esakal | जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : एक ते सात सप्टेंबर 
sakal

बोलून बातमी शोधा

bhavishya

मित्र हो, असे हे ज्येष्ठराज श्रीगणेश सर्व विद्यांचं मूळ आहेत, सत्याचं सत्य आहेत. पूर्णाचं पूर्णत्व आहेत. त्यामुळेच त्यांचा प्रणवरूपी हुंकार अक्षराला ओलावा देतो आणि निरवयवाला आलिंगन देत समर्पित होत असतो! 

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : एक ते सात सप्टेंबर 

sakal_logo
By
श्रीराम भट

सध्या गुरू ज्येष्ठा नक्षत्रात भ्रमण करत असताना ज्येष्ठराज श्रीगणेशाचं आगमन होत आहे. ज्येष्ठा हे नक्षत्र भववृक्षाचं मूळ आहे म्हणूनच त्याचा अश्र्वत्थाशी संबंध आहे. श्रीगणेश हे ज्येष्ठराज आहेत म्हणूनच जीवनाशी किंवा चक्क जीवनमंत्राशीच श्रीगणेशाचा संबंध आहे. 

ओंकाराच्या त्रिमात्रांचा (अ, उ, म) वाचेशी संबंध आहे. वाचेचा संकल्पाशी संबंध आहे. बावन्न मातृकांचा आधार घेत प्रणवाकडून वाचा वदवली जाते, त्यामुळेच वेदसुद्धा वदवले गेले. वाचा, विचार आणि संकल्परूप आचार ही एक प्रणवाची गतीच म्हटली पाहिजे. प्रणव आणि प्राण यांचा घनिष्ठ संबंध आहे. प्रणव आणि प्राण हे शेवटी एकच व्हावे लागतात. प्रणवामध्ये प्राण ओतल्यानंतर सत्याचा हुंकार निघत असतो; किंबहुना प्राणाची प्रणवाशी गाठ घालून दिल्यानंतरच हृदयात श्रीगणेशांची प्रतिष्ठापना होत असते आणि मग सत्य वदवणारी ‘सत्यं वच्मि’ अशी गणेशविद्या अंतर्यामी प्रकट होत असते. 
जीवनाचा मूलाधार असलेले श्रीगणेश जीवनाचीच गती आहेत. माणसाचा ‘मी’ हा ज्या वेळी सत्यसंकल्पाशी जोडला जातो त्या वेळीच तो सिद्धपदास प्राप्त होतो. माणसाचं जीवन सिद्ध होण्यासाठी माणसाची प्रणवोपासना अर्थातच श्रीगणेशविद्या सिद्ध व्हावी लागते. एकम्‌, नित्यम्‌ असं श्रीगणेशतत्त्वच प्रणवरूपानं या सृष्टीत नांदत असतं. माणसाच्या जीवनातलं शब्दसृष्टीला आधारभूत असलेलं हे श्रीगणेशतत्त्व हे एक प्रकारचं मंत्रसामर्थ्यच आहे. ज्या वेळी शब्दांतून भावजागृती होते त्या वेळीच ते मंत्र बनत असतात. माणूस आणि माणसाचा शब्द हा प्रणवप्रकाशातच जगला पाहिजे. माणसानं आपला प्राण प्रणवासाठी खर्ची घातला पाहिजे. अर्थातच तो प्राण प्रणवरूपी सत्यसंकल्पात ओतला पाहिजे आणि अशी अथर्वशीर्षाची आवर्तनं ध्यानावलंबनात परिवर्तित केली पाहिजेत. 

मित्र हो, असे हे ज्येष्ठराज श्रीगणेश सर्व विद्यांचं मूळ आहेत, सत्याचं सत्य आहेत. पूर्णाचं पूर्णत्व आहेत. त्यामुळेच त्यांचा प्रणवरूपी हुंकार अक्षराला ओलावा देतो आणि निरवयवाला आलिंगन देत समर्पित होत असतो! 
=========== 
कौतुक वाट्याला येईल 
मेष : सप्ताहात भरणी नक्षत्राच्या व्यक्तींचे कौतुकसमारंभ होतील. या कौतुकसमारंभाला शुक्रभ्रमणाचं नेपथ्य राहील. मिरवून घ्याच. ता. तीन आणि चार हे दिवस तुमच्या राशीसाठी एकूणच भारलेले. शुक्रवारची दुर्गाष्टमी तरुणांसाठी भाग्योदयाची. 
=========== 
परदेशी नोकरीची संधी 
वृषभ : सप्ताहात संचितातले ट्रॅव्लहर चेक्‍स वटणार आहेत! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींची लाईफ स्टाईल बदलेल. ऋद्धी-सिद्धी सतत बरोबर राहतील. सप्ताहाची सुरवात आणि शेवट मोठी भाग्यबीजं पेरणारा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरीची संधी. 
=========== 
रस्त्यावरची भांडणं टाळा 
मिथुन : हा सप्ताह शुक्रकलांद्वारे साजरा होईल. कलाकारांचा भाग्योदय. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती काही दिव्यानुभूती घेतील... दृष्टान्त होतील! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ऋषिपंचमीचा मंगळवार स्पर्धात्मक यश देईल. काहींना सेलिब्रेटींचा सहवास. शनिवारी रस्त्यावरची भांडणं टाळा. 
=========== 
प्रसन्नता अनुभवाल 
कर्क : या सप्ताहात आकर्षणाचा केंद्रबिंदू व्हाल. गणेशोत्सवातला हा सप्ताह प्रेमवीरांसाठी भावस्पर्शाचा; धक्काबुक्कीचा नव्हे! पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती प्रसन्नता अनुभवतील. नोकरीतलं एखादं यश सुखद धक्का देईल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना दुर्गाष्टमीचा शुक्रवार सुवार्तांचा. 
=========== 
घरात आनंदी वातावरण 
सिंह : या सप्ताहात मौजमजा करणार आहात. घरात आनंदी वातावरण राहील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट शुभग्रहांच्या स्पंदनांचा. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरी-व्यवसायात सुंदर टप्पा सुरू होईल. एखादं जुनं व्यावसायिक खटलं संपेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी 
आई-वडिलांची मनं जपावीत. 
=========== 
उखाळ्यापाखाळ्या नकोत 
कन्या : या सप्ताहात कुणाच्याही उखाळ्यापाखाळ्या काढू नका. रस्त्यावर हमरीतुमरी नको. भावंडांची मनं सांभाळा. बाकी, हस्त नक्षत्राच्या व्यक्तींनी या सप्ताहात बुध-मंगळ युतियोगाच्या पार्श्‍वभूमीवर काळजी घ्यावी. फसवणुकीची शक्यता. बाकी, ता. पाच व सहा हे दिवस मोठे रंजक. वैवाहिक जीवनात सुवार्ता. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मान-सन्मान. 
=========== 
नोकरीत वरिष्ठांची मर्जी 
तूळ : या सप्ताहातली सेलिब्रिटी रास. शुक्रकलांचा लाभ घ्याल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सुंदर ग्रहमान. ता. पाच व सहा हे दिवस शुभग्रहांच्या पॅकेजचे. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना एखाद्या नाजूक स्त्रीहट्टातून त्रास! चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत लाभ. वरिष्ठांची मर्जी राहील. 
=========== 
मौनं सर्वार्थ साधनम् 
वृश्‍चिक : या सप्ताहात परस्परविरोधी असं विचित्र ग्रहमान होत आहे. फक्त मौन पाळा म्हणजे सर्व साध्य होईल. गुरू-शुक्राच्या विशिष्ट स्थितीतून लाभदायक सप्ताह. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच आणि सहा या दिवशी मोठी अजब फळं मिळतील. दुष्टचक्र संपेल. 
=========== 
बेकायदेशीर व्यवहार टाळा 
धनू : सप्ताहात रवी-मंगळ युतीचा उत्तम प्रभाव राहील. मात्र, बेकायदेशीर व्यवहार टाळा. प्रलोभनं टाळा. सहवासातल्या स्त्रीवर्गाचा अहंकार तोषवा! बाकी पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी शुक्रकलांतून अफलातून लाभ. एखादं ग्लॅमर लाभेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाची संधी. 
=========== 
व्यवसायात मोठी तेजी 
मकर : संसर्गजन्य बाधेपासून काळजी घ्या. गर्दीची ठिकाणं टाळा. 
श्र्वानदंशापासून जपा. बाकी, व्यवसायात मोठी तेजी. ता. पाच आणि सहा हे दिवस शुभ ग्रहांच्या पॅकेजचे. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना राजाश्रय अर्थातच विशिष्ट अनुदानातून लाभ. भूखंड सोडवाल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात सुवार्ता मिळतील. 
=========== 
कुरघोड्या करू नका 
कुंभ : राशींच्या एक्स्चेंजमध्ये हुकमत गाजवणारी रास राहील! शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात शुक्रकलांचा परिपूर्ण लाभ मिळेल. मात्र, रवी-मंगळ-बुध सहयोग राजकारणासंदर्भात खराब. कुरघोड्या टाळा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहाच्या शेवटी जीवनातली एखादी मॅरेथॉन जिंकतील. मात्र, प्रेमप्रकरणं जपून हाताळा! 
=========== 
उधार-उसनवारी जपून 
मीन : वादग्रस्त व्हाल असं वर्तन या सप्ताहात करू नका. 
रवी-मंगळ-बुध यांचा सहयोग क्रिया-प्रतिक्रियांतून काहीसा त्रासाचाच. काळजी घ्या. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. उधार-उसनवारी जपून करा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना दुर्गाष्टमीचा शुक्रवार मोठ्या सुवार्तांचा. परदेशी नोकरी. कर्जवसुली. 

loading image
go to top