एशियाटिकला हवी ‘राष्ट्रीय दर्जा’ची संजीवनी

एशियाटिक सोसायटी हे मुंबईचे, महाराष्ट्राचे वैभव आहे. ब्रिटिशांनी बांधलेली ही इमारत आजही तेवढीच देखणी आहे.
Asiatic Society
Asiatic SocietySakal
Summary

एशियाटिक सोसायटी हे मुंबईचे, महाराष्ट्राचे वैभव आहे. ब्रिटिशांनी बांधलेली ही इमारत आजही तेवढीच देखणी आहे.

एशियाटिक सोसायटी हे मुंबईचे, महाराष्ट्राचे वैभव आहे. ब्रिटिशांनी बांधलेली ही इमारत आजही तेवढीच देखणी आहे. लायब्ररीत साडेतीन लाखांपेक्षा अधिक पुस्तकांचा अमूल्य खजिना आहे. २०० वर्षांपूर्वीची पुस्तके, त्यातही १५ हजार दुर्मिळ पुस्तके आहेत. पर्शियन, पाली, संस्कृत, ग्रीक, लॅटिन, इटालियन, जर्मन आणि फ्रेंच या युरोपीयन भाषांमधील प्राचीन, दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह आहे. मात्र या संस्थेचा आर्थिक डोलारा केव्हाही कोसळू शकतो, अशी परिस्थिती आहे. अर्थसंकटातून बाहेर पडण्यासाठी ‘राष्ट्रीय दर्जा’ ही संजीवनी ठरेल.

बॉम्बे प्रांताच्या सर जॉन मॅकिनतोश या कायदेतज्ज्ञ, न्यायमूर्तींनी १८०४ मध्ये ‘एशियाटिक सोसायटी’ची स्थापना केली. त्या वेळी सोसायटीचे नाव ‘लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे’ असे होते. त्यानंतर डॉ. स्टिवर्ट, जस्टीस तेलंग, जस्टीस एन. जी. चंदावरकर, जस्टीस माडगावकर, जस्टीस छागला, जस्टीस गजेंद्रगडकर, वाय. यू. चंद्रचूड, डी. कुंटे यांसारख्या बुद्धिवादी लोकांनी एशियाटिक सोसायटीचे अध्यक्षपद भूषवले. १८३० मध्ये ही संस्था आजच्या ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये स्थलांतरित झाली. १८४० पर्यंत एशियाटिक सोसायटीची दारे केवळ ब्रिटिशांसाठी खुली होती. त्यानंतर भारतीयांसाठी एशियाटिकची दारे खुली झाली. याला आज १८२ वर्षे उलटून गेली आहेत; मात्र आजही एशियाटिक सोसायटी खऱ्या अर्थाने लोकाभिमुख झाली नसल्याचे चित्र आहे. ब्रिटिशांनी बांधलेली ही इमारत आजही तेवढीच देखणी आणि मजबूत आहे; मात्र इमारतीमधील व्यवस्थापन आणि अमूल्य ग्रंथभांडार शेवटचे आचके देत आहे. आजच्या घडीला संस्थेकडे केवळ तीन हजार सक्रिय सभासद आहेत. संस्थेचा आर्थिक डोलारा केव्हाही कोसळू शकतो, अशी परिस्थिती आहे.

एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत साडेतीन लाखांपेक्षा अधिक पुस्तकांचा अमूल्य खजिना दडला आहे. २०० वर्षापूर्वीची पुस्तके, त्यातील १५ हजार दुर्मिळ पुस्तके आहेत. पर्शियन, पाली, संस्कृत, ग्रीक, लॅटिन, इटालियन, जर्मन आणि फ्रेंच या युरोपीयन भाषांमधील प्राचीन, दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह आहे. बायोग्राफी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, व्यवस्थापन, पर्यटन आणि फिक्शन यावरील पुस्तकांचा समावेश आहे. अनेक जगप्रसिद्ध पुस्तकांची पहिली आवृत्ती इथे ठेवली आहे. याशिवाय गुप्तकालीन, मुघलकालीन सोन्याच्या नाण्यांबरोबर १२ हजार विविध दुर्मिळ नाण्यांचा संग्रह इथे आहे. जवळपास १३०० प्राचीन नकाशे, ३००० दुर्मिळ हस्तलिखिते, संस्कृत, पाली आणि पर्शियन भाषेत ताडपत्रावरील लिखाण इथे आहे. २०० वर्षांपेक्षा जुनी नियतकालिके, वर्तमानपत्रे इथे आहेत. प्रसिद्ध पुरातन शास्त्रज्ञ भगवान इंद्राजी यांनी नालासोपारा इथे केलेल्या उत्खननात स्तुपाचे अवशेष मिळाले होते. त्यातून बुद्धकालीन वस्तू मिळाल्या. त्यामध्ये बुद्धाने वापरलेल्या वस्तूंचा समावेश आहे. त्याकाळी अनेक लोकांनी त्यांचा खासगी संग्रह सोसायटीला दान केला होता.

पुस्तके दान

एशियाटिक सोसायटीला समाजातील विविध थरातील उद्योगपती, प्रतिष्ठित व्यक्तींकडून पुस्तकांचा खजिना दानस्वरुपात मिळाला आहे. अनेकांनी आपला खासगी ग्रथसंग्रह एशियाटिकला दिला. कित्येक दशकापासून सुरू असलेल्या या पंरपरेतून एशियाटिकचे ग्रंथालय उत्तरोत्तर समृद्ध होत गेले. याशिवाय बॉम्बे सरकारनेही त्यांच्याकडील ऐतिहासिक हस्तलिखिते एशियाटिकला दिली. ए.एम.टी. जॅक्सन, जगन्नाथ शंकरशेठ, कोवासजी जहागीर, भाऊ दाजी लाड, भगवानलाल इंद्राजी, दोराबजी टाटा, कृष्णा राज पंडित, प्रेमचंद रायचंद यांसारख्या प्रतिष्ठित उद्योगपतींसह अनेक प्रशासक, स्कॉलर्सनी आपल्या खासगी पुस्तकांचा संग्रह एशियाटिकच्या हवाली केला. अलिकडे ज्येष्ठ समाजवादी नेते मधू लिमये, जस्टिस लेंटिन आणि व्ही. एम. कुलकर्णी यांनी त्यांची ग्रथसंपदा एशियाटिकला दिली.

केंद्राने एशियाटिकला दत्तक घ्यायला पाहिजे, ही मागणी खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत अनेकदा लावून धरला. पाठपुरावा केला. एशियाटिक सोसायटीच्या इमारतीची दुरुस्ती करायला पाहिजे. एशियाटिकमध्ये पुस्तकांचा, इतर ऐतिहासिक वस्तूंचा खजिना आहे. कोलकाता एशियाटिकला राष्ट्रीय दर्जा मिळतो; मात्र मुंबई एशियाटिकला का नाही, असा सवाल अरविंद सांवत यांचा आहे.

एशियाटिक सोसायटीचे मुख्य काम समजून घ्यायचे असेल, तर तुम्हाला तळमजल्याला भेट द्यावी लागेल. या तळमजल्यावर पुस्तकांचा खजिना जतन करून ठेवला आहे. पुस्तकांना धूळ लागू नये, सुरक्षित राहावीत, यासाठी स्टिलचे मोबाईल रॅक आहेत. केवळ ३३ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे. साडेतीन लाख पुस्तकांची देखभाल करणे, एवढे सोप काम नाही. अनेक पुस्तके हाताळताना फाटतात, दुर्मिळ पुस्तके खराब होतात. या फाटलेल्या, तुकडे झालेल्या, काळवंडलेल्या पुस्तकांवर प्रक्रिया करण्यासाठी एशियाटिकची स्वतःची प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत जुन्या पुस्तकांची पाने वेगवेगळी करून, त्यावर रासायनिक प्रक्रिया करून स्वच्छ धुतली जातात. त्यानंतर त्यांच्यावर दुसरा पातळ कागदाचा मुलामा चढवून, ती पुस्तके वाळवली जातात आणि त्यानंतर बाईंडिंग केली जातात. दिवसभरात अनेक पुस्तकांवर ही प्रक्रिया चालते.

डिजिटायजेशन

सर्व जग आता इंटरनेटवर आले आहे. त्यामुळे सर्व जण माहितीसाठी, कुठल्याही रेफरन्ससाठी इंटरनेटवर जाणे पसंत करतात. त्यामुळे एशियाटिकने पुस्तकांची डिजिटाजेशन मोहीम जोरात सुरू केली आहे. ग्रंथ संजीवनी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ४० हजार पुस्तकांचे डिजिटाजेशन करण्यात आले आहे. यासाठी निधी उभा करण्यासाठी एशियाटिकने मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना आवाहन केले. या कंपन्यांनी प्रतिसाद देत डिजिटायजेशनसाठी आपल्या सीएसआर निधी दिला. यामुळे दुर्मिळ आणि ऐतिहासिक पुस्तकांचे फिल्मिंग होते. त्यातून ही माहिती वाचकांपर्यंत एका क्लिकवर उपलब्ध होते. त्यासाठी ३ हजार रुपये वार्षिक शुल्क भरावे लागते. मात्र ग्रंथ संजीवनीची सदस्यसंख्या केवळ संशोधक आणि विद्यार्थ्यांपुरती मर्यादित आहे; मात्र भविष्यात सभासद संख्या वाढेल, असा विश्वस्त समितीचा आशावाद आहे.

पुस्तक दत्तक योजना

एशियाटिकमधील ऐतिहासिक मूल्य असलेली पुस्तके जपण्यासाठी वाचकांनी, दात्यांनी पुढे यावे, यासाठी सोसायटीने ‘पुस्तक दत्तक योजना’ हाती घेतली. या अंतर्गत तुमचे आवडते पुस्तक दत्तक घेण्यासाठी १० हजार रुपये मोजल्यास या पुस्तकावर दात्याचे नाव लिहिले जाते. मात्र, या योजनेसाठी फारसे लोक पुढे येत नसल्याची खंत इथल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

आर्थिक डोलारा कोसळला

केवळ ३३ पूर्णवेळ कर्मचाऱ्यांच्या जीवावर एशियाटिकचा गाडा कित्येक वर्षांपासून ढकलला जात आहे. सोसायटीला केंद्र सरकारकडून वार्षिक एक कोटी रुपयांचे अनुदान येते. राज्य सरकारकडून काही मदत होते. शिवाय सोसायटीच्या ठेवीतून व्याज मिळते. कोविडनंतर इथले काम जवळपास ठप्प झाले होते. कर्मचाऱ्यांना कोविड काळात केवळ ६५ टक्के पगार मिळाला.

दोन एशियाटिकची कथा

कोलकाता एशियाटिक सोसायटी ही मुंबईपेक्षा जुनी आहे. या सोसायटीला राष्ट्रीय दर्जा मिळाल्यामुळे वर्षाला ५३ कोटींचे अनुदान मिळते. त्यामध्ये सोसायटीचे उपक्रम वर्षभर सुरू असतात. आर्थिक अडचण न आल्यामुळे प्रकाशन संस्था, पुरस्कार, म्युझियमच्या आदींमार्फत कोलकाता एशियाटिक लोकांपर्यंत पोहोचली आहे; मात्र मुंबई एशियाटिक सोसायटीला अजूनपर्यंत राष्ट्रीय दर्जा मिळाला नाही. यासाठी विषेश प्रयत्न होताना दिसत नाहीत.

जागेची कमतरता

एशियाटिक सोसायटीसाठी कलिना इथे तीन एकर जागा मिळाली आहे. मात्र या जागेवर काहीच झाले नाही. टाऊन हॉलसह संपूर्ण इमारत जर एशियाटिकच्या ताब्यात मिळाली, तर वस्तुसंग्रहालय उभारता येईल. त्यातून उत्पन्न येऊ शकते. तरुणाई एशियाटिकशी जोडली जाईल. सध्या जागेअभावी नवीन पुस्तकेसुद्धा ठेवायला जागा कमी पडते.

एशियाटिक लोकाभिमुख व्हावी

एशियाटिक सोसायटीकडे असलेले वैभव केवळ सभासद, संशोधक, पीएच.डी. करणाऱ्यांसाठी मर्यादित ठेवले गेले, हे खरे आहे. १२ हजार दुर्मिळ नाण्यांचा संग्रह कधी सामान्यांसाठी खुला का करण्यात आला नाही, हा प्रश्न आहे. एशियाटिकचा दरबार हॉल हे सुंदर सभागृह आहे. त्याची दुरुस्ती केल्यास इथे साहित्यिक, शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रांतील १०० लोकांची परिषद नियमित स्वरूपात होऊ शकते. एशियाटिकमध्ये बुद्धकालीन प्राचीन वस्तू आहेत. या सर्व वस्तू लॉकरमध्ये सुरक्षित ठेवल्या गेल्या आहेत; मात्र सर्वसामान्यांसाठी हे लॉकर उघडेल का? पुस्तकात वाचायला मिळालेले प्रत्यक्षात बघायला मिळेल का, हा प्रश्न आहे. अमूल्य हस्तलिखित इथे उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना पाहण्याची संधी मिळाली, तरी त्यांना खूप काही शिकायला मिळेल; मात्र प्रत्यक्षात असं होत नाही.

vinod.raut@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com