इतके अनर्थ हवामान बदलाने केले...

या वर्षीचे विक्रमी तापमान असो किंवा वर्षागणिक वाढत जाणाऱ्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची संख्या असो, हे हवामान बदलाचेच परिणाम आहेत
weather update effects of climate change
weather update effects of climate change sakal
Summary

या वर्षीचे विक्रमी तापमान असो किंवा वर्षागणिक वाढत जाणाऱ्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची संख्या असो, हे हवामान बदलाचेच परिणाम आहेत. गेल्या तीन वर्षांपासून आलेल्या चक्रीवादळांनी त्याची जाणीव करून दिली. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, महापूर, दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान आपल्याला धोक्याची जाणीव करून देत आहेत. ते आता विनाशाकडे घेऊन जात आहेत. याची जाणीव करून देणारे खास विश्‍लेषण...

मानवाच्या, प्राण्यांच्या, वनस्पतींच्या आणि पक्ष्यांच्या जगण्यासाठी हवेची गरज आहे. हवेत २१ टक्के ऑक्सिजन व ७८ टक्के नायट्रोजन या दोन वायूंचे प्रमाण ९९ टक्के आहे. उरलेल्या एक टक्क्यामध्ये कार्बनडाय ऑक्साईड ०.०३६ टक्के, अरगॅन ०.९३, मिथेन ०.०००१, ओझोन ०.०००००१, नेऑन ०.००१८, हेलियम ०.०००५, हायड्रोजन ०.००००५, नायट्रस ऑक्साईड ०.००००३ टक्के इत्यादी वायू अल्प ते अत्यल्प प्रमाणात आहेत. याशिवाय हवेत बाष्प असते. यापैकी अल्प ते अत्यल्प प्रमाणातील वायूमध्ये वाढ होताच मोठ्या प्रमाणात हवामान बदल जाणवतात आणि केवळ मानवनिर्मित क्रियामुळे किंवा मानवाच्या कृतीमुळे ते घडत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अतिरिक्त वायू निर्मितीमुळे प्रदूषण वाढते. हे घातक वायू सूर्याचे प्रकाशापासून मिळणारी ऊर्जा उष्णता धरून ठेवतात. त्यामुळे पृथ्वीभोवतीच्या हवेचे तापमान वाढते. त्याचेच शास्त्रज्ञांनी आता नामकरण केले आहे जागतिक तापमान वाढ. या तापमान वाढीला निसर्गाची हानी करणारा मानवी समूहच जबाबदार आहे.

आशिया खंडात ५५ दशलक्ष हेक्टर, आफ्रिका खंडात ६५ दशलक्ष हेक्टर व लॅटिन अमेरिकेतील ८५ दशलक्ष हेक्टर जंगलतोड आजवर झाली आहे. त्यात वाढ होऊन आता ४२० दशलक्ष हेक्टर जंगलतोड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरवर्षी १० दशलक्ष हेक्टर जंगल तोडले जात आहे. भारतात एकूण भूमीच्या २५ टक्के, तर महाराष्ट्रात ते १६.५० टक्के जंगल आता शिल्लक राहिले आहे. मात्र ते ३३ टक्के असावयास हवे. वृक्ष, वनस्पती, झाडे-झुडपे प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बनडाय ऑक्साईड वापरतात आणि खोडात, फांद्यात मुळ्यामध्ये साठवतात. वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने अधिक प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड हवेत शिल्लक राहात आहे.

कार्बन उत्सर्जनवाढ

वाहन वापरात दिवसेंदिवस भर पडत आहे. भारतात दरवर्षी ३०० दशलक्ष वाहनांची नोंदणी होत आहे. वाहनासाठी वापरलेल्या इंधनातून मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड हवेत मिसळला जात आहे. विमानासाठी वापरलेल्या इंधनामधून क्लोरोफ्ल्युरो कार्बन हवेत मिसळला जात आहे. कारखान्यांच्या चिमन्यांमधून मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड हवेत मिसळला जात आहे. एकूण जगभराचा आढावा घेतल्यास कार्बनडाय ऑक्साईडचे हवेतील आकारमान ३५ टक्क्यांने वाढले असून, कार्बनडाय ऑक्साईडच्या प्रमाणात ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

घातक वायू

कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन व नायट्रस ऑक्साईड हे वायू प्रदूषण वाढवतात. सूर्याकडून प्रकाशाद्वारे येणारी ऊर्जा, उष्णता धरून ठेवतात. त्यामुळे पृथ्वीभोवतीच्या हवेचे तापमान सध्या १.२ अंश सेल्सिअस वाढले असून सन २०३० सालापर्यंत ते १.५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्य आहे. जेव्हा हवेचे तापमान वाढते तेव्हा तेथे हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होतात. त्यातूनच वादळ, वादळी वारे निर्माण होऊन हवा अधिक हवेच्या दाबाचे क्षेत्राकडून कमी हवेच्या दाबाच्या क्षेत्रात वारे वाहून तेथे मोठ्या प्रमाणात ढग जमतात. अतिवृष्टी सुरू होते. जो पर्यंत तेथे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र कायम राहते तो पर्यंत तेथे अतिवृष्टी होत राहते. उदा. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेला मुसळधार पाऊस आणि त्यापासून ओढवलेली आपत्ती आणि निर्माण झालेली हवामानाची आणीबाणी. त्यावेळी असंख्य मुंबईकरांचे हाल झाले.

आरक्टीक अन्टार्टिक या समुद्रातील बर्फ वितळून त्याचे पाणी होत आहे आणि ते समुद्राला मिळून समुद्राच्या पाणी पातळीत वाढ करीत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. या शिवाय बर्फाच्छादित प्रदेशातील बर्फ वितळत आहे. ते पाणी समुद्राला मिळत आहे. हवेचे तापमान वाढल्याने हे सर्व घडत आहे. समुद्र किनाऱ्यावरील वस्त्यांत पाणी शिरत आहे, समुद्र किनाऱ्यावरील शहराचे वस्त्यांचे स्थलांतर सुरू झाले आहे. या थंड पाण्याच्या प्रभावाने समुद्राच्या पाण्याच्या तापमानातही बदल होत आहेत. त्याचा परिणाम हवामान बदलावर होत आहे. समुद्राच्या पाणी पातळीत २५ सें.मी. ने वाढ झाली आहे. ती आता ३० सें. मी. पर्यंत वाढेल. चीनमधील सनया शहरास धोका आहे. नेदरलँड देश समुद्रपातळीपेक्षा खाली आहे. मालदिव १२ बेटांचा देश धोक्याच्या पातळीत आहे. तेथील समुद्र सपाटीपासूनची उंची केवळ तीन मीटर आहे. तेथील ७७ टक्के जमीन २१०० पर्यंत पाण्याखाली जाईल, असा अंदाज आहे. भारतातील समुद्र किनाऱ्यावरील वस्त्यांनाही धोका आहे.

जागतिक मोसम विज्ञान संघटना व इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज या दोन्ही जागतिक पातळीवरील संस्था सातत्याने अभ्यास करून आपले अहवाल सादर करीत आहेत. त्यांनी काही भागात अतिवृष्टी व महापूर, तर काही भागांत पावसात मोठा खंड व भीषण दुष्काळी स्थिती, चक्रीय वादळांच्या संख्येत वाढ व उष्ण लहरींच्या प्रमाणात वाढ होईल, असे निष्कर्ष काढले आहेत. हे सर्व प्रकार जागतिक तापमानवाढ व त्या अनुषंगाने होणाऱ्या हवामान बदलामुळे होतच राहतील, असे इशारे दिले आहेत. जागतिक हवामान संघटनेचे पेट्टरी तालास, युनोचे सचिव अनटेनिओ गुटरेस, इंटर गव्हर्मेटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजचे सदस्य नोबेलविजेते शास्त्रज्ञ जेम्स सलींगर यांनी हवामान बदलाचा प्रभाव व तीव्रता वाढत जाईल, असे १९ मार्च २०२२ रोजी विषद केले.

साऊदन ऑसिलेशन : प्रशांत महासागराचे विषववृत्तीय भागातील समुद्राचे पाण्याचे पृष्टभागाचे तापमान १ ते ४ अंश सेल्सिअसने वाढताच तेथे हवेचा दाब कमी होतो व हिंदी महासागरावरील बाष्पयुक्त वारे तिकडे वेगाने बाप घेऊन जातात तिकडे अतिवृष्टी आणि भारतात दुष्काळी स्थिती निर्माण होते. दुष्काळाची तीव्रता तेथील समुद्राच्या पाण्याच्या तापमानावर अवलंबून असते.

महाराष्ट्रात १९७० ते १९७९ या काळात ११ जिल्हे दुष्काळग्रस्त होते. १९८० ते १९८९ दरम्यान १४ जिल्हे, १९८० ते १९८९ मध्ये १७ जिल्हे, १९९० ते १९९९ या कालावधीत २१ जिल्हे, २००० ते २०१० या काळात २४ आणि २०१० ते २०२० या कालावधीत २७ जिल्हे दुष्काळग्रस्त होते. महाराष्ट्रात पाण्याची आणीबाणी निर्माण होत असून, हा हवामान बदलाचा परिणाम आहे. भारतातील महाराष्ट्र दुष्काळीप्रवण राज्य बनले आहे. २००५, २००६, २००७, २०१३, २०१४, २०१९, २०२०, २०२१ या वर्षांत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस झाला. काही भागांत महापुरापुळे मोठे नुकसान झाले.

२६ जुलै २००५ मुंबई, सन २००६ व २००७ साली सांगली व कोल्हापूर शहराचे नदी किनारी भागात महापुराचा धोका निर्माण झाला. पुराचे प्रमाण ६ पट वाढल्याचे महाराष्ट्रात दिसून आले. २०१४ साली ३० जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन गावाजवळचे डोंगराचे भूस्खलन होऊन लोक झोपेत असतानाच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अतिवृष्टी झाल्याने हे सर्व घडले. २०१३ च्या १६ जून रोजी उत्तराखंडमध्ये झालेल्या अतिवृष्टीने ५७०० लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक लोक बेपत्ता झाले. ४५५० गावांना फटका बसला. २०१९ मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा भागात ८ ऑगस्ट रोजी पाऊस सुरू झाला, ती अतिवृष्टी ९ ऑगस्टपर्यंत कायम राहिली. अशा एक-दोन नव्हे तर असंख्य दुर्घटनांची नोंद झाली. आकडेवारीनुसार दरवर्षी हे प्रमाण वाढत आहे आणि अशा घटना फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरात घडत आहेत.

२००९ चे फयान , २०२० चे निसर्ग आणि १६ मे २०२० तर २०२१ मध्ये तोक्ते वादळ येऊन मोठे नुकसान झाले. अरबी समुद्रातील वादळांची संख्या वाढत आहे. समुद्रातील पाण्याच्या तापमानातील फरकाने वादळे तयार होतात. जेथे पाण्याचे तापमान वाढेल तेथे चक्राकार वारे वाहतात, तेथे कमी दाबाचे

क्षेत्र निर्माण होऊन वादळ निर्मिती होते. अरबी समुद्रातील आणि बंगाल उपसागरातील वादळामुळे मान्सून पावसावरही परिणाम होतो. जितके अधिक तापमान वाढेल तितके सुपर सायक्लॉन मोठे होते. बंगालचे उपसागराचे पाण्याचे तापमान २८ अंश सेल्सिअस असते आणि अरबी समुद्राचे १ ते २ सेल्सिअसने त्यापेक्षा कमी असते. मात्र आता अरबी समुद्राचे पाण्याचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसचे जवळपास गेले. अशीच स्थिती पुढे राहिल्यास अरबी समुद्रात वादळे तयार होण्याचे प्रमाण वाढेल. २०१४ व २०१५ मध्ये विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत गारपीट झाली ती नोव्हेंबर व फेब्रुवारी मार्च महिन्यात, त्याचप्रमाणे १२ फेब्रुवारी २०१८ मध्ये जालना, बीड, बुलडाणा, वाशिम, अमरावती व अकोला जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. सलग दोन दिवस गारपीट झाल्याने गहू, द्राक्ष, ज्वारी, कांदा, हरभरा या पिकांचे नुकसान झाले. एकूण ३७ गावांतील ८५०६ हेक्टरवरील ८३०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

शेती क्षेत्र उघड्यावरचे असल्याने शेती पिकांचे हवामान बदलाने मोठे नुकसान होत आहे. दारिद्र्यरेषेखालील शेतकरी कुटुंबांचे मोठे प्रमाण आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने नुकसान झाल्यास ते सोसण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही. कर्जाचे डोंगर वाढत असताना ते फेडणे शक्य न झाल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अशीच काहीशी स्थिती अमेरिकेत १९७० ते १९८० च्या दशकात निर्माण झाली होती. मात्र अमेरिकन सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष सवलती, अनुदान दिल्याने तेथील आत्महत्या थांबल्याची माहिती मी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी १९८९-९० साली गेलो असता समजली. त्याच प्रकारे महाराष्ट्रात आणि भारतात करावे लागेल. अन्यथा अन्नधान्य पिकवणारा शेतकरी संपल्यास अन्नधान्य-भाजीपाला याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होईल आणि सर्वांचे जीवनमान धोक्यात येईल.

(लेखकांनी अमेरिकेत एम.एस. सी, पी.एच.डी, डी.एस.सी. या पदव्या घेतल्या असून, दोन नॅशनल पेटेंट्‌स त्यांच्या नावावर आहेत. ते दक्षिण असिया फोरम फॉर अॅग्रिकल्चर मेटिरॉलॉजीचे संस्थापक-सदस्य आणि भारतातील नॅशनल अॅकॅडमी ग्रुपचे सदस्य आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com