

Ancient rock carvings push Konkan towards UNESCO world heritage status
esakal
ऋत्विज आपटे
पर्यटकांचे दोन मुख्य आकर्षण बिंदू आहेत. एक नैसर्गिक आणि दुसरा सांस्कृतिक-ऐतिहासिक. कोकण किनारपट्टीला या दोन्हींचा उत्तम वरदहस्त लाभलेला आहे. समुद्रकिनारे, धबधबे, फुले अशा नैसर्गिक गोष्टी तर आहेतच, पण सोबतीने गणेशोत्सव, शिमगा, दशावतारही आहे. या प्रकारचा ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा पर्यटनाला चालना देण्यासाठी पुष्कळ आहे, परंतु याच्या पल्याड जाऊन अगदी अश्मयुगीन म्हणावा असा वारसा गेल्या काही वर्षांत कोकणात समोर येताना दिसतो आहे, तो म्हणजे कातळ खोदचित्र (कातळशिल्प) रूपाने.
महाराष्ट्राच्या पश्चिम भागात अरबी समुद्राशी संलग्न असलेला ७२० किलोमीटर लांब आणि अंदाजे ३० किलोमीटर रुंद किनारपट्टीचा भाग म्हणजेच कोकण किनारपट्टी. भौगोलिकदृष्ट्या जरी हा प्रदेश एकसारखा दिसत असला, तरी भूशास्त्रीय जडणघडणीनुसार या भागाचे अजून तीन-चार विभाग करता येतात. उत्तर कोकणातील ठाणे, रायगड जिल्हे या भागाचा भूप्रदेश मुख्यतः बेसॉल्ट दगडाचा म्हणजेच काळ्या पाषाणाचा आहे आणि दक्षिण कोकणातील म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील भूप्रदेश मुख्यत्वे जांभ्या दगडाचा आहे आणि त्याचा विस्तार अगदी महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे, गोवा-कारवार करत केरळपर्यंत दिसतो. कोकणाची ओळख असलेला जांभा दगड प्रामुख्याने दक्षिण कोकणात किनाऱ्याजवळच्या पठारांच्या माथ्यावर आढळून येतो. या जांभ्या दगडाच्या कमी उंचीच्या पठारांना स्थानिक भाषेत ‘सडा’ असे म्हणतात.