असे हे वाचक! (विजय तरवडे)

असे हे वाचक! (विजय तरवडे)

कोणतं पुस्तक विकत घ्यावं आणि कोणतं वाचनालयातून आणावं याचे काही नियम विसरू नयेत! रहस्यकथा असेल तर ती शक्‍यतो विकत आणावी. वाचनालयातली प्रत अनेकदा खराब असू शकते. जुनी असेल तर शेवटचं पान फाटलेलं - गायब - असू शकतं. एखाद्या दुष्ट वाचकानं कादंबरीच्या अधेमधेच कुठंतरी रहस्यभेद केलेला असू शकतो. सबब, रहस्यकथा विकतच आणलेली चांगली!

अर्ल स्टॅन्ले गार्डनरच्या अनेक ‘पेरी मेसन कथा’ मी रद्दीच्या दुकानातून विकत आणून वाचल्या आहेत. एकाही प्रतीवर कुणा वाचकानं रहस्यभेद करण्याचा खोडसाळपणा केलेला नव्हता. ललित साहित्य, कवितासंग्रह वाचनालयातून आणून वाचावेत आणि आवडले तर नंतर विकत घ्यावेत. वाचनालयातून आणून ललित किंवा मनोरंजनपर पुस्तक वाचण्यात एक मौज असते. शक्‍यतो जुनं झालेलं पुस्तक आणावं. काही वेळा त्यात वाचकांनी लिहिलेले अफलातून शेरे वाचायला मिळतात. रोहिणी कुलकर्णी यांची ‘सातवं दालन’ आणि ‘भेट’ या दीर्घ कथा दिवाळी अंकात वाचल्या तेव्हा खूप आवडल्या होत्या.

कालांतरानं त्या पुस्तकरूपानं उपलब्ध झाल्या. पुन्हा वाचाव्याशा वाटल्या म्हणून वाचनालयातून आणल्या. ‘सातवं दालन’च्या शेवटच्या पानावर एका वाचकानं शेरा मारला होता ः ‘ही कथा टॉल्‌स्टॉयच्या ‘ॲना कॅरेनिना’वरून ‘ढापलेली’ आहे.’ कुतूहलानं मी ‘ॲना कॅरेनिना’ आणून वाचली तर लक्षात आलं की त्या मूळ कादंबरीचा पूर्वार्ध म्हणजे ‘सातवं दालन’ होय आणि उत्तरार्ध म्हणजे ‘भेट’ होय. फक्त मूळ कादंबरीत ॲना आत्महत्या करते. मात्र, या दोन्ही मराठी कादंबऱ्या मराठीत आणताना पात्रांची व स्थळांची रशियन नावं बदलून मराठी नावं आणि मध्य प्रदेशात पूर्वी आढळणारं सरंजामी वातावरण समर्थपणे चितारलं आहे.

कथाबीज परकीय असल्याचा कुठंही वास येत नाही आणि कथा संपूर्णपणे आपल्या मातीतल्या वाटतात. एका गमतीचा जाता जाता उल्लेख ः मूळ कादंबरीमध्ये ॲनाचा प्रियकर ऱ्हॉन्स्की हा सतत कॉकटेल पार्ट्यांना जात असतो व ॲना घरात एकटी पडते. मराठी कादंबरीत सतीश मित्रांकडं पत्ते खेळायला जातो!
* * *
पुण्यातले एक दिवंगत संपादक-कादंबरीकार दरमहा काही मासिकं प्रकाशित करत असत. या मासिकांच्या दिवाळी अंकात ते स्वतःची कादंबरी छापत आणि कालांतरानं तिचं पुस्तक प्रकाशित करत. दिवाळी अंकांची स्वतःच्याच अंकात जाहिरात करताना ते साधारणतः अशी शब्दरचना करत ः 
येत आहे! *** चा यंदाचा दिवाळी अंक...
या अंकात पुढील मान्यवरांच्या कथा ः (इथं कथाकारांची यादी) आणि महाराष्ट्राचे लाडके कादंबरीकार ***

‘लाडके कादंबरीकार’ म्हणून ते स्वतःचे नाव छापत. त्यांच्या वाचकांचीदेखील याविषयी काही तक्रार नसे. त्यांच्या कादंबऱ्या म्हणजे तत्कालीन वर्णनानुसार ‘स्वतंत्र सामाजिक कादंबऱ्या’ असत. त्यात खळबळजनक किंवा प्रक्षोभक काही नसे. साधेसुधे नायक-नायिका, त्यांचा परस्परपरिचय, प्रेम, त्यात अडथळे व शेवटी मीलन आणि लग्न. हे नायक-नायिका शक्‍यतो पुण्याच्या बाहेर जात नसत. गेलेच तर एखाद्या महाराष्ट्रातल्या देवस्थानाला किंवा कादंबरीच्या शेवटी लग्नानंतर माथेरानला किंवा महाबळेश्वरला...

एकाच कादंबरीत त्यांनी नायिका मुंबईत आणि नायक पुण्यात दाखवला होता. एका प्रसंगी नायकाला नायिकेची तीव्र आठवण येते आणि तो तडक जेट विमानात बसून मुंबईला जातो! जेटचा वेग ताशी ६०० मैल आणि उड्डाण केल्यावर विमान मुंबईला अगदी दोन तासांत पोचतं! असं वर्णन त्यांनी केलं होतं. उड्डाण केल्यावर हवेतला दोन तासांचा कालावधी आणि त्यात नायकाला खिडकीतून दिसणारे ढग, नायिकेची आठवण वगैरे... सगळंच भन्नाट होतं! असं असलं तरीही उपरोक्त लेखकानं त्याच्या अमदानीत सव्वाशेहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सगळ्या कादंबऱ्या व्यवस्थित खपल्या. याचा अर्थ वाचकांची लेखकाबद्दल कोणतीही तक्रार नव्हती.

***

व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘सत्तांतर’ या कादंबरीनं मला वेगळाच अनुभव दिला. त्या काळात घडलेला एक प्रसंग आधी सांगतो. पुण्यातल्या एका ध्येयवादी मासिकाचे संपादक-कम-कथाकार इथली नोकरी सोडून एका मोठ्या साप्ताहिकात नोकरीला गेले. तिथं त्यांची कारकीर्द गाजत असतानाच त्यांचे दैनिकाच्या संपादकांशी काही वैयक्तिक मतभेद झाले. दरम्यान, त्यांच्या स्वतःच्या हातून काही भलत्याच चुका झाल्या. एका फ्री लान्स पत्रकारानं त्या चव्हाट्यावर आणल्या आणि त्यांची नोकरी गेली. हे प्रकरण साहित्यिक-सांस्कृतिक वर्तुळात, वृत्तपत्रांत आणि अनेक दिवाळी अंकांत गाजत होतं. त्या सुमारास मी वाचनालयातून ‘सत्तांतर’ वाचायला आणली होती. या कादंबरीत लंगूरांची अनेक रेखाटनं आहेत. लहानपणी खोडकर मुलं इतिहासाच्या पुस्तकातल्या व्यक्तींना दाढी-मिश्‍या काढत, तसा प्रकार एका अनामिक वाचकानं करून ठेवला होता. हा वाचक साहित्याक्षेत्रातल्या घडामोडींविषयीचा जाणकार असावा आणि उत्तम चित्रकारदेखील असावा. एका विशिष्ट पानावर कादंबरीतला एक प्रसंग, उपरोक्त खळबळजनक घटना आणि रेखाटनं योगायोगानं जुळली होती. त्या वाचकानं-चित्रकारानं रोटरिंग पेनच्या साह्यानं लंगूरांच्या चेहऱ्यांत काही बदल करून उपरोक्त घटनेतल्या व्यक्तींचे चेहरे हुबेहूब साकारले होते. चित्रातल्या एका झाडाच्या बुंध्यावरच्या रेषांमध्ये साप्ताहिकाचं नाव बेमालूमपणे मिसळलं होतं. ही खोडसाळपणाची खरं तर परिसीमाच होती. हा किस्सा वाचून क्षणभर हसू येईल; पण सार्वजनिक मालकीच्या पुस्तकाची प्रत अशा रीतीनं खराब करणं मनाला पटत नाही. आणि आज रोजी या वादाशी संबंधित व्यक्ती हयातही नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com