गोष्टी गावाकडील आठवता गड्या रे... !

‘व्हॉट्सॲप’वर वेगवेगळे गट. समूहही म्हणतात त्यांना. गावमित्रांचा. शाळामित्रांचा. कॉलेज-मित्रांचा. आता आजी-आजोबा झालेल्या चुलत-मावस-मामे भावंडांचा.
Village Story
Village Storysakal

‘व्हॉट्सॲप’वर वेगवेगळे गट. समूहही म्हणतात त्यांना. गावमित्रांचा. शाळामित्रांचा. कॉलेज-मित्रांचा. आता आजी-आजोबा झालेल्या चुलत-मावस-मामे भावंडांचा. जुन्या कंपनीतील सहकाऱ्यांचा. कंपनी सोडलेल्या जुन्या सहकाऱ्यांचा. एकेकाचा प्रयत्नपूर्वक शोध घेऊन तयार केले जातात असे गट. असे हे गट आणि समूह यांच्यातील समान धागा म्हणजे नॉस्टॅल्जिया. अर्थात स्मरणरंजन. भूतकाळातील रम्य आठवणी. काही काही वेळा त्या सुखद नसतात, तर कातर असतात. हळवं करणाऱ्या. डोळे किंचित ओलावणाऱ्या.

कविवर्य ग्रेस यांच्या ‘या व्याकुळ संध्यासमयी...’ कवितेतलं एक कडवं असंच कातर आहे -

तू आठवणींतुन माझ्या

कधिं रंगित वाट पसरशी

अंधार-व्रताची समई

कधिं असते माझ्यापाशीं...

आता पन्नास ते सत्तर वयोगटात असलेल्यांपैकी बऱ्याच जणांनी गेल्या काही वर्षांमध्ये अशा आठवणी लिहिल्या आहेत. रम्य भूतकाळाच्या कथा. वेगवेगळ्या माध्यमांतून. हुरडा, आमराई, गावाकडच्या जत्रा, आजोळ, तिथली सुटी आणि पाहुणचार, खेड्यामधले घर कौलारू वगैरे... माझं गाव, माझी शाळा, माझे मित्र, माझे गुरुजी... अनंत आठवणी. थोडं हळवं करणाऱ्या, थोडं हसवणाऱ्या आठवणी. ‘गेले ते दिन गेले...’ असा भावगदगद सूर लावणाऱ्या. या स्मरणरंजनात्मक लिखाणाला फेसबुकादी सामाजिक माध्यमांनी मोठंच व्यासपीठ मिळवून दिलं.

फेसबुक, व्हॉट्सॲप या नवमाध्यमांवरील हे (अति)स्मरणरंजनात्मक लिखाण हसण्याचा विषय होता माझ्यासाठी. ‘जुनं ते(च) सोनं’ असं नकळत आग्रही ठाम प्रतिपादन असतं हो त्याच्यामध्ये. नव्या जगातल्या सर्व सुखसोयी उपभोगत, जगणं सुखकर करणाऱ्या तंत्रज्ञानाचे आविष्कार अनुभवत ‘बाळपणीचा काळ सुखाचा’ एवढंच सांगतात बहुतेक मंडळी. म्हणूनच या लेखनात काही वेगळं, वैशिष्ट्यपूर्ण असेल तरच ते वाचायला आवडतं.

या गतरम्य काळाचं भूत एक दिवस माझ्याही मानगुटीवर बसेल, असं वाटलं नव्हतं. ते मला लिहायला लावील, अशी कल्पनाही कधी केली नव्हती. मध्यंतरी एक-दोघांनी तसे अनुभव लिहायला सांगितलं, तेव्हा त्यांना उडवून लावलं. ...पण काहीही झालं, तरी प्रवाहपतित होणं नशिबी होतंच! त्याला कारण ठरला एक लेखच. तो काही या पठडीतला नव्हता. आधुनिक जगाशी जोडून घेणारी, नातं सांगणारी माहिती होती त्यात. नवोन्मेषाची कथा. त्याच वृत्तलेखानं नॉस्टॅल्जिक केलं.

पस्तिशीच्या आतला तरुण अभियंता. तो मूळ गावी राहून आधुनिक पद्धतीची शेती करतो आहे. वेगळ्याच जातीच्या केळी पिकवण्याचा प्रयोग त्यानं केला. त्याचीच यशकथा या वृत्तलेखात होती. त्याच्या प्रयोगशीलतेचं कौतुक करणारा; नव्या वाटांकडे नेण्यासाठी प्रेरित करणारा लेख. एरवी अशा लेखांच्या वाटे कधी जात नाही. कारण शेती फार दूर राहिली आता. ती जिथं सोडली, ते वळण आता पार नजरेच्या टप्प्यापल्याड गेलं.

लेख सहज चाळताना त्यात तीन अक्षरी शब्द दिसला. तो एकच शब्द. आणि त्यामुळंच लेख पूर्ण वाचून काढला. लेखकाला विनंती करून त्या प्रयोगशील शेतकऱ्याचा फोन नंबर मिळवला. अगदी न राहून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्याचं भर मध्यरात्री अभिनंदन केलं. त्याच्याशी असलेला माझा बादरायण संबंध निःसंकोचपणे कळवला.

तो तीन अक्षरी शब्द होता - वाशिंबे! करमाळा तालुक्याच्या एका कोपऱ्यातलं गाव.

त्याच शब्दानं, त्याच गावानं पन्नास वर्षं मागं नेलं. स्मरणरंजन. गतरम्य आठवणी. कातर स्मरणं. असं सगळंच काही. थोडं थोडं आठवत होतं आणि बरंच काही विसरून गेलेलो. पण काही तरी जादू झाली आणि मेंदूनं स्मृतिकोषातील त्या फाइल धूळ झटकून उघड्या केल्या.

वाशिंबे म्हणजे माझं पहिलं गाव. आयुष्यातली पहिली आठ वर्षं तिथेच गेलेली. त्या वेळी खेड्यांतून बालवाडी वगैरेची पद्धत नव्हती. ‘एलकेजी’, ‘यूकेजी’ असलं काही कोणाच्या स्वप्नातही नव्हतं. फार काय, गावात असलेल्या सातवीपर्यंतच्या शाळेत इंग्रजी शिकवण्याची सोयच नव्हती. त्या वाशिंब्याच्या शाळेतच तिसरीपर्यंत शिकलो. जाधवगुरुजींनी ‘क-ख-ग’ गिरवायला शिकवलं. पहिल्याच दिवशी वर्गमित्रानं बैलाचं चित्र काढायला शिकवलं. चित्रकलेचा प्रवास तेवढ्याचपुरता मर्यादित. दोन प्राणी दगडी पाटीवर आकार घेत - बैल आणि हत्ती.

वाशिंबे वाचल्यावर असं बरंच काही काही आठवू लागलं. दोन दिवसांनी आणखी एक गंमत झाली. धाराशिवला राहणारा मामेभाऊ धनंजय देशपांडे याच्याशी बोलत होतो. माझं बोलणं एकदम थांबवून तो म्हणाला, ‘‘अरे, वाशिंब्याला आता रेल्वे स्टेशन झालंय की. परवा पुण्याला जाताना दिसलं. वाटलं की पटकन खाली उतरावं आणि फोटो काढावा...’

मग त्याला तो जुना टपाली पत्ताही आठवला - मु. वाशिंबे, पो. सोगाव, ता. करमाळा.

वाशिंब्याचं हे रेल्वेस्टेशनही जुनंच. तब्बल पन्नास वय असलेलं. स्टेशन मिळण्याची ही कृपा उजनीची. धरणाचं काम सुरू झालं आणि पाण्याचा फुगवटा लक्षात घेऊन रेल्वेमार्ग काही किलोमीटर हलवणं भाग पडलं. एरवी वाशिंब्याहून रेल्वेगाडीनं जायचं म्हणजे दीड-दोन किलोमीटर चालत जाऊन सोगाव स्टेशन गाठावं लागायचं. जाताना एक टेकडीवजा डोंगर चढणं भाग होतं. पुण्याकडे आणि सोलापूरकडे जाणाऱ्या दोन दोन पॅसेंजर गाड्या तिथे थांबत.

वाशिंब्याला स्टेशन का नाही? स्टेशनचं नाव ‘सोगाव’ का? लहानपणीही गावाचा अभिमान असतोच ना. त्यातून विचारलेल्या प्रश्नाला धाकट्या मधुकाकांनी उत्तर दिलं होतं - ‘वाशिम नावाचं मोठ्ठं गाव आहे. मग वाशिम आणि वाशिंबे असा गोंधळ होऊ नये म्हणून स्टेशनला सोगाव नाव दिलं. खरं तर हे वाशिंबे स्टेशनच आहे!’ त्या वयात पटलं होतं हे उत्तर. त्यामागचा तर्क अगदी शुद्ध वाटला होता.

पुढे जाऊन चंद्रभागा बनलेली भीमा नदी वाशिंब्याजवळूनच वाहते. आयुष्यात पाहिलेली, अनुभवलेली पहिली नदी स्वाभाविकच ती. म्हणून आजही तिचं दर्शन घडलं, की हात जोडले जातात. तेवढा वेळ मी पुन्हा त्या काळात जाऊन येतो. ह्याच भीमेवरच्या उजनी धरणामुळं करमाळा तालुक्यातल्या काही गावांचा इतिहास बुडाला आणि भूगोल बदलला. सोगाव, पोमलवाडी ही स्टेशनं रेल्वेच्या नकाशावरून पुसली गेली. वाशिंबे, जिंती रोड, पारेवाडी ही नवी नावं नकाशावर आली.

हा रेल्वेमार्ग बदलण्याचं काम अगदी जवळून पाहिलं. त्यासाठी मुरूम, माती वाहून आणणाऱ्या डंपरमधून अनेक चकरा मारल्या. ‘हेडमास्तरांची मुलं’ म्हणून ती मजा भरपूर अनुभवता आली. ते अजस्र काम पूर्ण होण्याच्या आधीच वाशिंबे सोडलं. तिथलं स्टेशन आकाराला येताना पाहायला मिळालं नाही. असंच कधी तरी त्या स्टेशनवर चुकून गाडी थांबली. पिवळ्या दगडी फलकावरची ‘वाशिंबे’ अशी काळी अक्षरं पाहून राहावलं नाही. खाली उतरलो, तर समोर पोस्टातला लक्ष्मणदादा. मग त्यांची आई लळितामावशी आठवल्या.

भगवानमामांचीही आठवण आली. शिवणकाम करायचे ते. लहानपणी रेल्वे एवढंच वाहतुकीचं साधन पाहिल्यामुळे सुटीतले खेळही रेल्वेगाडीचेच असायचे. त्यासाठीचे बावटे भगवानमामांकडून आणायचे. त्या तीन अक्षरांनी काय काय आठवतं - भैरोबाची यात्रा, ‘गुरुजींचा मुलगा’ म्हणून वर्गमित्रांनी आणून दिलेली गाभुळी बोरं, घरामागच्या माळ्याच्या मळ्यात आगटीत सालासकट भाजलेली मक्याची कणसं, पंधरा-वीस दिवसांनी फळं घेऊन सोगावहून येणारा शंकर आणि वाटेकरी अब्दुल यांनी घोड्यावर बसवून मारलेल्या रपेटी.

मुलं पतंग उडवायची, त्या काळात वावडी उडवलेली आहे. काची दोरा लावून. संथपणे ती विहरत राहायची आकाशात. मदतीला वर्गातले मित्र असायचेच. त्यांनीच सांगितलेल्या दोन खणी वावडीची कथा अद्भुत वाटायची. ती उडवायला मोटेचा नाडा लागायचा आणि आकाशात गेली, की सांभाळायला म्हणे चार माणसं.

मतदानाचा कायदेशीर अधिकार मिळण्याच्या फार वर्ष आधी ती प्रक्रिया पाहायला मिळाली. वडिलांनी एका निवडणुकीच्या (बहुतेक १९७२च्या) वेळी ती समजावून सांगितली होती. शिक्का मारल्यावर मतपत्रिकेची घडी उभीच घालायची. आडवी मारली तर दुसऱ्या नावावर शाई उमटून मत बाद होतं, हेही त्यांनी समजावून सांगितलं होतं. त्यानंतर १७ वर्षांनी पहिल्यांदा मतदान केलं, तेव्हा ते सगळं आठवलं.

पोतराज दिसला, की पोटात गोळा यायचा. त्याचा तो वेश, आसुडाचे त्वेषाने मारलेले फटके आणि अंगावर काटा आणणारं त्याच्या सोबतच्या बाईचं वादन. भीतीपोटी पोतराजाला टाळण्यासाठी लांबची वाट धरत होतो. अशीच भीती पुण्याहून आलेल्या चुलतभावानं घातली होती. स्टेशनवर ज्या टेकडीवरून जायचो, तिथं म्हणे कोल्हा होता.

तो त्याला अर्धा किलोमीटर अंतरावरून दिसला. त्याच्या म्हणण्यानुसार पुण्यात बटनाचा चाकू मिळतो. तो आपण इथून दाबला, की लांब अंतरावरचा कोल्हा गारद! पण त्या हत्याराचं वैगुण्य एकच, की त्या चाकूचं मागचं पातं इथं असलेल्या कोणाच्या तरी पोटात घुसतं. त्यामुळं ती कल्पनाच बाद केली.

असंच कोणी तरी सांगितलं, की वाळूत गोट्या लपवून ठेवल्या की दुसऱ्या दिवशी दुप्पट होतात. मारुतीच्या देवळाजवळच्या वाळूच्या ढिगाऱ्यात त्या लपवून ठेवल्या. नेमक्या कुठं ठेवल्या, हे दुसऱ्या दिवशी आठवलंच नाही. त्या काचेच्या गोट्या कोणाला सापडल्या असतील बरं? त्याला तेव्हा किती अफाट आनंद झाला असेल ना.. इतक्या वर्षांनंतर अगदी थोडीच नावं आठवतात. शेजारचे श्यामरावतात्या. त्यांचं जन्मसाल आजही लक्षात आहे - १९०४.

ते पोळ्याच्या संध्याकाळी आवर्जून हात धरून घरी जेवायला नेत. शेंगा सोलून देत. तसेच लक्षात आहेत गुलाबरावबापू झोळ. ते तेव्हाचे राजकीय नेते. अगदी नव्वदपर्यंत ते करमाळ्याला घरी येत. त्यांच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या पाणी संस्थेवर लेख लिहावा, अशी इच्छा होती त्यांची. राहूनच गेलं ते.

लाकूड फोडून द्यायला दगडूमामा यायचे. रंजला-गंजला जीव होता तो. एकदा करमाळ्याला घरी आले होते. वडील म्हणाले म्हणून माझा आवडता झब्बा त्यांना दिला. केवढं प्रसन्न हसू उमटलं होतं त्या जर्जर चेहऱ्यावर तेव्हा! शेजारच्या हरीभाऊची चोरीला गेलेली बैलाची जोडी सापडली. त्याचा आनंद केवढा! खास करमाळ्याहून बँड लावून रात्री उशिरापर्यंत गॅसबत्त्यांच्या प्रकाशात काढलेली मिरवणूक गावातून मिरवली होती.

आपल्याकडेही अशीच बैलजोडी पाहिजे, असं तेव्हा मनाशी ठरवलेलं. त्यांची नावं हिरा आणि मोती. अप्पा राऊत, बाबू राऊत, त्याची बहीण संजीवनी, दोन्ही पाय नसलेला गौतम... अशी मोजकीच माणसं आठवतात. अप्पाचे वडील केस कापायला घरी येत. रात्री ग्रामपंचायतीच्या दिवाबत्तीचं कामही तेच बघायचे.

पाच दशकांपूर्वीच्या वाशिंब्याच्या आठवणी लख्ख आहेत, असं म्हणणं जरा अतिशयोक्तीचं ठरेल. धूसर धूसर असल्या तरी त्या भासतात लख्ख; कालच, फार तर परवा घडल्यासारख्या. वाशिंबे सोडलं आणि तिथं परत कधीच गेलो नाही. जावं असं खूप वेळा वाटलं. योग आला नाही. अर्ध्या शतकात बरेच बदल झाले असतील. राजुरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या टेकडीवरचं मोठं तळं अजून आहे की बुजवलं, माहीत नाही. गावातला तो दगडी पायऱ्याचा चौक तसाच असेल? पडक्या वेशीबाहेरचं मारुतीचं देऊळ आता वाढलेल्या गावात आलं असेल?

लेखातल्या एका वाशिंबे उल्लेखानं ‘माझ्या गावी’ परत एकदा तरी जाण्याची इच्छा बळावली.

नॉस्टॅल्जिक लिखाणाबाबतचं पूर्वीचं मत अजून कायम आहे का? पूर्वीसारखं त्या लिखाणाचं हसू येईल का? खात्री देता येत नाही. ह्या निमित्ताने एक गोष्ट पुरेपूर कळली - कोणत्या ना कोणत्या निमित्तानं तुम्ही गाव सोडता. परिस्थिती भाग पाडते गाव सोडायला. तुम्ही हात सोडला असला तरी गाव काही तुम्हाला सोडत नाही. तुम्हाला त्यानं घट्ट पकडून ठेवलेलं असतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com