जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट

weekly horoscope 11august to 17 august 2019
weekly horoscope 11august to 17 august 2019

माणसांतले लव्हबर्डस्‌  नाहीसे होत आहेत? 
माणसाला ‘जीवपक्षी’ असंही म्हटलं जातं. जीवपक्षी असलेला मनुष्य जीवनाचा विहंगमार्ग अनुसरत असतो. एरवीच्या पक्ष्याप्रमाणेच आकाशाशी नातं जोडणारा माणूसरूपी जीवपक्षीही घरटं करून राहतो आणि स्वप्नांच्या पंखांनी आकाशात विहरताना घरट्याचंही स्मरण नेहमीच ठेवतो. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) माणूस आणि माणसाचं मन विशिष्ट स्मृतींना घट्ट पकडून आपल्या मनातल्या मनात माया-ममतेचं उबदार घरटं 

निर्माण करत असतं. माणसं ही एक प्रकारची लव्हबर्डस्‌च असतात. पक्ष्यांमधले लव्हबर्डस्‌ घरट्यात किंवा बाहेरच्या आकाशातल्या मर्यादित अवकाशात एकमेकांच्या आसपास वावरत असतात, झेपावत असतात आणि पंखांची फडफड करत असतात. पक्ष्याचं घरटं किंवा माणसाचं घरटं यात तसा काहीही फरक नाही. फक्त एवढंच की पक्ष्यांचे जगण्याचे संदर्भ माणसाइतके गुंतागुंतीचे नसतात. माणसानं आपल्या जगण्याचे संदर्भ इतके प्रचंड गुंतागुंतीचे केलेले आहेत की तो खऱ्या अर्थानं लव्हबर्ड होऊच शकत नाही. माणसं घरात पिंजऱ्यात लव्हबर्डस्‌ पाळतात आणि त्यांना लव्हबर्डस्‌ होण्याच्या खऱ्या आनंदापासून वंचितच करतात. खरे लव्हबर्डस्‌ हे स्वतःला माणसांप्रमाणे कोंडून घेत नसतात तर ते एकमेकांबरोबर राहत आपलं आकाश धुंडाळत असतात! 

खरं तर प्रेमाची घरटी ही मनात घर करून असतात आणि अशी ही घरटी लव्हबर्डस्‌चीच असतात. मात्र, माणसाची तथाकथित घरटी ही फक्त कार्पेट एरियाशी संबंधित असतात! 

‘मन जपणारा तोच माणूस’ असं म्हटलं जातं; परंतु हल्ली अशी मनातली घरटी जपणारा माणूस दुर्मिळ होत चालला आहे. त्यामुळेच माणसांतले लव्हबर्डस्‌ नाहीसे होत चालले आहेत. माणसं हल्ली लव्हबर्डस्‌सारखी आसपास वावरत असतात; परंतु त्यांचा आत्मा लव्हबर्डस्‌चा नसतो. 

सच्चे प्रेमिक असं म्हणतात की तू कितीही दूर गेलास किंवा गेलीस तरी मी तुझ्या जवळच आहे. याचा मथितार्थ असाच होतो की प्रेम हे एक चिंतन आहे आणि हे चिंतन जितकं म्हणून व्यापक होतं तितकं ते आकाशापेक्षाही मोठं होतं. प्रेमबंधन हेच ज्या वेळी अखंड चिंतन बनतं त्या वेळी हे बंधन आकाशात आकाश होऊन राहतं. त्यामुळेच ते आपल्या आसपासच सतत लव्हबर्ड होऊन राहत असतं. सप्ताहातलं रक्षाबंधन हे असंच एक प्रेमबंधन आहे. त्यामुळेच ते सृष्टीतलं प्रेम चिरंतन ठेवतं! 

महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल 
मेष : हा सप्ताह प्रचंड गतिमान राहील. सप्ताहात चंद्रकलांचं भरतं राहील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी यंत्रं, वाहनं आणि विद्युत्‌-उपकरणं यांच्यापासून जपून राहावं. बाकी, पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र एखादी मोठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती प्रेमात पडतील. 

जीवनाची क्षितिजं रुंदावतील! 
वृषभ :
पौर्णिमेचा सप्ताह अलौकिक फळं देईल. मृग नक्षत्राच्या व्यक्ती ता. १३ ते १५ या कालावधीत जीवनातला स्वातंत्र्योत्सव साजरा करतील. जीवनाची क्षितिजं रुंदावतील! शुभ ग्रहांचं ग्रीनकार्ड मिळेल. ‘टेक ऑफ’ घ्याल. 

जिभेवर नियंत्रण ठेवा 
मिथुन :
अन्न-पाण्यातून संसर्ग होणार नाही याची काळजी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात घ्या. सावध राहा. जिभेवर नियंत्रण ठेवा. स्त्रीवर्गाची थट्टा-मस्करी नको! जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय व्यक्तींकडून लाभ. 

आरोग्यविषयक पथ्यं पाळा 
कर्क :
पौर्णिमेच्या आसपासचं क्षेत्र तुमच्यासाठी अप्रतिम. मात्र, आरोग्यविषयक पथ्यं पाळा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ‘व्हिटॅमिन एम’चा पुरवठा होईल, अर्थातच मोठी अर्थप्राप्ती होईल. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात नूतन वास्तुप्रवेश. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना  ता. १६ व १७ हे दिवस सार्वजनिक जीवनात कटकटीचे. काळजी घ्या. 

कलेच्या माध्यमातून प्रसिद्धी 
सिंह :
या सप्ताहात पौर्णिमेचं भरतं राहील. प्रवासात काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. सप्ताहातली गुरुभ्रमणाची स्थिती 
तरुण-तरुणींच्या बाबतीत क्लिक होणारी. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रांच्या सहकार्यातून लाभ. मुलाखतींतून यश. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना कला-छंद या माध्यमातून मोठी प्रसिद्धी. 

व्यावसायिक तेजीतून लाभ 
कन्या :
चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात भाव खाऊन जातील! ता. १४ व १५ हे दिवस एकूणच विजयोत्सवाचे. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक तेजीतून लाभ. काहींना कर्जमुक्तीचा आनंद. मात्र, शनिवार कुवार्तांनी ढगाळलेला राहील. हनुमानाचं दर्शन घ्याच! 
 
नोकरीत लाभदायक परिस्थिती 
तूळ :
पौर्णिमेच्या आसपासच्या काळात चंद्रकलांचा उत्कर्ष राहील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १५ हे दिवस ‘बाजीगर’ बनवतील. वधू-वरांची पसंती होईल. नोकरीतल्या विशिष्ट परिस्थितीचा लाभ मिळेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासच्या काळात प्रसिद्धियोग. कलाकारांना मोठ्या संधी. 

व्यवसायात मोठे लाभ 
वृश्‍चिक :
पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात गुरू-शुक्राची विशिष्ट स्थिती राहील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना श्रावणात ग्रीन कार्ड मिळेल! परदेशस्थ तरुण-तरुणींचा भाग्योदय. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे व्यावसायिक लाभ अपेक्षित आहेत. पुत्रोत्कर्ष होईल. 

घरात वाद-विवाद नकोत 
धनू :
सप्ताहात गुरू मार्गी होत आहे. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात प्रलंबित कामं होतील. वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतींतून यश. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणासंदर्भात मार्ग दिसेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात घरात रागावर नियंत्रण ठेवावं. वाद-विवाद करू नयेत. 

सतत कोडकौतुक होईल 
मकर : या सप्ताहात तुम्ही हुकमी एक्के घेऊनच वावरणार आहात! सप्ताह तरुण-तरुणींना भन्नाट राहील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती श्रावणी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शुभ ग्रहांच्या माध्यमातून खरं माहेरपण अनुभवतील! अर्थातच सतत कोडकौतुक होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ ते १६ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. शनिवारी भांडण टाळा. 

नातेवाइकांशी जपून वागा 
कुंभ :
पौर्णिमेच्या आसपासचा काळ तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा राहील. अहंकार जोपासत बसू नका. नातेवाइकांशी जपूनच. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात विचित्र गाठी-भेटींची. कोर्टप्रकरण उद्भवू देऊ नका. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींचे पौर्णिमेच्या आसपासच्या काळात वास्तुविषयक व्यवहार पूर्णत्वास जातील. वादग्रस्त येणं येईल. शनिवारी दुखापतींपासून काळजी घ्या. 

विसंवाद दूर होईल 
मीन :
हा सप्ताह तरुण-तरुणींना खासच फळं देईल. गुरू-शुक्रांची पौर्णिमेच्या आसपासची विशिष्ट स्थिती जीवनातला विसंवाद पूर्णपणे घालवेल. जीवनातली विशिष्ट दहशत संपेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींचा जीवनचित्रपट ७० एमएममध्ये प्रदर्शित होईल! वैवाहिक जीवनातले लव्हबर्डस्‌ व्हाल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार प्रतिकूल. काळजी घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com