

Indian Textile Heritage
esakal
कॅनव्हासवरचे एखादे चित्र, त्यातली रंगसंगती, चेहऱ्यावरचे भाव, खादीच्या वस्त्रात विणून घेणे म्हणजे काय असते हे समजून घेण्यासाठी आधी जामदानी विणकामाचे तंत्र समजून घ्यावे लागते. जामदानी विणकाम हे असे तंत्र आहे, ज्यात वस्त्रावरची प्रत्येक आकृती थेट धाग्यात विणली जाते. विणकर नजरेसमोर ठेवतो ते फक्त कागदावरील आखीव रेखाचित्र. प्रत्येक हातमागाच्या खाली त्या त्या चित्राचा रेखांकित, रंगवलेला पार्चमेंट पेपर असतो आणि त्याबरहुकूम विणकर एकेका रंगाचा धागा त्या त्या जागी बसवत जातो.
हातमाग विणकामातल्या एका अनोख्या प्रयोगाबद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. विणलेल्या चित्रांबद्दल. चित्र पाहणे वेगळे असते. चित्र अनुभवणे वेगळे. चित्र विणणे तर त्याहून वेगळे. राजा रवि वर्मा यांची चित्रे न पाहिलेली व्यक्ती भारतात क्वचितच असेल. त्यांची चित्रे आपल्याला प्रत्येक हिंदू घरात दिसतात. राजा रवि वर्मा हे केरळच्या राजघराण्यात जन्मलेले चित्रकार. त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास केला, भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांतील स्त्रियांचे वेश, साडी नेसण्याच्या पद्धती, केशभूषा, दागिने, मुद्रा, चेहेरे पाहिले, त्यांच्या रेषांचा, रंगांचा बारकाईने अभ्यास केला आणि त्याच अभ्यासातून हिंदू पुराणकथांना मानवी चेहरा मिळाला. रवि वर्मांची सुरेख लालसर मरून नऊवारी लुगडे नेसून कमळावर बसलेली लक्ष्मी, पांढरे झळाळते जरीकाठी लुगडे नेसून वीणा वाजवणारी सरस्वती कॅलेंडर आर्टमुळे आपल्याला आज घरोघरी दिसते.