखी महत्वाची बाब म्हणजे, हिंदी व प्रशांत महासागरातून पाय काढता घेण्याची भाषा करणारे ट्रम्प आता चीनचा सागरी विस्तारवाद कमी करण्यासाठी अमेरिका- भारत-जपान व ऑस्ट्रेलिया (क्वाड) यांचे सागरी साह्य हवे, असे या भेटीत म्हणाले. चीनच्या दक्षिण चीनी समुद्रातील 9 डॅश लाईनच्या दाव्याला आव्हान देण्यासाठी अमेरिकेने पर्यायी 9 डॉट पॉइन्ट असा नवा प्रस्ताव सुचविला आहे. त्याला वरील चार देशांव्यतिरिक्त दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम, इंडोनेशिया, न्यूझीलंड आदी देशांचा पाठिंबा मिळण्याची शक्‍यता आहे. 

या भेटीचा इशारा चीनला जसा आहे, तसाच पाकिस्तानलाही आहे. ट्रम्प यांनी भारत व पाकिस्तान दरम्यान पुन्हा मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली. तथापि, मोदी यांनी यावेळीही थंड प्रतिसाद दिला. उद्या (29 फेब्रुवारी) रोजी काबुलमध्ये अमेरिकेचा तालिबानबरोबर करार होणार असून, त्यानंतर तालिबानचा अफगाणिस्तानच्या सत्तेत समावेश होण्याची शक्‍यता आहे. गेले 19 वर्ष तेथे ठाण मांडून बसलेले अमेरिकेचे सैन्य माघारी जाणार आहे. त्यानंतर तालिबान व पाकिस्तान यांची जवळीक वाढण्याची दाट शक्‍यता असून, त्यांचा रोख भारताकडे असेल. दहशतवाद वाढेल. याची कल्पना भारताला आहे. म्हणूनच अमेरिकेचे सैन्य परतले, की भारत व उपखंडातील शांतता राखण्याचे जिकिरीचे कार्य भारताला करावे लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com