कविसंमेलनांचं कवित्व (विजय तरवडे)

vijay tarawade
vijay tarawade

चांगल्या कविता आवडणारे दर्दी रसिक गर्दीयुक्त कविसंमेलनं अनेकदा टाळतात. कारण, अशा ठिकाणी चांगली कविता ऐकायला मिळेलच याची खात्री नसते. वसंत बापट सूत्रसंचालक असलेल्या एका कविसंमेलनात अजब प्रकार पाहिलेला आठवतो. स्टेजवर प्रचंड गर्दी होती आणि श्रोत्यांची संख्या तुलनेनं कमी होती. अर्थात एकेका कवीचं काव्यवाचन होत गेलं तशी व्यासपीठावरची गर्दी कमी होत गेली. पुण्यातल्या एका हौशी काव्यमंडळाच्या वार्षिक अधिवेशनाला आनंद यादव पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी भाषणाच्या सुरवातीला सांगितलेला एक किस्सा मजेदार आहे. नवोदितांच्या त्या संमेलनात फक्त कवीच उपस्थित होते. तेच कवी आणि तेच श्रोते. व्यासपीठावर फक्त अध्यक्ष, सूत्रसंचालक आणि कविता वाचणारा कवी. एकेका कवीचं वाचन होत गेलं तशी गर्दी कमी होत गेली. कारण स्वतःचं वाचन झाल्यावर कवी पसार होत होते. मध्येच वीज गेली. तेव्हा एका कवीनं स्वतःजवळची विजेरी आणली. मग एकेक कवी येऊन विजेच्या प्रकाशात कविता वाचू लागले; पण विजेरीच्या मालकाची वेळ आल्यावर त्यानं कविता वाचली आणि आपली विजेरी घेऊन तो निघून गेला. उरलेलं कविसंमेलन बारगळलं. हा किस्सा काल्पनिक आणि अतिशयोक्त असू शकतो; पण यादव सरांनी तो खुमासदार शैलीत सांगितला. श्रोत्यांचा हशा आणि दाद मिळाल्यावर गंभीर होऊन त्यांनी उरलेल्या भाषणात सगळ्यांना मार्गदर्शनपर आणि खडे बोल सुनावले.
* * *
पु. शं. पतके आणि प्रभाकर तामणे यांनी पुढाकार घेऊन आबासाहेब गरवारे महाविद्यालयात संमेलन आयोजित केलं होतं. कवी यशवंत, ज्योत्स्ना देवधर, प्रभाकर तामणे, बलराम नांगरे, मा. का. देशपांडे, जीवन किर्लोस्कर वगैरे प्रथितयश आणि ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते. शिवाय नवोदित कवीदेखील. आम्ही मागच्या रांगेत बसलेले होतो. कवी यशवंत हे माईकसमोर आल्यावर माका सर (मा. का. देशपांडे) पुटपुटले ः "आता हे त्यांची "कागदावरची कविता' ऐकवतील.' खरोखरच यशवंत यांनी ती कविता धीरगंभीरपणे, सावकाश वाचायला सुरवात केली; पण पहिल्या ओळीपासून माका सर हे यशवंतांच्या आधी प्रत्येक ओळ पुटपुटत होते. त्यांना ती कविता मुखोद्गत होती. नंतर काही कविता झाल्यावर माका सर म्हणाले ः ""चला मुलांनो, काव्यरस खूप झाला. आपण खरोखरचा रस प्यायला जाऊ या''.
आम्ही हळूच सटकलो आणि कर्वे रस्त्यावर उसाचा रस प्यायलो. उसाच्या रसाची आणि काव्यरसाची आणखी एक आठवण आहे. आकाशवाणीवर उषःप्रभा पागे असताना "युववाणी' कार्यक्रमात कविता वाचली की त्या आम्हाला समोरच्या गुऱ्हाळात रस प्यायला नेत. तिथून परतल्यावर मानधनाचे धनादेश मिळत. एकदा तरी रसाचं बिल आपण द्यावं, अशी इच्छा होती; पण ती पूर्ण झाली नाही. काव्यरस आणि उसाचा रस अशी दोन्ही बिलं उषःप्रभा मॅडमच देत राहिल्या.
* * *
नव्या जगात सुखानं जगायचं असेल तर नव्या तंत्रज्ञानाशी परिचय हवा. पूर्वी कविलोक झब्बा-कुर्ता परिधान करत. गळ्यातल्या शबनम पिशवीत कवितेची वही ठेवत. ती पिशवी दिसली की रसिक सावध होत. काही दिवसांपूर्वी एक सुमार कवी भेटला. त्याच्या गळ्यात ती पिशवी नव्हती. त्यामुळं मी बेसावध होतो. त्यानं आग्रह करून कॉफी प्यायला नेलं. कॉफीची ऑर्डर दिल्यावर त्यानं खिशातून स्मार्ट फोन काढला आणि त्यात सेव्ह केलेल्या चार विशाल गझला सुनावल्या. इथं "सुनावल्या' हे क्रियापद "शिक्षा सुनावली' या चालीवर वाचावं. ही हकीकत ऐकून आमच्या एका मित्रानं सुचवलं ः "अशा वेळी कवीचा मोबाईल कविता बघायला म्हणून मागावा आणि अडाण्याचं सोंग आणून चपळाईनं आख्खी फाईल डिलिट करावी!'
पण तेवढं क्रौर्य नकोसं वाटतं.

कविता कशीही असो, कवीचं तिच्यावर प्राणांपलीकडं प्रेम असतं. तिच्यासाठी तो वाट्टेल ते करू शकतो. संपादक कविता छापत नसतील तर स्त्रीचं नाव धारण करून कविता पाठवतो. प्रभाकर तामणे सरांचा "सत्यकथा' मासिकावर विशेष राग असावा. आकाशवाणीच्या "युववाणी' कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना त्यांनी एक किस्सा अगदी रंगवून सांगितला होता. भालेरावनामे कवीची कविता "सत्यकथा'नं साभार परत केल्यावर त्यानं तीच कविता "सत्यकथा'कडं स्त्रीच्या नावानं पाठवली आणि ती छापून आली.
* * *
स्त्रीच्या नावानं कविता करणं ही काही मराठी कवींचीच मिरासदारी आहे, असं नाही. उर्दू कवी इस से बढकर आहेत. ते तर अंशतः स्त्रीचं रूपदेखील धारण करतात. एकोणिसाव्या शतकातला एक मजेदार प्रसंग वाचनात आला होता. शेवटचा मोगल बादशहा बहादूरशहा जफर हा स्वतः कवी होता आणि कवींविषयी त्याला आस्था होती. बहादूरशहाचा मुलगा शहजादा फखरुद्दीन हादेखील कवी होता. गालिब, जौक आणि मोमीन हे समकालीन उर्दू कवी त्याचे जवळचे होते. गालिबचा दत्तकपुत्र करीमुद्दीन पैशांच्या अडचणीत होता. त्यानं प्रायोजकत्वासाठी बादशहाला खास विनंती करून सन १८४५ मध्ये दिल्लीत कविसंमेलन (मुशायरा) घडवून आणलं. त्या वेळी दिल्लीतला एक कवी मिर्जा बेग "नाजनीन' या टोपणनावानं स्त्रियांच्या भाषेत काव्य करत असे. उर्दूत या प्रकाराला "रिख्ती' असं म्हणतात. त्यानंही कविसंमेलनात भाग घेतला. कविता सादर करण्याची त्याची वेळ आली तेव्हा त्याच्यासाठी ओढणी मागवण्यात आली. ओढणीचा पदर डोक्‍यावरून घेऊन त्यानं आपलं काव्य सादर केलं. ते काव्य रसिकांनी तितक्‍याच गांभीर्यानं स्वीकारलं.
"उर्दू काव्याचा परिचय' (सेतू माधवराव पगडी) या पुस्तकात वरील हकीकत दिलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com