अरे ओ सांबा...प्रेक्षकांच्या मन:पटलावर राज्य करणारा खलनायक

amjad-khan.
amjad-khan.

"अरे ओ सांबा... कितने आदमी थे?' हा डायलॉग आजही सिनेमाप्रेमींच्या तोंडी आहे. ही अजरामर भूमिका साकारणारा गब्बर म्हणजेच अमजद खान. तो अजूनही विस्मृतीत गेलेला नाही. गब्बर हा चित्रपटातल्या खलनायकाचा वेगळा चेहरा... राजकीय, व्यावसायिक आणि इतर खलनायक आपण बरेच बघितले. किंबहुना याच खलनायकांची जास्त रेलचेल होती आणि आहे, असे म्हणायला हरकत नाही. काही चित्रपटांमध्ये चंबळचे डाकू किंवा गब्बरसारखे क्रूर डाकू. अशा प्रकारच्या व्हिलनने आपला चेहरा खलनायकी रूपात व्यवस्थितपणे उमटवला. गब्बर हा त्यातला सगळ्यांत मोठा किंवा बॉसच. आता परत हाच मुद्दा येतो की, असा खलनायक हा चित्रपटांच्या कथेत आला का, या प्रकारचे खलनायक रंगवले गेले. याचे पण उत्तर तसेच आहे. समाजाच्या दुर्बल घटकांवर जेव्हा अत्याचार व्हायला लागले तेव्हा त्या अत्याचाराचा बळी ठरलेल्या काहींनी स्वत:ला समाजापासून दूर करत स्वत:तून क्रूरपणे बदला घेणारा माणूस बाहेर काढला. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला किंवा स्वत:ला न्याय मिळवून देण्यासाठी काही लोकांनी डाकू व्हायचा मार्ग पत्करला आणि त्यातून स्वत:ची दहशत निर्माण केली. आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवला. मग या डाकू झालेल्यांना स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वत:चा दबदबा निर्माण करण्यासाठी आणि आपल्यावर अत्याचार झाले म्हणून या समाजाला वचपा घेण्यासाठी पुढे आयुष्यभर डाकूच व्हावे लागले. त्यामुळे त्यांचा प्रवास तसाच झाला. अत्याचार केले त्यांना धडा शिकवायला डाकू झाले आणि नंतर स्वत:च लुटपाट, हिंसा, अत्याचार करू लागले. या समाजात स्वत:चा चेहरा एक क्रूरकर्मा, एक मसीहा म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न करू लागले. पुन्हा या डाकूंच्या टोळीत स्वत:च्या वर्चस्वासाठी लढाया होत राहिल्या आणि हेच समाजाचे बदलते रूप चित्रपटात खलनायकांनी चेहरा घेऊन प्रकट झाले. यात फुलनदेवी पण आली.
आपण फुलनदेवीच्या आयुष्याचा प्रवास बघितला, तर तुम्हाला हेच दिसेल की, तिच्यावर झालेले अत्याचार आणि त्या अत्याचाराचा बदला घेण्याचा दुसरा चेहरा म्हणजे डाकू फुलनदेवी. तिच्यावर चित्रपट येऊन गेला; पण तो नायक की खलनायक, या प्रश्‍नावर संपला. म्हणजे लोकांनी ठरवायचे चित्रपटात दाखवलेला तिचा चेहरा नायक की खलनायक. ती नंतर खासदार झाली. लोकांनी तिला निवडून दिले. पुढचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे. पण, मूळ मुद्दा हा की, समाजाचा चेहरा हाच खलनायकाचा चेहरा असतो. समाजातील खलनायक बदलत जातात तसे चित्रपटातल्या खलनायकाचा चेहरा बदलत जातो. हे थोडक्‍यात म्हणजे समाजाचा चेहरा हा चित्रपटाचा बदलता चेहरा असतो. त्यात सगळेच आले. चित्रपटात खलनायिका पण रंगवल्या आहेत. मात्र, त्या खूप प्रमाणात नाही. काही होत्या त्या साधारण सासू-सून या प्रकारच्या घरगुती हिंसाचाराच्या प्रतीक होत्या. खरे तर आपल्या संस्कृतीत डोकावल्यास रामायणातली मंथरा ही पहिली जगप्रसिद्ध खलनायिका म्हणता येईल. रावण नंतर आला. तिच्या घरगुती हिंसाचारामुळे किंवा कान भरणे या कृतीमुळे सगळे रामायण घडले. पुरुष स्वत:ला श्रेष्ठ, बलवान, धनवान करण्यासाठी आराध्यदेवतांची पूजा करतात. त्या सगळ्या स्त्रीप्रतिमा आहेत. शक्तीसाठी दुर्गेची, बुद्धीसाठी सरस्वतीची, धनासाठी लक्ष्मीची उपासना करतात. म्हणजे पुरुष स्वयंपूर्ण आणि वर्चस्वासाठी स्त्री देवी प्रतिमांचीच आदिशक्तीचीच उपासना करतात. तथापि, समाजात पुरुष श्रेष्ठ कसा, हेच बिंबवण्याचा प्रयत्न करतात. स्त्री प्रतिमांची पूजा करून पुरुषी वर्चस्वाचा समाज निर्माण झालाय.
तसाच विचार केला, तर मंथरा ही सर्व खलनायकांची आद्य म्हणायला हरकत नाही. मी सर्वसामान्यांना ठाऊक असलेल्या खलनायकी चेहऱ्याबद्दल म्हणतोय. याच मंथरेचे पात्र चित्रपटात ललिता पवार यांनी अप्रतिमपणे उभे केले होते. जणू मंथरा म्हणजे ललिता पवारच असाच समज यामुळे निर्माण झाला. चित्रपटात खलनायिकेचे पात्र रंगवण्यात ललिता पवार यांचे नाव अग्रणी होते. एके काळी नायिका म्हणून काम करणाऱ्या ललिता पवारांना चित्रिकरणादरम्यान झालेल्या अपघाताने डोळ्यांवर परिणाम झाला. पण, त्या अपघातग्रस्त डोळ्याचा उपयोग करून त्यांनी खलनायिका रंगवल्या. भारतीय चित्रपटात खलनायिका साधारणपणे सासू याच पात्रात जास्त दिसल्या. घरातल्या लोकांना त्रास देणे आणि पैसे व अधिकारावर डोळा ठेवून वागणे अशाच प्रकारची खलनायिका रंगवली गेली. बिंदू हे अशा खलनायिका रंगवण्याच्या प्रकारात मोडणारे मोठे नाव. त्या आधी नादिरा हे नाव घेता येईल. नादिरा सुंदर तर होतीच; पण तिची अदाकारी लाजवाब होती. ते सिगरेट पिणे. तिची नजर एकदम खतरनाक. आपल्या चित्रपटात खलनायिका या सुंदर आणि मादक असलेल्या दाखवल्या. कारण तेच समाजाचा चेहरा. पुरुषांना मादक सौंदर्य आवडते. त्यात पुरुष अडकतात म्हणून तेच तंत्र चित्रपटात खलनायिकेच्या रूपात आले. आपल्या मोहजालात पुरुषांना अडकवून स्वार्थ साध्य करणे हा समाजातील चेहरा आहे. थोड्या मादक आणि क्रूर अशा मिश्रणात चित्रपटात खलनायिका म्हणून स्थापित झालेल्या स्त्रीने स्त्रीवर अत्याचार केल्याच्या कथा चित्रपटात खूप आल्या. तो आपल्याच समाजाचा चेहरा आहे. स्त्रियांवरील अत्याचार आपण नित्य बघतो. याला पुरुषप्रधान संस्कृती हे एक कारण असले, तरीही स्त्रियाच स्त्रियांना पण त्रास देतात, हे खास करून सासू-सून या नात्यात दिसून येते. या नात्याला इतके कंगोरे आहेत की, विचारू नका. हे कंगोरे कुणाला पूर्णपणे अजूनही समजलेले नाही. पुरुषांना स्त्री कळायला बरेच जन्म घ्यावे लागतील. कदाचित त्यासाठीच वटपौर्णिमा असावी. विवाहित पुरुषाला सात जन्मात तरी बायको स्त्री म्हणून कळावी. त्यासाठीच स्त्रियांचा हा आटापिटा असावा... पण, पुरुष सुधारेल, असे वाटत नाही. तो त्याच्यातला खलनायक सूक्ष्म रूपात दाखवत असतोच. हा प्रत्येकात दडलेला खलनायक कसा बाहेर येतो, हे त्याचे कर्म आणि समाज ठरवतो. म्हणून समाज सुधारणे गरजेचे आहे. समाज सुधारला, तर खलनायक आपोआप सुधारतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com