चित्र आणि विचित्र (विजय तरवडे)

विजय तरवडे vijaytarawade@gmail.com
रविवार, 12 ऑगस्ट 2018

व्हाईट प्रिंटवर छापलेल्या कादंबऱ्यांना खप असणाऱ्या काळात लोकप्रिय कादंबरीच्या मुखपृष्ठांसाठी "जोशी आर्टस' यांची चित्रं जास्त वापरली जात. ही चित्रं चाररंगी असत आणि हाफटोन पद्धतीनं आर्ट पेपरच्या जाकिटावर छापली जात. वाचनालयं ही जाकिटं दर्शनी भिंतीवर शोकेसमध्ये लावत. कादंबरीच्या पानांची संख्या तीनशेहून जास्त असली तरच ही चित्रं प्रकाशकाला परवडत. कारण, चित्रकारांचं मानधन आणि छपाईचा खर्च जास्त असे. इतर प्रकाशक "लाईन ड्रॉइंग' पद्धतीनं काढलेली चित्रं तीन किंवा चार रंगांत छापत. कलात्मक किंवा दर्जेदार म्हणवल्या जाणाऱ्या पुस्तकांसाठी मुखपृष्ठं काढणारे चित्रकार इंटुक वर्गात मोडत.

व्हाईट प्रिंटवर छापलेल्या कादंबऱ्यांना खप असणाऱ्या काळात लोकप्रिय कादंबरीच्या मुखपृष्ठांसाठी "जोशी आर्टस' यांची चित्रं जास्त वापरली जात. ही चित्रं चाररंगी असत आणि हाफटोन पद्धतीनं आर्ट पेपरच्या जाकिटावर छापली जात. वाचनालयं ही जाकिटं दर्शनी भिंतीवर शोकेसमध्ये लावत. कादंबरीच्या पानांची संख्या तीनशेहून जास्त असली तरच ही चित्रं प्रकाशकाला परवडत. कारण, चित्रकारांचं मानधन आणि छपाईचा खर्च जास्त असे. इतर प्रकाशक "लाईन ड्रॉइंग' पद्धतीनं काढलेली चित्रं तीन किंवा चार रंगांत छापत. कलात्मक किंवा दर्जेदार म्हणवल्या जाणाऱ्या पुस्तकांसाठी मुखपृष्ठं काढणारे चित्रकार इंटुक वर्गात मोडत. त्यांच्या चित्रांची छपाई महागडी असे. सुहास शिरवळकर यांनी एका कादंबरीच्या मुखपृष्ठाच्या चित्राचं काम एका इंटुक चित्रकाराला दिलं. त्याच्याकडं ते वर्ष-दीड वर्ष पडून राहिलं. कंटाळून शिरवळकरांनी नेहमीच्या चित्रकाराकडून चित्र काढून घेतलं. ते छपाईला पाठवल्यावर इंटुकचं पोस्टकार्ड आलं ः "तुमचं चित्र (तीन नमुने) तयार आहे.' चित्र दुसऱ्याकडून करून घेतल्याचं शिरवळकरांनी कळवल्यावर चित्रकारानं संतप्त होऊन त्यांना आंतर्देशीय पत्र पाठवलं. त्यात म्हटलं होतं ः "आता या चित्रांचं मी काय करू?' त्या पत्रात त्या चित्रकारानं काही अपशब्दही वापरले होते. "उत्तरोत्तर तुमची ही प्रवृत्ती ओसरत जावो' या वाक्‍यानं पत्राची सांगता केली होती. मात्र, पत्रातलं अक्षर अतिशय सुबक होतं, सुलेखन (कॅलिग्राफी) देखणं होतं. हा महागडा चित्रकार माझ्या नशिबात येईल का, असा विचार मनात आला. पुढं काही वर्षांनी ग. प्र. प्रधानसरांनी संपादित केलेल्या एका वार्षिक अंकात माझी दीर्घ कथा घेतली गेली तेव्हा त्या अंकाचं काम इंटुकनं केलं होतं; पण माझ्या कथेवरचं चित्र पाहून मी खट्टू झालो. चित्रकारानं "सेंटरस्प्रेड लेआऊट' केला होता. या पानाच्या डावीकडून त्या पानाच्या उजवीपर्यंत एक नागमोडी रेषा, वरच्या बाजूला एक पाठमोरी रेखाकृती आणि रेषेच्या खाली कथेचं आणि माझं नाव अगदी बारीक अक्षरांत टाईप केलेलं. कथा न वाचताच ठोकून दिलेलं चित्र.
***

मुंबईला झालेल्या समांतर साहित्य संमेलनात श्‍याम जोशी दहा रुपये घेऊन प्रत्येकाचं कॅरिकेचर काढून देत होते. त्या वेळी मी ते काढून घेतल्यावर त्यांचा पत्ता लिहून घेतला. काही दिवसांनी "ललित'मध्ये त्यांचा लेख वाचायला मिळाला. त्यात त्यांनी म्हटलं होतं ः "चित्रकाराला साधे दोनशे रुपये मानधन द्यायचं म्हटलं तरी प्रकाशकांचं बीपी हाय होतं.' मी त्यांना माझ्या कादंबरीसाठी चित्र काढायची विनंती केली. त्यांचं पोस्टकार्ड आलं ः "रविवारी सकाळी अकरा वाजता या.' हस्तलिखित घेऊन मुंबईला गेलो. त्यांना ते देऊन परतणार होतो. "चित्र काढून झालं की पैसे देऊन चित्र आणि हस्तलिखित घेऊ', असा विचार होता; पण त्यांनी आतल्या खोलीत नेलं, गप्पा मारल्या, पोहे आणि चहा दिला व कादंबरीचा विषय विचारला. मी हस्तलिखित पुढं केल्यावर म्हणाले ः ""थोडक्‍यात गोष्ट सांगा.'' त्यांनी समोरच्या मेजावरची मऊ (एचबी) पेन्सिल घेतली. मी कादंबरीतल्या नायिकेचं वर्णन केलं. म्हणजे सावळा रंग, धारदार नाक वगैरे.. त्यांनी समोरच्या बोर्डावर पेन्सिलनं झराझरा कारागिरी करत आणि क्वचित खोडरबर वापरत माझ्या मनातला चेहरा हुबेहूब रेखाटला. (संशयित गुन्हेगारांची अचूक चित्रं पोलिस कशी बनवत असतील याची तेव्हा कल्पना आली). मग रोटरिंग पेननं चित्राच्या बाह्य रेषा गिरवून पेन्सिलकाम पुसून जोशी यांनी चित्रात देखणे रंग भरले. जाड निब असलेल्या लेखणीनं दोन वेगवेगळ्या रंगांत कादंबरीचं आणि माझं नाव लिहिलं आणि मला चित्र दिलं.
""तुम्ही लगेच चित्र द्याल, हे मला ठाऊक नव्हतं... मी पैसे आणले नाहीत,'' मी म्हणालो.
""पुण्याला गेल्यावर पाठवून द्या,'' त्यांनी सांगितलं.
पैसे पाठवल्यावर त्यांचं आभाराचं पत्र आलं. नंतर एकदा मुंबईला गेल्यावर सहज त्यांच्या घरी गेलो. त्यांनी सांगलीच्या आणि कोकणातल्या अशा दोन संपादकांना माझी शिफारस करणारी पत्रं लिहून माझ्याकडं दिली. त्या संपादकांना मी कथा पाठवल्या. श्‍याम जोशी यांचं मुखपृष्ठ असलेलं पुस्तक छापल्यावर काही कारणांनी ते रद्द करावं लागलं. तांत्रिक भाषेत मूळ चित्र "कलर कटआउट हाफ टोन' होतं. ते मी लॅमिनेट करून जपून ठेवलं. त्याच्या रंगीत फोटोप्रती काढल्या. सन 2008 मध्ये एका प्रकाशकांनी "दिनरात तुला मी' हा माझ्या निवडक कथांचा संग्रह प्रकाशित केला. त्यावर छापण्यासाठी मी त्यांना मूळ चित्र दिलं; पण त्यांच्याकडून ते हरवलं. आता माझ्याकडं फक्त फोटोप्रत शिल्लक आहे.
***

नूतन दांडेकर नावाची एक गुणी अभिनेत्री होती. दूरदर्शन सुरू झालं तेव्हा एका ऐतिहासिक मालिकेत तिला पूर्ण लांबीची भूमिका मिळाली होती. माझ्या एका पुस्तकावर तिच्या फोटोचं मुखपृष्ठ होतं. ते काढणाऱ्या चित्रकाराशी तिनं ओळख करून दिली. रंगीत, कृष्ण-धवल फोटो वापरून आणि लेटरिंग करून मासिकांची आणि पुस्तकांची "लाईन ड्रॉइंग्ज' पद्धतीची कव्हर्स तो बनवायचा. तो कम्पोझिशन असं करायचा की चित्र रंगीत दिसेल; पण छपाईचा खर्च कमी येईल. पुढं तो चित्रकार व्यसनाच्या आहारी गेला. व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला. तिथं उपचार घेत असतानाच गफलतीनं त्याच्या मृत्यूची बातमी पुण्या-मुंबईत प्रकाशित झाली. ती वाचून तो केंद्रातून पळाला आणि संबंधित सर्व संपादकांना भेटला. त्यांनी चुकीच्या बातमीबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्याला चहा पाजला, दहा-वीस रुपये दिले. पैसे घेऊन तो निघून गेला. या गोष्टीला आता तीसेक वर्षं लोटली. तो आहे की नाही ठाऊक नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay tarawade write article in saptarang