लहानपणी मुंबईहून गावी कोकणात जाताना पनवेलहून पुढे पेणच्या दिशेने निघालो की, अंगठ्याच्या आकाराचा सुळका नजरेस पडायचा. त्यामुळे या सुळक्याचं आकर्षण अगदी लहानपणापासूनच होते. किमान एकदातरी इथे जायचं असा प्रण गावी जाताना करायचो. पुढे गो. नी. दांडेकर यांच्या कादंबरीवरील ‘जैत रे जैत’ हा चित्रपट पाहण्यात आला. त्यामुळे गावी जाताना लिंगोबाच्या डोंगराकडे पाहताना, नाग्यासारखाच ‘ह्या दोंगरान आपलं बोट कश्यापाई उचील्लं?’ असा प्रश्न पडत असे.