मुंबई ड्रग्ज्‌मध्ये आघाडीवर

मुंबई देशातील इतर शहरापेक्षा जास्त कॉस्मोपॉलिटन शहर आहे. मुंबईत वेगवेगळ्या संस्कृती, भाषा आणि सर्व वर्गातील लोक राहतात. शिवाय मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी आहे.
मुंबई ड्रग्ज्‌मध्ये आघाडीवर

सुशांत सिंह आत्महत्या आणि आर्यन खान प्रकरणानंतर मुंबई आणि अंमली पदार्थाचे जग प्रकाशझोतात आले आहे. दोन्ही प्रकरणात सेलिब्रिटी आणि तरुणाई अंमली पदार्थाच्या दलदलीत सापडली या बाबीपेक्षा राजकारण अधिक झाल्यामुळे हा प्रश्न नेमका काय आहे, वास्तव चित्र काय हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही. त्याचा घेतलेला हा आढावा.

मुंबई देशातील इतर शहरापेक्षा जास्त कॉस्मोपॉलिटन शहर आहे. मुंबईत वेगवेगळ्या संस्कृती, भाषा आणि सर्व वर्गातील लोक राहतात. शिवाय मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास मुंबई श्रीमंत शहर आहे, त्यामुळे नशेच्या पदार्थाचे ग्राहकही जास्त आहेत. मागणीप्रमाणे पुरवठा असा अर्थशास्त्राचा साधा नियम आहे. त्यामुळे मुंबईत अंमली पदार्थाची तस्करी, पुरवठा जास्त होतो. मुंबई अत्यंत वेगवान म्हणजे धावते शहर आहे. घर चालवायचे असेल तर आईवडील दोघांनाही नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांवर लक्ष द्यायला वेळ नाही. त्यातून मुले व्यसनाधीन होतात.

मुंबईत आपल्या आपल्या परीने, आपल्या क्षमतेनुसार अंमली पदार्थाचे सेवन करणारा वर्ग आहे. झोपडपट्टी भागात तुलनेने स्वस्त असलेल्या गांजाचे सेवन केलं जातं. उच्चभ्रू वस्त्यांत अधिक नशा देणारे पदार्थ, ज्याची किंमत जास्त असते, त्याचे सेवन केले जाते.

उच्चभ्रू वर्गात रंगणाऱ्या पार्ट्यांमध्ये कोकेन, हेरॉईनसारख्या अत्यंत महागड्या ड्रग्जचे सेवन केले जाते. कारण त्यांना ते परवडणारे आहे. मात्र नशेची कारणे वेगवेगळी आहे. तरुणामध्ये वाईट संगत, ड्रग्जचे आकर्षण ही मोठी कारणं आहेत. तरुणाई नैराश्य घालवण्यासाठी नशा करते. कारण त्यामुळे आनंद मिळतो, ताण जातो, असा त्यांचा समज असतो. काही ठिकाणी उत्सुकता, मजा म्हणून नशा केली जाते. व्यक्तिपरत्वे नशा करण्याचे कारण बदलतं.

पुरवठा साखळी

मुंबईत तस्करीच्या मार्गाने येणारे बहुतांश अंमली पदार्थ आजूबाजूच्या राज्यातून दाखल होतात. लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेत कोकेन आणि हेरॉईन तयार होते. अलीकडे हेरॉईन, चरस, गांजा हे अंमली पदार्थ आजूबाजूच्या राज्यातून रेल्वे, बस, आणि कुरिअरच्या माध्यमातून मुंबईत दाखल होत आहे. अंमली पदार्थांचे व्यवहार करणारे दोन प्रकारचे लोक आहेत. काही लोक अजूनही ड्रग्ज सप्लाय करण्यासाठी परंपरागत पद्धतीचा म्हणजे मानवी कुरिअरचा वापर करतात. एक दुसरा वर्ग आहे जो ह्युमन-टू-ह्युमन संबध टाळतो. कारण त्यातून त्यांचे सिंडिकेट पोलिसांच्या हाती लागण्याची भिती त्यांना असते. त्यासाठी कॉलिंग ॲप्स, सोशल मिडीयाचा वापर केला जातो. कुरिअर सेवेचा वापर करून व्यापार केला जातो. खरेदीसाठी कुठे कुठे क्रिप्टो करंन्सींचाही वापर होतो. मात्र हा टेक्नोसॅव्ही वर्ग बहुतांश तरुण आहे.

धंद्याचे जाळे गुंतागुंतीचे

अंमली पदार्थाच्या प्रकारानुसार हा धंदा तीन ते चार पातळ्यांवर काम करतो. एक निर्मितीचे काम करतो. दुसरा वाहतूक, तिसरा ड्रग्ज पुरवठ्याचे-स्वीकारण्याचे काम करतो तर चौथा विक्रीचे काम करतो. पोलिस बहुतांश दोन ते तीन पातळ्यांपर्यंत पोहोचतात. ड्रग्ज वाहतुकीची साखळी मोडून काढण्याचे काम मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी शाखेने केले आहे. मात्र या व्यवसायातील नफ्याची टक्केवारी बघता, व्यवसायातील चेहरे कायम बदलतात.

मेफेड्रनच्या एका ग्रॅमच्या निर्मितीला २०० रुपये खर्च येतो. मात्र बाजारात ते दोन हजाराला विकले जाते. हा गडगंज नफा बघता अनेकजण या व्यवसायात येतात. त्यामुळे पोलिसांनी कुणाला तुरूंगात टाकलं, तरी नफ्याची टक्केवारी बघता त्याला पर्यायी माणूस लगेचच तयार होतो. आफ्रिका खंडात ५५ देश आहेत. त्यातून टांझानिया, नायजेरिया, घाना या देशातील गुन्हेगार अंमली पदार्थांच्या धंद्यात अधिक सक्रिय आहेत. ते कोकेनचा धंदा करायचे आता ते मेफेड्रॉनसह अन्य पदार्थांच्या तस्करीतही आहेत.

अंडरवर्ल्ड कनेक्शन

मुंबईत अंमली पदार्थाच्या तस्करीत संघटित गुन्हेगारी टोळ्या सुरुवातीपासून कार्यरत होत्या. मुंबईत हेरॉईन, गांजा, चरस, सिंथेटिक ड्रग्जचा धंदा करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या आहेत. दाऊद इब्राहिमपासून ते अनेक गुन्हेगारी टोळ्या नशेच्या तस्करीत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी होत्या, याचा मोठा इतिहास आहे. आजही या व्यापारात संघटित टोळ्या आहे. शेकडो किलोमीटरवरुन अंमली पदार्थ आणायचे असतील, तर व्यवस्थित, गोपनीयता बाळगून, पैशाचे व्यवहार पूर्ण करायचे असतात. त्यामुळे या काळ्या धंद्याची एक स्वतंत्र व्यवस्था आहे. मुंबईत दरवर्षी दोनशे कोटी रूपयांपेक्षा जास्त उलाढाल होणारा हा धंदा असल्याचे पोलिस कारवायांमधील आकडेवारी सांगते. न पकडलेल्या अमली पदार्थांची किंमत शेकडो कोटीच्या घरात असल्याचे पोलिस अधिकारी सांगतात.

वर्षभरापूर्वी विधी सेंटर फॉर लिगल पॉलिसी या संस्थेने एक सर्वेक्षण केलं होतं. देशभरात एनडीपीएस कायद्याखाली नोंदणी झालेल्या एकूण प्रकरणांपैकी ८२ टक्के गुन्हे एकट्या मुंबईत दाखल झाल्याचे समोर आले. २०१४ पासून २०१८ पर्यंतचे हे प्रमाण वाढत चाललं आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे २०१४ पासून राज्यात अमली पदार्थ बाळगणे, तस्करीची प्रकरण पाचशे टक्क्यानी वाढली आहेत. त्यातही मुंबईचा वाटा अगदी ९८ टक्क्यापर्यंत आहे.

२०१४ मध्ये एनडीपीएस अंतर्गत केलेल्या कारवायात मुंबईचा वाटा ९८ टक्के, २०१५ मध्ये ९६.६ टक्के तर २०१७ मध्ये ९०.५ टक्क्यापर्यंत होता, असे या संस्थेचा अहवाल सांगतो.

देशभरात इतर ठिकाणी पोलिस यंत्रणा आक्रमकपणे केस दाखल करत नाही. मुंबईत अंमली पदार्थ तस्कराविरोधात कारवाईचे प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय मुंबई पोलिसाची अंमली पदार्थ विरोधी शाखा आणि एनसीबी अशा दोन्ही यंत्रणा इथे कार्यरत असल्यामुळे केसेसचे प्रमाण अधिक आहे. अभिनेता सुशांत सिंह प्रकरणानंतर अंमली पदार्थ तस्करावर कडक कारवाईचे आदेश दिले गेले होते. त्यामुळे केसेस नोंदणी करण्याचे प्रमाणही वाढल्याचे मुंबई पोलिस अधिकारी सांगतात. परिणामी मुंबईत केसेस जास्त दिसतात, असे पोलिस अधिकारी सांगतात.

सेलिब्रिटी : प्रसिध्दी जास्त, प्रमाण कमी

अंमली पदार्थ सेवन प्रकरणात अनेक सेलिब्रिटी रडारवर आले आहेत. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून सेलिब्रिटीवर सामान्यपणे आणि शांतपणे कारवाया सुरु असतात. यामध्ये अनेकदा पुरवठा करणाऱ्यावर कारवाया झाल्या. सुशांत सिंह आणि आर्यन खानपर्यंतच्या प्रकरणातील जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे प्रमाण तसे काही ग्रॅममध्ये आहे. ग्लॅमर असल्यामुळे सेलिब्रिटी प्रकरणाना मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळते. मात्र त्यातून पूर्ण फिल्म इंडस्ट्री म्हणजे ड्रग्जचे केंद्र आहे, असाही चुकीचा अर्थ लावला जातो. मुंबईत एनडीपीएस कायद्याखाली झालेली एकुण प्रकरणांची संख्या बघितली आणि त्यात बॉलीवूड सेलिब्रिटीसंदर्भातील केसेस बघितल्या तर त्या तुलनेने अत्यंत नगण्य असल्याचे पोलिस अधिकारी सांगतात. आर्यन खान आणि सुशांत सिंह प्रकरणाने सेलिब्रिटी ड्रग्ज सेवनाचा देशात गाजावाजा झाला. मात्र या दोन्ही प्रकरणात विशेषतः आर्यन खानप्रकरणात ड्रग्स सेवनाचे प्रमाण अत्यंत अत्यल्प होतं. देशातील नामवंत कायदेतज्ज्ञ फैजान मुत्सफा यांच्या मते आर्यन खानने तो सेलिब्रिटी सुपरस्टारचा मुलगा असल्याची किंमत चुकवली.

केंद्रीय संस्था विरुध्द पोलिस

सध्या महाराष्ट्रात केंद्रीय चौकशी यंत्रणा विरुध्द राज्य यंत्रणा असा संघर्ष आहे. गैरभाजप सरकारे सत्तेवर असलेल्या राज्यात केंद्रीय यंत्रणा अतिशय सक्रिय असल्याचे अलिकडच्या घटनांवरुन दिसून येते. चौकशी आणि तपासात राजकारण शिरल्याचे चित्र आहे. न्यायपालिकेने वेळोवेळी यावर ताशेरे ओढलेत. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीत ईडी, सीबीआयपासून एनसीबीपर्यंत सर्व केंद्रीय यंत्रणा कामी लावल्या. मात्र प्रत्यक्षात त्यातून काहीच हाती लागलं नाही. मात्र राज्य आणि केंद्र सरकारचे संबध ताणले गेले. सुशांत सिंह प्रकरणात अनेक सेलिब्रिटी केवळ व्हाट्सॲप चॅटवरुन चौकशीला बोलावले गेले. मात्र त्याचे पुढे काय झाले, त्याचा तपशिलही बाहेर आला नाही. सुशांत सिंह तपासात काहीच सापडलं नसल्याचं स्पष्ट झालंय. परमबीर सिंग प्रकरणात अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. आर्यन खान प्रकरणात सुरुवातीपासून अगदी पंचाच्या वर्तनापासून अनेक कच्चे दुवे दिसत होते. मात्र अल्पंसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणातील अनेक कच्चे दुवे मांडले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस विरुध्द नवाब मलिक असा राजकीय संघर्ष रंगला. मात्र यातून एकमेकांची बदनामी वगळता अन्य काही साध्य होत नाही.

एनसीबी विरुध्द मुंबई पोलिस

मुंबईत नार्कोटिक्स सेल १९८८ मध्ये स्थापन झाले. एनसीबीची स्थापना १९८६ साली केंद्रीय कायद्यानुसार झाली. सुशांत सिंह आणि आर्यन खान प्रकरणात या दोन्ही संस्था एकमेकांविरुध्द काम करतात किंवा त्यांच्यात शीतयुध्द चालल्याचे चित्र दिसले. मात्र प्रत्यक्षात असे नाही, असे दोन्ही संस्थेतील अधिकारी सांगतात. शेवटी या दोन्ही संस्थांचे उद्दिष्ट एक असतं. या दोन्ही संस्थांचे नेटवर्क वेगवेगळी आहेत. त्यामुळे एकमेकांविरोधात काम करतो, असं म्हणणे चुकीचे आहे, असं पोलिस अधिकारी सांगतात. मात्र या प्रकरणामुळे अनेक खबरी गायब झाले आहेत. शिवाय, पोलिसही एका चौकटीपलिकडे तपासात खोलात शिरणार नाहीत, अशी भीती एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने व्यक्त कली.

लढा कसा जिंकणार

अंमली पदार्थाविरोधातील लढाई केवळ पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून, कडक कायदे करुन, अटक करुन यशस्वी होणार नाही. पोलिस यंत्रणा यातील पुरवठा कमी करण्यासाठी काम करतील. मात्र मागणी कमी करण्यासाठी ते काहीच करु शकत नाही. त्यासाठी कायद्याचा धाक वापरला जाऊ शकत नाही. त्यामुळे मागणी कमी करण्यासाठी नशेकडे लोक वळू नये आणि जो वळला त्याच्यावर उपचार करणे, त्यातून त्याला बाहेर काढणे आणि मुख्य प्रवाहात आणणे हे महत्वाचे काम आहे. त्यासाठी जनजागृती हाच मोठा मार्ग आहे, असं मुंबई अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com