एक वर्तुळ पूर्ण झालं!

‘साधना’च्या हीरकमहोत्सवी वर्षाच्या समारोपाचा कार्यक्रम २००८ मध्ये ८ सप्टेंबरला त्यावेळच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत झाला.
Books
Bookssakal
Summary

‘साधना’च्या हीरकमहोत्सवी वर्षाच्या समारोपाचा कार्यक्रम २००८ मध्ये ८ सप्टेंबरला त्यावेळच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

- विनोद शिरसाठ, saptrang@esakal.com

‘साधना’च्या हीरकमहोत्सवी वर्षाच्या समारोपाचा कार्यक्रम २००८ मध्ये ८ सप्टेंबरला त्यावेळच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत झाला. तेव्हा युवा संपादक या नात्याने आभार मानताना मी म्हणालो, ‘आज हीरकमहोत्सवी वर्षाचा समारोप झाला असं म्हणण्यापेक्षा, अमृतमहोत्सवी वाटचालीची पायाभरणी पूर्ण झाली असं म्हणणं योग्य ठरेल.’ कारण दरम्यानच्या काळात संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी तयारीच तेवढी करून ठेवली होती. त्या तयारीचाच एक भाग म्हणून त्यांनी, ‘यापुढे विनोद शिरसाठ हा साधनाचा संपादक म्हणून काम करेल,’ असा ठराव २३ ऑगस्ट २००८ रोजी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेतला होता, तसं जाहीरही केलं होतं.

मात्र, दुसऱ्या दिवशी मी त्या ठरावाला स्थगिती मिळवली आणि ‘आणखी किमान पाच वर्षं मला युवा संपादक व कार्यकारी संपादक या लेबलखाली वावरू द्या’ अशी विनंती केली. तो पाच वर्षांचा कालखंड संपत आला तेव्हा, ‘आणखी दोन वर्षं मला कार्यकारी संपादक म्हणूनच राहू द्या’, अशी विनंती करून ती मान्य करून घेतली. मात्र, त्यानंतर चारच महिन्यांनी म्हणजे २०१३ मध्ये २० ऑगस्टला डॉ. दाभोलकरांची हत्या झाली आणि मग मी संपादकपद स्वीकारलं.

त्याआधी साडेनऊ वर्षं मी साधना साप्ताहिकाचं व प्रकाशनाचं संपादकीय काम करीतच होतो, त्यात कठीण असं काही मला वाटत नव्हतं. डॉक्टरही त्याबाबत निर्धास्त होते. मात्र, त्यांना एकाच गोष्टीची चिंता होती, ती म्हणजे ‘वितरण, व्यवस्थापन व अर्थकारण या तिन्ही क्षेत्रांत मी लक्ष घालत नव्हतो, रसही दाखवत नव्हतो.’ आणि संपादक झाल्यानंतर माझ्यासमोर मुख्य आव्हान तेच होतं. अर्थातच विश्वस्त मंडळ व अनेक हितचिंतक साथीला होते.

साधना ट्रस्टचे तेव्हा तीन विभाग होते - साप्ताहिक, प्रकाशन व मीडिया सेंटर (पुस्तक विक्री केंद्र). त्यातील प्रकाशनाचं काम उर्वरित दोन विभागांकडून होत होतं. म्हणजे पुस्तकांचं लेखन, संपादन व निर्मिती साप्ताहिकामार्फत, तर वितरण व विक्री मीडिया सेंटरमार्फत. तेव्हा साधना प्रकाशनाची जेमतेम चाळीस नवी पुस्तकं उपलब्ध होती. त्यानंतरच्या दहा वर्षांत दीडशे पुस्तकांची भर पडली. त्यात राजकारण, समाजकारण, प्रशासन, साहित्य, संस्कृती, शिक्षण, विज्ञान, सिनेमा, शेती व शेतकरी, आदिवासींचं जीवन, मुस्लिम समाजसुधारणा इत्यादी विषयांवरील ललित, वैचारिक पुस्तकांचा समावेश प्रामुख्याने आहे.

यातील बहुतांश पुस्तकांबद्दल किंवा त्यांच्या लेखकांबद्दल खास असं काही ना काही सांगता येईल; पण त्यातला मध्यवर्ती भाग हाच आहे की, ही सर्वच पुस्तकं समाजसन्मुख जगण्याला व भारतीय राज्यघटनेला पूरक भूमिका घेणारी आहेत.

त्यामध्ये तीन मोठ्या व विशेष महत्त्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद आहेत. ग. प्र प्रधान व अ. के. भागवतलिखित ‘लोकमान्य टिळक चरित्र’, लुई फिशरलिखित ‘महात्मा गांधी चरित्र’, अरुणा रॉयलिखित ‘कहाणी माहिती अधिकाराची’ याशिवाय, पराग चोळकर यांनी लिहिलेलं भूदान आंदोलनाचा इतिहास सांगणारं ‘अवघी भूमी जगदीशाची’ आणि सतीश बागल यांनी लिहिलेलं ‘चिनी महासत्तेचा उदय’ ही दोन पुस्तकं मराठी ग्रंथविश्वात मोलाची भर मानता येईल. त्याचप्रमाणे ‘ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर’ हे डॉ. निरुपमा व सुषमा तळवलकर यांनी लिहिलेलं पुस्तकही महत्त्वाचा ऐवज आहे.

मिलिंद बोकील यांना ‘कहाणी पाचगावची’ व ‘मेळघाट शोध स्वराज्याचा’ ही दोन्ही पुस्तकं साधना प्रकाशनाकडून आणावीत असं वाटलं, यालाही महत्त्व आहे. तसंच, डॉ. ऐश्वर्या रेवडकरलिखित ‘बिजापूर डायरी’ आणि डॅनियल मस्करणीसलिखित ‘मंच’ या दोन (तरुण लेखकांच्या) पुस्तकांना राज्य सरकारचं प्रथम प्रकाशनासाठीचं ताराबाई शिंदे पारितोषिक लागोपाठच्या वर्षी मिळालं, हा योगायोग नव्हता.

‘तीन मुलांचे चार दिवस’ हे एस.पी. कॉलेजमधील टी.वाय.बी.ए.च्या विद्यार्थ्यांनी २०१६ मध्ये लिहिलेलं अफलातून प्रवासवर्णन म्हणजे साधनाच्या इतिहासातील सर्वांत मोठा व देखणा विशेषांक, नंतर त्याचं पुस्तक आलं. आता ते पुणे विद्यापीठामध्ये टी.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमाला आहे. या सर्व प्रक्रियेत सर्व पुस्तकांची निर्मिती म्हणजे कागद, छपाई, बाईंडिंग, लॅमिनेशन हे एकाच दर्जाचं राहील याबाबत आम्ही दक्ष राहिलो; प्रिंटर्स वारंवार बदलले जाणार नाहीत याची काळजी घेतली. या सातत्याचं मुख्य श्रेय आमचे निर्मिती व्यवस्थापक सुरेश माने यांच्याकडे जातं. शिवाय, बहुतांश पुस्तकांची मुखपृष्ठं, मांडणी व सजावट गिरीश सहस्रबुद्धे यांनी केली आहे. साधना प्रकाशनाची पुस्तकं प्रथमदर्शनीच आकर्षक व उच्च अभिरुचीची वाटतात, त्याचं मुख्य श्रेय गिरीश यांच्याकडे जातं.

या सर्व काळात पुस्तकांच्या विक्रीसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे शॉर्टकट अंगीकारले नाहीत. लेखकांकडून पैसे घेऊन किंवा त्यांना काही प्रती खरेदी करायला लावून, पुस्तकं प्रकाशित करण्याचा मार्गही आम्ही अवलंबला नाही. मात्र दर वर्षी एप्रिल महिन्यात सर्व लेखकांना पुस्तक विक्रीचे हिशोब व रॉयल्टी पाठवत राहिलो. अनुवादक, शब्दांकन करणारे, प्रूफ तपासणारे यांना तुलनेने जास्त मानधन दिलं. लेखकांना, माध्यमांना, मान्यवरांना, साधना कार्यालयात येणाऱ्या लहान-थोरांना सढळ हाताने पुस्तकं भेट देत राहिलो. आर्थिक व्यवहार चोख करीत राहिलो, आकर्षक जाहिराती करीत राहिलो. त्यातूनच, ‘आशयसंपन्न मजकूर, दर्जेदार निर्मिती, किंमत कमी, तरीही सवलत जास्त!’ ही आमची टॅगलाइन बनली.

या सर्वांचा एकत्रित परिणाम काय झाला? तर २००३ मध्ये साधना मीडिया सेंटर सुरू केलं, तेव्हा साधना प्रकाशनाच्या पन्नास-साठ पुस्तकांच्या जुन्या आवृत्त्या मागच्या बाजूला दोन रॅकमध्ये निस्तेज अवस्थेत पडून होत्या, त्यांच्या विक्रीतून वर्षभरात मिळून पन्नास हजार रुपयांच्या दरम्यान रक्कम जमा होत होती. मात्र, २०२३ च्या प्रारंभी मीडिया सेंटरचं नूतनीकरण केलं आहे आणि आता साधना प्रकाशनाची पावणेदोनशे पुस्तकं दर्शनी भागातच / प्रवेश दालनातच मोठ्या दिमाखाने उभी आहेत. गेल्या वर्षी साधना प्रकाशनाच्या पुस्तकांचा विक्रीचा आकडा ३५ लाख रुपयांच्या जवळच जाणारा आहे. म्हणजे बरोबर वीस वर्षांतील हे स्थित्यंतर आहे, एक वर्तुळ पूर्ण झालं आहे!

चार वर्षांपूर्वी साधनाने डिजिटल क्षेत्रातही पदार्पण करून, त्या आघाडीवरही बरंच काम केलं आहे, ते किती आणि कसं, हे पुढच्या म्हणजेच शेवटच्या लेखात पाहू..!

(लेखक, साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन या दोहोंचे संपादक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com