

शांतानं भावाला गंध लावलं. कपाळभर अक्षता टेकवल्या. सुपारीनं, अंगठीनं त्याला औक्षण केलं. त्याला खाली वाकून नमस्कार केला. निरांजनाच्या प्रकाशात तिचा चेहरा उजळला होता. ती आशेनं दादाच्या हाताकडं पाहत होती. एवढ्यात दादानं ओवाळणी घातली. संत्र्याच्या दोन फोडी! ते पाहताच तिनं ओरडून थयथयाट केला. तिची मनसोक्त थट्टा करून आपल्या पिशवीतून त्यानं जरीचं रेशमी, सुंदर मोठ्या बुट्ट्या-बुट्ट्यांचं मोरपंखी कापड तिच्या हातात ठेवलं. आता कुठं तिचं लक्ष तिकडं गेलं होतं. तिच्या चेहऱ्यावर हास्य झळकलं. जणू पावसात उन्ह पडलं.
दुपारची वेळ. सखू नुकतीच भांडी घासून गेली होती. स्वयंपाक करणाऱ्या रमाकाकू आपल्या खोलीत आराम करत होत्या. शांताबाई माजघरातल्या झोपाळ्यावर बसून मंद झोके घेत होत्या. वर्तमानपत्र वाचून झालं होतं. त्यांची सून सरिता आणि मुलगा जय दोघंही कामावर गेले होते. त्यांची लाडकी नात राधा शाळेत गेली होती.
ही दुपारची वेळ त्यांना खायला उठे. झोपही येत नव्हती. घड्याळ तर हळू चाललं आहे. टीव्ही पाहूनही त्यांना कंटाळा आला होता. एखाद-दुसरा कार्यक्रम त्या पाहत होत्या. आताशी लागोपाठ कार्यक्रम पाहिले, की डोकं जड होई. डोळे दुखू लागत.
मग त्या झोपाळ्यावर बसत. मंद मंद झोके घेत. आजही त्या झोके घेत होत्या. झोक्यांबरोबर मनातही आंदोलन सुरू झालं. त्या आता सत्तरीच्या घरात आल्या होत्या. नुकताच त्यांचा सत्तरीचा वाढदिवस त्यांच्या सुनेनं साजरा केला होता. वाढदिवसाला जरीचे रुंद काठ असलेली अंजिरी रंगाची रेशमी साडी त्यांना आणली होती. त्यांचा आवडीचा श्रीखंड-पुरीचा बेत केला होता.
अलीकडं शांताबाईंना आपल्या आईची फार आठवण येत असे. त्यांना भूतकाळात रमावंसं वाटे. त्यांना आपलं बालपण आठवलं. दिवाळीतली भाऊबीज आठवली.
***
छोटी शांता मोठ्या भावाची आतुरतेनं वाट पाहत होती. कारण त्या दिवशी भाऊबीज होती. संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच बाईसाहेबांचा नट्टापट्टा झाला होता. पायात चांदीच्या तोरड्या, गळ्यात आईची सोन्याची एकदाणी, डोक्यात सोन्याचं गुलाबाचं फूल, कमरेला कंबरपट्टा, कानात सोन्याचे झुमके, वेणीला रेशमी गोंडा, हाताच्या बोटांत नाजूक कमळाचं डिझाईन असलेली अंगठी होती. जरीचं लाल रंगाचं रेशमी रंगाचं परकर-पोलकं परिधान केलं होतं. तिचं सावळं रुपडं, भारीच गोड दिसत होतं. आईनं तिच्या गालाला तीट लावली.
""ए, आई केव्हा गं येणार दादा? दादा मला ओवाळणी काय गं घालणार? सांग ना!''
""मला नाही बाई माहीत. देईल काहीतरी!'' आई तिच्या कामात होती; पणत्यांत तेलवाती भरत होती. गॅलरीत, दारापुढं, अंगणात, तुळशीपुढं ठेवून लावणार होती.
""शांता जा. दारापुढं एक छोटीशी रांगोळी काढ,'' आई म्हणाली. शांतानं अंगणात पाच ठिपक्यांचं बिल्वपत्र काढलं. त्यात रंगही भरले. तेवढ्यात दादा आला. अठरा वर्षांचा, भारी रागीट. सदानकदा "अभ्यास कर.. अभ्यास कर' म्हणून मागं लागायचा! ""खेळूच देत नाही. मी मुळी त्याच्याशी बोलणारच नाही... पण आज नको बाई..'' शांतानं आपल्या मनाला बजावलं.
शांतानं रंगीत पाट मांडला. पाटाभोवती फुलांची रांगोळी काढली. दादानं डोक्यात टोपी घातली. पाटावर बसत म्हणाला ः ""हं, ओवाळा आता आम्हाला!''
आईनं ओवाळणीचं तबक तयार ठेवलं होतं. शांतानं त्याला गंध लावलं. कपाळभर अक्षता टेकवल्या. नंतर सुपारीनं, अंगठीनं त्याला औक्षण केलं. त्याला खाली वाकून नमस्कार केला. निरांजनाच्या प्रकाशात तिचा चेहरा उजळला होता. ती आशेनं दादाच्या हाताकडं पाहत होती. "काय बरं असेल?' एवढ्यात दादानं ओवाळणी घातली. संत्र्याच्या दोन फोडी! ते पाहताच तिनं ओरडून थयथयाट केला ः ""दादीटल्या, खापीटल्या! मला नको तुझी ओवाळणी.'' तिची मनसोक्त थट्टा करून आपल्या पिशवीतून त्यानं जरीचं रेशमी, सुंदर मोठ्या बुट्ट्या-बुट्ट्यांचं मोरपंखी कापड तिच्या हातात ठेवलं. आता कुठं तिचं लक्ष तिकडं गेलं होतं. तिच्या चेहऱ्यावर हास्य झळकलं. जणू पावसात उन्ह पडलं.
***
त्यावेळी लक्ष्मी जणू पाणी भरत होती. घरात पाहुणेरावळे येत. आठ-आठ दिवस राहत. आई आणि आजी भरपूर फराळाचं करी. पायलीच्या पायली डबे भरत. स्वस्ताई भरपूर होती. मुलांना व्यवहारज्ञान व्हाने म्हणून शांताचे वडील मुलांना पाच-दहा रुपये देत. आठवडे बाजाराला पाठवत. बाजार आणताना शांता आणि तिचा भाऊ बेजार होत. पुढं एकाएकी पारडं फिरलं. शांताचे वडील अपघातात गेले. पाहुण्यारावळ्यांनी आपले मुक्काम हलवले. सख्खे काका निघून गेले, आजी पण काकांबरोबर निघून गेली. पुढं 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला. दादाला नोकरी मिळाली. छोकरी पण मिळाली. ती एकुलती एक लेक होती. दादा घरजावई झाला. वेगळा स्वतंत्र राहू लागला. त्यानं घरची सर्व जबाबदारी झटकली.
त्याच्या पाठचा अण्णा आईला धीर देई. ""आई, मी मिळेल ती नोकरी करीन; पण तुला आणि शांताला सोडून कुठंही जाणार नाही,'' असं म्हणे. अण्णा पेपर टाकी, दुधाच्या पिशव्या ग्राहकांना नेऊन देई. आई स्वतः एक-दोन ठिकाणी स्वयंपाक करी, वेळेला भांडीही घाशी; मात्र कुटुंब स्वाभिमानानं राहत होतं.
***
शांता तरुण झाली. आता आईला तिच्या लग्नाची काळजी लागली. घरातली चांदीची भांडी, किडुकमिडुक पण विकलं होतं. लक्ष्मीचा हा खेळ शांता लहानपणापासून पाहत आली होती. ज्या आईला कधी कोथिंबीरसुद्धा आणायची माहीत नव्हतं, ती आता लोकांची कामं करतं. जवळ पैसा नाही, कुणाचा आधार नाही. अण्णाला अजून नोकरी मिळाली नव्हती. प्रयत्न चालू होते; पण नुसत्या मॅट्रिक पासला कोण देणार नोकरी? अण्णाला आईच्या कष्टाची जाणीव होती.
अशातच शेजारच्या लताकाकूंनी शांतासाठी स्थळ आणलं. ""मुलगा 38 वर्षाचा आहे. बिजवर आहे. पहिली दोन मुलं- एक मुलगा आणि एक मुलगी आहे. राहायला स्वतःचा मोठा वाडा आहे. मुलाला बॅंकेत मॅनेजरची नोकरी आहे. गावी शेती पण आहे. सध्या मुलांना संभाळण्याकरिता आत्याबाई आल्यात; पण त्यांनाही त्यांचा संसार आहे. मुलगा देखणा, गोरापान उंच आहे. शिवाय लग्नखर्च ते करणार. आता दोघांच्या वयात अंतर आहे म्हणा! बघा बाई, मी सुचवलं आहे. विचार करून दोन दिवसांनी सांगा,'' त्या म्हणाल्या.
लताकाकू गेल्यावर आईनं स्पष्ट नकार दिला ः ""आपण आणखी स्थळं बघू!'' अण्णाचंही तेच मत पडलं; पण एकेक दिवस कसा ढकलतो आहोत, ते शांताला दिसत होतं. फायनलच्या परीक्षेचा फार्म भरायलाही पैसे नव्हते. मुदत संपायला एकच दिवस राहिला, तेव्हा बाईंनी फार्म फी भरली, ते तिला आठवलं. ""ते काही नाही. मला हे स्थळ पसंत आहे,'' शांतानं निक्षून सांगितलं. आईला वाईट वाटलं; पण ती वेळच तशी होती.
शेवटी हो-ना करता शांताचं लग्न ठरलं आणि महिनाभरात झालंही!
***
सासरी जाताना शांतानं काही सामान आवर्जून घेतलं. मुलीसाठी एक सुंदर भारी बाहुली, मुलासाठी बॅटबॉल आणि खाऊचा डबा. घरात पाऊल ठेवताच तिनं मुलांना जवळ घेतलं; पण दोघंही लांबच राहिले. गोंधळल्या नजरेनं तिला बघत राहिले. ""डोळे मिटा बरं! आम्ही तुमच्यासाठी गंमत आणलीय!'' गंमत म्हटल्यावर दोघंही शांताजवळ थोड्या अंतरावर उभे राहून बघू लागले.
""गंमत अशी नाही मिळणार. जवळ या बरं. अन् डोळे मिटा! मी जेव्हा उघडा म्हणेन, तेव्हाच डोळे उघडायचे बरं का?'' आता दोघांनी खरंच डोळे मिटले. ""हं, सुमन बेटा, उघडा डोळे.'' छोट्या सुमननं डोळे उघडले तो काय! तिच्या हातात परीसारखी सुंदर बाहुली. सुमनला खूप आनंद झाला. ती बाहुली घेऊन घरभर नाचू लागली. ""आता रघुनाथला काय बरं द्यावं? ए बेटा, थांब आधी डोळे मिट!'' आठ वर्षांच्या रघुनाथनं डोळे मिटले. ""हं, उघड आता!'' त्यानं डोळे उघडले, तर हातात बॅट-बॉल! दोन्ही मुलं आनंदली.
""आणि आम्हाला काय आणलं? का आम्हाला काहीच नाही?'' बाबासाहेब. ""असं कसं होईल? तुम्हालाही आणलं आहे. देते, थोडं थांबा...'' शांता.
""बाबा, तुम्ही पण डोळे मिटा ना. मगच गंमत मिळेल, '' रघुनाथ. ""बरं बुवा, हे बघा मिटले.'' बाबासाहेबांनी खरंच डोळे मिटले. ""हं उघडा!'' त्यांच्या हातात दोन टपोरे लाल रंगाचे सुंदर गुलाब बघून ते पण खूश झाले.
आता आत्याबाईंचा नंबर. आत्याच्या हातावर रेशमी जरीची साडी, त्याच रंगाचा जरीच्या काठाचा ब्लाऊजपीस शांतानं ठेवला. तिनं त्यांना खाली वाकून नमस्कार केला. ""सुखी राहा, सदा सौभाग्यवती भव,'' आत्यांनी तोंडभर आशीर्वाद दिला.
""आता मला काळजी नाही. ही पोरगी तुझा संसार चांगला करील. पोरांनाही नीट संभाळेल,'' शांता साडी बदलायला गेली, तेव्हा आत्यानं आपलं मनोगत बाबासाहेबांना सांगितलं, तेव्हा बाबासाहेबांनी मंद स्मित केलं. शांतानं मुलांना जवळ बोलावून मूठमूठ सुकामेवा दिला. आता आत्याबाईंना घरी जाण्याचे वेध लागले. त्यांचा घरी जाण्याचा दिवस ठरला. शांतानं बरोबर देण्यासाठी साजूक तुपातले रव्याचे लाडू आणि पातळ पोह्यांचा खमंग चिवडा केला. एका सुंदर पिशवीत फराळाचं बांधून दिलं. थोड्या दशम्या आणि लिंबाचं लोणचं दिलं. आत्याबाई निघाल्या. जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या बोटातली लाल खड्याची सोन्याची अंगठी शांता "नको नको' म्हणत असताना तिच्या बोटात घातली. रघुनाथ आणि सुमनचं शांताशिवाय पानही हलत नव्हतं. शांताचा सुखी संसार पाहून शांताची आई तृप्त झाली. शांतानं रघुनाथ आणि सुमनला आपलीच मुलं समजून प्रेमानं त्यांचा संभाळ केला. मुलाला चांगली नोकरी लागली. सुमन मॅट्रिक झाल्यावर मोठ्या थाटानं तिचं लग्न करून दिलं. तिला सासरची माणसं चांगली मिळाली.
सर्व काही ठीकठाक चाललं असताना एक दिवस बाबासाहेबांना छातीत ऍटक आला. रघुनाथ कामावर गेलेला. शांतानं रघुनाथला फोन केला. आपले फॅमिली डॉक्टर डॉ. पुरोहित यांना फोन केला. तेही तातडीनं आले. रघूही आला. बाबासाहेबांना ऍब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेलं; पण वाटेतच त्यांची प्राणज्योत निमाली होती. शांतावर जणू पहाडच कोसळला. दिवस- रात्री सरता सरेनात; पण शेवटी सर्व दुःखावर काळ पडदा टाकतो. जगरहाटी चालूच असते. पुढं दोन वर्षांनी रघुनाथचं लग्न झालं. शांताला सुंदर, सुशील सून मिळाली. शांताची आई शांताकडं पाहून हळहळे. शांता आईची समजूत घाली. "अगं आई, ती वेळच तशी होती. आता माझं सर्व चांगलं आहे. यांनी माझी आर्थिक बाजू भक्कम केलीय. वाडा माझ्या नावावर केला. बॅंकेत माझ्या खात्यात भरपूर पैसा ठेवलाय. शिवाय माझी खरी इस्टेट माझा मुलगा- सून अन् माझी लाडकी नात- राधा. देवानं मला न मागताच सर्व काही दिलं. मी सुखी आहे.''
... शांताबाईंच्या मनात विचारांचा हिंदोळा चालूच होता. आठवणींच्या धुक्यात त्या जणू हरवून गेल्या होत्या. एवढ्यात दारावरची बेल वाजली. राधा - त्यांची नात शाळेतून आली होती. ""ए, आजी, मला खूप भूक लागलीय. काहीतरी खायला दे ना.'' मंद हलणारा झोपाळा थांबला अन् शांताबाई सत्यसृष्टीत आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.