‘विक्रांत’ गाजवणारे कृष्णन...

'ॲडमिरल कृष्णन, पीव्हीएसएम, डीएसओ हे इंग्रजी शौर्यपदक पटकावणारे तामिळी अय्यर. आव्हाने स्वीकारणारा दर्यासारंग.
Nilkantha Krishnan
Nilkantha KrishnanSakal
Updated on

एकेकाळचे स्वातंत्र्यपूर्व काळातील दोन मित्र. फाळणीनंतर एकमेकांसमोर १९७१ युद्धात उभे राहिले, लढले. ‘एक हरला, तर एक जिंकला.'' ॲडमिरल नीलकंठ कृष्णन, तर पाकिस्तानचे ॲडमिरल सईद अहसान मोहम्मद. कृष्णन यांचा जन्मदिन ८ जूनचा. त्यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या शौर्याचं स्मरण

१९७१ चे युद्ध हे भारत-पाक युद्ध म्हणण्यापेक्षा ‘बांगलादेश मुक्ती संग्राम’ होता. या युद्धानं इतिहास घडवला. १४ दिवसांत ९३ हजार सशस्त्र सैनिकांना शस्त्रे खाली ठेवण्यास भाग पाडून पूर्व पाकिस्तानची लष्करी जोखडातून मुक्तता करत आम्ही, भारतीय सैन्याने ‘बांगलादेश’ हा नवा देश जगाच्या नकाशावर कोरला. हे युद्ध म्हणजे भारतीय नौसेनेला मिळालेली सुवर्णसंधी होती, पर्वणी होती ‘हम भी कुछ कम नही’ हे सिद्ध करण्याची. यापूर्वीच्या युद्धात भारतीय नौदल फक्त ‘गस्त'' घालण्यासाठीच वापरली गेली. ही संधी नौदलानं आव्हान समजून स्वीकारली. हे युद्ध खरे तर आठ दिवसांतच संपले. ११ डिसेंबरला मेजर जनरल गंधर्वसिंग ढाक्‍याच्या वेशीवर उभे राहून लेफ्टनंट जनरल अब्दुल अमीर नियाजीला खडसावत होते, ‘शरणागती पत्करतोस का हकनाक मरतोस?’ शरणागतीची संपूर्ण प्रक्रिया होण्यास १९७१ मधला १६ डिसेंबर हा ‘विजय दिन’ उजाडला. संध्याकाळी ॲडमिरल नीलकंठ कृष्णन ‘विक्रांत’ युद्धनौकेवर पोचले. ‘ही पाहा पाकिस्तानी ॲडमिरल मोहम्मद शरीफ यांची मी हिसकावलेली पिस्तोल.’ ती आम्ही पाहताच सर्वजण उत्स्फूर्तपणे गरजलो, ‘भारत माता की जय...’

'ॲडमिरल कृष्णन, पीव्हीएसएम, डीएसओ हे इंग्रजी शौर्यपदक पटकावणारे तामिळी अय्यर. आव्हाने स्वीकारणारा दर्यासारंग. डफरीनवरची परीक्षा पहिल्या नंबरने पास झाल्याने त्यांना रॉयल इंडियन नेव्हीमध्ये निवडण्यात येऊन दुसऱ्या महायुद्धातल्या पराक्रमाबद्दल त्यांना "डिस्टिंग्विश सर्व्हिस क्रॉस'' (DSO) मिळाला होता. १९७१ च्या युद्धात त्यांच्यावर नौसेना पूर्व विभाग ध्वजाधिकारी (FOC-in-c East) ही महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. या युद्धात त्यांनी विक्रांत या महाकाय विमानवाहू युद्धनौकेचा इतका प्रत्ययकारी उपयोग करून घेतला. त्यामुळे पूर्व पाकचे कंबरडेच मोडले.

१९६१ मध्ये विक्रांत भारतीय नौसेनेमध्ये सामील झाली. ती विकत घेण्याचे ठरले तेव्हा ‘हा पांढरा हत्ती भारत पोसू शकेल का?’ आदी शंका काढण्यात आल्या होत्या. परंतु १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात विक्रांतवरील आकाशयोद्‌ध्यांनी इतका पराक्रम गाजवला, की हेच विरोधक म्हणाले, "One more air craft carrier` आणि नौदलात "विराट'' सामील झाली. व्हाईट टायगर, कोब्रा, हारपून व अलीझे यांनी या युद्धात दिवसात ५०-५० उड्डाणे करून तीन दिवसांत पाकिस्तानी वायूदलाचे कंबरडे मोडले, तर पाकिस्तानी भूदलाला भुईसपाट करून टाकले. विक्रांत हा पराक्रमाचा मापदंड ठरला. ॲडमिरल नीलकंठ कृष्णन व त्यांच्या चमूने एक इतिहास रचला. आशिया खंडात अवतरलेल्या या युद्धनौकेचे अप्रूप होते.

तत्कालीन कॅप्टन असलेले नीलकंठ कृष्णन हे विक्रांतचे मुख्याधिकारी होते. १९६२ च्या मे महिन्यात सिंगापूरला युद्धसराव कॉमनवेल्थ अभ्यास (War Exercise) करून आली होती. कोचीनमध्ये नांगर टाकून शांतपणे उभी होती. दिवस रविवार, वेळ पहाटेचे पाच. कॅप्टन कृष्णन पूजाअर्चा, गीतापठण यात व्यग्र होते. इतक्‍यात विक्रांतचा ड्युटी ऑफिसर व सिग्नल ऑफिसर कॅप्टन केबिनसमोर ओरडले - सर, एसओएस. कृष्णनसाहेब क्षणाचाही विलंब न लावताच बाहेर आले. सिग्नल ऑफिसर सॅल्यूट ठोकत म्हणाला, "सर, रडारवर अनोळखी युद्धनौका दिसत असून इकोही तसाच वाटतो.'' कॅप्टन कृष्णन सोवळे नेसलेल्या अवस्थेत ब्रिजवर स्थानापन्न होऊन आदेश देऊ लागले, ‘‘इंजिन सुरू करा. सर्व गन ऑपरेट करा. युद्धसज्जतेची ‌घोषणा करा.’’

ट्यालीओ, तुझे अलीझे उड्डाणास तयार ठेव. ट्यालीओ म्हणजे कमांडर आर. एच. तहिलीयांनी अलीझे स्क्वाड्रनचे प्रमुख. ते नंतर ॲडमिरल होऊन १ डिसेंबर १९८४ ते ३० नोव्हेंबर १९८७ पर्यंत नौसेना प्रमुख होते. लढाऊ विमान उडवणारा विक्रांतवरचा आकाशयोद्धा. आपली एअरक्राफ्ट हॅंगरमधून बाहेर काढून पुढील आदेशाची वाट पाहत उभे राहिले. विक्रांत तयार होत असताना अनुभवी कॅप्टन कृष्णन यांनी ओळखले ती युद्धनौका म्हणजे पाकिस्तानची ध्वजनौका क्रूझर पी.एन.एस. बाबर असून तिला संदेश पाठवला, ‘‘सईद मागे फिर. खबरदार पुढे आलास तर जलसमाधी. हकनाक, बेमौत मारला जाशील.''

बाबरचा कमांडिंग ऑफिसर कॅप्टन सईद अहसान याने संदेश दिला, "डिअर ट्यूबी क्रिश, रिलॅक्‍स. माझ्या जहाजावर आमचे राष्ट्राध्यक्ष फिल्ड मार्शल अयूबखान असून, त्यांना विक्रांतचे दर्शन घ्यायचे आहे. विक्रांतला मुबारक व तुला फत्ते चिंतीतो. तुझा बॅचमेट सईद.'' अहसान मोहम्मद, सी.ओ.पी.एन.एस. बाबर हे दोघेही त्या वेळी कॅप्टन होते आणि स्वातंत्र्यपूर्व काळात स्नेही होते. दोघेही नंतर ऍडमिरल पदापर्यंत पोचले. विक्रांतच्या बाजूने सुरक्षित अंतर राखून बाबर ही पाकिस्तानी युद्धनौका नाविक परंपरेनुसार मानवंदना देत - स्वीकारत दिसेनाशी झाली. ॲन्टी एअर गन्स विसावल्या. विक्रांतच्या कंपनीने सुटकेचा श्‍वास सोडला. कॅप्टन नीलकंठ कृष्णन हसत-हसत आपल्या केबिनकडे परतले. १९६५ च्या युद्धात पाकिस्तानने खोटा दावा केला होता, ‘‘आम्ही विक्रांत बुडवली.’’ हे खोटे होते. कारण विक्रांत तेव्हा डॉकमध्ये डागडुजीसाठी उभी होती. १९७१ मध्ये ॲडमिरल नीलकंठ कृष्णन भारतीय नौसेनेचे नेतृत्व करत होते, तर ऍडमिरल सईद अहसान मोहम्मद पूर्व पाकमध्ये धुरा सांभाळत होते. ॲडमिरल कृष्णन यांनीऍडमिरल सईद यांना युद्धोत्तर सिग्नल पाठवला, "डिअर अहसू, ही तीच १९६३ मधील जांबाज विक्रांत जिने तुम्हाला डुबवले.''

खरे तर लांब पल्ल्याची अण्वस्त्रे व नभांगणात अत्याधुनिक अवतरणारी विमाने यामुळे विमानवाहू युद्धनौका टिपण्यास फार सोपे. इझी टार्गेट. पण ॲडमिरल कृष्णन यांचे कुशल नेतृत्व आणि विक्रांतवरील निपुण, तरबेज लढवय्ये मंडळींनी हे आव्हान परतवून लावले ही विक्रांतची यशोगाथा आहे. पाकिस्तानी पाणबुडी विक्रांतचा माग घेत आली; पण तिलाच या युद्धाच्या सुरुवातीलाच शोधून आमच्या कमोर्टा व राजपूत या युद्धनौकांनी जलसमाधी दिली. पाकिस्तानपेक्षा अमेरिकेला हा धक्का होता. कारण ‘गाझी’ ही अत्याधुनिक पाणबुडी अमेरिकेने पाकिस्तानला दिली होती. विस्तार व गरज याचा विचार केला तर आपल्या संरक्षण अंदाजपत्रापेक्षा चीन व पाकिस्तानचे अंदाजपत्रक तिप्पट-चौपट असते. आजमितीला चीनकडे ८० पाणबुड्या आहेत. नुकतेच त्यांच्या नौदलात विमानवाहू युद्धनौका दाखल झाली आहे. ‘ग्वादर’ हे बंदर पाकिस्ताननं चीनला ५० वर्षांच्या भाडेपट्टीवर दिले असून, चीनव्याप्त तिबेटमधून चीन रेल्वेमार्ग बांधत असून, तो पाकव्याप्त काश्‍मीरमधून पुढे जात आहे. चीनची न्युक्‍लिअर अणुभट्टी कार्यरत झाली आहे. इथून पुढील युद्ध हे अंडरवॉटर व नभांगणात लढले जाईल. १९७१ च्या युद्धात पाकने हेच केले. पाकने हॅंगर, शुशुक व मॅंग्रो या फ्रान्सने बनवलेल्या पाणबुड्यांचा वापर केला व पश्‍चिम पाकिस्तानच्या संरक्षणावर भर दिला. तरीही आपल्या मिसाईल बोटींनी कराचीवर यशस्वी हल्ला केला आणि पाकिस्तानी विनाशिका खैबर व शहाजहान यांना जलसमाधी दिली.

विक्रांतचा यथोचित वापर करत ॲडमिरल नीलकंठ कृष्णन या शूरवीराने जोखीम पत्करून जो पराक्रम गाजवला त्याला जोड नाही, तोड नाही. १९१९ मध्ये ८ जूनला जन्मलेल्या या जिगरबाज अधिकाऱ्याने १९८२ मध्ये ३० जानेवारीला हैदराबाद मुक्कामी शेवटचा श्‍वास घेतला. १९७१ च्या युद्धात विक्रांतचा एक बॉयलर, एक इंजिन नादुरुस्त असताना ॲडमिरल कृष्णन यांच्या बेदरकार नेतृत्वाला विक्रांतच्या शिप्स कंपनीने युद्ध लढवलेले, विक्रांतही पराक्रम करण्यास आतूर होते. युद्धाच्या इतिहासातला हा कळीचा मुद्दा होता. विशेषतः विक्रांतला जलसमाधी देण्यासाठी आतूर असलेल्या पाकिस्तान नेव्हल शिप गाझी या पाणबुडीला भारतीय नौदलानं सागराच्या रसातळात गाडले. हा पन्नास वर्षांपूर्वीचा भारतीय नौसेनेचा देदीप्यमान इतिहास आहे. बा विक्रांता, तुझ्या फ्लाय डेकवर नेव्ही बॅंडने घुमवलेले "सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्ता हमारा'' हे स्वर आजही कानात घुमत आहेत. ॲडमिरल कृष्णन व विक्रांत यांची नोंद घेतल्याशिवाय नौसेना इतिहास पुढे जाऊच शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com