'रोमॉं अ क्‍ले' आणि अनैतिहासिक कादंबरी (विजय तरवडे)

vijay tarawade
vijay tarawade

मेदलेन द स्क्‍युदिरी या फ्रेंच लेखिकेनं सतराव्या शतकात एक कादंबरी लिहिली. तीत तत्कालीन समाजातले राजकीय नेत्यांची आणि इतर बड्यांची नावं न घेता अशा खुबीनं चित्रण केलं होतं की जाणकार वाचकाला त्या व्यक्ती ओळखता याव्यात. या प्रकारची ज्ञात इतिहासातली ती पहिली कादंबरी. ही शैली "रोमॉं अ क्‍ले' या नावानं ओळखली जाते.

भालचंद्र नेमाडे यांच्या बहुतेक कादंबऱ्यांमधल्या पात्रांची नावं आणि खऱ्या व्यक्ती यांच्यातला पडदा अतिशय झिरझिरीत असतो. ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी या विषयावर फेसबुकवर पोस्ट लिहून काही जुनी माहिती उपलब्ध करून दिली आहे. "तपशील' (संपादक ः नाना जोशी) या अनियतकालिकात अ. ना. महाशब्दे यांनी लिहिलेल्या लेखात "बिढार' (भालचंद्र नेमाडे) आणि "भंगलेले देऊळ' (ग. त्र्यं माडखोलकर) या रचनांचा "रोमॉं अ क्‍ले' या वर्गात समावेश केला आहे; पण या प्रकारच्या अनेक कलाकृती जगभर असू शकतील. विख्यात ब्रिटिश साहित्यिक विल्यम सॉमरसेट मॉम यांनी विख्यात फ्रेंच चित्रकार पॉल गोगॅं याच्या जीवनकहाणीशी साधर्म्य सांगणारी "द मून अँड सिक्‍स पेन्स'ही अजरामर कादंबरी लिहिली. त्यांची दुसरी "केक्‍स अँड एल' ही कादंबरीदेखील इंग्लिश कादंबरीकार ह्यू वॉलपोल आणि थॉमस हार्डी या समकालीनांच्या जीवनावर असल्याची बोलवा होती. अर्थातच मॉम यांनी याचा इन्कार केला. काही दिवसांनी त्यांच्या कादंबरीला प्रत्युत्तर देणारी "जिन्स अँड बिटर्स' ही कादंबरी टोपणनावानं बाजारात आली. ती ह्यू वॉलपोल यांनी लिहिल्याची अफवा पसरली होती; पण तिचा लेखक कुणी तिसराच निघाला. मात्र, मॉम यांच्या कादंबरीमुळे वॉलपोल यांच्या आयुष्यातली सृजनशील अकरा वर्षं उद्‌ध्वस्त झाली. अनेक इंग्लिश साहित्यिकांपैकी नेमका मॉम यांचाच आवर्जून उल्लेख करण्याचं कारण असं, की मागच्या पिढीत यांच्या कथा-कादंबऱ्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट होत्या आणि हा साहित्यिक मराठी वाचकांना बऱ्यापैकी ठाऊक आहे. हा वाङ्मयप्रकार तितकासा साळसूद नाहीच. एखाद्या व्यक्तीचं थेट नाव न घेता त्याला बदनाम करण्यासाठी हे शस्त्र वापरलं जाण्याची शक्‍यता असते. मारिओ पुझो यांच्या "द गॉडफादर' या गाजलेल्या कादंबरीत ज्यॉं फॉंतेन हा गायक-नट माफिया डॉनच्या साह्यानं हॉलिवूडमध्ये काम आणि नंतर ऑस्कर मिळवतो असं वर्णन आहे. लेखकानं याला "काल्पनिक' म्हटलं आहे; पण फ्रॅंक सिनात्रा या गायक-नटाला हे पात्र स्वतःवरून योजल्याचं वाटलं व एका मेजवानीप्रसंगी त्यानं पुझो यांना शिवीगाळ केली. स्वतः पुझो यांनीच हा प्रसंग एका लेखात सांगितला आहे.

हिंदीत उदय प्रकाश यांनी लिहिलेली "वॉरन हेस्टिंग्ज्‌ का सांड' ही अतिशय सुंदर कादंबरी नुकतीच वाचनात आली. तीत त्यांनी वॉरन हेस्टिंग्ज्‌चं थेट नाव घेतलेलं असलं तरी सुरवातीलाच त्यांनी त्याबाबत खुलासाही केला आहे ः "इस कहानी में इतिहास उतना ही है, जितना दाल में नमक होता है.' विजय तेंडुलकर यांच्या शब्दांत हिला "अनैतिहासिक कादंबरी' म्हणायला हरकत नाही! आपल्याकडं ना. सी. फडके यांनी याच पद्धतीनं "कुहू! कुहू!', "ही का कल्पद्रुमाची फळे' आणि "अखेरचे बंड' या कादंबऱ्या लिहिल्या होत्या. आचार्य अत्रे यांनी "बुवा तेथे बाया' हे नाटक लिहिलं. मात्र, काही वर्षांनी "महाराष्ट्राचा भयानक बुवा' या शीर्षकाचा लेख लिहून त्यांनी सदर नाटक कुणामुळं सुचलं हे स्पष्ट करून टाकलं. आचार्य अत्रे आणि मो. ग. रांगणेकर यांच्यात वाद झाला तेव्हा अचानक सर्वत्र "आचार्य' आणि "मोचीराम मोगरे' या दोन नाटकांच्या जाहिराती झळकल्या. योगायोगानं दोघांतला वाद त्वरित मिटला आणि ही नाटकं रसिकांसमोर येता येता राहिली. "आचार्य' लिहिल्याचा रांगणेकरांनी आणि "मोचीराम मोगरे' लिहिल्याचा अत्रे यांनी जाहीर इन्कार केला. ग. वा. बेहेरे यांच्या "प्रचंड' या पुस्तकात आचार्य कात्रे, पु. रा. सावे, गोविंद तडवळकर, कांता पोळके अशा नावांची पात्रं आहेत. हिला "रोमॉं अ क्‍ले' म्हणायचं की आणखी काही म्हणायचं हे वाचकांनीच ठरवावं. सन 1986-87 च्या सुमाराला रमेश मंत्री यांनी "कलमदानी फटाके' आणि "कागदी सिंह' या दोन कादंबऱ्या लिहून तत्कालीन साहित्यिविश्वातल्या आणि पत्रकारांच्या जगातल्या गमतीजमती रेखाटल्या. विद्यार्थिनींशी आणि स्त्री-चाहत्यांशी सूत जमवताना अडचणीत येणारे मराठीचे प्राध्यापक, वाङ्मयचौर्य करणारे कथाकार, लंपट लेखकाला स्त्रीच्या नावानं खुशीपत्रं पाठवून त्याची गंमत करणारे इरसाल वाचक, फक्त स्त्री-वाचकांच्या पत्रांना लाडिक उत्तरं देणारे कथाकथनकार, साहित्यसंमेलनात पडद्याआड होणाऱ्या गमती, पत्रकारांच्या-संपादकांच्या आपापसातल्या हाणामाऱ्या वगैरेंचं (काल्पनिक नावं लिहून; पण खरी नावं समजतील अशा रीतीनं केलेलं) मजेदार चित्रण त्या कादंबऱ्यांमध्ये आहे. शिवाय आचार्य अत्रे, अनंत काणेकर, बा. भ. बोरकर वगैरेंची मूळ नावं तशीच ठेवून त्यांची व्यक्तिचित्रं आणि ऐकीव किस्से यांची सरमिसळ करण्यात आलेली आहे. भाबड्या व्यक्तिमत्त्वाला भोचकपणाचा पदर असलेलं डिंगणकर हे अफलातून व्यक्तिमत्त्व "कलमदानी फटाके'मध्ये आहे. डिंगणकर सर्वसंचारी आहेत. आपली नोकरी आणि लेखन यातून वेळ काढून ते इकडच्या बातम्या तिकडं पसरवतात. त्यातून प्रसंगी त्यांची जवळची माणसंदेखील अडचणीत येतात. मात्र, डिंगणकर हे प्रत्यक्षात एक अतिशय चांगले ललित लेखकही होते. अनेक नवोदितांना त्यांनी मदतीचा हात दिला. त्यांच्या या बाजूचादेखील उल्लेख मंत्री यांनी करायला हवा होता असं वाटतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com