श्रुतयोजन आणि वाङ्‌मयचौर्य (विजय तरवडे)

विजय तरवडे vijaytarawade@gmail.com
रविवार, 23 डिसेंबर 2018

लेखकाला किती मोठं आर्थिक यश किंवा लौकिक प्राप्त व्हावा याचे मापदंड ज्याच्यात्याच्यापुरते असतात; पण लोकप्रिय लेखकांना आणि मानाचे पुरस्कार खेचणाऱ्या दर्जेदार लेखकांना एकमेकांविषयी असूया वाटू शकते. विल्यम सॉमरसेट मॉमची यावर एक फर्मास कथा आहे. कथेमध्ये एक बिन-लोकप्रिय लौकिकवान लेखक मॉमला भेटायला येतो आणि त्याच्या लोकप्रिय कादंबऱ्यांचा उल्लेख टाळून अजिबात न खपलेल्या कादंबरीचं कौतुक करतो. नोकरी करताना हौसेपोटी लेखन करणाऱ्यांना लेखन छापून येण्यात आणि क्वचित मानधन मिळालं तर त्यात आनंद असू शकतो. स्वतः मॉमला कोणतेही मानाचे पुरस्कार मिळाले नाहीत. त्याला मिळणाऱ्या मानधनाचे आकडे स्तिमित करतात.

लेखकाला किती मोठं आर्थिक यश किंवा लौकिक प्राप्त व्हावा याचे मापदंड ज्याच्यात्याच्यापुरते असतात; पण लोकप्रिय लेखकांना आणि मानाचे पुरस्कार खेचणाऱ्या दर्जेदार लेखकांना एकमेकांविषयी असूया वाटू शकते. विल्यम सॉमरसेट मॉमची यावर एक फर्मास कथा आहे. कथेमध्ये एक बिन-लोकप्रिय लौकिकवान लेखक मॉमला भेटायला येतो आणि त्याच्या लोकप्रिय कादंबऱ्यांचा उल्लेख टाळून अजिबात न खपलेल्या कादंबरीचं कौतुक करतो. नोकरी करताना हौसेपोटी लेखन करणाऱ्यांना लेखन छापून येण्यात आणि क्वचित मानधन मिळालं तर त्यात आनंद असू शकतो. स्वतः मॉमला कोणतेही मानाचे पुरस्कार मिळाले नाहीत. त्याला मिळणाऱ्या मानधनाचे आकडे स्तिमित करतात. वीस कादंबऱ्या, नऊ कथासंग्रह, एकतीस नाटकं आणि काही पटकथा लिहिणाऱ्या मॉमला त्याच्या आयुष्यातल्या शेवटच्या दहा वर्षांत म्हणजे 1955 ते 1965 या काळात दरसाल पन्नास हजार पौंड इतकं मानधन मिळत होतं.

मॉम या मानधनावर समाधानी होता का, हा प्रश्नच आहे. त्याचा मानधनवसुलीचा एक किस्सा मजेदार आहे. स्पेनमधल्या प्रकाशकांकडून मानधन वसूल होत नव्हतं, म्हणून मॉमनं तिथं जाऊन एका आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. ऐश केली. मानधनाएवढं बिल केलं. ते बिल प्रकाशकांच्या माथी मारून इंग्लंडला परतायचं, असा त्याचा बेत होता. निघण्याच्या आदल्या रात्री त्यानं व्यवस्थापकांना बिल बनवण्यास सांगितलं, तेव्हा व्यवस्थापक नम्रपणे उत्तरले ः ""तुमच्यासारखा ख्यातनाम लेखक आमच्या हॉटेलमध्ये उतरला आणि आम्हाला प्रतिष्ठा मिळवून दिली. सबब, आम्ही तुमच्याकडून बिल घेणार नाही.''

मॉमचा आणखीन एक किस्सा. इटलीमधल्या घरात विश्रांतीसाठी गेला असताना त्याला स्थानिक माफियांनी खंडणी मागितली. मॉमनं ती मागणी हसण्यावारी नेली. तेव्हा खंडणीखोरांनी त्याच्या घरातल्या सामानाची मोडतोड केली. मॉमला शेवटी झुकावं लागलं. खंडणी द्यावी लागली.

ऐंशीच्या दशकात हे मॉमचे किस्से वाचले, तेव्हा माझ्या परिचयातला एक लोकप्रिय सदरलेखक कॅफे डिलाईट नावाच्या उपाहारगृहात नेहमी भेटत असे. कॅफे डिलाईट तेव्हा विविध विचारसरणींच्या लेखकांचं, पत्रकारांचं, संपादकांचं आणि कार्यकर्त्यांचं आश्रयस्थान उर्फ अड्डा होतं. सदरलेखकाला मी पहिला किस्सा सांगितला. काही दिवसांनी त्याच्या सदरात वर्णन आलं, की तो कोकणात कुठंसा वसुलीसाठी गेला आणि एका लॉजमध्ये उतरला. लॉजचे मालक त्याचे चाहते निघाले. त्यांनी त्याला बिल माफ केलं. हे वाचून मौज वाटली. पुढच्या भेटीत मी त्याला मॉमचा किस्सा रंगवून सांगितला तो असा ः मॉम इटलीतल्या घरी विश्रांतीसाठी गेल्यावर त्याला माफियांनी खंडणी मागितली. मॉमची मारिओ पुझोशी जान-पेहचान होती. त्याच्या विनंतीवरून मारिओ पुझोनं मध्यस्थी केली आणि माफियांनी खंडणी माफ केली. अर्थातच काही दिवसांनी लेखकरावांच्या सदरात नवा किस्सा आला. त्याच्या कोणा घरमालक असलेल्या मित्राच्या घरातला भाडेकरू गुंड होता आणि घर सोडत नव्हता; पण तिथला नगरसेवक लेखकाचा चाहता होता. नगरसेवकानं डोळे वटारल्यावर तो गुंड भाडेकरू तात्काळ घर सोडून गेला!

वाङ्‌मयचौर्य हा प्रत्येक भाषेतल्या लेखकांना जडलेला रोग असू शकतो. निगरगट्ट लेखक थेट वाङ्‌मयचौर्य करतात. थोडे भित्रे लेखक मूळ कलाकृतीत जुजबी फेरफार करतात. सफाईदार इंटुक लेखक मूळ कलाकृतीची संकल्पना घेऊन तिच्यावर कारागिरी करतात. समर्थन करताना "आम्हाला दोघांना एकच कल्पना सुचू शकते,' हा लोकप्रिय युक्तिवाद असतो. काहीजण "आपलं ते श्रुतयोजन आणि इतरांचं ते वाङ्‌मयचौर्य' असं म्हणतात.

"द लंच्युन' ही मॉमची गाजलेली लघुकथा. तिचा नायक एक गरीब लेखक आहे. त्याच्या खिशात अवघे ऐंशी फ्रॅन्क असताना त्याची कोणी श्रीमंत वाचक भेटते. तो तिला जेवणाचं आमंत्रण देतो. ती महागडं हॉटेल निवडते. जेवताना गप्पा मारत असताना अनेकदा संधी मिळूनही संकोचापोटी तो तिला स्वतःच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगत नाही. ती आपल्या प्रेमात पडली असेल, असा त्याला भाबडा भ्रम झालेला असावा. ती पदार्थ मागवत राहते. बिल द्यायला पैसे पुरावेत म्हणून तो काही खात नाही. बिल दिल्यावर तो खंक होतो. त्याला उरलेला महिना हलाखीत काढावा लागतो. काही वर्षांनी तो प्रथितयश लेखक बनल्यावर ती वाचक पुन्हा भेटते. तेव्हा ती अतिशय लठ्ठ- दीडशे किलो- झालेली असते. तिच्या अशा बेढब होण्यातच लेखकाला आनंद होणं हे टीकाकारांना कोतेपणाचं लक्षण वाटलं.

याच शीर्षकाची एक कथा जेफ्री आर्चरनंदेखील लिहिली आहे. मूळ सांगाडा तसाच आहे. गरीब लेखक आणि कोणा चित्रपट दिग्दर्शकाची भार्या. लेखकाच्या खिशात अवघे 37.63 पौंड आहेत. चित्रपटात संधी मिळावी या सुप्त हेतूनं तो तिला जेवायचं निमंत्रण देतो. ती महागडं हॉटेल निवडते आणि महागडे पदार्थ मागवते. ती मेन्यूकार्डाच्या डाव्या स्तंभाकडं आणि तो उजव्या स्तंभाकडं बघत जेवतात. अवांतर गप्पा मारतात. जेवण संपतं. बिल देऊन तो खंक होतो. निरोप घेताना ती त्याला सहज सांगते, की नुकताच तिनं चित्रपटदिग्दर्शकाला घटस्फोट दिलाय आणि पुनर्विवाह केलाय. तिचा नवा पती याच हॉटेलचा मालक आहे.

जेफ्री आर्चरची कथा मॉमपेक्षा सफाईदार आहे. तिला श्रुतयोजन म्हणायचं, की मूळ कथेपेक्षा सरस रूपांतर म्हणायचं हे वाचकांनीच ठरवावं.

Web Title: vijay tarawade write article in saptarang