रंग बदलून मनसेचे इंजिन पळणार काय?

vikas kotwal writer blog about mns raj thackeray political decisions
vikas kotwal writer blog about mns raj thackeray political decisions

राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेनेशी फारकत घेत मनसेची स्थापना केली. सुरवातीला धर्मनिरपेक्ष रंग दाखवला खरा; पण पुढे मराठी भाषा, भूमिपुत्र, परप्रांतीयांना विरोध करत राज यांनी सौम्य हिंदुत्वाचा रागही आळवला. यामुळे राज आपल्या मनातील बोलत आहे, असे मराठी जनतेला त्यांना वाटू लागले. याच जोरावर त्यांनी राज्यात मनसेची बांधणी केली. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथेक्लिक करा

2009च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने 10 जागा लढवल्या. त्यात एकाही जागेवर यश आले नाही. मात्र मतांची टक्केवारी पाहता येणाऱ्या काळात मनसे राज्यात प्रभावी ठरण्याचे संकेत मिळाले. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. याचा फटका शिवसेनेला बसला आणि मनसेचा दबदबा वाढला. त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीत मनसेने चमकदार कामगिरी केली. यानंतर जनतेने टाकलेला विश्‍वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी ओघाने राज यांच्यावर आली. मात्र नाशिक महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर सुरवातीच्या दोन-अडीच वर्षांत ठोस विकासकामे झाली नाही. याबाबत बोलताना राज यांनी "माझ्या हाती काही जादूची कांडी नाही,' असे सांगितल्यावर त्यांच्या कथणी आणि करणीत फरक असल्याचे नागरिकांना वाटू लागले. मनसेला नाशिकचे "रोल मॉडेल' तयार करून ते राज्यासमोर ठेवता येणे शक्‍य होते. मात्र तसे न झाल्याने नागरिकांचा विश्‍वास हळूहळू उडाला. पुढे राज यांना पक्ष संघटना एकत्र बांधून ठेवण्यातही अपयश आले. मनसेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला. यामुळे मनसे अधिकच खिळखिळी झाली. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला यश मिळाले नाही. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर केवळ एका जागेवर पक्षाला यश मिळाले. राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. नरेंद्र मोदींच्या लाटेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही खिळखिळे झाले. राज्यात प्रबळ विरोधी पक्षाची मोठी पोकळी निर्माण झाली. वास्तविक या संधीचे राज यांनी सोने करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. परिणामी पुढे झालेल्या महापालिका निवडणुकांत मनसेची पीछेहाट झाली. राज्यात युतीच्या सरकारमध्येही फारसा सौख्य नव्हते, याचा फायदाही राज यांना उठवता आला नाही. केवळ नरेंद्र मोदींवर टीका करण्यातच त्यांनी धन्यता मानली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत मनसेला पुन्हा एकदा अपयश आले. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा देण्यात पक्षाने शक्ती खर्च केली. ही भूमिका मराठी माणसाच्या पचनी पडली नाही. त्यापुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीत "कल्याण ग्रामीण'मधून प्रमोद पाटील हे एकमेव आमदार निवडून आले. यातून कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह निर्माण झाला आहे. यातून सावरणे राज यांच्यासमोरील सध्या मोठे आव्हान आहे. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथेक्लिक करा

शिवसेनेने आता हिंदुत्वाच्या मुद्द्याला दुय्यम महत्त्व देत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा हिंदुत्वादाला वाव आहे. मनसेकडून आता भाजपच्या साथीने राजकारण करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फसणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये याबाबत तासभर चर्चा झाल्याचे देखिल सांगण्यात येते. बाळा नांदगावकर यांनीही भाजपबरोबर जाण्याचे संकेत दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील याबाबत विचार करण्याचे संकेत दिले आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीशी सामना करण्यासाठी भाजपला देखील मनसेशी जुळून घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. दोन्ही पक्षांना आता एकमेकांची गरज असून त्यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. कॉंग्रेस स्वातंत्रवीर सावरकारांचा विरोध करत आहे, तर दुसरीकडे शिवसेने सावरकर हे आमचे सर्वस्व असल्याचे सांगत आहे. या पार्श्‍वभुमीवर मनसे आगामी काळात सावरकारांना अग्रस्थान देणार असल्याचे समजते. मनसेने आता ध्वजामध्ये बदल करून तो भगवा किंवा केशरी करण्यासह राजकीय भूमिका बदल्याचे सूतोवाच केले आहे. मात्र कणखर आणि योग्य ध्येय-धोरणांअभावी मनसेच्या इंजिनाची रुतलेली चाके ध्वजाचा रंग बदलल्याने पुन्हा गती पकडणार का, हे पाहणे येणाऱ्या काळात औत्सुक्‍याचे ठरेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com