esakal | वृद्ध कसे व्हायचे ते शिकूया..!
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

वृद्ध कसे व्हायचे ते शिकूया..!

sakal_logo
By
सुखदा चौधरी

उत्क्रांतीच्या एकूण कालावधीपैकी मागील 100 वर्षांच्या कालावधीमध्येच मानवजातीने सर्वाधिक प्रगती केली आहे, असे म्हटले तर ती नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्या पूर्वजांनी कधीच पाहिल्या किंवा अनुभवल्या नव्हत्या इतक्‍या नवनवीन सुविधा आणि प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ आज अगदी सामान्य माणूसदेखील घेताना दिसतो आहे. या प्रगतीच्या आणि बदलांच्या जोरावर आज आपण अविश्वसनीय असे तंत्रज्ञान आत्मसात केले, अनेक आजार समूळ नष्ट केले, आपण चंद्रावर जाऊन परतदेखील आलो, आपण अंतराळाची यात्रादेखील केली. मानवाच्या प्रगतीची गेल्या शतकभरातली ही यशोगाथा खूप मोठी आहे आणि आपण हे सर्व यश प्राप्त करू शकलो याच्या अनेक कारणांपैकी सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे आपण माणूस म्हणून अधिक वर्षे जगण्याची क्षमता विकसित केली आहे. आपले आयुर्मान वाढले आहे.
हजारो वर्षांपूर्वी माणूस भटके जीवन जगत असे. शेतीचा शोध लागला नव्हता आणि त्यामुळेच एका प्रदेशात स्थायिक होणेदेखील शक्‍य नव्हते. अन्न मिळवण्यासाठी माणसाला दररोज भटकंती आणि शिकार करावी लागत असे. अशा परिस्थितीत मृत्यू हा सातत्याने बरोबर असायचाच. यासाठी कारणे अनेक होती; जंगली प्राण्यांचा हल्ला, रोग, भूक, कुपोषण आणि बरेच काही. कधी आणि केव्हा मृत्यू झडप घेईल ते सांगता येणे शक्‍यच नव्हते. याउलट आज मात्र आपल्यासाठी मृत्यू म्हणजे न उलगडणारे असे कोडे राहिलेले नाही. जीवनाचा अंत म्हणजे मृत्यू आणि मृत्यू येणे अटळ आहे या गोष्टी आज आपण स्वीकार केलेल्या आहेत. त्यामुळे कधीतरी येणाऱ्या मृत्यूच्या विचाराने आपण आपले निर्णय घेणे, आपले कार्य बंद करत नाही. कदाचित या आश्वस्ततेमुळेच आपले आयुर्मानदेखील वाढते आहे. वर्ष 2016 च्या आकडेवारीनुसार भारतातील सामान्य नागरिकाचे आयुर्मान हे सरासरी 68.56 वर्षे इतके आहे. पूर्वीच्या काळातील आयुर्मान पाहू जाता ही वाढ विलक्षण आहे. आपल्या इतिहासातील अनेक वीर पुरुष, आपले अनेक राजे हे आयुष्याच्या ऐन भरात असताना, चाळिशीच्या दरम्यान मरण पावलेले आपल्याला आठवतच असेल.
आयुर्मानात झालेली ही वाढ आपल्यासाठी एक अनपेक्षित अशी गोष्ट घेऊन आलेली आहे. आता आपले तारुण्य अधिक काळपर्यंत टिकून राहते. आज चाळीस वर्षांचे होणे म्हणजे वयस्कर होणे असे मानले जात नाही, तर चाळिशी म्हणजे नव्या आयुष्याची नवी सुरुवात मानली जाते. तिशीचा काळ हा आता पूर्वीच्या विशीच्या काळासारखा मानला जातो आणि आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तिशीपर्यंत वाट पाहिली जाते. तारुण्याच्या या बदलत्या संकल्पनेसह आपण आता वयाच्या साठाव्या वर्षीपर्यंत काम करू लागलो आहोत, चाळिशी किंवा पन्नाशी आल्यानंतर जग बघायला निघायचं या उद्देशाने आपण बचत करू लागलो आहोत, आपण बऱ्यापैकी बिनधास्त आयुष्य जगू लागलो आहोत. या आयुष्यात मृत्यूची टांगती तलवार सतत आपल्या डोक्‍यावर नसते. कारण मृत्यू हे अंतिम सत्य आहे, आणि तो कधीतरी येणार आहे, याचा स्वीकार आपण केलेला आहे. यामुळे आज वृद्ध किंवा ज्येष्ठ होण्याचे एक ठराविक वय समाजात राहिलेले नाही आणि त्यामुळेच कदाचित आपण स्वतःला वृद्ध किंवा ज्येष्ठ होण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयारच करत नाही. वाढत्या वयाबरोबर आपल्यात कोणते बदल करायचे याची तयारी आपण करीतच नाही.
मी नुकतेच वाचलेले एक पुस्तक याच विषयावर भाष्य करणारे आहे. "बीइंग मॉर्टल' या अतुल गावंडे यांच्या पुस्तकाने माझी विचार करण्याची पद्धतच बदलली. हे पुस्तक जीवनाचा दर्जा, जीवनाची लांबी आणि शेवटी मृत्यू या विषयांवर भाष्य करते. हे पुस्तक आपल्यापुढे असे प्रश्न मांडते हे प्रश्न आपण सहसा कधीच एकमेकांना विचारीत नाही. या प्रश्नांवर कुटुंबात, आईवडिलांबरोबर तर सोडाच; पण अगदी पतिपत्नीमध्येदेखील कधीच चर्चा होत नाही. हा विषय म्हणजे आपण नेमके कोणत्या पद्धतीने वृद्ध व्हायचे? म्हातारपण कसे स्वीकारायचे? म्हातारे झाल्यावर आपण स्वतंत्र राहायचे की वृद्धाश्रमात राहायचे? जीवनाचा उत्तम दर्जा निवडायचा की जगण्याची अधिक वर्षे निवडायची? आपले शरीर थकल्यानंतर व्हेंटिलेटर आणि जीवनरक्षक प्रणालीच्या भरवशावर जीवन सुरू ठेवायचे का? आणि या प्रश्नांची तुमच्या मनातील जी काही उत्तरे असतील, त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी नेमका किती पैसा लागणार आहे? या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला हे पुस्तक आपल्याला भाग पाडते.
वास्तविक पाहता आज आपले सर्वांचेच आयुर्मान वाढले आहे आणि आपण दीर्घायुषी झालेलो आहोत. ही खरोखरच चांगली गोष्ट आहे; मात्र दीर्घायू होण्याचीच दुसरी बाजू वृद्ध होणे हीदेखील आहे, हे विसरून चालणार नाही. वर्तमानात जगले पाहिजे आणि आता जगतोय त्या क्षणाचा आनंद घेतला पाहिजे, हे जरी खरे असले तरीदेखील मृत्यूप्रमाणेच म्हातारपणदेखील अटळ आहे, हे आपण समजून घ्यायला हवे. वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञान कितीही पुढे गेले, तरीसुद्धा आपल्याला म्हातारपणाला सामोरे जायचे आहे हे सत्य आहे. मग त्याबद्दल आधीपासूनच शिकून घ्यायला काय हरकत आहे? या विषयावर चर्चा करून, ज्येष्ठांकडून त्यांचे अनुभव जाणून घेण्यात काय हरकत आहे? म्हातारपणासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहायला काय हरकत आहे? सध्या आपण जीवनाचा आनंद घेणे शिकतो आहोत, एकेक क्षण साजरा करायला शिकतो आहोत; मात्र याबरोबरच आपण वृद्ध कसे व्हायचे याबद्दलदेखील थोडेबहुत शिकून घ्यायला हवे.  


 

loading image
go to top