जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 12 ते 18 जानेवारी

श्रीराम भट
रविवार, 12 जानेवारी 2020

शनी हा शिवाचा सारथी आहे. शिवाच्या साक्षीनं शनी सृष्टीच्या रथाचं सारथ्य करतो. आपल्याकडे पंचमहाभूतांच्या समोर साक्ष देण्याची पद्धत आहे. सत्य आणि असत्य अशा धूसर सीमेवर उभं असलेलं माणसाचं जीवन जगण्यातल्या अनेक तिन्हीसांजा अनुभवत असतं.

सत्यं‌, शिवं,‌ सुंदरम्‌! 
सृष्टीचा एक भाव आहे आणि हा भाव दिशांचं वस्त्र परिधान केलेला आहे. या अष्टदिशा सृष्टीचं पावित्र्य किंवा सत्त्व जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. या अष्टदिशा यमाच्या दरबारातील अष्टदिक्‍पाल या स्वरूपातच कार्यरत असतात. शनीला यमाग्रज असं म्हटलं जातं आणि हा रवीचा पुत्र अष्टदिशांच्या पदराच्या सावलीत (छायेत) जन्माला आला. अर्थातच शनी नावाचा हा जीवगर्भच होय आणि हा जीवगर्भ शिवाचा सत्त्वांश आहे. सृष्टी एका सत्यावर चालते आणि हे सृष्टीतलं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न मानवजात सदैव करत आलेली आहे. स्वेदज, जारज, उद्भीज व मणिज अशा चार प्रकारांमध्ये सृष्टी विभागलेली असते. पाशात किंवा बंधनात अडकणारा तो पशू आणि या पशुबंधनातून सोडवणारा तो पशुपतीनाथ! जीव हा पशूच आहे आणि मनुष्य हासुद्धा जीव आहे. माणसानं सृष्टीतल्या सत्याचा शोध घेत शिवांशरूपानं जगण्याचा आनंद घेतला पाहिजे, तरच त्याचं जीवन सत्यं, शिवं‌ आणि सुंदरम्‌ होईल. 

शनी हा शिवाचा सारथी आहे. शिवाच्या साक्षीनं शनी सृष्टीच्या रथाचं सारथ्य करतो. आपल्याकडे पंचमहाभूतांच्या समोर साक्ष देण्याची पद्धत आहे. सत्य आणि असत्य अशा धूसर सीमेवर उभं असलेलं माणसाचं जीवन जगण्यातल्या अनेक तिन्हीसांजा अनुभवत असतं. तिन्हीसांज ही शनीची आहे. संध्याकाळी निरांजनातून दीपाराधन करायचं असतं. सूर्यप्रकाशाइतका सत्य असा ‘वाक्प्रचार’ माणूस करत असतो; परंतु त्यातील मथितार्थ जाणून घेणं सध्याच्या काळात अतिशय आवश्‍यक होऊन बसलं आहे. मकरसंक्रांत हे एक चिंतन आहे; किंबहुना मकरसंक्रांत हा एक चिंतनाचा गाभा आहे. या चिंतनाच्या गाभाऱ्यात एक गर्भित नांदत असतं. 

मकरसंक्रांतीचा हा जीवगर्भ सत्यप्रकाशाच्या किंवा चैतन्याच्या साक्षीनं संक्रमित होऊन विश्र्वाच्या प्रांगणात मकर राशीच्या भक्कम पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतो. अशी ही सत्यप्रकाश दाखवणारी मकरसंक्रांत ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ या सत्यवाणीशी संबंधित आहे. कलियुग हे एक असत्यवादी युग आहे. अशा या डिप्लोमॅटिक कलियुगात पोटात एक आणि ओठात दुसरंच असं मार्केटिंग अनेकांना खड्ड्यात घालत असतं. माणसाचं जीवन हे सत्यवादी झालं तरच माणसाचा श्‍वास शब्दरूपानं मंत्र म्हणून अवतरत असतो आणि हा मंत्र म्हणजे सत्यं‌, शिवं‌, सुंदरम्‌ असाच असतो. 
मित्र हो, यंदाच्या मकरसंक्रांतीच्या प्रभावात शनी आपल्या पित्याची भेट घेत आहे, तीसुद्धा बुध आणि प्लूटो यांच्या संगतीत. त्यामुळेच बुधाची सद्‌सद्विवेकबुद्धीची साक्ष ठेवून आपण मकर संक्रांतीचा सूर्योदय पाहू या! 
========== 
नोकरीच्या उत्तम संधी 
मेष :
सप्ताहात मंगळाची एक विशिष्ट स्थिती राहील. दुखापतींपासून जपावं. बाकी, भरणी नक्षत्राच्या व्यक्ती मकरसंक्रमणाच्या अनेक माध्यमांतून सन्मानित होतील. नोकरीच्या उत्तम संधी येतील. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी रवी-शनी-बुध-प्लूटो ही चतुर्ग्रही सप्ताहाच्या शेवटी वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर खराब. 
========== 
दैवी चमत्कार घडेल! 
वृषभ :
हा सप्ताह तुम्हाला ग्रहयोगांतर्गत १४४ व्या कलमातून नेणारा! अतिरेकी स्वभावाच्या आजूबाजूच्या व्यक्तींपासून सावध राहा. ता. १७ व १८ हे दिवस तुमच्या राशीला मोठं उपद्रवमूल्य‌ असलेले. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवारची संकष्टी मोठ्या सुवार्तेची. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना मकरसंक्रांत प्रेमाश्रूंची. दैवी चमत्कार घडेल! 
========== 
राजकारणापासून दूर राहा 
मिथुन :
रवी-शनी-बुध-प्लूटो यांची चतुर्ग्रही सप्ताहावर प्रभाव टाकणारी. सहवासातील अतिरेकी स्वभावाच्या किंवा राजकारणी मंडळींपासून जपा. सार्वजनिक गोष्टीत नाक खुपसू नका. बाकी, आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा मकरसंक्रांतीच्या आसपास भाग्योदय. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार मानवी उपद्रवाचा. प्रेमप्रकरणातून त्रास. 
========== 
व्यावसायिकांना मोठा लाभ 
कर्क :
मकरसंक्रांतीचं प्रभावक्षेत्र रवी-शनी-बुध-प्लूटो यांच्या चतुर्ग्रहीद्वारे अपवादात्मक अशी फळं देणारं. चीजवस्तू सांभाळा. शिंग असलेली जनावरं आणि माणसं यांच्यापासून सावध! बाकी, ता. १३ च्या संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींसाठी भाग्याचा. खेळाडू, कलाकारांना आणि स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. 
========== 
नातेवाइकांशी वाद नकोत 
सिंह :
या सप्ताहात अपवादात्मक परिस्थितीतून मोठे लाभ उठवाल. मात्र, नातेवाइकांशी वाद नकोत. नवपरिणितांनी काळजी घ्यावी. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना विचित्र प्रसंगांना सामोरं जावं लागण्याची शक्यता. घरच्यांच्या विरोधात जाऊ नका. बाकी, पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना मकरसंक्रांत व्यावसायिक लॉटरीची. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग. तिन्हीसांजेला विशेष काळजी घ्या. 
========== 
प्रिय व्यक्तींची काळजी घ्या 
कन्या :
रवी-शनी-बुध-प्लूटो अशी चतुर्ग्रही चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींच्या बाबतीत एक प्रकारचं १४४ वं कलम घोषित करेल! तिन्हीसांजेला सर्वच बाबतींत आचारसंहिता पाळा. प्रिय वस्तूंची आणि प्रिय व्यक्तींची काळजी घ्या. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या प्रारंभी मोठे व्यावसायिक लाभ. ता. १६ रोजी सरकारी कामं मार्गी लागतील. 
========== 
संशयास्पद वागू नका 
तूळ :
तुमच्या राशीला हा सप्ताह एकूणच सार्वजनिक घटक-गोष्टींतून उपद्रवकारक ठरण्याची शक्यता. गावगुंडापासून सावध. संशयास्पद वागू नका किंवा संशयास्पद स्थितीत फिरू नका. सिग्नलला थांबताना काळजी घ्या. ता. १३ चा संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय सुवार्ता घेऊन येणारा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींनी देवदर्शनाला जावं. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. 
========== 
घरातली भांडणं टाळावीत 
वृश्‍चिक :
या सप्ताहात ग्रहयोगांतर्गत ‘हाय टेन्शन वायर’ राहील! ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी घरात भांडणं टाळावीत. गृहिणींनी भाजण्या-कापण्यापासून जपावं. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मकरसंक्रांत वैयक्तिक सुवार्तेची. व्यावसायिक लाभ. ता. १३ ची संकष्टी चतुर्थी एकूणच शुभलक्षणी. शनिवार जागरणाचा. लहान मुलांचा त्रास शक्य. 
========== 
दैवी चमत्काराचा लाभ मिळेल 
धनू :
राशीतील चतुर्ग्रही शनीच्या आधिपत्याखाली येईल. नम्रतेनं वागा. शिंग असलेल्या जनावरांपासून आणि माणसांपासूनही काळजी घ्या! उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती चतुर्ग्रहीच्या ‘हाय टेन्शन’खालून जातील. ता. १३ ची संकष्टी चतुर्थी पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी चमत्कारातून लाभ देणारी. शनिवारी संध्याकाळी भांडू नका. 
========== 
असंगाशी संग नको 
मकर :
हा सप्ताह वादग्रस्त ठरू शकतो. असंगाशी संग नको. घरात विचित्र पाहुणे येतील. मकरसंक्रांतीच्या आसपासच्या काळात चीजवस्तूंची काळजी घ्या. वाहनं सांभाळा. मंगळवार प्रवासात प्रकृतिअस्वास्थ्याचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती विचित्र घटनांमुळे प्रकाशात येऊ शकतात. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. 
========== 
विशिष्ट स्वप्न पूर्ण होईल 
कुंभ :
ता. १३ च्या संकष्टी चतुर्थीच्या आसपास जीवनातला चंद्रोदय होईल! विशिष्ट स्वप्न पूर्ण होईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींचा विशिष्ट भाग्योदय जीवनात जाण आणेल. बाकी, मंगळभ्रमणाची एक प्रकारची दहशत राजकीय व्यक्तींना राहू शकते. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट काळजीनं पोखरणारा. 
========== 
मानवी व्हायरसपासून दूर राहा 
मीन :
या सप्ताहात तुम्ही रवी-शनी-बुध-प्लूटो यांच्या चतुर्ग्रहीच्या ‘हाय टेन्शन वायर’खाली राहणार आहात. मकरसंक्रांतीचं प्रभावक्षेत्र प्रदूषित राहील. सभोवतालचे मानवी व्हायरस किंवा मानवी बॉम्ब यांच्यापासून काळजी घ्या. रेवती नक्षत्राच्या व्यक्ती क्षतिग्रस्त होऊ शकतात. गुरुवारी उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी चमत्काराचा अनुभव येईल!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weekly horoscope 12 January to 18 January 2020