esakal | जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 1 ते 7 मार्च
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 1 ते 7 मार्च

पंचांग 1 मार्च 2020 

रविवार ः फाल्गुन शुद्ध 6, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.56, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय सकाळी 10.59, चंद्रास्त रात्री 11.56, भारतीय सौर फाल्गुन 11, शके 1941. 

जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 1 ते 7 मार्च

sakal_logo
By
श्रीराम भट

गंभीर तूं श्रीरामा! 

माणसाच्या जीवनाचा जिव्हाळा जसा अलौकिक आहे तसंच माणसाच्या जीवनाचं गांभीर्यही मोठं खोल आणि अतिगंभीर आहे. माणसाच्या जीवनाचं गांभीर्य अनुभवणारं तसंच ते वाढवणारं ज्योतिषशास्त्र हे निश्‍चितच एक गूढशास्त्र आहे! 
महाविष्णूंचं अनंततत्त्व आकाशाला पोटात घालून एक दीर्घ श्वास घेत असतं किंवा दीर्घ श्वास सोडत असतं. श्रीकृष्णानं अर्जुनाला दाखवलेलं विश्र्वरूपदर्शन हा एक प्रकारचा दीर्घ श्वासच होय! मुंगीचा किंवा माणसाचा चिमुकला श्वास या महाविष्णूंच्या दीर्घ श्वा‍सात हुंकारत असतो म्हणतात! शिवाय, असं हे मुंगीचं म्हणा किंवा माणसाचं म्हणा, श्वासावरील स्वामित्व अखेरचा श्वास सोडत असतं आणि मग या अखेरच्या श्वासानंतर कुणीतरी त्या माणसासाठी तीळ तीळ तुटत तिलांजली देत असतं म्हणे!

असा हा तथाकथित जाणता माणूस आपलं जाणतेपणाचं गांभीर्य उगाचच वाढवत असतो असंच म्हणावं लागेल. माणसाच्या जाणतेपणाचा श्वास आणि व्हेंटिलेटर लावून घेतलेला श्वास हे आकाशातील वायूचं स्पंदनच असतं. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत 
भगवंत म्हणतात : ‘वायूचं श्वसन मीच आहे!’ याचा खोल अर्थ जाणून घेतल्यास माणसानं आपल्या जीवनाचं अकारण वाढवलेलं गांभीर्य तत्काळ नाहीसं होऊन त्याचा श्र्वास अनन्यातून अनंत होतो! 

सध्या भारतीय माणसानं आपल्या जीवनाचं गांभीर्य पराकोटीचं वाढवलं आहे, त्यामुळेच तो धापा टाकत श्वास घेतोय! प्रपंचाचं गांभीर्य आणि परमार्थातील गांभीर्य यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. 

गंभीर तूं श्रीरामा। नानाभूतैकसमा। 
सकळगुणी अप्रतिमा। अद्वितीया।। 

- संत ज्ञानेश्वरमहाराज 

वरील ओवीत विश्वरूपदर्शनाचा तत्त्वबोध दडला आहे. असा हा तत्त्वबोध जाणून घेऊन माणसाच्या जगण्यातील पारमार्थिक गांभीर्य अनुभवलं पाहिजे! फलज्योतिषातील प्लूटो हा ग्रह अशा या गांभीर्याचा कारक ग्रह आहे! 
मित्र हो, ता. सात मार्चच्या शनिवारी सूर्योदयीच्या शनीच्या होऱ्यात प्लूटो भारताच्या मकर राशीत प्रवेश करत आहे. भगवद्‌गीतेतील वरील पारमार्थिक गांभीर्य ओळखूनच आगामी काळात भारतीय माणसानं भगवंतांच्या स्मरणातच श्वास घेतला पाहिजे! 
=========== 

विवाहप्रस्तावांकडे लक्ष द्या 

मेष : राशीतील शुक्रभ्रमण फाल्गुनोत्सव साजरा करणारं. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींचे ‘होले होले’ होईल! विवाहप्रस्तावांकडे लक्ष द्या. ता. चार व पाच मार्च हे दिवस अत्यंत प्रवाही. जनसंपर्कातून मोठी कामं होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवारची संध्याकाळ शुभदायक. मात्र, शनिवारी तिन्हीसांजेला काळजी घ्या. 
=========== 

नोकरीत वरिष्ठांचा मान ठेवा! 

वृषभ : अष्टमस्थ मंगळभ्रमण रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी दखलपात्र. मित्रांची मनं जपा. नोकरीत वरिष्ठांचा मान ठेवा. बाकी, ता. तीन ते पाच हे दिवस सरकारी कामांचे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार शुभदायक. शनिवारी सूर्योदयी बेरंग होण्याची शक्यता. वस्तूंची नासधूस. स्त्रीवर्गाशी वाद शक्य. 
=========== 

बेकायदेशीर व्यवहार नकोत 

मिथुन : सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. शनी आणि मंगळ यांची फील्डिंग राहील. अजिबात अरेरावी नको. बेकायदेशीर व्यवहार टाळा. बाकी, पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणाची गुप्त मदत होईल. सीर्फ आम खाने से मतलब रखो! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा हे दिवस अनेक प्रकरणांतून बेरंगाचे. शब्द जपून वापरा. 
=========== 

संमोहनापासून दूर राहा 

कर्क : हा सप्ताह ग्रहांच्या गुगली गोलंदाजीतून यष्टिबाद करू शकतो. कोणत्याही संमोहनाला बळी पडू नका. राजकीय डावपेचाचे बळी होऊ शकता. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीच्या विरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता. बाकी, पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रभ्रमणाद्वारे मोठे व्यावसायिक लाभ उठवतील. उत्सव-प्रदर्शनांतून लाभ. शनिवार ठेचकाळण्याचा. 
=========== 

जीवनातील सुरावट साधाल! 

सिंह : हा सप्ताह बुद्धिजीवींना अप्रतिमच राहील. आजचा रविवार भाग्यबीजं पेरणारा. व्यवसायातल्या प्रयत्नांना यश येईल. कलाकारांसाठी मोठा सुंदर सप्ताह! मघा नक्षत्राच्या व्यक्ती जीवनातील सुरावट साधतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार विलक्षण सुवार्तांचा. शनिवार सूर्योदयी बेरंग करणारा. 

=========== 

शेजाऱ्यांशी हुज्जत नको 

कन्या : मंगळाची कडक फील्डिंग राहील! रस्त्यावर वावरताना काळजी घ्या. शेजाऱ्यांशी हुज्जत नको. गर्दीच्या ठिकाणी व्हायरसपासून जपा. बाकी, हा सप्ताह व्यावसायिक वसुलीचा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार नोकरीत सुवार्तेचा. पगारवाढ. शनिवारी घरातील वृद्धांशी वाद शक्य. संयम बाळगा. 
=========== 

तरुणांचं प्रेमप्रकरण फुलेल 

तूळ : या सप्ताहाला शुक्रभ्रमणाची एक किनार राहील. तरुणांचं प्रेमप्रकरण फुलेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती कात टाकतील. ता. चार व पाच हे दिवस अतिशय भन्नाट राहतील. मारा विजयी चौकार-षटकार! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाची संधी. मात्र, शनिवार संसर्गजन्य व्हायरसचा. लहान मुलांची काळजी घ्या. 
=========== 

नोकरीत अनपेक्षित भाग्योदय 

वृश्र्चिक : या सप्ताहाची सुरुवात वैयक्तिक सुवार्तांचीच. सोमवारची संध्याकाळ मोठ्या मौजमजेची. वैवाहिक जीवनात शुभ घटना घडतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीत अनपेक्षित भाग्योदय. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. चार व पाच या दिवशी मौल्यवान वस्तू जपाव्यात. चोरी-नुकसानीची शक्यता. शनिवार मनाविरुद्ध प्रवासाचा. 
=========== 

सरकारी प्रकरण जपून हाताळा 

धनू : शुभ ग्रहांची गुप्त रसद या सप्ताहात पुरवली जाईलच. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांद्वारे चर्चेत राहतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींवर शनी-मंगळाच्या फील्डिंगद्वारे सप्ताहाच्या शेवटी दबाव निर्माण होण्याची शक्यता. एखादं सरकारी प्रकरण सतावू शकतं. 
जपून हाताळणी करा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना भ्रातृविरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता. 
=========== 

व्यावसायिक भाग्योदयाचा काळ 

मकर : हा सप्ताह मंगळभ्रमणातून धुरळा उडवू शकतो. वाद वाढवू नका. बाकी, आजचा रविवार शुभशकुन घेऊन येईल. श्रवण नक्षत्राच्या कलाकारांना मोठे लाभ होतील. उद्याचा सोमवार व्यावसायिक भाग्यबीजं पेरणारा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट साडेसातीची जाणीव करून देणारा. वैवाहिक जीवनातील आचारसंहिता पाळावी. 
=========== 

समजून-उमजून वागा! 

कुंभ : या सप्ताहात राशीचा नेपच्यून क्रियाशील होऊ लागेल. शनीचा तत्त्वविचार समजून घेऊन वागल्यास जीवनाचा अमृतकुंभ होत असतो हे लक्षात ठेवा! बाकी, पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणातून काही लाभ होतील. ता. चार व पाच हे दिवस अतिशय प्रवाही. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र गुप्त चिंतेचा. 
===========

नोकरीत आचारसंहिता पाळा 

मीन : हा सप्ताह दशमस्थ मंगळाच्या दबावातून जाणारा. नोकरीतील आचारसंहिता पाळावी. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. चार व पाच हे दिवस एखाद्या वादात ओढणारे. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार सूर्योदयी सुवार्तेचा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार मानसन्मानाचा. मोठी सरकारी कामं होतील. 

०००===========०००