मराठमोळे इस्राईली ज्यू

इस्राईल-पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष पुन्हा गडद झाला आहे. या संघर्षामुळे जगभरातील ज्यू विशेषतः मुंबईत वसलेला मराठी ज्यू समुदायदेखील चिंताग्रस्त आहे.
Israel Jew Community
Israel Jew CommunitySakal

इस्राईल-पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष पुन्हा गडद झाला आहे. या संघर्षामुळे जगभरातील ज्यू विशेषतः मुंबईत वसलेला मराठी ज्यू समुदायदेखील चिंताग्रस्त आहे. दुसऱ्या बाजूला हा समाज मराठी संस्कृती आणि आपल्या अस्तित्वाच्या खाणाखुणा जपण्यासाठी संघर्ष करतो आहे. जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी अलीबागला आलेल्या इस्रायली ज्यू धर्मियांनी मराठी संस्कृती स्वीकारली आणि ते आम्ही महाराष्ट्रीय असल्याचे आजही अभिमानाने सांगताहेत...

जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी ज्यू मध्यपूर्वेतील छळाला कंटाळून आपला जीव वाचवण्यासाठी रायगडच्या किनारपट्टीवर धडकले. अलिबागच्या नागाव बंदरावर ते पहिल्यांदा उतरले. अलिबाग तालुक्यात हा समाज आजूबाजूला पसरला. कालांतराने महाराष्ट्राच्या मातीत रुळले. अलिबाग तालुक्यातील ज्या गावात ते राहत होते, त्या गावांची नावे त्यांनी घेतली.

दिवे आगारवरून दिवेकर, तळेवरून तळेगावकर, पेणवरून पेणकर, नागाववरून नागावकर अशी नावे पडली. मराठी ज्यूंची आडनावे पेझरकर, अगरवरकर, वास्कर, बिरवडकर, उमरेडकर, अष्टमकर, सनकर, गडकर अशी आहेत. आडनावावरून आमचे पूर्वज कुठून आले होते, हे आम्हाला समजतं, असे डेविड तळेगावकर सांगतात.

मराठी ज्यू धर्मियांना बेने इस्राईल म्हणतात. याचा अर्थ सन ऑफ इस्राईल (इस्राईलची मुलं) असा होतो. याचा बायबलमध्ये उल्लेख असल्याचे सांगण्यात येते. अलिबागमधील नागावमध्ये अजूनही मराठी ज्यूंच्या आगमनाच्या खाणाखुणा सापडतात. नागावला ज्यू धर्मियांची दफनभूमी आहे. अलिबागपासून १५ मिनिटे अंतरावरील खंडाळा गावात एक पवित्र खडक आहे.

४० वर्षे हायकोर्टात वकिली केलेले डेविड तळेगावकर आता माझगावमधील प्रसिद्ध सर इली कादरी शाळेसह ज्यू समाजाच्या प्रार्थनास्थळापासून अनेक ट्रस्टवर कार्यरत आहेत. त्यांनी एक मजेदार किस्सा सांगितला. रायगडमध्ये ज्यू समाजाने तेलघाणीच्या व्यवसायात प्रवेश केला. स्थानिक लोक सोमवारी तेलघाणा बंद ठेवायचे, तर ज्यू शनिवारी. त्यामुळे लोक त्यांना ‘शनिवार तेली’ असेही म्हणायचे.

मुंबईत स्थलांतर

अलिबागवरून मराठी ज्यू समाजातील लोक शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी हळूहळू पनवेल, ठाणे, मुंबईकडे सरकत गेले. दक्षिण मुंबईतील डोंगरी, माझगाव, नागपाडा, उमरखाडी परिसरात स्थायिक झाले. १९५१ च्या जनगनणेनुसार संपूर्ण भारतातील या समाजाची लोकसंख्या २६ हजार ५१२ होती. यातील ८० टक्के म्हणजे २० हजार १५३ मराठी ज्यू मुंबई शहरात राहत होते.

मात्र १९४८ मध्ये इस्राईल देश म्हणून अस्तित्वात आला आणि जगभरातील गांजले गेलेले ज्यू धर्मीय इस्राईलला गेले. याच काळात मराठी ज्यू समुदाय मोठ्या प्रमाणात इस्राईलला स्थलांतरित झाला. १९६१ च्या जनगनणेनुसार देशात १८ हजार ५५३ ज्यू नागरिक होते. त्यापैकी ८५ टक्के म्हणजे १५ हजार ८५१ ज्यू समाज मुंबईत राहत होता. १९८१ पर्यंत महाराष्ट्रात केवळ पाच हजार २०४ ज्यू नागरिक उरले.

मुंबईतील ज्यू समाजाची संख्या तीन हजार ६०७ पर्यंत खाली आली. अनेक लोक ज्यू धर्मियांना पारशी किंवा ख्रिस्ती समजतात. पारशी समाजाप्रमाणे मराठी ज्यू श्रीमंत नाहीत. ते नोकरदार मध्यवर्गीय आहेत. बहुतांश केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नोकरीवर आहेत. अस्खलित मराठी येत असल्यामुळे अनेक महिला महापालिका शाळांत मराठीच्या शिक्षिका आहेत.

मुंबईतील अस्तित्वाच्या खाणाखुणा

सुरुवातीला दक्षिण मुंबईत मराठी ज्यू मोठ्या प्रमाणावर राहत होते. नागपाडा, डोंगरी, उमरखाडी या भागात ज्यू धर्मियांची (सॉयगॉन) प्रार्थनास्थळे आहेत. त्या प्रार्थनास्थळांच्या आजूबाजूला ज्यू समाज वस्ती करून राहतो. मुंबईत मशीद बंदर भागातील भाजी गल्लीत २२५ वर्षे जुने ‘गेट ऑफ मर्सी सिनेगॉन’ हे प्रार्थनास्थळ आहे. ज्यू धर्मिय एका देवाला म्हणजे ईश्वराला मानतात.

हशेम, अदोना असाही ईश्वराचा उल्लेख करतात. ख्रिस्ताचा जन्म झाल्यापूर्वीच्या ओल्ड टेस्टामेन (बायबल जुना करार), त्याला तोरा म्हणतात. या धर्मग्रंथाला ज्यू धर्मिय पवित्र मानतात. प्रार्थनास्थळात प्रवेश घेण्यासाठी कुणालाही आडकाठी नाही. आता या भागातील ज्युईश संख्या कमी झाली. वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या बघता या प्रार्थनास्थळात कुणी येत नाही.

त्यापेक्षा सर्वांना सोयीस्कर असणाऱ्या आग्रीपाड्याच्या प्रार्थनास्थळी सर्व येतात. मुंबई शहरात मराठी ज्यू धर्मियांची सहा प्रार्थनास्थळे आणि वरळीत दफनभूमी आहे; तर बगदादी ज्यू समाजाचे स्वतंत्र प्रार्थनास्थळ आणि दफनभूमी आहे.

मुंबईत पारशी समुदायाप्रमाणे मराठी ज्यू कमी होत गेला. तो आता केवळ दीड हजार उरल्याचे डेविड तळेगावकर यांनी सांगितले. कुटुंब वाढू लागल्यामुळे जागा अपुरी पडायला लागली. मुंबईत फ्लॅटच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या. त्यामुळे मराठी माणसाप्रमाणे ज्यू मराठीदेखील मुंबईबाहेर फेकला गेला आहे. तो मुख्यतः आता ठाणे, मुलुंड आणि डोंबिवलीत राहतो. या भागात प्रार्थनास्थळे आहेत. शिवाय ठाण्यात कोशर मिट (मटन) उपलब्ध होते.

मुंबईच्या विकासात हातभार

१८ व्या शतकात इराक आणि आजूबाजूच्या देशांतून ज्यू धर्मिय भारतात आले. या स्थलांतरितांना ‘बगदादी ज्यू’ असे नाव पडले. ‘बगदादी ज्यू’ समाज उद्योगात आघाडीवर होता. सर अल्बर्ट ससून, जेकब ससून हे ‘बगदादी ज्यू’ होते. ससून डेविड हे ‘बँक ऑफ इंडिया’चे संस्थापक- अध्यक्ष होते. त्यांनी महाराष्ट्रात मोठे उद्योगधंदे उभारले.

मुंबईतील ससून डॉक, जिजामाता उद्यान, भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय, पुण्यातील ससून रुग्णालय आणि मुंबईतील डेविड ससून ग्रथांलयाची उभारणी त्यांनी केली. माझगाव भागातील प्रसिद्ध सर एली कदुरी शाळा कदुरी कुटुंबाने बांधली. ज्यू धर्मिय चालवत असलेली ही मुंबईतील एकमेव मराठी माध्यमाची शाळा आहे. नुकतीच या शाळेला १५० वर्षे पूर्ण झाली.

इस्राईलमध्ये स्थलांतर

संपूर्ण देशात आता केवळ पाच हजार मराठी ज्यू उरले आहेत. नवी पिढी आधुनिक इस्राईलला जाणे पसंत करते. कोविडमध्ये भारतात ज्येष्ठ नागरिकांची देखभाल करणारे कुणी नव्हते. त्यामुळे कोविड संपल्यावर इस्राईलला निघून जाणाऱ्यांची संख्या अधिक वाढली. ज्यू समुदायातील प्रत्येक परिवारातील एक तरी सदस्य इस्राईलला राहतो. काही संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब इस्राईलला निघून गेली.

अनेकदा तरुण मुले फिरायला, खेळायला किंवा परिषदेच्या निमित्ताने इस्राईलला गेली. तिकडे जीवनमान आवडल्यामुळे ती तिथेच राहिली. ठाण्यात ‘आमची शायली’ साप्ताहिक चालवणाऱ्या मेरी चोर्डेकर यांचे वेगळे म्हणणे आहे. त्यांच्या मते, मराठी ज्यू समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळाला. मात्र प्रत्यक्षात काहीच फायदे त्यांना मिळाले नाहीत.

अनेक मराठी ज्यू तरुण उच्चशिक्षित आहेत. त्यांना नोकरीच्या संधी देशात कमी मिळतात. त्यामुळे त्यांचा इस्राईलला जाण्याचा कल वाढला आहे. इस्राईल हे एक स्वतंत्र ज्यू राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर आल्यानंतर जगभरातील ज्यू धर्मिय इस्राईलला स्थायिक झाले. बाहेरच्या देशातून आलेल्या ज्यू नागरिकांना सेटल होण्यासाठी इस्राईल सरकार सर्व प्रकारची मदत करते.

मुंबईतील मराठी ज्यू समुदायाचे इस्राईलशी घट्ट नाते आहे. लग्न, मुंज किंवा कुणाच्या मृत्यूच्या निमित्ताने वर्षातून एकदा तरी इस्राईलला जाणे होते. मात्र वाढत्या स्थलांतरामुळे नव्या पिढीचे भारताशी, मराठीशी फारसे भावनिक नाते उरले नाही, याची खंत ज्यू समुदायाला आहे.

भारतीयत्वाचा अभिमान

ज्यू समाजाचे महाराष्ट्रावर आणि मराठीवर खूप प्रेम आहे. जगभरात जेव्हा ज्यू धर्मियांना तिरस्कार, छळ आणि अत्याचाराला सामोरे जावे लागत होते. त्याचवेळी भारतात मात्र ज्यूंसोबत कुठलाही भेदभाव केला नाही. याची जाणीव भारतीय ज्यू समाजाने कायम ठेवली आहे. आम्ही गेल्या जन्मी काही तरी पुण्याचे काम केले असेल म्हणून ईश्वराने आम्हाला भारतात जन्माला घातले.

हिंदू, मुस्लीम धर्मियासोबत आम्ही राहिलो. कुणीही तिरस्काराने आमच्याकडे बघितले नाही. सर्वांनी प्रेम, आपलेपणा दिला. अशी भावना डेविड तळेगावकर यांची आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आणि रेल्वे कबड्डी संघाचे तीन वर्षे कॅप्टन राहिलेले विजू पेनकर यांची मुलगी लिबाना पेनकर इंडीयन ज्युईश फेडरेशनच्या सदस्या आहेत.

त्यांना भारतीय आणि मराठी असण्याचा प्रचंड अभिमान आहे. भारत आमची मायभूमी आहे तर इस्त्राईल पितृभूमी, असे लिबाना अभिमानाने सांगतात.

मराठी संस्कृतीचा प्रभाव

मराठी ज्यू धर्मियांच्या लग्नापासून ते इतर सण, धार्मिक चालीरीतीवरही मराठी संस्कृतीचा प्रभाव आहे. जेवण कोकणी पद्धतीचे असते. लग्नात हळद लावणे, हिरवी बांगड्या, हिरवी साडी नेसण्याची परंपरा आहे. इस्त्राईलधील मराठी ज्यूदेखील हा रिवाज पाळतात. सण उत्सवाला हलवा होतो. मराठी पद्धतीने ज्यू धर्मिय करंजा करतात. सुतारफेणी, पुरणपोळी त्यांच्या आवडीची. गव्हाचा हलवा एवढा फेव्हरेट आहे की इस्त्राईलमधून याची माागणी होते. ज्यू धर्मिय उपवासाला कडवे वाल आवर्जुन खातात.

मराठी मातीशी नाते तुटले

सॅम्यूअल तळेगावकर हे १९८५ पासून इस्त्राईलमध्ये सेटल झाले आहेत. अश्तोत या शहरात ते राहतात. या शहरात मराठी ज्यू मोठ्या प्रमाणात राहतात. सॅम्यूअल यांच्या पत्नी ईवा यांनी इस्त्राईली बँकेत नोकरी केली. सेवानिवृत्त झाल्यावर त्या अश्तोत शहरात भारतीय सांस्कृतिक केंद्रात मराठी शिकवतात. इस्त्राईलमध्ये मराठीचा गोडवा टिकला पाहिजे एवढाच त्यांचा उद्देश आहे.

आता युद्ध सुरू झाल्यापासून क्लासेस बंद आहेत. ईवा यांची एक सुन मोरक्को, दुसरी रशियन वंशाची आहे. दोन्ही जावई रशियन आणि बुखारी ज्यू धर्मिय आहेत. त्यांची धाकटी सून उत्तम महाराष्ट्रीय पदार्थ करते. घरात वरण-भात, श्रीखंड-पुरी, बटाटे, भजी, सुतारपणी हे पदार्थ सर्वांच्या आवडीचे आहेत. अलिकडे एका कार्यक्रमात त्यांच्या नातीने एक मराठी गाणे गायले हा ईवा यांच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता.

इस्त्राईलच्या रामले, हैफा या शहरात भारतीय ज्यू समुदायाची संख्या चांगली आहे. मराठी ज्यू समुदायातील मुले, मुली आता रशियन, फ्रेंचसह इतर वंशाच्या ज्यूसोबत लग्न करतात. त्यामुळे नव्या पिढीला भारताची ओढ कमी झाली आहे. या पिढीचे भारतासोबतचे नाते आमच्यासारखे भावनिक राहणार नाही, याचे दु:ख मराठी ज्यू समाजाला आहे. देशाबाहेर सेटल झालेल्या मराठी ज्यूंना एकत्र ठेवण्यासाठी ‘मायबोली’ आणि ‘आमची शायली’ नावाचे मराठी साप्ताहिक चालवले जातात.

वेगाने बदलत असलेल्या या जगात आपले अस्तित्व जपण्याचे आव्हान मराठी ज्यू समाजापुढे आहे. आपल्या पूर्वजांची संस्कृती, भाषा, पंरपरा जपण्याची चिंता पहिल्या पिढीला जास्त आहे. त्यांनी हे प्रेम, ओलावा अनुभवलेला आहे. मात्र ही पिढी निघून गेल्यावर पुढे काय, हा मोठा प्रश्न आहे.

vinod.raut@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com