प्रेरणादायी जीवनकथा

देशाचा स्वातंत्र्यलढा आणि सुधारणावादी चळवळीत असंख्य मुस्लिम महिला-पुरुषांचे योगदान आहे. हे चेहरे मुस्लिमांसाठीच नव्हे, तर देशांसाठीही आयकॉन आहेत.
Book
BookSakal
Summary

देशाचा स्वातंत्र्यलढा आणि सुधारणावादी चळवळीत असंख्य मुस्लिम महिला-पुरुषांचे योगदान आहे. हे चेहरे मुस्लिमांसाठीच नव्हे, तर देशांसाठीही आयकॉन आहेत.

देशाचा स्वातंत्र्यलढा आणि सुधारणावादी चळवळीत असंख्य मुस्लिम महिला-पुरुषांचे योगदान आहे. हे चेहरे मुस्लिमांसाठीच नव्हे, तर देशांसाठीही आयकॉन आहेत. ‘द क्विन, द कोर्टिसन, द डॉक्टर, द रायटर’ या सबाह खान यांनी लिहिलेल्या पुस्तकात अशाच ५० भारतीय मुस्लिमांच्या प्रेरणादायी जीवनकथा आहेत. ‘परचम’ या मुंबईतील संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सामाजिक कार्यकर्ते जावेद अहमद यांची प्रस्तावना आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांच्या हस्ते नुकतेच या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

अलिगढ विश्वविद्यालयाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांना आधुनिक शिक्षणाचे जनक मानले जाते; मात्र फार कमी लोकांना हे माहिती असेल की, त्यांच्या संस्थेचे दरवाजे मुस्लिम महिलांसाठी बंद होते. महिला शिक्षणाला त्यांचा कडवा विरोध होता. त्या वेळी लाहोरमधील सय्यद मुमताज अली खान यांनी अहमद यांच्या मुस्लिम महिला शिक्षणाविरुद्धच्या धोरणाला कडाडून विरोध केला. मुलींना शिक्षण देणे हे मुस्लिमांचे धार्मिक कर्तव्य असल्याचे त्यांनी त्या काळात ठासून सांगितले. त्यांनी मुस्लिम मुलींसाठी एक शाळा उघडली. एक वर्तमानपत्र सुरू केले, त्यातले सर्व कर्मचारी, पत्रकार आणि संपादक, प्रकाशक महिला होत्या.

१९३० मध्ये पांरपरिक मुस्लिम कुटुंबातील हजरा बीबी उच्च शिक्षणासाठी लंडनला गेल्या. मायदेशात परतल्यानंतर त्यांनी नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन या संघटनेचा पाया रचला. १९९० मध्ये रोकेया बेगम यांनी बुरखा झुगारून दिला आणि बंगालमध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. कानपूर इथे कोठा चालवणाऱ्या अजिजून निसा यांनी १८५७ च्या उठावात भाग घेतला. रणांगणात त्या ब्रिटिशांविरुद्ध लढल्या आणि फासावर चढल्या. अत्यंत धार्मिक, रुढीवादी मुस्लिम कुटुंबात जन्म झालेल्या अनिस किडवई यांनी बुरख्यातून बाहेर पडत फाळणीमुळे स्थलांतरित, आई-वडील गमावलेल्या हजारो मुली-मुलांना आसरा देण्याचे काम केले. राजघराण्यातील बेगम कुडसिया ऐयाज रसूल यांनी १९३७ मध्ये बुरखा झुगारून तत्कालीन उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवली.

बुरखा झुगारणाऱ्या मुस्लिम महिलांना मतदान करणे इस्लामविरोधी आहे, असा फतवा मौलवींनी काढला; मात्र तरीही बेगम भरघोस मतांनी निवडून आल्या होत्या. त्या वेळचा मुस्लिम समाजही तेवढाच प्रगल्भ होता. केरळमध्ये मुस्लिम महिलांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी लढणाऱ्या, त्यासाठी पहिले वर्तमानपत्र, मासिक सुरू करणाऱ्या हलीमा बीवी, दिल्लीच्या पहिल्या मुस्लिम शासक रजीया सुलतान, मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी शाळांचे जाळे उभारणाऱ्या आणि भोपाळला आधुनिक चेहरामोहरा मिळवून देणाऱ्या भोपाळच्या बेगम, भारत कधीच अत्यावश्यक औषधासांठी इतर देशांवर अवलंबून राहणार नाही, या राष्ट्रवादी प्रेरणेने १९३५ मध्ये ‘सिप्ला’ या औषध निर्माण कंपनीची स्थापना करणारे डॉ. ख्वाजा अब्दुल हमीद, सिप्लाने देशाला मलेरिया, टीबी, मधुमेह, श्वसनाच्या विकाराविरुद्ध लढा देण्यात मोलाची भूमिका बजावली. तुरुगांत वर्षानुवर्षे सडत असलेल्या तरुणांचे विनामूल्य खटले लढवणारा मुंबईतील तरुण वकील शाहिद आझमी, त्यांनी सात वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये १७ लोकांना न्याय मिळवून दिला. अशा असंख्य महिला, पुरुषांचा जीवनपट ‘द क्विन, द कोर्टिसन, द डॉक्टर, द रायटर’ या पुस्तकातून उलगडला गेला आहे.

जोतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी महिला, दलित मुलींसाठी शाळा सुरू केली. या कामामुळे फुले दाम्पत्याला समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते. १८०० मध्ये त्यांना आसरा दिला त्या फातिमा शेख आणि त्यांचा उद्योजक भाऊ उस्मान शेख यांनी. फातिमा शेख यांनी त्यांच्या घराच्या आवारात शाळा सुरू केली. घरोघरी जाऊन त्या मुस्लिम मुलींना शाळेत पाठवण्यासाठी विनंती करायच्या. आज अनेकांना मुस्लिम महिला शिक्षणाला विरोध करणाऱ्या सर सय्यद अहमद खान यांना ओळखतात; मात्र फातिमा शेख यांची ओळख अजूनही पटलेली नाही. हे पुस्तक वाचल्यानंतर हमीद आणि मेहरुन्नीसा दलवाई यांनी उभारलेल्या चळवळीचे महत्त्व लक्षात येते. ट्रिपल तलाक पद्धती आज कायदेशीर बंद झाली; मात्र १९६६ मध्ये या पद्धतीला विरोध करण्यासाठी मेहरुन्नीसा यांनी केवळ सहा महिलांसह मंत्रालयावर मोर्चा काढला होता. भारताची पहिली अंकर सई बानो असो की १८८४ ला जन्मलेल्या १९१९ मध्ये हैदराबादला महिला शिक्षणासाठी ‘मदरसा ऐ सैफदारीया’ या गर्ल स्कूलचा पाया रचणाऱ्या बेगम सुग्रा हुमाय मिर्झा यांच्या धाडसाची कहाणी या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपुढे येते.

या पुस्तकातील व्यक्तिरेखांचे चित्र नीलिमा आर्यन यांनी रेखाटले आहे. १३३ पानांचे हे पुस्तक असून, मोजक्या शब्दात ५० जणांच्या जीवनकार्याला उजाळा दिला गेला आहे. यात सलीम अली, डॉ. झाकीर हुसेन, फैज अहमद फैज, डॉ. असगर अली इंजिनीयर, भोपाळच्या बेगम, अश्फाकुल्ला खान, बेगम अख्तर, हबीब तन्वीर, कैफी आझमी, सरहद गांधी, मौलामा अब्दुल कलाम आझाद, फातीमा रशीद ऊर्फ नरगीस दत्त, रझीया सुल्तान, मंटो, हमीद दलवाई, सिप्लाचे संस्थापक ख्वाजा अब्दुल हमीद, शाहीर अमर शेख यांच्यासह अनेक महत्त्वाच्या सुधारणावादी आणि काळाच्या पुढे असणाऱ्या थोर मुस्लिम महिला-पुरुषांचा समावेश आहे. मुस्लिम धर्मात पुरुषांच्या तुलनेत कर्तृत्ववान महिलांची संख्या कमी आहे, असं एकंदरीत चित्र रंगवलं जातं; मात्र हे पुस्तक वाचले, तर हा गैरसमज दूर होईल. या पुस्तकातील ५० नायकांमध्ये २५ नायक महिला आहेत. १८०० च्या दशकात बुरखा झुगारून देणाऱ्या, मौलवींना आव्हान देणाचे धाडस दाखवणाऱ्या महिला यामध्ये आहेत. यातील अनेकांची ओळख कदाचित पहिल्यांदा वाचकांना होते. हल्ली वाचकांना जाडजुड पुस्तकं वाचण्याचा कंटाळा येतो. मात्र हे पुस्तक एकदा हाती पडले तर वाचक त्यात रमत जातो आणि पुस्तक रटाळ होत नाही.

पुस्तकाचे महत्त्व

सध्या जगभरात आणि देशात एकंदरीत मुस्लिमांच्या मनात एक ‘आयडेंटी क्रायसेस’ निर्माण झाला आहे. मुस्लिम म्हणजे कट्टरपंथी असे चित्र उभे केले आहे. अनेक मुस्लिम तरुणांना मुस्लिम टोपी, बुरखा आणि कट्टरता जपणे हीच मुस्लिम असण्याची ओळख वाटते. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते देश उभारणीत मुस्लिमांचे योगदान मोठे आहे. आजच्या कठीण काळात मुस्लिमधर्मीयांचे खरे हिरो, आदर्श ठरणाऱ्या चेहऱ्यांची ओळख या पुस्तकातून करून दिली आहे.

अठराव्या शतकात ज्या पद्धतीने मुस्लिम महिला, पुरुषांनी महिला शिक्षणासाठी जो लढा दिला, देशाच्या उभारणीत मोलाचा वाटा त्यांनी उचलला, त्यांच्या कार्याची माहिती देणारे हे पुस्तक समाजमनातील गोंधळ, भय दूर करण्यास मदत करेल. अनेक सुधारणावादी महिला स्वत: शिकल्या आणि मुस्लिम महिलांना शिक्षणाची दारे उघडून दिले. यातील अनेकांची नावे इतिहासातून पुसली गेली आहेत. त्याला उजाळा मिळाला आहे. हे प्रेरणादायी जीवनचरित्र वाचून विशेषतः मुस्लिम महिलांमध्ये ‘हम किसी से कम नही’ हा नवा आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com