इम्रान खान यांची कबुली की खेळी? 

विजय नाईक
सोमवार, 29 जुलै 2019

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या आठवड्यात वॉश्‍गिंटनला दिलेल्या भेटीत तेथील युएस इन्स्टिट्यूट ऑफ पीसमध्ये भाषण करताना पाकिस्तानमध्ये तब्बल 30 हजार ते 40 हजार दहशतवादी असून, त्यांचे सुमारे 40 गट अफगाणिस्तान व काश्‍मीरमध्ये संघर्ष करीत आहेत, असे सांगितले.

"फ्रॉम द हॉर्सेस माउथ" असा इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे. याचा अर्थ अगदी अत्युच्च व्यक्तीने केलेले विधान. ते खरे असलेच पाहिजे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या आठवड्यात वॉश्‍गिंटनला दिलेल्या भेटीत तेथील युएस इन्स्टिट्यूट ऑफ पीसमध्ये भाषण करताना "" पाकिस्तानमध्ये तब्बल 30 हजार ते 40 हजार दहशतवादी असून, त्यांचे सुमारे 40 गट अफगाणिस्तान व काश्‍मीरमध्ये संघर्ष करीत आहेत,"" असे सांगितले. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे, तर त्यांनी "सिक्‍सर" मारली किंवा "सेंच्युरी" काढली, असे म्हणावे लागेल.

जे कधी पाकिस्तानच्या सेनेने अथवा गुप्तचर संघटना आयएसआय ने कबूल केले नाही, ते खान यांनी जगजाहीर केले. त्यांच्या प्रांजळपणा बाबत त्यांचे कौतुक करावयास हवे. त्यासाठी त्यांना सेनाप्रमुख अथवा आयएसआय प्रमुखांची परवानी होती, की नाही, हे कळावयास मार्ग नाही. ते पाकिस्तानात परतले आहेत. त्यांच्या कबुलीचे काय पडसाद उमटतात, हे येत्या काही दिवसात दिसून येईल. 

गेली पंचवीस तीस वर्षे भारत कंठशोष करून जगाला तेच सांगत आहे, की पाकिस्तान हा जगातील दहशतवाद्यांचा अड्डा बनलाय. तरीही ना अमेरिका ना जग आजवर मानायला तयार नव्हते. राष्ट्रसंघाला अद्याप दहशतवादाची व्याख्या करणे जमलेले नाही. का, तर म्हणे, त्याबाबत निरनिराळ्या सदस्य देशांची वेगवेगळी भूमिका आहे. तरीही, मुंबईवर हल्ला करणाऱ्या जैशे ए महंमद च्या मसूद अजहर यास राष्ट्रसंघाच्या सुरक्षा मंडळाने दहशतवाद्यांच्या यादीत त्याचे नाव घालावे, यासाठी भारत तब्बल गेले एक दशक प्रयत्नशील होता. त्यात चीनने गेले नऊ वर्ष खोडा घातला होता. अखेर 1 मे 2019 रोजी भारताला यश आले. आता खुद्द इम्रान खान यांनीच कबुली दिल्यावर जगाला पाकिस्तान दहशतवाद्यांचा "प्रमुख अड्डा"बनलाय, याची खात्री पटायला हवी.

लष्कर ए तैय्यबा व जामत उद-दवाचा म्होरक्‍या ""हाफीझ महंमद सईद याला जो कुणी अटक करील अथवा शोधून देईल त्याला 10 लक्ष डॉलर्स"" देण्याचे अमेरिकेने जाहीर केले होते, त्याला काही वर्ष झाली. तो उजळ माथ्याने दिवसाढवळ्या लाहोर व पाकिस्तानमधील अन्य शहरातून भारताला धमक्‍या देत इतकी वर्ष फिरतोय, तरीही त्याला पकडून अमेरिकेच्या स्वाधीन करण्यासाठी ओबामा वा ट्रम्प यांनी दबाव आणला नाही, की पाकिस्तानने त्याला अमेरिकेच्या स्वाधीन केले नाही. त्याच्या व मसूद अझहरच्या भारतातील काळ्या कृत्यांचा पुरावा वर्षानुवर्ष पाकिस्तान व अमेरिकेला भारतातर्फे दिला गेला. तरी काहीतरी खुस्पटे काढून पाकिस्तानने त्यांच्याविरूद्ध कारवाई केली नाही. भारत व अमेरिका यांचा फारच दबाव वाढला, की दोघांना "हाऊस ऍरेस्ट" करण्याचे धोरण ठेवले. म्हणजे, कारवाया करण्यास, प्रक्षुब्ध भाषणे करण्यास दोघेही मोकळे. असे अनेक दहशतवादी पाकिस्तान पोसत आहे, ते काश्‍मीरचे खोरे व अफगाणिस्तान धुमसत ठेवण्यासाठी. 

अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करून हैदोस घालणाऱ्या हक्कानी गटाचा त्यात समावेश आहे. या गटाचा तळ पाकिस्तानच्या मिरामशहा या शहरात असून, त्याचा प्रमुख जलालउद्दीन हक्कानी आजही अफगाणिस्तानातील दहशवादाची सूत्रे चालवित आहे. अफगाणिस्तानातील तालिबानला पाठिंबा देऊन विद्यमान अध्यक्ष अश्रफ घनी यांची सत्ता खिळखिळी करू पाहात आहे. ज्या तालिबानविरूद्ध अमेरिका व नाटो इतकी वर्ष लढली, तीच अमेरिका आता अफगाणिस्तानच्या मंत्रिमंडळात तालिबानचा समावेश व्हावा, यासाठी शिष्टाई करीत आहे. ते एकदा झाले, की अफगाणिस्तान अपसूकपणे तालिबान व पाकिस्तानच्या प्रभावाखाली येईल. 

वरील कबुली देण्यासाठी इम्रान खान यांना पाकिस्तानचे अध्यक्ष बनावे लागले. यापूर्वी आलेले अध्यक्ष, पंतप्रधान व हुकूमशहा यांनी मात्र अशी कबुली देण्याचे टाळले होते. एवढेच काय, कारगिल युद्धात यमसदनी पाठविलेल्या पाकिस्तानच्या जवानांना त्यांच्या लष्करी गणवेशावर पाकिस्तानी ओळख चिन्ह असताना, कागदपत्रे असताना जनरल परवेझ मुशर्रफ यांनी त्यांचे मृतदेह परत घेण्यास नकार दिला होता. शेवटी, सैनिकांना दिल्या जाणाऱ्या मानासह भारताने त्यांचे अंत्यविधी केले. दहशतवाद्यांबाबत मुशर्रफ व सेनेने सर्वावर कढी केली, ती ऍबटाबादमध्ये आश्रय दिलेला तालिबान व अल कैदाचा म्होरक्‍या ओसामा बिन लादेन याच्या पाकिस्तानमधील वास्तव्याचे गुपित कायम ठेवून. पाकिस्तानने केवळ अमेरिका नव्हे, तर जगाला गुंगारा दिला. लादेन अफगाणिस्तानच्या दुर्गम डोंगरात दडून बसला असावा, असा अनेक राष्ट्रांचा भ्रम होता. अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकीर्दीत भ्रमाचा भोपळा फुटला आणि त्याच्या मृत देहाला (2 मे, 2011) तालिबानच्या हाती लागू नये, म्हणून दूर समुद्रात जलसमाधी देण्यात आली.

अल कैदाचा दुसरा म्होरक्‍या आयमान अल जवाहिरी अजूनही जिवंत आहे. तसेच, आयसीसी वा दाएशचा प्रमुख अबु बक्र बघदादी जिवंत असल्याचे त्याच्या अलीकडील वक्‍यव्यावरून दिसून येते. त्याला अमेरिकेने "जहन्नम" मध्ये पाठविले, असे सांगण्यात येत होते. त्यात तथ्य नाही, असे बघदादीच्या व्हिडिओवरून स्पष्ट होते. 

इम्रान खान यांचा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्ष सत्तेवर येण्यापूर्वीपासून पाकिस्तानात तहरीक-इ-तालिबान पाकिस्तान हा दहशतवादी गट कार्यरत आहे. 2014 मध्ये त्याचे 25 हजार दहशतवादी अफगाणिस्तानात होते. त्यापैकी काही हजार आजही पाकिस्तानमध्ये आहेत. परवेझ मुशर्रफ यांनी खैबर पख्तुनवामधील दहशतवाद आटोक्‍यात आणण्यासाठी 2007 मध्ये लाल मशिदीत इस्लामी दहशतवादी अब्दुल अझीझ व अब्दुल रशीद यांच्या मदरसावर हल्ला चढविला होता. त्यात तीनशे ते चारशे दहशतवादी ठार झाले होते. इतकी मोठी कारवाई त्यानंतर पाकिस्तानच्या कोणत्याही अध्यक्ष अथवा पंतप्रधानाने केलेली नाही. परंतु, इम्रान खान 30 हजार ते 40 हजार दहशतवाद्यांवर काय कारवाई करतात, याकडे जगाचे लक्ष लागून राहील. 

प्रश्‍न आहे, तो इम्रान खान यांनी ही कबुली का द्यावी? काही तज्ञांच्या मते इम्रान खान यांची ही एक खेळी असावी. ट्रम्प सत्तेवर आल्यापासून जाहीरपणे पाकिस्तानवर कोरडे ओढत आहेत. 2018 मध्ये ते असेही म्हणाले, ""पाकिस्तानने गेली पंधरा वर्षे अमेरिकेला मूर्ख (उल्लू) बनविले. तरीही अमेरिकेने पाकिस्तानला 33 अब्ज डॉलर्सचे साह्य केले. "गेल्या काही वर्षातील अमेरिकेच्या पाकिस्तान विषयक धोरणाकडे पाहता असे दिसून येते की दहशतवादाविरूद्ध लढा देण्यासाठी पाकिस्तानला अर्थसाह्य द्यावयास हवे, असा पक्का सूर होता व पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्स मिळत होते. त्यापैकी पाकिस्तान लाखो डॉलर्स काश्‍मीर व अफगाणिस्तानातील दहशवाद्यांना देत होता. याबाबत, भारताने अनेक वेळा अमेरिकेला जागरूक केले, परंतु, अमेरिका एका कानाने ऐकायची व दुसऱ्याने सोडून द्यायची.

इम्रान खान यांनी दहशतवाद्यांची इतकी मोठी संख्या सांगण्यामागे हेतू हा, की त्यांच्याविरूद्ध लढा द्यावा, अशी ट्रम्प यांची इच्छा असेल, तर अमेरिकेने पाकिस्तानवर पुन्हा डॉलर्सचा वर्षाव करण्यास सुरूवात करावी. खान यांच्या दाव्यावर बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने जोरदार हल्ला चढविला. ""ते (खान) पक्के खोटार्डे (कम्पल्सिव्ह लायर) आहेत व तेच दहशतवादाला पाठिंबा देत आहेत, त्यांना गोबेल्स पारितोषक दिले पाहिजे"" असा आरोप पीपीपी च्या महासचिव नसीफा खान यांनी केला. इम्रान खान म्हणतात, ""आमची (आमच्या पक्षाची) सत्ता नव्हती, म्हणून परिस्थिती काबूत ठेवणे अशक्‍य होते."" 

""मुंबईवरील हल्ल्याच्या मागे असलेल्या हाफिझ सईद याला अमेरिकेतील दौऱ्याचा पार्श्‍वभूमीवर ताब्यात का घेण्यात आले,"" असे वॉशिंग्टनमध्ये खान यांना विचारता त्यांनी प्रश्‍न टाळला. पुलवामावरील हल्ला त्यानंतर झालेले बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक हे विषयही यांच्या डोक्‍यात असावे. परंतु, ट्रम्प यांचा नूर पाहाता आपण कसे नेमस्त नेते आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न त्यांनी वॉशिंग्टन दौऱ्यात केला. पाकिस्तानमधील दहशतवादी केवळ अफगाणिस्तान व भारतात सक्रीय नाही, तर चीनच्या शिंजियांग प्रांत, इराण, मध्य आशियातील देशातही सक्रीय आहेत. प्रश्‍न आहे, तो इतक्‍या मोठ्या संख्येने असलेल्या सशस्त्र व टोकाला पोहोचलेल्या दहशतवाद्यांना ते काबूत आणणार काय? त्यांची कबुली शिष्टाई ट्रम्प यांचे मन वळविणार काय? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Naik Writes Article on imran khan America Tour