राशिभविष्य (ता. १० जानेवारी २०२१ ते १६ जानेवारी २०२१)

श्रीराम भट
Sunday, 10 January 2021

आत्मनिर्भर व्हा, आत्मप्रतिष्ठित व्हा
मनुष्य हे अवधानाचं एक ध्यानमंदिरच होय. या ध्यानमंदिरात ईश्‍वराची प्राणप्रतिष्ठा होत असते; किंबहुना मनुष्य ही अमूर्त ईश्‍वराची मूर्तिरूप प्राणप्रतिष्ठाच! आणि ती त्याच्या हृदयात नांदत असते. माणूस ही एक संक्रमित होत जाणारी प्रदक्षिणा आहे. ज्योतिष हे माणसाच्या संक्रमणांचा अभ्यास करत असतं.

आत्मनिर्भर व्हा, आत्मप्रतिष्ठित व्हा
मनुष्य हे अवधानाचं एक ध्यानमंदिरच होय. या ध्यानमंदिरात ईश्‍वराची प्राणप्रतिष्ठा होत असते; किंबहुना मनुष्य ही अमूर्त ईश्‍वराची मूर्तिरूप प्राणप्रतिष्ठाच! आणि ती त्याच्या हृदयात नांदत असते. माणूस ही एक संक्रमित होत जाणारी प्रदक्षिणा आहे. ज्योतिष हे माणसाच्या संक्रमणांचा अभ्यास करत असतं. मन, प्राण आणि शरीर हे काळानुसार संक्रमित होत असतात आणि हे काया-वाचा-मनाचं संक्रमण ज्या वेळी हृदयात आत्मप्रतिष्ठित होत असतं, त्या वेळीच मकर संक्रान्त उदय पावत असते! मकर राशीतील श्रवण नक्षत्र हे महाविष्णूंची प्रतिष्ठाच होय. श्रवण हे नक्षत्र महाविष्णूंचा प्राण आहे आणि हा प्राण प्रणवरूपात स्वतःतच आपल्या स्वरूपाचं नामसंकीर्तन करत असतो किंवा ऐकत असतो. अशी ही मकर राशीतील श्रवण नक्षत्राची आत्मसाधना मकर संक्रान्तीच्या दिवशी आत्मप्रतिष्ठित होत असते!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपल्या संस्कृतीतील पौराणिक कथांतून गूढ असा आध्यात्मिक बोध दडलेला आहे. असं म्हणतात की श्रीविष्णूंनी त्रिलोकात आपली प्रतिष्ठा राहावी किंवा आपली अपकीर्ती होऊ नये म्हणून तीन कपालांवर याग केला, त्यामुळेच श्रीविष्णूंनी आपल्या तीन पावलांनी द्युलोक, अंतरिक्ष, पृथ्वी असा त्रिलोक व्यापून टाकला आणि आपली आत्मप्रतिष्ठा श्रवण नक्षत्रावर करून ते नामसंकीर्तनातून स्वतःतच अद्वयानंद भोगू लागले! हीच ती श्रवण नक्षत्राची संक्रमित होणारी अर्थातच आत्मसंक्रमण किंवा आत्मसमर्पण करणारी प्रदक्षिणा! आणि हेच ते प्राणाच्या प्रणवाचं श्रवण किंवा गुणगान होय! 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मित्र हो, माणूस ही एक अष्टधा प्रकृतीची चेष्टा आहे. या स्वचेष्टेची संभाषणं माणूस मनात करत असतो किंवा ती दुसऱ्याला सांगत असतो. माणसाच्या स्वचेष्टांची संभाषणं बंद झाली की खरी आत्मसाधना सुरू होते. यंदाची मकर संक्रान्त श्रवण नक्षत्रावर गुरुवारी होत आहे. गुरू मकर राशीत असताना आणि तोसुद्धा श्रवण नक्षत्रात असताना होणारी ही मकर संक्रान्त शनीच्याच प्रासादात कर्मशुद्धीतून आपणा सर्वांना आत्मप्रतिष्ठाभवनी विराजमान करो आणि आपला संक्रमित होणारा संसार गोड करो! तीळ-गूळ घ्या, गोड बोला आणि भगवंताचं गोड नाम श्रवण करा!

व्यवसायात भाग्योदय
मेष :
राशीचं मंगळभ्रमण आणि गुरुभ्रमणाची विशिष्ट स्थिती अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तमच राहील! ता. १४ व १५ हे दिवस व्यवसायात भाग्यबीजं पेरणारे. तरुणांना नोकरी लागेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना यंदाची मकर संक्रान्त दैवी चमत्काराची. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपास मातृ-पितृचिंता. 

संत-सज्जनांचा सहवास
वृषभ :
भाग्यातील गुरूमुळे यंदाचं मकरसंक्रमण महत्त्वाचंच. ‘आत्मनिर्भर’ व्हाल. जीवनात संत-सज्जनांचा प्रवेश होईल. कृत्तिका नक्षत्राच्या तरुणांचं नैराश्‍य जाईल. ता. १४ ते १६ हे दिवस जीवनात रंग भरणारे. शुक्रवारी रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायात ‘खुल जा सिम् सिम्’चा अनुभव! मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या यंत्रपीडेची. 

घरातील स्त्रियांची मनं जपा
मिथुन :
या सप्ताहात ग्रहांच्या सत्तासंघर्षानं बाधित होणारी रास. तुमच्या राशीच्या व्यक्तींनी अमावास्येच्या आसपासच्या काळात जपूनच राहिलं पाहिजे. घरातील स्त्रियांची मनं जपा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी खरेदी-विक्रीचे व्यवहार जपून करावेत. भावा-बहिणींशी वाद टाळावेत. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात राजकीय व्यक्तींचा जाच. 

दैवी प्रचीतीचा सप्ताह
कर्क :
मकरसंक्रमणाचा हा सप्ताह मोठ्या ग्रहयोगांचा. तरुणांना निश्र्चितच लाभप्रद. बुध-गुरू शुभयोग तारक ठरेल. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. ता. १४ व १५ या दिवशी पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना अद्वितीय फळं मिळतील. विशिष्ट स्पर्धात्मक यश. अमावास्येच्या आसपासच्या काळात वादग्रस्त गाठी-भेटी टाळा. राजकीय व्यक्तींपासून दूर राहा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचीती. 

कलाकारांचा सन्मान
सिंह :
शनी-मंगळाचा योग आणि मकर संक्रान्तीच्या आसपासची अमावास्या ग्रहांच्या सत्तासंघर्षाचीच. सप्ताहात वादग्रस्त मुद्दे टाळा. बेकायदेशीर प्रकरणात अडकू नका. बाकी, मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवारी सुवार्ता मिळतील. ओळखी-मध्यस्थीतून तरुणांना उत्तम नोकरीचा लाभ. कलाकारांचा सन्मान. 

तेजोवलयांकित व्हाल! 
कन्या :
यंदाचं मकरसंक्रमण गुरूकृपेचं. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती तेजोवलयांकित होतील. मात्र, अमावास्येच्या आसपासच्या काळात यंत्रं, वाहनं आणि विद्युत-उपकरणांपासून जपून राहा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी सुवार्ता मिळतील. विवाहेच्छूंचा विवाह ठरेल. वास्तुयोग. 

मनःप्रक्षोभ होऊ देऊ नका 
तूळ :
सप्ताहातील सप्तमस्थ मंगळ-हर्षल यांची स्थिती अमावास्येच्या आसपासच्या काळात ज्वालाग्राही राहील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींनी मनःप्रक्षोभ होऊ देऊ नये. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या सार्वजनिक जीवनात कटकटीची. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना मकर संक्रान्तीला नोकरीत शुभ वार्ता समजेल. 

मोठ्या यशाची चाहूल
वृश्र्चिक :
आजचा रविवार मोठ्या यशाची चाहूल देणारा. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० व ११ रोजी महत्त्वाच्या कामांत यश. विवाहेच्छूंचा विवाह ठरेल. अमावास्येच्या आसपासच्या काळात ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना काल्पनिक भयभीती सतावू शकते. नका करू भविष्याचा विचार. यंदाचं मकरसंक्रमण तुमच्या राशीला गुरूची भेट घडवेल! 

संयम बाळगावा
धनू :
या सप्ताहात अमावास्येच्या आसपासच्या काळात शनी-मंगळ या ग्रहांचा सत्तासंघर्ष होणार आहे. अमावास्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातल्या मंडळींना वादात ओढणारी. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी संयम बाळगावा. बाकी, ता. १४ ते १६ या दिवशी पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचे शिक्षण-नोकरी-विवाह यासंदर्भातले प्रश्न मार्गी लागतील. 

संक्रान्तीला गुरुकृपा होईल
मकर :
अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात तुमच्या राशीत ग्रहांची शिखर परिषद होत आहे! अर्थातच, या काळात शनी-मंगळाचा सत्तासंघर्ष जोर धरेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासचा काळ वादग्रस्त पार्श्वभूमीवर काहीसा नाजूक. बाकी, यंदाचं गुरुवारचं मकरसंक्रमण निश्र्चितच गुरुकृपेचं. ता. १४ ते १६ हे दिवस तुमच्या राशीला चढत्या क्रमानं शुभ. तरुणांचा भाग्योदय. वाहनं जपून चालवा. 

नोकरीत भाग्योदय
कुंभ :
बुध-गुरू-शनी सहयोग तुमच्या राशीला गुप्तपणे सहकार्य करेल. मौनात राहून आनंद घ्या! कलियुगात मौन ग्रहपीडानिवारण करत असतं! ता. १० व ११ हे दिवस तुमच्या राशीला एकूण छानच! शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक सुवार्ता मिळतील. सप्ताहाच्या शेवटी पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीत भाग्योदय. 

आत्मिक बळ वाढेल
मीन :
मकरसंक्रमणाचा सप्ताह तुमचं आत्मिक बळ वाढवेल. आजचा रविवार दैवी प्रचीतीचा. कलाकारांचा भाग्योदय. अमावास्येच्या आसपासचा काळ रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सार्वजनिक जीवनात कटकटीचा. गैरसमज टाळावेत. बाकी, ता. १४ व १५ हे दिवस बुध-गुरू सहयोगाच्या पार्श्वभूमीवर निखालस शुभ! उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरी. मित्रांकडून लाभ.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekly horoscope 10th January to 16th January 2021