Purvayan Madhyayan Travelogue
esakal
गणाधीश प्रभुदेसाई - Ganadhish.Prabhudesai@esakal.com
पेशाने अभियंता म्हटले की सूक्ष्म निरीक्षणशक्ती आलीच. त्यातच कविमन असेल तर मग अशा व्यक्तिमत्त्वाच्या लेखणीतून साकारलेली साहित्यकृती वाचनीय व अभ्यासपूर्ण असेल, हे सांगायची गरज नाही. विलास शेळके हे असेच व्यक्तिमत्त्व. त्यांची ‘पश्चिमायन’, ‘मध्यमायन’ आणि ‘पूर्वायन’ ही प्रवासवर्णनात्मक पुस्तके वाचकाला जगाच्या विविध भागांचा केवळ भौगोलिक नव्हे, तर सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि मानवी जीवनाचा जवळून परिचय करून देतात. लेखकाने प्रवास करताना पाहिलेल्या स्थळांचे वर्णन माहितीपूर्ण आणि साहित्यिक शैलीत केले असून, त्यामध्ये वैयक्तिक अनुभव, स्थानिक लोकजीवन, इतिहास, निसर्ग आणि सामाजिक निरीक्षण यांचा सुंदर मिलाफ आढळतो.
‘पूर्वायन’मध्ये पूर्वेकडील काही देशांतील संस्कृती, तंत्रज्ञान, परंपरा, शिक्षणव्यवस्था, निसर्ग आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांचे सूक्ष्म निरीक्षण लेखकाने केले आहे. आधुनिकतेचा स्वीकार करतानाच परंपरेचे जतन कसे करता येते, याचे प्रभावी उदाहरण या देशांच्या माध्यमातून लेखक दाखवतात. निसर्गरम्य स्थळे, मंदिरे, शहरे, लोकांचे स्वभाव आणि सामाजिक मूल्ये यांचे चित्रण पुस्तकाला वेगळे सौंदर्य प्राप्त करून देते. जपान, हाँगकाँग, मकाव, कंबोडिया, व्हिएतनाम व चीन या सहा देशांचे दर्शन या पुस्तकातून होते. ‘मध्यमायन’ या पुस्तकात मध्य आशिया व मध्य पूर्वेतील देशांचा प्रवास उलगडतो. या प्रदेशाचा प्राचीन इतिहास, रेशीम मार्गाची परंपरा, इस्लामी संस्कृती, विविध राजवटींचा प्रभाव आणि आधुनिक बदल यांचा अभ्यासपूर्ण आढावा लेखक घेतात. स्थानिक बाजारपेठा, खाद्यसंस्कृती, धार्मिक स्थळे आणि लोकांचे दैनंदिन जीवन यांचे वास्तववादी चित्रण वाचकाला त्या प्रदेशात प्रत्यक्ष फिरत असल्याचा अनुभव देते. इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घालण्याची लेखकाची शैली या पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरते. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना मध्यावदीत भेटलेल्या दुबई, इजिप्त, श्रीलंका, थायलंड, सिंगापूर व भूतान या सहा देशांचे शब्दचित्र या पुस्तकातून रेखाटलेले आहे.