esakal | साप्ताहिक राशिभविष्य ( ता. १८ एप्रिल २०२१ ते २४ एप्रिल २०२१)
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope

साप्ताहिक राशिभविष्य ( ता. १८ एप्रिल २०२१ ते २४ एप्रिल २०२१)

sakal_logo
By
श्रीराम भट saptrang@esakal.com

मनोमहिषाचा बळी द्या !

माणसाचा देह आणि मन हा एक अजब प्रकार आहे. प्रकृतीचे प्राकृत आपले एक अंगवस्र घेऊन मनाच्या प्रांगणात आपले पदर उलगडत विहार करत असतं. मन एक संस्कार घेऊन माणसाच्या देहाला खेळवत असतं ! आणि हे मनाचं खेळवणं करोनापेक्षाही भयानक असतं. मनाचा विकास साधणारा माणूस एक मानवी धर्म जपत असतो. माणसाची बुद्धी ज्यावेळी मनाला येईल तसे वागते त्यावेळी माणसाचं मन केवळ प्रवृत्त होऊन ते पशू बनत पाहावी होत असते. त्यामुळेच माणूस हा सुद्धा पशू (ॲनिमल) समजला जातो.

माणूस हे एक जाणिवेचं सौंदर्य आहे. आणि हे सौंदर्य टिकवून ठेवणारा माणूसच जाणीव कला जगणारा जीनियस असतो. किंवा असा माणूसच सहृदय असतो. असा हा सौंदर्यवान माणूसच मानवी मनोधर्म जपणारा मानव असतो! जाणिवेचे सौंदर्य लांडग्याला किंवा बोकडाला नसते. बुद्धीचे जाणणं माणसाला दिलं आहे. अशी ही माणूस जाणण्याची कला म्हणजेच ज्योतिष होय!

मित्र हो, सप्ताहात बुध शुक्र हर्षल असा त्रिग्रह योग मेष राशीत होत आहे. ज्योतिषात हर्षल हा बुद्धिवंतांचा कारक ग्रह आहे. बुद्धीचा विकास करणारा तोच हर्षल बौद्धिक राशीत बलवान ठरतो. सध्या माणसाचा मनोविकास खुंटला आहे. ‘दिसतं तसं नसतं. माणसानं आपल्या अंतरंगाचा ठाव घेतल्यावर विवेक जागृत होत असतो.’ सप्ताहातील मेषेतील बुध शुक्र हर्षल हा त्रिग्रह योग हेच सांगत आहे की, ‘बाहेरच्या जगात धुमाकूळ घालणाऱ्या आपल्या मनोमहिषाला किंवा मेंढ्याला आत्मबुद्धीच्या प्राणशक्तीपुढे एकांतात आत्मचिंतनातून बळी दिला पाहिजे.’

चौकार षटकार मारण्याचा कालखंड

मेष : राशीतील बुध शुक्र हर्षल त्रिग्रहयोग कलाकारांना मोठी संधी देणारा. ता. २२ व २३ हे दिवस ग्रहांचा फास्ट ट्रॅक ठेवतील. मारा चौकार षटकार. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट विक्रम तोडतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार संध्याकाळ घरात वृद्धांशी विसंवादाची ठरेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना आकारण जागरण होईल.

आर्थिक चिंता मिटतील

वृषभ : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात आर्थिक चिंता घालवेल. बॅंकेचे कर्ज मंजूर होईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२ व २३ हे दिवस वैयक्तिक सुवार्तांचे व शैक्षणिक चिंता घालवणारे ठरतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातून सुवार्ता. कलाकारांचे भाग्योदय, कॅम्पसमधून नोकरी मिळेल.

नोकरीच्या मुलाखतीत यश

मिथुन : ग्रहांचे फील्ड बॅंटिंगचेच राहील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट व्यावसायिक आर्थिक ओघ प्राप्त करून देईल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना बुध हर्षल शुक्र सहयोग हुकमी सीक्वेन्स लावणारा. थोरा मोठ्यांच्या ओळखी जबरदस्त क्‍लिक होतील. नोकरीसाठीच्या मुलाखतींच्या अंतिम फेरीत यश!

सरकारी व कोर्टप्रकरणात लाभ

कर्क : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात विजयी चौकार षटकार मारतील. तरुणांना सप्ताह ऑनलाईनच क्‍लिक होणारा. व्यावसायिकांना जुन्या गुंतवणुकींतून लाभ. मित्रांकडून लाभ. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सरकारी कामांतून वा कोर्ट प्रकरणातून लाभदायी. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील राजकारणातून त्रास.

तरुणांना परदेशी नोकरीची संधी

सिंह : सप्ताहातील बुध शुक्र हर्षल त्रिग्रहयोग मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अपवादात्मक परिस्थितीतून लाभ देणारा. तरुणांना परदेशी कॅम्पसमधून नोकरी. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील ग्रहांचे फील्ड पूर्णपणे फलंदाजीचे ! स्रीवर्ग वश होईल. अर्थात स्त्रीकडून लाभ. २३ ची कामदा एकादशी कामना पूर्ण करणारीच. अर्थात शुक्रवार शुभच.

स्थावर मिळकतींच्या व्यवहारात लाभ

कन्या : कोणतेही अरेरावी कृत्य करू नका. सिर्फ आम खानेका है ! नोकरीत संशयास्पद वागू नका. सप्ताहात स्त्रीचे संमोहन टाळाच. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात स्थावर मिळकतींच्या व्यवहारांतून लाभ होतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींची कर्ज मंजुरी होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना संसर्गजन्य बाधा. मास्क लावाच. गर्दी टाळाच.

ओळखी - मध्यस्थीतून मोठा लाभ

तूळ : सप्ताहात बुध हर्षल शुक्र त्रिसहयोग एक उत्तम पॅकेज अस्तित्वात राहील. ओळखी मध्यस्थींतून मोठे लाभ. ता. २२ व २३ हे दिवस मोठ्या कनेक्‍टिव्हीटीचे. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ. नोकरीतील घटना भाग्योदयीची चाहूल देतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहीच सुरुवात मानसिक करोना घालवणारी. स्रीचा सल्ला घ्या.

व्यावसायिक वसुली होईल

वृश्‍चिक : तरुणांनी सप्ताहात प्रेम प्रकरणं जपावी. हल्ली वेडं होणं परवडत नाही! अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात भावनावेग आवरावा. बाकी सप्ताह व्यावसायिक वसुली करून देणारा. ता. २२ व २३ हे दिवस व्यावसायिक करामदार गाठी भेटींतून अतिशय सुसंवादी राहतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार स्रीहट्टातून त्रासाचा.

सगळींकडून स्वागतच होईल

धनु : सप्ताहात सुंदर ट्रॅक पकडणारी रास राहील. बुध शुक्र हर्षल त्रिगृहयोग गुरुच्या अधिष्ठानातून सुंदर फळे देईल. जिथे जाल तिथे आगत स्वागतच होईल. अर्थातच सोशल डिस्टन्स ठेवून ! सप्ताहात मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मोठं बॅटिंग फील्ड राहील. नोकरीचे फायनल इंटरव्ह्यू होतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना २३ चा शुक्रवार भन्नाट ठरेल.

तरुणांचा भाग्योदय होईल

मकर : उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात सुवार्तांतून फ्लॅश न्यूजमध्ये राहतील. नोकरीतून परदेशी संधी येतील. घरातील तरुणांचे भाग्योदय होतील. ता. २३ व २४ हे दिवस श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सुवार्तांच्या कोषातच ठेवतील. प्रेम प्रकरणांमधील विसंवाद संपतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार खरेदीत फसण्याचा.

विवाहाचे निर्णय लांबणीवर नकोत

कुंभ : बुध शुक्र हर्षल त्रिग्रहयोगातून स्वैर फलंदाजी करणार आहात. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती मोठा लाभ उठवतील. ता. २२ व २३ हे दिवस अतिशय प्रवाही राहतील. विवाहाचे निर्णय लांबवू नका. उरका लवकर. घनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी उद्याचा सोमवार सुवार्तांतून फ्लॅशन्यूजमध्ये आणणारा. पूर्वाभाद्रपदा व्यक्तींसाठी मात्र शनिवार बेरंगाचा.

आर्थिक कोंडीतून सुटका होईल

मीन : सप्ताह व्यावसायिक आर्थिक ओघ प्राप्त करून देणारा. वसुली होईल. सप्ताह उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना आर्थिक कोंडीतून बाहेर काढेल. बॅंकांची कामे होतील. ता. २१ ची रामनवमी घरात सुवार्तांची. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवार धनवर्षावाचा. ठरेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना मात्र शनिवार गुप्त चिंतेचा ठरेल.